विनयी पत्नी दारात अश्रू ढाळीत, केविलवाणी पाहत उभी राहिली व शेवटी ती केळीप्रमाणे पडली ! मुलगा बाहेर गेला होता. त्याला बातमी लागली. तो धावत घरी आला, तो आई निश्चेष्ट पडलेली ! मुलगा आईला वारा घालू लागला. त्याच्या डोळ्यांना पाणी लावू लागला. “मा, मा गो- मा, मा !” तो रडू लागला. आली, मा- शुद्धीवर आली.

“काय रे बाळ, कसे रे होईल, ते मांग घेऊन गेले रे. मारतील, छळतील. काय काय करतील ? बाळ ?” असे म्हणून मुलाला कवटाळून मा रडत होती. हंबरठा फो़डीत होती. बाळही रडत होता. त्या दोघांचे सांत्वन कोण करणार ?

राखालला पोलीस ठाण्यावर नेण्यात आले.

“तू कोणाच्या सांगण्यावरून विणलेस, का विणलेस, कोणाला विकलेस, सांग ?” असे त्याला धमकावण्यात आले.

अधिका-यांना कळले होते. परंतु त्याच्या तोंडून दिगंबर रायांचे नाव काढावयाचे होते. परंतु राखाल एक शब्द बोलेना, “मी विणणार, हजारदा विणीन, वाटेल त्याला विकीन. तुम्ही मला मारा, वाटेल ते करा, मी काही एक बोलू इच्छित नाही.”

त्याला वेत मारण्यात आले. तो कलावान वीर हार गेला नाही. त्याला एका अंधार्‍या खोलीत कोंडण्यात आले. उपाशी राखण्यात आले. हाल सुरू झाले. धर्माची पूजा करणार्‍याला, केलेची पूजा करणार्‍याला हाल म्हणजे हारच वाटतो ! इंग्रज का कलेचे उपासक आहेत ? गोरे लोक का कलेचे उपासक अहेत ? ग्रीक लोक का कलेचे उपासक होते? गुलामाने जर उत्कृष्ट शिल्प-वस्तू तयार केली तर ग्रीक लोक त्याला देहांत प्रायश्चित्त देत ! परंतु पेरिक्लिस, -थोर पेरिक्लिस ! त्याने तो कायदा बदलला. ‘खरे कलापूजक व्हा.’ असे ग्रीक लोकांस त्याने सांगितले. ज्याला कलेची खरी भक्ती आहे, तो कलापूजकाला, कलाभक्ताला पाहून नाचेल, आनंदेल. भक्ताला खरा भक्त पाहून अत्यानंद होतो. संतांची भेट म्हणजे दिव्य दर्शन
आहे. इंग्रज ते कलापूजक नव्हते. ते धनपूजक होते. त्यांनी कलाभक्तांचा उच्छेद मांडला. छळ मांडला.

वार्ता दिगंबर रायांच्या कानावर गेली. तो दिलदार पुरुष कळवळला. माझ्यासाठी बिचार्‍या राखालला राखेचे तोबरे ! दिगंबर राय पोलीस अधिकार्‍यांना भेटले व म्हणाले, “मी खरा अपराधी आहे. मला शासन करा. मी त्याला विणायला सांगितले. मला हे मिलचे सूत पसंत नाही. याहून सुंदर व तलम, निर्मल व धर्मळ असे आयाबहिणींच्या पवित्र बोटांनी काढलेले सूत, ते मला प्राणाहूनही प्रिय आहे. त्याचेच पवित्र वस्त्र मला मंगल विवाहासाठी पाहिजे होते. तो गरिब बिचारा, त्याने माझे म्हणणे ऐकले. मला शिक्षा करा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel