एक दिवस राम सिंहासनावर विराजमान होते आणि त्यांची अंगठी खाली पडली. खाली पडताच ती जमिनीच्या एका छिद्रात गेली. हनुमानाने ते पहिले तेव्हा त्याने लघु रूप धारण केले आणि तो त्या छिद्रात शिरला. हनुमान कोणत्याही छिद्रात शिरू शकत असे, मग ते कितीही लहान का असेना.

हनुमान त्या छिद्रात चालत राहिला, परंतु त्या मार्गाचा शेवटच दिसत नव्हता. तेवढ्यात अचानक तो पाताळात पडला. पाताळ लोकातील कित्येक स्त्रिया आरडओरडा करू लागल्या "अरे बघा बघा, वरून एक छोटेसे माकड पडले आहे." त्यांनी हनुमानाला पकडले आणि एका थाळीत सजवले. पाताळ लोकांत राहणाऱ्या भूतांना जीव जंतू खाणे अतिशय आवडत होते, म्हणूनच छोट्या हनुमानाला माकड समजून त्यांनी त्याला जेवणाच्या थाळीत सजवले. थाळीत बसलेला हनुमान संभ्रमात पडलेला की आता काय करावे?


http://i1.dainikbhaskar.in/thumbnail/655x588/web2images/www.dailybhaskar.com/2014/12/11/9160_1.jpg

तिकडे राम, हनुमान त्या छिद्रातून बाहेर येण्याची वाट पाहत बसलेले. तेवढ्यात वसिष्ठ मुनी आणि ब्रह्मदेव त्यांना भेटायला आले. ते रामाला म्हणाले, "आम्हाला आपल्याशी एकांतात काही बोलायचे आहे. कोणीही त्यात बाधा आणावी किंवा आपले बोलणे ऐकावे हे आम्हाला नकोय. तुम्हाला हे मान्य आहे?"

रामाने सांगितले, "मान्य आहे."

त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, "आपण एक नियम बनवूया. जर आपले बोलणे चालू असताना कोणी इथे आले तर त्याचा शिरच्छेद केला जाईल."

राम म्हणाले, "जशी तुमची इच्छा."

आता प्रश्न असा होता की सर्वांत विश्वसनीय द्वारपाल कोण असेल जो कोणालाही आत येऊ देणार नाही? हनुमान तर अंगठी आणायला गेला होता. अशात रामाने लक्ष्मणाला बोलावले आणि सांगितले की तू जा आणि कोणालाही आत यायला देऊ नको. लक्ष्मणाला सर्व काही समजावून सांगून रामाने त्याला द्वारपाल बनवले.

लक्ष्मण द्वारावर उभा होता, तेव्हा महर्षी विश्वामित्र तेथे आले आणि म्हणाले, "मला रामाला त्वरेने भेटण्याची आवश्यकता आहे. ते कुठे आहेत?"

लक्ष्मण म्हणाला, "आदरणीय मुनिवर, आत्ता आत जाऊ नका. ते अन्य काही लोकांसोबत अतिशय महत्त्वाची चर्चा करत आहेत."

विश्वामित्र म्हणाले, "अशी कोणती गोष्ट आहे, जी राम माझ्यापासून लपवत आहे?"

विश्वामित्र पुन्हा म्हणाले, "मला आत्ताच, अगदी अत्ताच आत जायचे आहे."

लक्ष्मण म्हणाला, "तुम्हाला आत जाऊ देण्यापूर्वी मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल."

विश्वामित्र म्हणाले, "मग आत जा आणि विचारून ये."

तेव्हा लक्ष्मण म्हणाला, "मी तोपर्यंत आत जाऊ शकत नाही जोपर्यंत राम बाहेर येत नाहीत. तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल."

विश्वामित्र संतापले आणि म्हणू लागले, "जर तू आत जाऊन माझ्या आगमनाची वार्ता दिली नाहीस तर मी माझ्या अभिशापाने आत्ता सारी अयोध्या भस्मसात करीन."

लक्ष्मणासमोर धर्मसंकट उभे राहिले. आत्ता आत गेलो तर मी मरेन आणि नाही गेलो तर महर्षी आपल्या रागात संपूर्ण अयोध्या भस्म करतील. तेव्हा लक्ष्मणाने विचार केला की त्यापेक्षा मी एकट्याने मरणेच योग्य आहे आणि तो आत गेला.

रामाने विचारले, "काय हवे?"

लक्ष्मण म्हणाला, "महर्षी विश्वामित्र आले आहेत."

राम म्हणाले "आत पाठवून दे."

विश्वामित्र आत आले. एकांत वार्ता तोपर्यंत संपलेली होती. ब्रह्मदेव आणि वसिष्ठ रामाला असे सांगायला आले होते की आता तुमचे मृत्युलोकातील कार्य संपन्न झाले आहे. तेव्हा आता तुम्ही राम अवतार रुपाला त्यागून हे शारिर सोडून देऊन पुन्हा ईश्वर रूप धारण करावे. ब्रम्हा आणि वसिष्ठ मुनींना एवढेच रामाला सांगावयाचे होते.

परंतु लक्ष्मण रामाला म्हणाला, "दादा, तुम्हाला माझा शिरच्छेद करावा लागेल."

राम म्हणाला, "का? आता आम्हाला काहीही बोलायचे नव्हते. तर मी तुझा शिरच्छेद कशाला करू?"

लक्ष्मण म्हणाला, "नाही. तुम्ही असे करू शकत नाही. तुम्ही मला केवळ तुमचा बंधू आहे म्हणून सोडू शकत नाही. हा रामाच्या नावावर एक कलंक असेल. मला दंड मिळालाच पाहिजे कारण मी तुमच्या एकांत चर्चेत विघ्न आणले आहे. जर तुम्ही दंड दिला नाही तर मी प्राणांचा त्याग करेन."

लक्ष्मण शेषनागाचा अवतार होता, ज्याच्यावर विष्णू आराम करतो. त्याचा देखील काल पूर्ण झाला होता. तो सरळ शरयू नदीकडे गेला आणि तिच्या प्रवाहात विलुप्त झाला. जेव्हा लक्ष्मणाने आपले शरीर त्यागले तेव्हा रामाने आपले सर्व अनुयायी, बिभीषण, सुग्रीव, आणि इतरांना बोलावले आणि आपले जुळे पुत्र लव आणि कुश यांच्या राज्याभिषेकाची व्यवस्था केली. यानंतर रामाने देखील शरयू नदीत प्रवेश केला.

यादरम्यान तिकडे हनुमान पाताळ लोकात होता. त्याला शेवटी भुतांच्या राजाकडे नेण्यात आले. त्यावेळी तो सतत रामाचे नाव जपत होता,

"राम... राम... राम...!"

भुतांच्या राजाने विचारले "तू कोण आहेस?"

हनुमान म्हणाला "हनुमान."

राजाने विचारले "इथे का आला आहेस?"

हनुमान म्हणाला "रामाची अंगठी एका छिद्रात पडली. मी तिला बाहेर काढायला आलो आहे."

भूतांचा राजा हसू लागला. मग त्याने इकडे तिकडे पहिले आणि हनुमानाला अंगठ्यायंनी भरलेली थाळी दाखवली. थाळी दाखवून तो म्हणाला, "यातून तू आपल्या रामाची अंगठी घेऊन जा. मला नाही माहित की कोणती अंगठी तुझ्या रामाची आहे."

हनुमानाने सर्व अंगठ्या बारकाईने पहिल्या आणि म्हणाला, "मलाही माहित नाही यापैकी कोणती अंगठी रामांची आहे ते. सर्व अंगठ्या एकसारख्याच दिसत आहेत."

भूतांचा राजा म्हणाला की या थाळीत जेवढ्या अंगठ्या आहेत त्या सर्व रामाच्याच आहेत. परंतु त्यातली तुझ्या रामाची कोणती हे तुलाच ओळखावे लागेल. या थाळीत जेवढ्या अंगठ्या आहेत, तेवढे राम आतापर्यंत झाले आहेत.

आणि ऐक हनुमान, जेव्हा तू धरतीवर परत जाशील तेव्हा तुला तिथे राम भेटणार नाहीत. रामाच्या या अवताराचा अवधी समाप्त झाला आहे. जेव्हा कधी रामाच्या एखाद्या अवताराचा अवधी समाप्त होणार असतो, त्यांची अंगठी खाली पडते. मी त्या उचलून ठेवतो. आता तू जाऊ शकतोस.

 

 धन्यवाद...!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel