ध्रुव कथा
ध्रुव कथा अशीच जन्मली असावी. तो ध्रुवाचा जरा लहानसा परंतु तेजस्वी तारा उत्तरेला दिसतो. त्याच्याभोवती कोणी नाही. जणू परित्यक्त बालक. जरा लांब दोन ठळक तारे दिसतात. सावत्र आई सुरुची, नि पिता उत्तानपाद- म्हणजे पाय उचलून लाथा मारणारा (अक्षरशः ज्याने पाय उचलला आहे असा.) त्या दूरच्या ता-याला यांनी का खाली ढकलले?  बापाने मांडीवरुन का लोटले? ध्रुवाच्या आईचे नाव सुनीती. सावत्रआईचे नाव सुरुची. ती ऐटीने उभी आहे. आई कोठे आहे ? नीतीला कोण मान देणार ? ती अंधारगृहातच होती. तिचा अगदी बारीक तारा दिसतो आणि तो बाळ देवाकडे गेला. देवाजवळ हट्ट धरता झाला. त्याला अढळ स्थान मिळाले. आणि आता पिता नि सावत्रआई त्याला प्रदक्षिणा घालू लागली. सप्तर्षीभोवती फिरु लागले. अशा या आकाशातील दर्शनावरुन ध्रुवाची कथा निर्माण झाली असावी.

भारताची ध्येये या सर्व दंतकथांतून दृष्टीस येतात. दंतकथा म्हणजे आपले अमर भांडार आहे. त्यांची ऐतिहासिक सत्यता पाहायची नसते. सत्य म्हणजे तरी काय ? जन्मला, जगला, मेला म्हणजे का सत्य ? मारामा-या, द्वेष-मत्सर, कामक्रोध म्हणजे का सत्य ? ही सृष्टी, हा संसार, हा समाज यांच्याविषयी ज्या ज्या आदर्श कल्पना आपल्या मनात खेळतात, त्यांनाच खरोखर सत्यत्व आहे. कारण त्यांच्यासाठी आपण धडपडतो. ध्रुवाची कथा त्या अर्थाने सत्यमय आहे. न्यायमूर्ती रानडे, ध्रुव, प्रल्हाद इत्यादींच्या प्राचीन कथांविषयी बोलताना म्हणायचे, “या गोष्टी खरोखर घडल्या अशा अर्थानं आपण पाहू नये. त्या कथांतील सार घ्यावे.”

लहानपणी भागवतात ही ध्रुवकथा मी प्रथम वाचली. तसेच आमच्या गावात एक कीर्तनकार आले होते. त्यांनी ध्रुवाख्यान फार रंगवले. माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. ध्रुवाच्या गोष्टीने मला वेड लागले होते. नावडत्या राणीचा तो बाळ. मुलांत खेळताना त्याचा अपमान होतो.

“तुझ्या बापानं तुला टाकलं आहे. राजाचा मुलगा-परंतु भिकारी. उगीच ऐट कशाला?” असे मुले त्याला म्हणतात. ध्रुव आईला विचारतोः “मी जाऊ का बाबांकडे ?” ती नको म्हणते. परंतु आशेने ध्रुव जातो. तो बापाला शोधतो. पित्याच्या मनात क्षणभर वात्सल्य जागे होते. तो त्याला मांडीवर बसवतो. इतक्यात पट्टराणी येते. ती त्याला ढकलून देते. “या मांडीवर बसण्याचं भाग्य तुझ्या नशिबी नाही. त्यासाठी माझ्या पोटी यावं लागतं. हो दूर. पूर्वपुण्याई लागते राज्याच्या मांडीवर बसायला.” ती पतीला बोलते. तिच्या मुठीत वागणारा राजा बाळाला ढकलतो. बाळ रडत आईकडे येतो. माता वाटच पाहात होती. अपेक्षित ते घडले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel