॥ श्रीगणेशाय नमः ॥
ऋषी म्हणे राजा सर्व देवगण ॥ इंद्र आदिकरूनि देवीसी जाणा ॥ सर्वही करूं आदरिले स्तवन ॥ महिषासुरा जाण मारिल्यावरी ॥१॥
सर्वस्त्र जग आत्मशक्ती ॥ संरक्षिलें तुवां जगज्योती ॥ अशेष देचाची तूं शक्ती ॥ समूहमूर्ती जगदंबे ॥२॥
सर्व देव आणि ऋषिगण ॥ अंबे सकळा तूं पूज्यमान ॥ भक्तिपूर्वक आमुचे नमन ॥ शुभचिंतन आमुचें करी ॥३॥
तुझ्या प्रभावाचें तुळन ॥ हरिहरब्रह्मादिका न ये जाण ॥ करावया तूं सर्व जगा पालन ॥ भय दैन्य संपूर्ण नाश करिसी ॥४॥
तूं पुण्यवंता घरीं नांदसी ॥ पाप्यासमीप वास न करिसी ॥ श्राद्धाळू कुळवंता रक्षिसी ॥ आमुचें नमन तुजसी जगपोषके ॥५॥
अचिंत्य रूपें तुज न वर्णवे ॥ असुरक्षय कराया अतिवीर्ये ॥ चरित्र तुझें सर्वाश्चर्य ॥ न जाणवे देवा असुरा ॥६॥
त्रिगुणागुणे जगामूळ ॥ पार नेणती ब्रह्मादि सकळ ॥ आश्रय तुझा जगा समूळ ॥ आद्य केवळ अव्याहतरूपें ॥७॥
देवा आणि पितृगणासी ॥ स्वाहास्वधामंत्रें तृप्ति करिसी ॥ यज्ञकर्त्याच्या मनोरथासी ॥ तृप्तिसर्वनाशी करिसी तूं ॥८॥
तूं मुक्तिहेतू विद्यादाती ॥ जितेंद्रिय भक्ता ज्ञानदुभती ॥ मोक्ष्यार्थाचे दोष नाशकर्ती ॥ तूं ज्ञानदाती मननशीळा ॥९॥
ऋग्वेदयजुर्वेद जाण ॥ अतिरम्य गाथा सामगायन ॥ वेदत्रयी तूंचि आपण ॥ संसारदुःखालागून नाशकर्ती ॥१०॥
बुद्धिरूपें तूं शास्त्रसार ॥ भवाब्धिनी दुर्गे तूं सधर ॥ ईशहृदयीं तुझें घर ॥ प्रतिष्ठिला चंद्रशेखर गौरी तुवां ॥११॥
ईषत हास्यपूर्ण चंद्रा ऐशें ॥ सुवर्णकांती फांकें तैसें ॥ अत्यद्भुत मुख क्रोधावेशें ॥ महिषासुरें ऐसें पाहिलें ॥१२॥
कराल भृकुटी चंद्रानना पाहे ॥ सकोपछबी जगदंबेची हे ॥ महिषासुराचा अंत होय ॥ विचित्र नोहे काळ बिहे देवीकोपें ॥१३॥
अंबे तुवां प्रसन्न व्हावें ॥ संसारभया नाश करावें ॥ आम्ही समस्त जाणीतला प्रभाव ॥ महिषासुरसैन्या अभावकर्ते ॥१४॥
स्वभक्ता करिसी सधन ॥ धर्मयशा करिसी विवर्धन ॥ त्याशी प्रसन्न तूं होऊन ॥ संततीसंपन्न अक्षयीं करिसी ॥१५॥
स्वभक्ता धर्मकर्मद्वारें ॥ करविसी पुण्यमार्ग आचार ॥ त्यासी स्वर्गसुख निरंतर ॥ प्राप्त लौकर कृपें तुझ्या होय ॥१६॥
नाममात्रें सर्व जीवाचें दुःख ॥ नासूनि देशी उत्कृष्ट सुख ॥ दरिद्र दुःख भयनाशक ॥ तुजवांचुनि आणीक कृपाळें नेणो ॥१७॥
संग्रामी जे मृत्यू पावले ॥ ते उत्तम लोकासींच गेले ॥ स्वभक्त नाममात्रें उद्धरलें ॥ अभक्त गेले ते वायां ॥१८॥
शत्रू भस्म होती क्षणमात्रें ॥ मग तुवां धारण केल्या शस्त्र ॥ त्या शस्त्रघातें अपवित्र ॥ जाती पवित्रलोका देवी ॥१९॥
अति उग्र खङ्गाची दीप्ती ॥ पाहतां असूरशूलाची कांती ॥ सूर्योदयीं चंद्रकिरणें लोपते ॥ नाश होती शत्रू तैसें ॥२०॥
स्वभाव तुझा पापा नाशी ॥ रूप अगोचर मनावाचेसी ॥ हतपराक्रम देवद्वेष्ट्या करिसी ॥ वैरीही उद्धरिसी कृपाळूपणें ॥२१॥
त्रिभुवनवरदे कृपावंते ॥ समरी निष्ठुर आर्द्रचित्तें ॥ तुझ्या पराक्रमा उपमावें कोणातें ॥ पाहतां तुझ्या रूपातें भीती शत्रू ॥२२॥
शत्रू मारूनिया त्रिभुवन ॥ कृपेनें केलें संरक्षण ॥ स्वर्गीं देवा केलें स्थापन ॥ असुरनाशने नमन तुज ॥२३॥
शूले करूनि आम्हां रक्षी ॥ खङ्गे करूनि रक्षी कामाक्षी ॥ घंटानादें सर्वसाक्षी रक्षी ॥ ज्या शब्दें मीनाक्षी रक्षी तूं ॥२४॥
प्राची रक्षी आणि प्रतीची ॥ ईश्वरी रक्षी तूं उदीची ॥ चंडिके दिशा दक्षिणेची ॥ रक्षी तूंची शूलभ्रमणें ॥२५॥
सौम्य जे कां रूपें जाण ॥ करिती त्रैलोक्यांत संचरण ॥ त्या अत्यंत घोर रूपापासुन ॥ करी रक्षण जगदंबे ॥२६॥
खङ्ग आदि गदाशूल ॥ अस्त्रें जितुकी असतील ॥ तुझ्या हस्ताश्रयीं सकळ ॥ रक्षी बळें आम्हां तेणें ॥२७॥
ऋषी म्हणे देव अंबेसी ॥ पुष्पें आणोनि अतिसुवासी ॥ वाहिलीं जगद्रक्षकेसीं ॥ लाविलें अंगासी दिव्य चंदन ॥२८॥
अत्यंत भक्ती करून ॥ करविली धूपआघ्रापन ॥ सुमुखी प्रसन्न हो म्हणून ॥ समस्त देवगण नमन करिती ॥२९॥
देवी म्हणे देवा मागा वर ॥ जो मागाल तो सर्वत्र ॥ देईन मी तुम्हां वर ॥ तुमच्या पूजनें फार संतोषलें ॥३०॥
देव म्हणती देवी सर्व केलें ॥ कांहींयेक नाहीं राहिलें ॥ आमुच्या शत्रूसी संहारिलें ॥ ख्याति लाविलें महिषासुरा ॥३१॥
वर देसी आम्हां जरी ॥ मागतों तुला परमेश्वरी ॥ आम्ही स्मरण करूं जया अवसरीं ॥ आपदा हरी आमुची तेव्हां ॥३२॥
तुझा भक्त जो कां मनुष्य ॥ कमळनयने तुज करी संतोष ॥ वित्तविभवदारा त्यास ॥ वांच्छीत संपदेस देईं तू ॥३३॥
जरी झालीस देवी प्रसन्न ॥ आमुची वृद्धि करी आपण ॥ जे कां कर्तव्य असेल जाण ॥ तोही विचार करणें तुवांची ॥३४॥
वर ऐसा देवें मागितला ॥ जगासह उपकार करी आम्हांला ॥ ऋषी म्हणे राजा देवीनें देवाला ॥ तथास्तु म्हणोनि त्याला गुप्त झाली ॥३५॥
जैसें पूर्वींचें वर्तमान ॥ राजा तुज सांगितलें संपूर्ण ॥ देवी देवशरीरीं होऊनि उत्पन्न ॥ जगा संरक्षण केलें ऐसें ॥३६॥
पुन्हां गौरीदेहापासूनि शरीर ॥ धारण करिती झाली सुंदर ॥ वधावया दैत्य अपार ॥ शुंभनिशुंभ वीर त्यासहित ॥३७॥
रक्षण करावया जगासीं ॥ उपकारही व्हावा देवासी ॥ ते मी सांगतो ऐक तुजसी ॥ पूर्ववृत्तांतासी श्रवण करी ॥३८॥
सुरथ राजांसीं सुमेधा सांगें ॥ ऐसी वर्तली कथा मागें ॥ तोचि मार्कंडेयकथाभाग ॥ भागोरी ऋषीसी सांगत ॥३९॥
तेचि कथा नित्यानंद ॥ प्राकृत वर्णिली अशुद्धशुद्ध ॥ क्षमा करूनि घ्याल तुम्ही सिद्ध ॥ पुढील कथाप्रबंध ऐकिजे श्रोती ॥४०॥
इति श्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेय पुराणसंमत ॥ पुढील कथा गोड अत्यंत ॥ चतुर्थाध्याय संपला हा ॥४१॥
इतिश्री देवीविजय ग्रंथ चतुर्थाध्याय समाप्तः ॥श्री॥        ॥         ॥
॥ इति श्रीदेवीविजय चतुर्थाध्याय समाप्त ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel