ब्रह्मदेवाचा पुत्र क्षुप हा महान तेजस्वी राजा होता. मुनिश्रेष्ठ दधिचाचा तो परम मित्र होता. एकदा दोघांत "राजा श्रेष्ठ की मुनी?' यावरून वाद झाला व तो विकोपाला गेला. दधीच हा उग्र स्वभावाचा असल्यामुळे त्याने रागाच्या भरात क्षुपाच्या डोक्‍यावर मुठीने प्रहार केला. क्षुपाने यावर आपल्या वज्राने दधिचाला मारले. दधीच जमिनीवर पडला. त्याने भृगुपुत्र शुक्राचे स्मरण केले. शुक्र योगगतीने तिथे पोचले. त्याने दधिचालाजिवंत केले व त्याला संजीवनी विद्या दिली. दधिचाने स्वाध्याय व ध्यास याद्वारे संजीवनीमंत्राचा अभ्यास केला व शंकराची आराधना करून अमरत्व प्राप्त करून घेतले. त्यामुळे नंतर क्षुपाने केलेल्या वज्राच्या आघातांनी दधिचाचे शरीर जखमी झाले नाही. ते पाहून राजा क्षुपाने विष्णूची आराधना सुरू केली. भगवान विष्णू क्षुपाला प्रसन्न झाले. पण दधीच हा शिवभक्त असल्याने त्याला मृत्यूचे भय नाही हे विष्णूने जाणले. तरीही दधिचावर विजय मिळवण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी याचकाचे रूप घेऊन विष्णू दधिचाकडे गेले व शिवाच्या प्रार्थनेत मग्न असलेल्या दधिचाला ते काही मागू लागले. दधिचांनी विष्णूचे याचक रूप ओळखले व आपण क्षुपाची बाजू घेऊन आला आहात, तरी भगवान रुद्रांची भक्ती केल्याने मी कशालाच भीत नाही असे सांगितले. दधिचाचे हे बोलणे ऐकून भगवंतांनी क्षणात आपले मूळ रूप धारण केले व तुम्ही राजा क्षुपास सोडून द्यावे, असे सांगितले. पण दधिचांनी यास नकार दिला. यावर विष्णूंनी क्रोधाने आपले सुदर्शनचक्र सोडून दधिचास जाळण्याचा प्रयत्न केला. पण तेही प्रभावहीन झाले. सर्व देव विष्णूच्या साह्यासाठी आले. त्या वेळी दधिचाने शिवांचे स्मरण करून दर्भाच्या साह्याने अग्नीसारखे जाळणारे त्रिशूळ तयार केले. त्यामुळे नवल वाटून भगवंतांनी आपले विश्‍वरूप प्रकट केले. मग दधिचाने विष्णूची प्रार्थना करून म्हटले, "आपल्या या मायेचा काय उपयोग? आपण ही माया सोडून युद्धास तयार व्हावे." महाविष्णू अंतर्धान पावले. दधीच मुनीचा हा महिमा पाहून राजा क्षुप त्याच्यापुढे नम्र झाला व त्याने क्षमा मागितली. दधिचाने त्याला सोडून दिले. तो त्याला म्हणाला, "राजा, देव, नृप, गण यांना मुनी हे पूजनीय असतात," असे म्हणून तो आपल्या कुटीत गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel