जयदेव जयदेव जय भार्गवरामा । श्रीभार्गवरामा ।
पूर्ण ब्रह्म सनातन, त्रिभुवन विश्रामा ॥जय० ॥धृ॥
भृगुकुलमंडित महारण-पंडित विजयमणी ।
प्रसवली पुत्र चिरंजीव रुचिकात्मज रमणी ।
प्रचंड प्रबल प्रतापी द्विजस्वामी तरणी ।
खद्योतवत गत केले रिपु गण अमित रणीं ॥जय० १॥
मुनि जमदग्नी आणि जननी कैवारें ॥
वधिला खळ सहस्त्रार्जुन रणिं सहपरिवारें ।
पुढें निःक्षत्रिय केलें क्षिति-तळवट सारें ।
जडमूढ नर उद्धरिले नामामृत-सारें ॥जय० २॥
दिधली भू कनकांबरें रत्‍नें द्विजवर्या ।
परम कृपाघन तत्पर, शरणांगत कार्या ।
नाहीं उपमा तुझिया रामा ! औदार्या ।
तोहि नसेची तुजसम लक्ष्मी ज्या भार्या ॥जय० ३॥
श्रीरेणुकासंनिध दक्षिण गिरिभागा ।
त्रिभुवन पावन निर्मळ पुण्यस्थळ जागा ।
वससी तेथें सन्मुनि जनमानसरंगा ।
विष्णूदास म्हणे दे दर्शन भवभंगा ॥जय० ४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इतर आरती संग्रह