इंग्रज आता जवळजवळ सर्व हिंदुस्थानाचे स्वामी झाले होते. अजून सारा पंजाब त्यांनी ताब्यात घेतला नव्हता. तो डलहौसीस शेवटचा घास राखून ठेवण्यात आला होता. एखाद्या भागाचा भौगोलिक कब्जा घेताच तेथील आर्थिक कब्जाही इंग्रज घेत. तेथील उद्योगधंदे मारण्याला ते उशीर लावीत नसत. इंग्लंडमध्ये भराभर गिऱण्या वाढू लागल्या होत्या. कारण हिंदूस्थान ही नवीन पेठ त्यांना मिळाली होती. परंतु इंग्लंडमधल्या यांत्रिक युक्तीने भराभरा निघणारा माल हिंदुस्थानात खपणार कसा ? हिंदुस्थानातील खेड्यापाड्यांतून माग पसरलेले आहेत, तोपर्यंत इंग्रजांचा माल घेणार कोण ?

हिंदुस्थानातील व्यापा-यांची, हिंदी कारागिरांनी विणलेली रेशमी वस्त्रे, तलम मलमली यांनी भरलेली गलबते पूर्वी युरोपला जात असत. इंग्लिश खाडीतून जात असत, फिरत असत. परंतु इंग्रजांनी या गोष्टीला कायद्याने बंदी केली. हिंदी व्यापा-यांची शेकडो गलबते घरी बसली, तो उद्योगधंदा इंग्रजांनी मारला ; व्यापारी वाहतूक सारी आपल्या हातात त्यांनी घेतली. इंग्लडमध्ये तरीही हिंदुस्थानातील माल खपे ! परंतु हिंदुस्थानीतील भारी जकाती देऊनही स्वस्त पडणारा माल जर इंग्लंडमध्ये कोणी वापरील तर त्याला कायद्याने शिक्षा ठरवली गेली. हिंदुस्थानातले वस्त्र वापरणे हा इंग्लंडमध्ये फौजदारी गुन्हा ठरला ! इंग्लडमध्ये हिंदी कपडा बंद झाला, युरोपमध्येही बंद झाला. कारण इंग्रज कंपन्या माल नेतनाशाच झाल्या. हिंदी गलबते नाहीशी झाली.

हिंदुस्थानात मात्र अजून हिंदी माल खपत होता ; तो कसा नाहीसा करावा, हिंदी लोकांच्या घरीही इंग्रजी माल, इंग्रजी कपडा कसा भरावा, याचा दयाळू, व मायाळू इंग्रज विचार करु लागले ! हिंदी स्त्रिया घरोघर सूत कातीत. या सुतावर इंग्रजीने कर घेण्याचे सुरु केले. त्यामुळे सूत विकत घेणार्‍या विणकराला ते महाग प़डू लागले. इंग्लंडमधून मिलमधले आयते सूत इकडे इंग्रज पाठवू लागला व ते बाजारात स्वस्त विकू लागला. विणकर लोक हे स्वस्त सूत विकत घेऊ लागले व त्याचे कपडे विणू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel