भूपाळी १

ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकडे ।
पाहती सौगडे वाट तूझी ॥ ध्रु. ॥

लोपली हे निशी मंद झाला शशी ।
मुनीजन मानसीं ध्याति तुजला ॥ १ ॥

भानु-उदयाचळीं तेज पुंजाळलें ।
विकसती कमळें उदकावरी ॥ २ ॥

धेनुवत्सें तुला बाहती माधवा ।
ऊठिं गा यादवा उशिर झाला ॥ ३ ॥

ऊठिं पुरुशोत्तमा वाट पाहे रमा ।
दाविं मुखचंद्रमा सकळिकांसी ॥ ४ ॥

कनकपात्रांतरी दीपरत्नें बरी ।
ओंवाळिती सुंदर तूजलागीं ॥ ५ ॥

जन्मजन्मांतरीं दास होऊं हरी ।
बोलती वैखरी भक्त तुझे ॥ ६ ॥

कृष्णकेशव करीं चरणांबुज धरी ।
ऊठिं गा श्रीहरी मायबापा ॥ ७ ॥

==भूपाळी २==

जाग रे जाग बापा ।
विश्र्वपालका कृष्णा ।
दीन आम्ही उभे द्वारी ।
आमुची बोळवीं तृष्णा ॥ ध्रु. ॥

त्रासलो प्रपंची या ।
बहु कष्टलों भारी ।
म्हणवूनि शरण आलों ।
विभो तुझिया द्वारीं ॥ जाग. ॥ १ ॥

सांग बा न्यून काय ।
हरि तुझिया भांडारीं ।
याचक भीक मागे ।
प्रेम दीई झडकरी ॥ जाग. ॥ २ ॥

गुरुकृपे उदयो झाला ।
हरि उदया आला ।
सुख ते काय सांगूं ।
जिवलग भेटला ॥ जाग. ॥ ३ ॥

श्रीगुरुनाथराया ।
कृपासिंधु गोविंदा ।
देवनाथ प्रार्थिताहे ।
प्रभुपदारविंदा ॥ जाग. ॥ ४ ॥



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel