प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।

शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥४१॥

कैसें हें कौतुक । अर्जुना जो लोक । पावावया देख । शत यज्ञ ॥८४०॥

करोनि इंद्रास । पडती सायास । तो चि मुमुक्षूस । अनायासें ॥८४१॥

तेथील अमोघ । अलौकिक भोग । भोगितां तो मग । कंटाळोनि ॥८४२॥

जन्म पावे येथें । पुन्हां संसारांत । वैभवश्रीयुक्त । कुळामाजीं ॥८४३॥

जैसा भातकण । वाढे सुक्षेत्रांत । तैसा त्या कुळांत । अंकुरे तो ॥८४४॥

होय जें सकळ । धर्माचें माहेर । वर्ततें साचार । नीतिपंथें ॥८४५॥

जिये कुळीं सत्य । पवित्र भाषण । आणिक दर्शन । शास्त्रशुद्ध ॥८४६॥

जिये कुळीं वेद । जागृत दैवत । व्यापार विहित -।आचरण ॥८४७॥

जेथें सारासार -। विचार हा थोर । मंत्री निरंतर । कार्यकर्ता ॥८४८॥

तेवीं चि गा पार्था । जिये कुळीं चिंता । झाली पतिव्रता । ईश्वराची ॥८४९॥

जिये कुळीं गृह -। देवतासंपत्ति । ऐशी सर्व स्थिति । सानुकूल ॥८५०॥

जिये कुळीं सर्व -। सुखाचा व्यापार । वाढला साचार । पूर्व -पुण्यें ॥८५१॥

पार्था , योगभ्रष्ट । सुखें पावे जन्म । ऐशा चि उत्तम । कुळामाजीं ॥८५२॥

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ‍ ।
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ‍ ॥४२॥

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ‍ ।

यतते च ततोः भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥४३॥

किंवा ज्ञानाग्नींत । करिती हवन । वैदिक जे पूर्ण । ब्रह्मनिष्ठ ॥८५३॥

जे का ब्रह्मानंद -। क्षेत्रींचे मिराशी । नित्य -सुखराशि । भोगिती जे ॥८५४॥

बैसोनि सिद्धान्त - । रुप सिंहासनीं । राज्य त्रिभुवनीं । करिती जे ॥८५५॥

होवोनि कोकिळ । संतोषाच्या वनीं । गाती गोड गाणीं । स्वानंदे जे ॥८५६॥

विवेक -वृक्षाच्या । बैसोनियां बूडीं । ब्रह्मफळगोडी । चाखिती जे ॥८५७॥

तयां योगियांच्या । कुळीं पावे जन्म । पार्था , मोक्ष -काम । योगभ्रष्ट ॥८५८॥

जन्मतां चि मग । आत्मज्ञानोदय । तयालागीं होय । स्वभावें चि ॥८५९॥

सूर्याचा उदय । होतां चि गा देखें । तयाआधीं फांके । प्रभा जैसी ॥८६०॥

तैसी प्रौढत्वाची । न पाहतां वाट । न होतां पहांट । तारुण्याची ॥८६१॥

बाळपणीं च ती । तया योगभ्रष्टा । साच सर्वज्ञता । माळ घाली ॥८६२॥

मागील जन्मीं च । तयाची तों बुद्धि । पावलीसे सिद्धि । सर्वथैव ॥८६३॥
म्हणोनि तयाचें । मन चि तें आतां । प्रसवतें पार्था । सर्व विद्या ॥८६४॥

मग शास्त्रजात । आपोआप जाण । निघे मुखांतून । तयाचिया ॥८६५॥

देखें ऐसें जें का । पुण्यकुळीं जन्म । देव हि सकाम । जयासाठीं ॥८६६॥
जप -होमादिक । करिती साचार । पार्था , निरंतर । स्वर्गामाजीं ॥८६७॥

अमर हि भाट । होवोनि वानिती । मृत्युलोकाप्रति । जयासाठीं ॥८६८॥

ऐसें जें का पुण्य । पावन उत्तम । तें तो पावे जन्म । योगच्युत ॥८६९॥

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।

जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मतिवर्तते ॥४४॥

मागिलिया जन्मीं । आयुष्याच्या अंतीं । प्राप्त झाली होती । सद्‌बुद्धि जी ॥८७०॥

पुढिलिये जन्मीं । मग तया ती च । पुन्हां लाभे साच । नित्य नवी ॥८७१॥

आधीं च पायाळू । आणि भाग्यवान् ‍ । वरी दिव्यांजन । घाली डोळां ॥८७२॥

मग जैसा देख । पाताळींचें धन । कौतुकें तो जाण । धनंजया ॥८७३॥

तैसे जे कठिण । गूढ अभिप्राय । किंवा जें प्रमेय । गुरुगम्य ॥८७४॥

तयाच्या बुद्धीस । प्रयत्नावांचोन । सहजें संपूर्ण । आकळे तें ॥८७५॥

इंद्रियें प्रबळ । सर्वथा तीं जाण । मनाच्या आधीन । होती मग ॥८७६॥
प्राणामाजीं मन । एकवटे पूर्ण । मिळों लागे प्राण । शून्यालागीं ॥८७७॥

ऐसा योगाभ्यास । स्वभावें चि होय । नेणों कैसा काय । धनंजया ॥८७८॥

आणि तयाचिया । मनो -मंदिरांत । येवोनि रहात । समाधि ती ॥८७९॥

देखें आदिमाया -। भवानी -गौरव । जणूं तो भैरव । योगपीठीं ॥८८०॥

किंवा जणूं काय । वैराग्य -सिद्धीचा । अनुभव साचा । प्रकटला ॥८८१॥

ना तरी संसार । मोजण्याचें माप । साहित्याचें द्वीप । योगाचिया ॥८८२॥

देखें धनंजया । सुगंधें चि साचें । जैसें चंदनाचें । घ्यावें रुप ॥८८३॥

तैसा संतोषाचा । घडिला तो येथ । साधकावस्थेंत । असोनि हि ॥८८४॥

दिसे सिद्धांचिया । समुदायांतून । जणूं निवडून । काढिला कीं ॥८८५॥

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।

अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ‍ ॥४५॥

वर्षे कोटयवधि । सहस्त्र जन्मांचे । प्रतिबंध साचे । ओलांडोनि ॥८८६॥

तरोनि संसार । आत्मसिद्धि -तीर । गांठलें साचार । तयानें तें ॥८८७॥

म्हणोनियां साध्य । तयालागीं होती । सर्व साधनें तीं । आपोआप ॥८८८॥

ऐसा तो साधक । मग अनायासें । राज्यावरी बैसे । विवेकाच्या ॥८८९॥

विचाराचा वेग । होवोनिया स्थिर । विवेक माघार । घेई जेथें ॥८९०॥

तेथें स्वरुपीं त्या । मग पार्था पाहें । साधक तो राहे । जडोनियां ॥८९१॥

तेथें मनोमेघ । जातसे विरोन । सरे वारेपण । वार्‍याचें हि ॥८९२॥

आणि आकाश हि । आपुल्या चि ठायीं । मुरोनियां जाई । पूर्णपणें ॥८९३॥

ॐकाराचा माथा । बुडोनियां जात । ऐसें शब्दातीत । सुख लाभे ॥८९४॥

म्हणोनि आधींच । बोला पडे मौन । ऐसी जी गहन । ब्रह्मस्थिति ॥८९५॥

अमूर्त सकळ -। गतींची जी गति । तियेची तो मूर्ति । स्वयें होय ! ॥८९६॥

जन्मजमान्तरीं । तयानें साचार । झाडियेला केर । विक्षेपाचा ॥८९७॥

म्हणोनि हा जन्म । पावतां क्षणीं च । लग्न -घटि साच । बुडाली ती ॥८९८॥

पार्था , जैसें अभ्र । विरोनियां जातां । पावे तद्रूपता । आकाशीं तें ॥८९९॥

ब्रह्मस्वरुपाशीं । तैसें त्याचें लग्न । लागोनि अभिन्न । जाहला तो ॥९००॥

जेथोनियां विश्व । होतसे निर्माण । होतें पुन्हा लीन । स्वरुपीं ज्या ॥९०१॥

स्वर्ये तें स्वरुप । होवोनि तो राहे । विद्यमानें देहें । धनंजया ॥९०२॥

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥

धैर्य -बाहूवरी । ठेवोनि विश्वास । धरोनियां आस । वस्तूची ज्या ॥९०३॥

घालिती ते उडी । देखें कर्मनिष्ठ । पार्था प्रवाहांत । षट्‌कर्माच्या ॥९०४॥

किंवा प्राप्त व्हावी । वस्तु जी म्हणोन । कवच लेवोन । ज्ञानाचें गा ॥९०५॥

येथें ज्ञानीं जन । झुंजती निःशंक । रणांगणीं देख । प्रपंचाशी ॥९०६॥

किंवा तपस्वी ते । धरोनि जी चाड । जो का अवघड । तपोदुर्ग ॥९०७॥

चढावया जाती । जयाचा हि कडा । बहु निसरडा । निराधार ॥९०८॥

देखें भजकांसी । जें का भजनीय । यजन -विषय । याज्ञिकांचा ॥९०९॥

ऐसें सकळांसी । सर्वकाळीं होय । जें का पूजनीय । परब्रह्म ॥९१०॥

साधकांचे साध्य । स्वरुप निर्वाण । स्वयें तें आपण । जाहला तो ॥९११॥

म्हणोनि तो होय । कर्मनिष्ठां वंद्य । तपस्व्यांचा आद्य । तपोनाथ ॥९१२॥

जाणावयाजोगा । ज्ञानियांतें साच । धनंजया तो च । एक जगीं ॥९१३॥

जीव -परमात्मा -। संगम पावन । तेथें झालें लीन । मन ज्याचें ॥९१४॥

अर्जुना तो येथें । देहधारीं झाला । तरी लाभे त्याला । थोरवी हि ॥९१५॥

म्हणोनियां सांगे । सर्वदा मी तूर्ते । योगी होई चित्तें । पंडु -सुता ॥९१६॥

योगिनामपि सर्वेषां मद्बतेनान्तरात्मना ।

श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥

इति श्रीमद्भगवद्भीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे षष्ठोऽध्यायः ॥६॥

जयालांगी देती । योगी ऐसें नांव । जाणावा तो देव । देवांचा हि ॥९१७॥

तो चि माझें सुख । सर्वस्व निधान । स्वभावें तो प्राण । असे माझा ॥९१८॥

पाहें पार्था , भज्य । भजता भजन । आघवें साधन । भक्तीचें हें ॥९१९॥

जया योगियासी । स्वानुभव -बळें । मद्रूप । चि झालें । अखंडित ॥९२०॥

मग प्रेमभाव । परस्परांतील । वर्णितां येईल । बोलांमाजीं ॥९२१॥

नव्हे चि तो ऐसा । धनंजया , साच । एकरुपता च । तया आम्हां ॥९२२॥

तया ऐक्य -प्रेमा । साजेल उपमा । देह मी तो आत्मा । हीच एक ॥९२३॥

ऐसें भक्तरुपी । चकोराचा चंद्र । एक चि नरेंद्र । त्रैलोक्याचा ॥९२४॥

गुणाचा सागर । बोलिला श्रीपति । सांगे राजाप्रति । संजय तो ॥९२५॥

पार्थाचिया ठायीं । श्रवणाची आस्था । होती ती च आतां । दुणावली ॥९२६॥

प्रभु यादवेंद्रा । ऐसें कळों आलें । तेणें चित्त धालें । स्वभावें चि ॥९२७॥

आपुलें भाषण । यथार्थ ग्रहण । कराया दर्पण । पार्थ झाला ॥९२८॥

म्हणोनियां देव । आनंदाच्या भरें । आतां जें विस्तारें । निरुपील ॥९२९॥

तो चि आहे पुढें । प्रसंग रसाळ । जेथें प्रकटेल । शांतरस ॥९३०॥

सिद्धान्तबीजाचा । भरोनि ठेविला । मुडा उघडिला । जाईल तो ॥९३१॥

सत्त्वगुणाचा कीं । होवोनि वर्षाव । भरा आला भाव । श्रोतयांचा ॥९३२॥

तेणें आध्यात्मिक । तापाचीं ढेंकुळें । जातां चि सकळें । विरोनियां ॥९३३॥

चतुर भाविक -। चित्ताचे ते भले । वाफे सिद्ध झाले । अनायासें ॥९३४॥

अवधानरुप । पेरणीचा होय । सुवर्णसमय । त्या हि वरी ॥९३५॥

म्हणोनियां ज्ञान -। बीज पेरायातें । निवृत्तिनाथातें । इच्छा झाली ॥९३६॥

ज्ञानदेव म्हणे । सद्‌गुरुंनी भलें । मज चाडें केलें । कौतुकें चि ॥९३७॥

आणि मस्तकीं तो । ठेवोनियां हात । घातलें चाडयांत । बीज जणूं ॥९३८॥

म्हणोनि अंतरीं । होतां चि स्फुरण । जें जें मुखांतून । निघे माझ्या ॥९३९॥

तें तें सज्जनांसी । होईल प्रमाण । भरंवसा पूर्ण । ऐसा मज ॥९४०॥

असो हें समस्त । सांगेन प्रस्तुत । काय भगवंत । बोलिले तें ॥९४१॥

परि ते ऐकावें । मनाचिया कानीं । देखावें नयनीं । बुद्धीचिया ॥९४२॥

आपुल्या चित्ताचें । देवोनियां मोल । मग घ्यावे बोल । येथींचे हे ॥९४३॥

अवधानाचिया । हातें नेवोनियां । सोडावें हृदया -। माजीं ह्यांतें ॥९४४॥

करोनि संतुष्ट । जाणत्यांची मति । देतील हे शांति । स्व -हितासी ॥९४५॥

पूर्णावस्थेलागीं । होतील जीवन । जीवा सुखपूर्ण । करितील ॥९४६॥

आतां बोलतील । कौतुकें श्रीकृष्ण । सुंदर भाषण । अर्जुनाशीं ॥९४७॥

ज्ञानदेव म्हणे । बोल ते यथार्थ । ओंवीच्या छंदांत । सांगेन मी ॥९४८॥

इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् ‍ अभंग -ज्ञानेश्वरी षष्ठोऽध्यायः ।

हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा