ही एक लघुकथा आहे. फेब्रुवारी २०१० सालच्या हास्यगारवा या ई-हिवाळी अंकामधे प्रकशित झाली होती. इथे पुन:प्रकाशित करत आहे.

शैलेश नावाचा माझा एक मित्र आहे. कॉम्प्युटरमधला किडाच म्हणा ना! कॉम्प्युटरवर काम करताना एखादी अडचण आली आणि त्याला फोन केला, तर चुटकीसरशी अडचण सोडवायचा तो.

पण त्याला फोन करायचा म्हणजे एक वेगळाच त्रास असायचा. त्याच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्स! शैलेशचा मूड आणि शैलेशच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्स सतत बदलत असायच्या. गाण्यांची आवड आणि त्याचा बदलता मूड याचा अचूक मेळ मला त्याच्या मोबाईलच्या कॉलर ट्यून्समधे ऐकायला मिळे. कॉलर ट्यून म्हणून शोले मधील गब्बरसिंगचे डायलॉग ऐकायला आले, तर समजायचं. कार्ट्याने अजून क्रेडीट कार्डची उधारी चुकती केलेली नाही. पैशांसाठी क्रेडीट कार्ड कंपनी वारंवार फोन करत असणार. त्यानंतर काही दिवस आमच्यासारख्या मित्रांच्या कानाला दिलासा म्हणून की काय, त्याने काही दिवस नुसतीच कुठलीतरी धून, कॉलर ट्यून म्हणून लावून घेतली होती. पण आमचं ते सुख काही दिवसच टिकलं. ‘रविवारी एकत्र जमू या’, हे सांगण्यासाठी त्याला फोन केला आणि....

"अब तेरे बिन, जी लेंगे हम...." कुमार सानू उसासे देत होता. मी लगेच ताडलं, ह्याचं ब्रेक अप झालं. पुढे काही बोलायची सोय नव्हती. आता ही कॉलर ट्यून पुढचे किमान पंधरा दिवस तरी त्याच्या मोबाईलवर वाजणार याची खात्री आम्हा मित्रमंडळींना होती. त्याचं ब्रेक अप आम्ही गंभीरपणे घेतलंही असतं पण हे त्याचं दुसरं... नाही, बहुधा तिसरं ब्रेक अप होतं. त्यानंतर आम्ही जवळजवळ वीस दिवस शैलेशला फोन करणं टाळलंच. एकदा असंच कामासाठी म्हणून त्याला फोन केला तर कॉलर ट्यूनवर "मै जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुँवे में उडाऽऽऽ" सुरू होतं.

आता ह्या पोराने काय लोचा केला? माझं काम बाजूला ठेवून आधी त्याला त्याच्या बद्दल विचारलं.

"नोकरीचा राजीनामा दिला!" त्याने हसत सांगितलं.

मला माझ्या नोकरीचा राजीनामा दिल्यावरही जितकं दु:ख झालं नसतं, तितकं त्याच्या राजीनाम्याची बातमी ऐकून झालं. त्याने त्याच्या तिस-या नोकरीचा राजीनामा दिला होता.

"अरे इथे लोकांना एक नोकरी मिळताना मारामार होते. मिळाल्यावर ती टिकवायची कशी, असा प्रश्न पडतो आणि तू पावसाच्या साचलेल्या पाण्यावर कागदाची होडी सोडावी, तेवढ्या सहज नोकरी कशी रे सोडतोस?"

"मन नाही रमलं, दिला सोडून जॉब." त्याने कारण सांगितलं.

पहिली नोकरी सोडताना तो जितका बेफिकीर होता, तितकाच बेफिकीर तो ही नोकरी सोडतानाही होता. अशाच लोकांना फटाफट नोक-या कशा मिळतात, देव जाणे! नोकरी सोडल्यावरही कॉलर ट्यूनसाठी महिना ३० रूपये खर्च करणं त्याला परवडेल की नाही हा विचारही माझ्या मनात आला नाही कारण पठ्ठ्या एक वेळ दोन वेळेचा चहा पिणार नाही पण कॉलर ट्यूनसोबत तडजोड नाही करायचा.

दुस-याच दिवशी पेपरमधली एक नोकरीची जाहिरात पाहून मी त्याला फोन केला, तर रिंगटोन बदललेला. "आसमॉं के निचे, हम आज अपने पिछे..."

ऑं? काल नोकरी सोडली, आज छोकरी गटवली? त्याला समजणं माझ्या आकलनशक्तीपलिकडचं होतं.

"अगं आत्ताच इंटरव्ह्यू देऊन आलो. प्लेसमेंट एजन्सीमधे काम करणारी मुलगी शाळेत असताना माझ्या वर्गातच होती. आज बोलता बोलता तिने सांगितलं की शाळेत असताना ती माझ्यावर सॉलीड फिदा होती पण सांगण्याचा कधी धीर झाला नाही."

"मग आता तू तिला धीर देणार वाटतं?"

"अगं, मला पण आवडायची ती तेव्हा. पण तिच्यासारखंच धीर नाही म्हणून मी बोललो नाही कधी. शिवाय.... ती एंगेज्ड नाही कुठे."

"छान! प्रेमात पडताना नोकरी आहे का नाही हे पहायचं नसतं, हे विसरलेच होते मी."

माझं काम सांगून मी फोन ठेवला. आता पुढ्च्या वेळी ह्याला फोन केला, तर बहुधा "दो सितारों का जमीं पर है मिलन आज की रात...." सुद्धा ऐकायला मिळू शकेल, असं वाटत होतं पण नाही.... कुठेतरी माशी शिंकली. सहज नेहमी करतात तसाच फोन केला होता मी आणि...

"जाऊँ कहॉं बता ऐ दिल, दुनिया बडी है संगदिल, चॉंदनी आयी घर जलाने, सुझे ना कोई मंझिल..." मुकेशचा दर्दभरा आवाज कानावर आला.

आता काय झालं ह्याला?

"तिच्या आईवडीलांचा नी माझ्याही आईवडीलांचा विरोध आहे प्रेमाला." तो उदास स्वरात म्हणाला.
"मग पळून जा आणि लग्न कर." मी.

"नोकरी नको?" त्याने फटकन प्रश्नवजा उत्तर फोनमधून माझ्या तोंडावर मारलं. जणूकाही त्याच्याकडे नोकरी नव्हती हा माझाच गुन्हा होता.

"अरे, नोकरी काय मिळेल आज ना उद्या. तुला तर नक्की मिळेल." मी तेवढ्यात सावरण्याचा प्रयत्न केला.

"मिळेल गं. पण आत्ता तर नाहीये ना! ती तर म्हणते की या महिन्यात लग्न नाही केलं, तर तिचे आईवडील तिचं लग्न दुसरीकडे कुठेतरी लावून देतील. आता पळून जाऊन हिच्याशी लग्न करायचं तर मला नोकरी नको का? बॅंक बॅलन्सचा खडखडाट आहे.”

"तिची नोकरी तर असेल ना पण?"

"नाही ना! गेल्याच आठवड्यात तिनेही नोकरी सोडली."

"अरे देवा!"

“....”

त्यानंतर बरेच दिवस शैलेशला फोन केला की "सॅक् रीफा‌ऽऽऽइस, होऊ ओऊ...." असं गाऊन, एल्टन जॉन शैलेशच्या अफेअरचा शेवट कसा झाला असेल, याची कल्पना द्यायचा. पण एल्टन जॉनलाही फार काळ मु्क्काम नाही ठोकता आला. त्याच्या मोबाईलवर काही दिवसांतच “दिल चाहता है, हम ना कभी रहे यारों के बिन...” कॉलर ट्यून रूजू झाली आणि आम्ही मित्रमंडळींनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

शैलेश तसा खूप बडबड्या. महीना-दीड महिन्याने माझ्या घरी त्याची एक तरी चक्कर ठरलेली. तो आला की आईसुद्धा खूश असायची. तिला दिवसभर कुणासोबत बोलायला मिळायचं नाही. शैलेश आला की आई आणि तो, दोघं निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारत बसायचे. माझ्या बहिणीच्या साखरपुड्याची बातमी ऐकून शैलेशला इतका आनंद झाला की त्या आनंदाप्रित्यर्थ त्याने स्वत:च्या मोबाईलची कॉलर ट्यून बदलली... “मेरी प्यारी बहनिया, बनेगी दुल्हनिया....”

माहित आहे, माहित आहे... हे थोडं जास्तच होतंय पण शैलेश असाच होता. अगदी मनस्वी! त्याच्या प्रत्येक कॉलर ट्यूनमधून त्याच्या मुडचा पत्ता लागायचा. ताईच्या लग्नाच्या पत्रिका वाटताना माझ्या मित्रांना सर्वात शेवटी पत्रिका द्यायच्या असं मीच ठरवलं होतं. अपेक्षेप्रमाणे पत्रिका कमी पडल्याच! मित्रांना फोनवरून आमंत्रण दिलं, तरी चालतं. तेवढीच कागदाचीसुध्दा बचत, असा विचार करून मी सर्वांना फोनवरूनच आमंत्रण दिलं. आमंत्रणाच्या यादीत शैलेशचा नंबर लागला, तेव्हा ’आता कोणतं गाणं ऐकायला मिळेल’, हाच विचार सर्वात आधी मनात आला.

“इक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है...”

आईशपथ! एकदम दचकायलाच झालं. फटाफट नोकरी आणि छोकरी मिळवणं याला कसं काय जमतं बुवा? इतर काही चौकशा न करता मी थेट मुद्यालाच हात घातला.

“आता कोण?”

“माधवी शिलेदार.” त्याने उत्तर दिलं.

“हे तरी फायनल आहे का तुझं?”

“असायलाच हवं. कारण हे आईबाबांनी ठरवलं आहे.” त्याने पुन्हा हसतच सांगितलं.

“अरे...!”

“माधवी आईच्या बालमैत्रीणीची मुलगी आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं, पसंत पडलो. घरच्यांनी लग्न ठरवून टाकलं.”

“अभिनंदन मित्रा पण तुझ्या नोकरीचं काय?”

“शिलेदारांचा स्वत:चा व्यवसाय आहे. माधवी त्यांची एकुलती एक मुलगी आहे.”

“अरे, तुला जॅकपॉटच लागला की!”

“नाही, तसं नाही. खरं तर मी त्यांच्याकडे नोकरीसाठी गेलो होतो, तिथेच ओळखींचे संदर्भ लागले मग पुढच्या गाठीभेठी घडल्या.” शैलेशने खुलासा केला.

मी ताईच्या लग्नाचं आमंत्रण देऊन फोन ठेवला पण ताईच्या लग्नाइतकाच शैलेशच्या लग्नाचाही आनंद मला झाला होता. त्याचं लग्न झाल्यावर तरी तो ह्या कॉलर ट्यूनच्या फंदात पडणार नाही असं वाटलं होतं. पण कसलं काय? त्याच्या लग्नाच्या वेळी त्यालाच हॉलवर पोहोचायला उशीर झाला, म्हणून चौकशीसाठी फोन केला तर...

“मेहंदी लगा के रखना, डोली सज़ा के रखना....”

अपेक्षित नव्हतं असं नाही पण अशी सूचक आणि अचूक गाणी त्याला कशी काय आठवतात, हे मला कधीच समजलं नाही. शैलेशला अगदी सुस्वरूप मुलगी पत्नी म्हणून मिळाली होती. लग्नानंतरही शैलेशने आम्हा मित्रमंडळींना सोडलं नव्हतं. उलट आमच्या ग्रुपमधे आणखी एक मैत्रीण सामील झाली. हो! माधवीला आमचा ग्रुप एवढा आवडला की काही दिवसात ती आमच्यातीलच एक होऊन गेली.

त्यानंतर काही महिन्यांनी सहज म्हणून मी शैलेशला फोन केला आणि त्याची कॉलर ट्यून ऐकून मला पुढे काय बोलायचं हेच सुचलं नाही. शैल्याने मोठाच आनंदाचा धक्का दिला.

“जीवन की बगीया महकेगी, चहकेगी...”

शैल्या बाप बनणार होता! त्याच्याशी फोनवर बोलून झाल्यावर त्याला म्हटलं, “शैल्या, आता पुन्हा तुला फोन केला ना, तर उचलू नकोस हां. मला हे गाणं ऐकून दे. तुझ्या फोनवर ऐकलेली सर्वात सुंदर कॉलर ट्यून आहे ही.”

पुढच्या काही महिन्यांनंतर शैल्याने नर्सरी र्‍हाईम्स जरी कॉलर ट्यून म्हणून लावल्या असत्या तरी मला नवल वाटलं नसतं.

- समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel