''त्याला हात नको रे लावूं म्हणतेस. मी का दुष्ट आहें ? ज्याचें भलें करायला जावें, त्यानेंच चावायला यावें. असो. अधिक कशाला बोलूं ?''

''वन्सं, तुम्ही येथून जाच. रोज उठून मेलीं भांडणें. तुम्ही सुखी, आम्ही सुखी.''

''दादा, तुझीहि अशीच इच्छा आहे का ?''
''मलाहि असेंच वाटतें.''

''ठीक. आजवर आधार दिलात त्याबद्दल मी ॠणी आहे. दादा, पृथ्वी ओस नाहीं. परमेश्वरानें कोठें तरी आमच्यासाठी घांस ठेवलाच असेल. जो पांखरांना पोसतो, कीडमुंगीला सांभाळतो, तो आम्हांला दूर नाहीं लोटणार. मी कोठें तरी खोली शोधतें तोंवर येथें राहूं दे. तुझी बहीण कोठें तरी मोलकरीण होईल, परंतु येथें नाहीं हो राहणार. नको तुम्हांला भार, तुम्हांला ओझे. कोणाची भांडी घांशीन, धुणीं धुवीन; दळीन, कांडीन. देवाची जनाबाईहि दळी. मला त्यांत कसला कमीपणा ? जाईन बरें, दादा जाईन.''

काशीताईनें रंगाला पोटाशीं धरलें. तिच्या डोळ्यांतील धारांचा त्या बाळराजाला अभिषेक होत होता.

''आई, तूं नको रडूं. मी चित्रें काढीन नि तुला पैसे आणून देईन. आपण येथून जाऊं.''

''बघा कसा चुरु चुरु बोलतो आहे तो. जा, खुशाल जा'' मामी म्हणाली.

जेवणें झालीं. रंगा जेवला नाही. त्याची आईहि जेवली नाहीं. रात्र झाली. सारीं झोपलीं. आईजवळ रंगा झोंपला होता. तिला झोंप येईना. तिच्या एकुलत्या बाळाचा आज वाढदिवस होता. आज बाळाचे वडीलं असते तर केवढा आनंदाचा सोहळा झाला असता. रंगाला रंगांची पेटी हवी होती. परंतु आज त्याला मरेमरे तों मी मारलें. मामानें त्याला मारलें. तिनें रंगाच्या अंगावरुन प्रेमळ हात फिरवला. अंगावर वळ होते. आपल्या डोळ्यांतील अश्रूंचें अमृतांजन त्या जखमांना ती लावित होती.

''माझा गुणांचा बाळ'' मरताना ते म्हणाले-'बाळ गुणी आहे. त्याला जप.'  रंगा, राजा, आतां नाहीं हो कधीं तुझी आई तुला मारणार ! ते आकाशांतून बघत असतील. त्यांचा आत्मा तुझ्याभोंवतीं घुटमळत असेल. त्यांचीच का ती मूर्ति ! होय. नका. असे रागानें नका बघूं ! हें काय ? क्रोध जाऊन तोंडावर करुणा ओथंबली. नका रडूं. बाळाला आतां नाही कधीं मारणार. मी कैदाशीण नाहीं होणार. त्याची प्रेमळ माता बनेन. आम्ही उद्यांपासून स्वतंत्र राहूं. बाळाचा आत्मा फुलेल. खरेच. हंसले. रंगा. ते बघ तुझे वडील हंसताहेत. तुला आशीर्वाद देत आहेत.'' गेली, ती मूर्ति गेली. तें का स्वप्न होतें की भास होता ? काशी अंथरुणावर पडली. ती विचार करित होती. ''उद्यां कोठें जायचें ? पृथ्वी मोठी आहे म्हणून म्हटलें खरें ! परंतु रात्रीं डोकें कोठें ठेवायचें ? त्या रखमाबाई देतील काम मिळवून. त्या मायळू आहेत. रंगाला त्या खाऊ आणून देतात. हो. त्यांनाच विचारावें. आई, बाबा, काय ही तुमच्या मुलीची दशा ! जाऊं दे. तुमची मुलगी धीर नाहीं सोडणार. तुम्ही बरं वाईट नका वाटून घेऊं. या तुमच्या दुर्दैवी मुलीला, या तुमच्या गुणी नातवाला आशीर्वाद द्या. आणि दादा, वैनी, तुम्हीहि सुखी असा. तुमची मुलेंबाळें सुखी असोत. इतके दिवस आधार दिलात. ते उपकार आहेतच. देवा, त्यांना सुखी ठेव.'' असें म्हणत मुलाच्या रंगावर प्रेमानें हात ठेवून ती दु:खी दुर्दैवी माता केव्हांतरी झोंपली. झोंप. तुझ्या आत्म्याची वेदना कमी होवो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel