आयुष्याच्या
तव्यावरती संसाराची पोळी
भाजता भाजता हाताला किती बसले चटके ,                              
मोजलेच नाही

नवर्‍यासह
मुलांचे
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा                                        
मोजलेच नाही

सहन करता करता किती सोसले मोजलेच नाही
जरा चुकले की
घरच्यांची, बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
अपमान झेलले
काळजाला किती घरं पडली ,                                                   
मोजलेच नाही

याच्यासाठी त्याच्यासाठी आणखीही कुणासाठी
कितींनी केले आपलेसे  कितींनी बाजुला केले
मोजलेच नाही

जगता जगता माझ्यासाठी मी अशी किती जगले ,                                    
मोजलेच नाही

पाखरे जातील फारच दूर
डोळ्यात उरेल अश्रूंचा पूर
सोशिकतेचे हे नुसते आवरण गळून पडेल का कधीतरी वाटते भीती मनी ....
निसटून गेले कितीतरी क्षण
आळवले च नाहीत कधी कधी आवडते  सूर  
मोजलेच नाही..,मोजलेच नाही ...!

©मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel