एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन । श्‍वानविष्ठेसमान । अधम जन ते एक ॥१॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन । गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णुसीं ॥२॥
अशुद्ध विटाळशीचे खळ । विडा भक्षितां तांबुल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥३॥
सेज बाज विलास भोग । करिती कामिनीचा संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥४॥
आपण नवजे हरिकीर्तना । आणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा तो महोमेरु ॥५॥
तया दंडी यमदुत । झालेस तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकाद्शी चुकलिया ॥६॥
*
पंधरा दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझा जीव जातो  एका दिसें । फ़राळाच्या मिसें धनी घेसी ॥२॥
स्वहित कारण मानवेल जन । हरिकथ पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥४॥
तुका म्हणे कां रे सकुमार झालासी । काय जाब देसी यमदुतां ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel