॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीजगदंबायै नमः ॥
आधीं नमूं विघ्नहर ॥ नाम जयाचें लंबोदर ॥ जयाच्या कृपे विघ्ने थोर ॥ जाती दूर पळोनि ॥१॥
विघ्नें हा मोठा थोर ॥ आमावास्येचा गडद अंधार ॥ याचा नाश करावयास धर ॥ तूं दिनकर विनायका ॥२॥
कंटक वृक्षलतेचे दारुण ॥ विघ्न हेचि घोर अरण्य ॥ त्याचे करावयां दहन ॥ तूं हुताशन वडवानळ ॥३॥
मोठे मोठे भयंकर ॥ सर्परूपें विघ्नें अपार ॥ याचा नाश करतां बळात्कारें ॥ मजवर गरुडरूपें ॥४॥
मदस्रवी मदोन्मत्त ॥ उंच वारणरूप विघ्नें बहूत ॥ तयाचा तसा घात ॥ होऊनि अद्भुत पंचानन ॥५॥
उंच विस्तीर्ण अपार ॥ विघ्नें मोठीं पर्वताकार ॥ तयाचा भेदकर्ता वज्र ॥ तूं विघ्नहर सर्वस्वें ॥६॥
विघ्नें अत्यंत प्रबळ ॥ सखोल समुद्रचि केवळ ॥ तयाचा प्राशन करतां न लागतां वेळ ॥ तूं वडवानळ गणेशा ॥७॥
संवर्त्तकादि मेघगण ॥ पापरूप विघ्नें दारुण ॥ तयाचा विध्वंसिता तूं पवन ॥ गजवदन गणराया ॥८॥
जरी तूं कृपा करिसीं ॥ तरीच ग्रंथ जाईळ सिद्धीसी ॥ म्हणोनि विघ्नहरा तुजसी ॥ कायावाचामनेसी नमन माझें ॥९॥
आतां वंदू शारदाभवानी ॥ जे कवीश्वराची मुख्य जननी ॥ चतुर्विध वाचेसी स्फूर्तिदाती ॥ कवित्वा लागुनी प्रसाद जियेचा ॥१०॥
चतुर्भुज पीतांबरधारी ॥ विणा पुस्तक अक्षमाळा करीं ॥ अभय देऊनि लौकरी ॥ जिव्हाग्री करी वस्ती माझ्या ॥११॥
सुहास्य सुंदर वदन ॥ हंसावरी करूनि आरोहण ॥ शीघ्र येऊनि वरदान ॥ करी मज लागुनी जननी ये ॥१२॥
वंदीन आता सद्गुरुनाथ ॥ शिष्य प्रबोधनी अति समर्थ ॥ जयाचा लागता मस्तकीं हात ॥ तो त्रैलोक्यात वंद्य होय ॥१३॥
जयजयाजी सद्गुरु समयी ॥ जयजय सद्गुरु कृपावंता ॥ जयजय सद्गुरु अनाथनाथा ॥ शरणागता रक्षी मज ॥१४॥
तुज स्त्ववावयां लागुन ॥ न कळे वेदशास्त्रा महिमान ॥ सहस्रमुखी शेष जाण ॥ तोही वर्णन करूं न शके ॥१५॥
तूं जरी कृपा करिसी ॥ तरीच ज्ञान होय शिष्यासी ॥ शिष्यसेवा अपेक्षा नाही तुजसीं ॥ उपमावें आणिकाशीं कवणा तुज ॥१६॥
तूं माये विद्यावेगळा शुद्ध ॥ अद्वयत्वे परमानंद ॥ महिमा तुज अगाध ॥ वर्णितां विबुध वेडावले ॥१७॥
तेथें मी पामर तो किती । तुझी काय करूं जाणें स्तुती ॥ तुवांची प्रसन्न होऊनी कृपामूर्ती ॥ ग्रंथार्थ स्फूर्ती द्यावी मज ॥१८॥
ऐसी ऐकूनि विनंति ॥ कृपा उपजली सद्गुरुचित्ती ॥ ग्रंथारंभ करी म्हणती ॥ साह्य भगवती होईल तुज ॥१९॥
ऐसें होता वरदान ॥ मस्तकी वंदूनि श्रीचरण ॥ संतश्रोत्या विनवण ॥ करावें श्रवण सावध कथा ॥२०॥
श्रवणा व्हावें सावध श्रोती ॥ हे म्यां केली तुम्हा विनंती ॥ हे माझी उद्धट उक्ती ॥ क्षमा संती करावी ॥२१॥
ऐसें ऐकूनि श्रोते सज्जन ॥ कृपेनें केलें वरप्रदान ॥ होईल तुजला अंबा प्रसन्न ॥ ग्रंथार्थ कथन करी आतां ॥२२॥
श्रोत्यांची आज्ञा होता ऐसी ॥ नमन करूनि संत श्रोत्यांशीं ॥ नमस्कारुनि जगदंबेशीं ॥ नित्यानंद कथेशीं आरंभी ॥२३॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ झाले मंगलचरण समाप्त ॥ नित्यानंद श्रोत्या विनवीत ॥ अवधान स्वस्थ चित्तें द्यावें मज ॥२४॥
इति श्रीमंगलाचरणन्नाम प्रथमोध्यायः ॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel