कॉलेज सुरू होऊन आठवडा होऊन गेला. या आठवड्याभरात मला जाणवले की, अल्फा विक्षिप्त होता खरा, पण त्याचा विक्षिप्तपणा त्रासदायक नव्हता. त्याच्या कृती एखाद्या सामान्य माणसासारख्या नव्हत्याच. तो सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचे निरीक्षण करत असायचा. अभ्यासापेक्षा इतर गोष्टींची त्याला इतरांपेक्षा सखोल माहिती होती. वायफळ बडबड तर नॉनस्टॉप असायची. काही वेळा तत्वज्ञानही असायचे. पण ती डोकेदुखी होत नव्हती. माझी तर जाम करमणूक व्हायची. अल्फाची आणखी एक वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे, त्याचे 'शेरलॉक होम्स' वरचे अपरंपार प्रेम! मी शेरलॉक होम्सबद्दल फारसे वाचले नाहीये आणि मला 'होम्स एक काल्पनिक गुप्तहेर होता' यापलीकडे काहीही माहिती नाहीये, हे ऐकून अल्फाने मला वेड्यातच काढले.

"शेरलॉक होम्सबद्दल माहीत नसलेल्या लोकांनी दुसऱ्या ग्रहावर रहायला जावे!! " अल्फाने स्टेटमेंट मारले, " असा कसा रे तू टॉपर? अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरीक्त दुसरं काही वाचलंयस की नाही तू?? आणि शेरलॉक होम्सतर किती प्रसिद्ध नाव आहे. त्याबद्दल तुला यथातथाच माहिती कशी? "

" त्यात काय एवढं!! मला काही फार इंटरेस्ट नाही बाबा अवांतर वाचनात." मी म्हणालो, "आणि अभ्यासातून वेळ मिळाला तर वाचणार ना. तो होम्स काही मला पेपरला गणिते सोडवायला मदत करणार नाहीये. त्यामुळे मी मला जे आवश्यक आहे तेच वाचतो."

"खुपच निरस आहेस तू! " अल्फा उद्गारला, " शेरलॉक होम्सबद्दल माझ्यासारखा माणूस काय बोलणार? सर आर्थर कॉनन डॉयलचा मानसपुत्र तो. निरीक्षण - निष्कर्ष शास्त्राचा जनक. गुन्हे संशोधन क्षेत्राचा अनभिषिक्त राजा! त्याला लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, की ती व्यक्तिरेखा काल्पनिक होती हेच लोक विसरून गेले. त्याची गुन्हे संशोधनाची पद्धत आजही पोलीस आदर्श म्हणून वापरतात. एकोणिसाव्या शतकात सर डॉयलनी लिहीलेल्या शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा आजही तितक्याच ताज्या वाटतात. आख्खं जग वेडं आहे शेरलॉक होम्ससाठी, आजही. पण काय दुर्दैव! तुझ्यासारखे होम्सची माहिती नसणारे लोकही जगात आहेत! "

मी तर वैतागलोच. हे 'होम्सपुराण' रोजचंच होतं. पण हळूहळू मलाही त्याची सवय झाली. पण एक गोष्ट मात्र होती - अल्फाच्या डिटेक्टिव्हगिरीचा अजून मला प्रत्यय आला नव्हता. पण लवकरच एक सनसनाटी रहस्य आमच्या समोर उभे ठाकणार होते आणि अल्फाच्या बुद्धीचा कस लागणार होता.

अशीच एक मंगळवारची ढगाळलेली संध्याकाळ होती. दोन तीन दिवस पाऊस पडला नव्हता; पण ढगांचे आच्छादन कायम होते. आमच्या मेसमधून रात्रीचे जेवण उरकून मी आणि अल्फा रूमवर परतलो. दहा वाजायला आले होते. अल्फा कानात हेडफोन घालून निवांत गाणी ऐकत बसला. मी आपले 'बेसिक मेकॅनिकल इंजिनीअरिंग' चे पुस्तक उघडले. कॉलेजमध्ये शिकविण्याआधीच वाचायची माझी सवय होती. मी पानभरही वाचले नसेल, इतक्यात अल्फाचा सेलफोन खणाणला.

"हॅलो.." अल्फा बोलला, "शुभसंध्या! बोल रामू."

मग पुढची काही मिनिटे तो फक्त ऐकत राहिला. मध्ये मध्ये 'हं', 'बरं' असे तुटक शब्द तो वापरत होता. मी नुसताच त्याच्याकडे टकामका पाहत होतो. अल्फाने जेव्हा फोन ठेवला, तेव्हा त्याचा चेहरा चांगलाच गंभीर झाला होता. पण त्याचे डोळे मात्र उत्साह आणि उत्सुकतेने भरून गेले होते.

"कोणाचा होता रे फोन?" मी विचारले.

"माझा एक खास मित्र." अल्फा म्हणाला, "खुपच उत्कंठावर्धक गोष्ट सांगितलीय त्याने आत्ता मला."

"काय म्हणाला तो? " मी विचारले. अल्फा झटकन उठला आणि त्याने कपडे बदलायला सुरूवात केली.


" प्रकरण तसं गंभीर आहे. पण मी खुष आहे. बऱ्याच दिवसांनी  काहीतरी इंटरेस्टिंग समोर येतेय." अल्फा म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरील या प्रश्नचिन्ह पाहून तो पुढे म्हणाला, "मी तुला परवा म्हणालो नव्हतो का - 'आडमार्ग'!" अल्फाने आपले सामान कपाटात टाकले आणि केसबिस व्यवस्थित केले.


"आणि तू कुठे निघालायस आत्ता? " मी गोंधळून विचारले.


" सांगलीच्या गांवभागात. " अल्फा उत्तरला. त्याची बाहेर जाण्याची सगळी तयारी झाली आणि मग त्याने मला विचारले, " तू येतोयस? "


" अरे पण मला कळू तरी दे काय प्रकार आहे ते! "


" ते मी जाताना वाटेत सांगेनच. हा आडमार्ग आहे प्रभव. तू जर आत्ता इथे बसून तुझे पुस्तक वाचणे पसंत केलेस, तर तुझी वेळ नेहमीप्रमाणेच, सरळ जात राहिल. पण मी जिकडे निघालोय तिकडे, मी तुला हमी देतो, की तुला नक्कीच एखादा रोमांचक अनुभव मिळेल. विचार कर. तुला फक्त माझे बूट घालून होईपर्यंतच वेळ आहे. "


मी घाईघाईने बूट घालणाऱ्या अल्फाकडे पाहतच राहिलो. क्षणभर विचार केला आणि मग पुस्तक मिटून बाजूला फेकले.


" शाबास! मला अपेक्षा होतीच, की तुला त्या बोअरींग पुस्तकापेक्षा माझ्यासोबत यायला जास्त आवडेल. आणि ती तू फोल ठरवली नाहीस. " अल्फा हर्षोल्हासित होऊन म्हणाला, " मी तुला आणखी एक मिनीट देतो, आवरण्यासाठी. आत्तापर्यंत आपण खाली असायला हवे होते. आधीच खुप उशीर झालाय. "


मिनीटभरात मी आवराआवर केली आणि झपाझप पावले टाकत आम्ही खालच्या रोडवरून चालू लागलो. मेन रोडला आम्ही एक रिक्षा पकडली.


" गांवभागातला राजवाडा. " अल्फा म्हणाला. रिक्षा सुरू झाली. मग पुढचे मिनिट शांततेतच गेले. मग न राहवून मी विचारले,


" आता मला सांग, नक्की काय झालंय? "


" सांगलीच्या राजवाड्यातील म्युझियममध्ये खून झालाय. " अल्फा गंभीरपणे म्हणाला. माझ्या छातीत धस्स झाले, " तिथल्या रखवालदाराचा खून झालाय, आणि म्युझियममधील शेकडो वर्षे जुना आणि अतिशय मौल्यवान असा एक रत्नजडित खंजीर चोरीला गेलाय. "


" काय?? " मी डोळे विस्फारून म्हणालो.


" होय. म्युझियमच्या चेअरमननी तर धसका घेऊन अंथरुणच धरलंय. खुपच गंभीर घटना. "


" मग आत्ता आपण म्युझियमकडेच निघालोय का? "


" होय. " अल्फा तुटकपणे म्हणाला. मला पुढे काही विचारवले नाही. दहा मिनिटे आम्ही तसेच गप्प बसून राहिलो. रिक्षा गांवभागाच्या दिशेने धावत होती. रात्र असल्यामुळे रस्त्यांवर फारशी रहदारी नव्हती आणि शिवाय आमची रिक्षादेखील वेगात असल्याने थोड्याच वेळात आम्ही राजवाड्याच्या समोर आलो. रिक्षावाल्याचे पैसे चुकते केले आणि आम्ही राजवाड्याच्या दिशेने चालू लागलो. सांगलीचा राजवाडा भव्य होता. त्याच्या मागील बाजूस हे म्युझियम होते. खरे तर तो राजवाड्यातील एक महालच होता, पण आता त्याचे संग्रहालयात रुपांतर करण्यात आले होते. जुन्या पद्धतीची बांधणी, रात्रीची शांतता आणि त्यातच भर म्हणून असा भयानक प्रसंग, या सर्वांमुळे ते संग्रहालय भेसूर वाटत होते.


आम्ही संग्रहालयाच्या महालापासून थोड्या अंतरावर उभे राहिलो. अल्फा विचारांत गढलेला असल्यामुळे मी त्याच्याशी न बोलता राजवाड्याचे निरीक्षण करीत राहिलो. अल्फा संग्रहालयात का जात नाहीये, असा मला प्रश्न पडला होता. पण तो बहुधा कोणाचीतरी वाट पहात असावा. दोनच मिनीटांत आमच्या समोर एक किंमती फोक्सवॅगन येऊन उभारली. त्यातून एक बऱ्यापैकी वृद्ध, काळ्या - पांढऱ्या अशा संमिश्र केसांचा, थोड्याशा सुरकुतलेल्या चेहऱ्याचा, धारदार व तीक्ष्ण डोळ्यांचा आणि दणकट शरीरयष्टी असलेला माणूस उतरला. त्याने इकडेतिकडे पाहिले आणि आम्ही दिसताच तो आमच्या दिशेने आला.


"अरे देवा! हा अल्फा तर नाही ना? " अंधारात आमचा अंदाज घेत त्यांनी विचारले.


" हो, मीच आहे, वाघमारे सर. " अल्फा पुढे होत म्हणाला. वाघमारेंच्या चेहर्‍यावर आश्चर्य आणि वैताग असे दुहेरी भाव होते. अल्फाने मला ओळख करून दिली, " प्रभव, हे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. वाघमारे. "


पण वाघमारेंना या शिष्टाचारांमध्ये स्वारस्य नव्हते. ते ताडकन् म्हणाले, " तुला ही गोष्ट कशी काय कळाली? अजून तर  बाकीच्या पोलिसांनाही काही ठाऊक नाहीये. "


" मला माहिती मिळवणं फारसं अवघड नाहीये सर. माझे मित्र सर्वत्र आहेत. " अल्फा स्मित करीत म्हणाला.


" रामू! मूर्ख कुठला! त्याला बघतोच जरा मी " वाघमारे म्हणाले, " आणि हा कोण? याला कशाला घेऊन आलायस सोबत?"


"हा माझा नवीन रुममेट आणि मित्र, प्रभव." अल्फा म्हणाला. वाघमारेंनी माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.


"हे बघ पोरा. तुझं आत्ता इथं येणं मुळीच अपेक्षित नाहीये. तू नेहमीच आमच्या कामात लुडबुड करीत असतोस. पण हे प्रकरण अतिशय संवेदनशील आणि गोपनीय आहे. या घटनेबद्दल लोकांना कळाले तर मोठे संकट कोसळेल. त्यामुळे तू इथून काढता पाय घ्यावास हेच उत्तम. आणि या तुझ्या नव्या मित्रालाही घेऊन जा. "


" पण सर, मी ज्या प्रकरणांमध्ये लुडबुड करतो, ती प्रकरणे लगेच सुटतात हेदेखील तितकंच खरं आहे, नाही का?" अल्फा मिश्कीलपणे म्हणाला, " आणि शिवाय केलेल्या मदतीची मी कुठे वाच्यताही करत नाही. दरवेळी श्रेय तुम्हालाच जाते आणि नाव तुमचेच होते. बरोबर आहे ना?"


" काही बरोबर वगैरे नाही! " ते खेकसले, " आणि ती प्रकरणे लगेच सुटतात कारण त्यामागे माझी कर्तबगारी असते, तुझी मदत नव्हे! " त्यांनी एकवार संग्रहालयाकडे पाहिले आणि डोक्यावरून जोरात हात फिरवला.


" मी काय करतोय इथे!! " मग ते अल्फाकडे वळले, " बरं, ठिकाय. ये बाबा. भांडायची ही काही योग्य वेळ नाही. उगीच फुकट माझ्या डोक्याला ताप नको. पण लक्षात ठेव - याबद्दल कुठेही काहीही बोलायचं नाही. जे काही असेल ते गुपचूप करायचं,समजलं? आणि तुझ्या या नव्या मित्रालापण सांग. "


" माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद, सर. या गोष्टीची कुणाला कानोकान खबर जाणार नाही, याची पूर्ण काळजी मी घेईन. " अल्फा गालातल्या गालात हसत म्हणाला. त्याचे बोलणे संपेपर्यंत वाघमारे संग्रहालयाच्या दिशेने निघालेही होते, "घडलेल्या प्रसंगाबद्दल मला खुपच पुसट माहिती आहे. मला सविस्तर सांगा ना सर, काय घडले ते. हा प्रसंग घडला कधी?"


"साधारणतः अर्धा तास आधी. " चालता चालता वाघमारे म्हणाले, " खुपच भयानक संकट कोसळले आहे संग्रहालयाच्या समितीवर. तो खंजीर म्हणजे सांगलीच्या म्युझियमचे भूषण होतेे. जवळपास दिडशे वर्षे जुना. त्यावर त्या काळातले तीन हिरे आणि चार माणके, अशी मिळून एकूण सात बहुमूल्य रत्ने होती- खंजिराच्या मुठीवर. गेल्या सत्तर वर्षांपासून तो संग्रहालयात सुरक्षित होता. पण आत्ताच अर्ध्या तासापूर्वी तो तेथून गायब झालाय. म्युझियमच्या संचालकांचा मला तातडीचा फोन आला होता. ते तर जवळपास रडकुंडीलाच आले होते. त्यांनी अक्षरशः गयावया केली आहे. ही बातमी जर फुटली, तर संग्रहालयाच्या समितीवर खुप मोठी कुऱ्हाड पडेल. त्यामुळे हे प्रकरण गुप्त ठेवण्याच्या अटीवर मी येथे आलोय."


"ठिक आहे सर. मी यात तुम्हाला योग्य ती मदत करेन."


वाघमारेंनी गंभीरपणे मान डोलावली.



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel