सहस्रार्जुनाच्या शंभर पुत्रांपैकी शूर, शूरसेन, कृष्ण, धृष्ण व जयध्वज हे विशेष शूर व धार्मिक प्रवृत्तीचे होते. जयध्वज हा विष्णूंचा तर इतर चौघे रुद्राचे भक्त होते. जयध्वज विष्णूंची आराधना करीत असता ते चौघे म्हणाले, "आपले वाडवडील शंकरभक्त होते. तरी तूही तसेच कर." यावर जयध्वज म्हणाला, "पृथ्वीवरचे सर्व राजे भगवान विष्णूंचा अंश आहेत. विष्णूच जगाचे पालन करतात. म्हणून राज्यकर्त्यांनी विष्णूचीच पूजा केली पाहिजे." अशा प्रकारे वादविवाद वाढत गेला. तेव्हा ते सर्व जण सप्तर्षींच्या आश्रमात गेले व त्यांनी त्यांचे म्हणणे विचारले. तेव्हा वसिष्ठ व इतर मुनी म्हणाले, "ज्याला जी देवता मान्य होते तीच त्याची इष्ट देवता होय; पण काही विशेष कार्यासाठी इतर देवांनाही भजतात. राजांसाठी विष्णू हाच देव होय. विद्येची देवता सरस्वती, तर राक्षसांचा आराध्य देव शंकर व किन्नरांची देवता पार्वती आहे." हे ऐकून जयध्वजाने विष्णूची आराधना करणे योग्य असे ठरले. तो आपल्या सुंदरपूर नगरीस येऊन प्रजेचे न्यायबुद्धीने पालन करू लागला.
एकदा विदेह नावाचा एक क्रूर राक्षस तेथे आला. त्याला पाहून प्रजाजन भीतीने पळू लागले. शूराने रौद्रास्त्र तर शूरसेनाने वरुणास्त्र सोडले. कृष्णाने प्राजपत्यास्त्र तर धृष्णाने वायव्यास्वाचा प्रयोग केला; पण तो विदेह अजिंक्‍यच राहिला. बुद्धिमान जयध्वजाने विष्णूंचे स्मरण केले. विष्णूंनी सूर्याप्रमाणे तेजस्वी चक्र जयध्वजास दिले. त्याच्या साह्याने त्याने विदेहाचा नाश केला. त्याच्या सर्व बंधूंनी जयध्वजाची स्तुती केली.
जयध्वजाचा हा पराक्रम ऐकून महर्षी विश्‍वामित्र तेथे आले. त्यांना सन्मानपूर्वक आसनावर बसवून राजा जयध्वजाने त्यांना भगवान विष्णूंबद्दल सविस्तर माहिती विचारली. तेव्हा विश्‍वामित्र म्हणाले, "विष्णू या जगतात सर्वत्र स्थित आहेत. निष्कामभावाने त्याची प्रार्थना केल्यास मोक्ष मिळतो," असे म्हणून विश्‍वामित्र निघून गेले.
त्यानंतर वसिष्ठ, गौतम, अगस्ती, अत्री यांनी जयध्वज व त्याच्या भावांसाठी यज्ञ केले. त्यांच्या भक्तीमुळे भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. अशा प्रकारे जयध्वजाची विष्णुभक्ती त्याला व इतरांनाही मोक्षप्राप्तीस कारण ठरली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel