- योगेश सुरेश जगताप
आमच्या लायब्ररीला लागूनच एक मोठ्ठं गुलमोहराचं झाड होतं. ती बसायची तिथून अगदी स्पष्ट दिसायचं ते. बहुधा त्यामुळंच की काय पण कॉलेजच्या चार वर्षांत तिनं ती जागा एकदाही बदलली नाही. इतक्या वर्षांनंतर सुद्धा तो गुलमोहर आणि खिडकीजवळ बसलेली ती असं चित्र माझ्या मनात तेवढच जिवंत आहे.
तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाही ती त्या गुलमोहराला निरखत होती. पाठमोरी, स्थिर, एखाद्या तैलचित्रासारखी. स्वतःत गुंतून गेलेली. वार्यामधे भिरभिरणारे ते केस, ऑगस्ट महिन्याचा मंद धुंद गारवा, श्वासांमध्ये न मावणारा ओल्या मातीचा सुगंध आणि पावसाच्या थेंबाचं आणि विजांचं पार्श्वसंगीत. कधीही न विसरल्या जाणार्या आठवणींमध्ये ती एक आठवण लगेच सेव्ह झाली होती.
खरंतर एखाद्या टिपिकल मराठी मुलीपेक्षा फारच वेगळी होती ती. मध्यम बांध्याची, मध्यम उंचीची, थोडीशी सावळी, केस अगदी खांद्यापर्यंत कापलेले, नाकी डोळी रेखीव तरी डोळे जरा मोठेच वाटावे अशी. तिचं हास्य अगदी निरागस होतं. तिच्या डोळ्यांसारखं. मनमोकळं हसताना तिच्या डोळ्यांत तरळणारी पाणीदार चमक तिच्या चेहऱ्यात केवढा बदल आणायची.
वाचनाची प्रचंड आवड होती तिला. ती काय वाचायची ते तिच्या हावभावांवरून लगेच लक्षात यायचं. कधी धीरगंभीर, कधी उत्कंठेने नखांसोबत खेळणारी, कधी डोळ्यांतलं पाणी कसोशीने रोखलेली, तर कधी चेहर्यावर कळेल न कळेल असं हसू. वेगवेगळ्या हावभावांच्या छटा तिच्या चेहर्यावर तेवढ्याच मोहक दिसायच्या.
हळूहळू माझ्या लक्षात आलं की ती नसताना भकास वाटणारी लायब्ररी ती असताना एकदमच वेगळी भासायची. सायंकाळच्या खिडकीतून येणार्या सोनेरी संधीप्रकाशात तिचा चेहरा उजळून जायचा. आणि मग मात्र माझा अभ्यास बोंबलायचा. एव्हाना हा प्राणी अभ्यासापेक्षा निसर्गनिरीक्षणच जास्त करतो हे सगळ्या लायब्ररीच्या लक्षात आलं असावं. पण ती मात्र स्वतःच्याच जगात रमलेली. मी तिच्यासाठी अस्तित्वात होतो की नाही याचीही मला कल्पना नव्हती.
अशाच एका सोनेरी संध्याकाळी लायब्ररीमधे फारशी गर्दी नसताना मला ती माझ्याकडे येत असल्याचा भास झाला. तिनं हसून काहीतरी मागितलं आणि परत गेली. क्षण दोन क्षणांसाठी काय झालं हे माझ्या लक्षातही आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तोपर्यंत ती निघून गेली होती.
त्यानंतर आमचं एकमेकांसोबत बोलणं बरचसं कॉमन झालं. कधी नजरानजर व्हायची, कधी हसून ओळख दाखवणं व्हायचं तर कधी गप्पा. एक गोष्ट जी एवढ्या दिवसांत लक्षात आली नाही आणि जी जवळ गेल्यावर लक्षात आली ती म्हणजे तिच्या डोळ्यांतलं कारुण्य. कठोर भूतकाळाची अस्पष्ट अशी निशाणी. मी तिला हे कधी बोलून दाखवलं नाही पण तिने ते भाव कधीच लपवले नाहीत. म्हणून मला तिच्यासोबत असताना फार वेगळं वाटायचं. एकदम मुक्त असल्यासारखं. आमच्या मैत्रीची सुरवात ही अशी झाली.
कॉलेजच्या उरलेल्या दिवसांत तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू मी फार जवळून अनुभवले. ती खरच फार वेगळी होती. एखाद्या पुस्तकाबद्दल, कवितेबद्दल, त्या गुलमोहोराबद्दल बोलतानाचा तिचा उत्साह बघण्यासारखा असायचा. मग ती कितीतरी वेळ बोलत असायची आणि मी फक्त ऐकत असायचो. लायब्ररीच्या कट्ट्यावर बसून आजवर कुणालाही न सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आम्ही एकमेकांना सांगायचो तेव्हाही तिनं बर्याच कडू आठवणी मनात तशाच ठेवल्यात असं वाटायचं.
हेच कारण असेल कदाचित पण माझ्या मनातल्या भावना मी तिच्यासमोर कधीच व्यक्त केल्या नाहीत. एखादी खोलवर झालेली जखम पुन्हा उघडी पडेल या भीतीमुळे मला त्या कधी बोलून दाखवता आल्याच नाहीत. असंही वाटायचं की भरपूर वेळ आहे. आज ना उद्या तिला या गोष्टी कळून जातील. या आशेवर मी तिला बोलून दाखवणं पुढेपुढे ढकलत राहिलो. माझी हिंमत कधीच झाली नाही. तिनंही कधी बोलून दाखवलं नाही. आणि कॉलेज कधी संपत आलं ते कळंलच नाही.
जसजसा निरोप समारंभ जवळ येऊ लागला, मला अस्वस्थ वाटायला लागलं. जिच्याबरोबर उरल्या आयुष्याची स्वप्न पाहिली, जिच्यासोबत कॉलेजच्या सार्या आठवणी राहिल्या तिला पुन्हा पाहताही येणार नाही या विचारानंच अंगावर काटा आला. नकार पचवायची ताकत तर आजही नव्हती. पण वेळ संपत आली होती. आयुष्याच्या पुस्तकात प्रेमाची पानं कोरी रहावीत यासारखं वाईट नशीब नसतं. प्रेमाच्या प्रयत्नात आयुष्यभराची मैत्रीही तुटेल हा प्रश्नही होता. या सगळ्या विचारांमध्ये मला योग्य मार्ग सापडण्याआधीच निरोप समारंभाचा दिवस उजाडला.
मी तिला दुरून येताना पहिलं आणि आपलं आयुष्य फार बदललंय हे माझ्या लक्षात आलं. सोबत घालवलेली ती काही वर्ष आता कधीच मिळणार नव्हती. होत्या त्या फक्त आठवणीच. उभं आयुष्य 'बोलून दाखवलं नाही' या पश्चातापात काढायचं की नकार पचवायचा या भीतीमुळे शेवटपर्यंत मी तिला काहीच बोललो नाही आणि निरोप घेताना तिनं भिजलेल्या डोळ्यांनी मला विचारलं, 'मला विसरशील का रे?'
या एका प्रश्नासोबत मागची चार वर्ष माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेली. माझ्या प्रेमाचा साक्षीदार असलेला तिच्या सोबत घालवलेला क्षण न क्षण मला आठवला. जिच्या सोबतीनं खूप खूप चालायचं होतं, थकायचं होतं आणि जिच्याकडे आधारासाठी पहायचं होतं तिला माझ्या मनातलं एवढंही कळू नये? माझ्याही डोळ्यांत नकळत अश्रू जमू लागले आणि त्या पडणार्या प्रत्येक थेंबासोबत मी माझं मन तिच्यासमोर मोकळं करत राहिलो. ती फक्त ऐकत होती. तिच्या डोळ्यांतलं ते कारुण्य आजही तसंच होतं. पण मला कसलीही फिकीर नव्हती. मी बोलत राहिलो आणि ती ऐकत राहिली.
कॉलेज संपून आज कितीतरी वर्ष लोटली आहेत. रियुनियनच्या निमित्तानं आज आम्ही सर्व वर्गमित्रांनी कॉलेजला भेट दिली तेव्हाही ती जास्त वेळ आमच्यामध्ये रमली नाही. बराच वेळ ती कुठे दिसली नाही तेव्हा माझी पावले आपसूकच लायब्ररीकडे वळली. आजही ती तशीच उभी होती. पाठमोरी. स्थिर. इतक्या वर्षांची वसंताची पालवी आणि शिशिराची पानगळ अंगावर लेऊन तो गुलमोहरही तसाच उभा होता. मी तिला निरखत राहिलो. कितीतरी वेळ...
परतीच्या प्रवासात ती जास्त काही बोलली नाही. विचारात गुंग असताना तिच्या अशा शांत असण्याची एवढ्या वर्षांत मला सवय होऊन गेली होती. समजूतदार पतीपत्नी म्हणुन आम्ही आजही एकमेकांसाठी कधीच कमी पडलो नव्हतो. गेल्या कित्येक वर्षांचं वादळवारं झेलून आजही आमचं प्रेम तेवढंच टवटवीत होतं. अगदी त्या गुलमोहोरासारखं....