कर्म म्हणजे काय याचा विचार करणे मला प्रथम योग्य वाटते .ही चर्चा क्लिष्ट व तांत्रिक वाटण्याचा संभव आहे .नीट विचार केला तर ते वास्तविक फार सोपे आहे .ही चर्चा फार महत्त्वाची आहे कारण आपले जीवन ही एक कर्म प्रक्रिया आहे. आपल्यापैकी बहुतेक जण काही ना काही कर्म करीत असतात .ही कर्मे एकमेकांशी संबंध नसलेली व न जोडलेली असतात .बऱ्याच वेळा  त्यापासून विघटन व विफलता प्राप्त होत असते .हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.आपले जीवन कर्मरूप असते .कर्मा विना जीवन नाही. अनुभव नाही. विचार नाही.विचार हेही एक कर्मच आहे .जाणिवेच्या एकाच पातळीवर कर्म पाहणे हे चूक आहे.तसे केल्यास आपण केवळ जड कर्म लक्षात घेऊ .कर्म प्रक्रिया आपण संपूर्णपणे पाहणार नाही.जर संपूर्ण कर्म प्रक्रिया आकलन झाली नाही तर विफलता  व  दुःख यांशिवाय दुसरे काय मिळणाऱ ? 


                  आपले जीवन ही जीवनाच्या निरनिराळ्या पातळ्यांवरील एक कर्म साखळी आहे .जाणीव म्हणजेच अनुभव नामकरण, व संग्रह .जीवन म्हणजे अनुभवणे,क्रिया प्रतिक्रिया, (अाव्हान व जबाब )नंतर नामकरण, (तुलना) व संग्रह, (संस्कार ).तीच आठवण वा संस्कार संग्रह .ही सर्व प्रक्रिया म्हणजे कर्म नव्हे काय?आव्हान, जबाब, अनुभवणे ,नामकरण, व संस्कार संग्रह, याशिवाय कर्म नाही . 


                 आता कर्मामुळे कर्ता निर्माण होतो  .कर्माला जेव्हा हेतू असतो तेव्हाच कर्ता अस्तित्वात येतो .हेतु रहित कर्माला कर्ता नसतो  .जर हेतू असेल, तर कर्म, कर्ता आणते.अश्या तर्‍हेने हेतू, कर्म ,व कर्ता ,ही एकच प्रक्रिया आहे .आणि ही प्रक्रिया ,जेव्हा कर्म हेतुयुक्त असते, तेव्हाच अस्तित्वात येते .हेतुयुक्त कर्म म्हणजेच इच्छा.हेतू नाही तर इच्छा  नाही .कसल्या तरी प्राप्तीची वासना, इच्छा निर्माण करते .तोच कर्ता .मला हे पाहिजे. मला ते मिळवायचे आहे.मला पुस्तक लिहायचे आहे.मला श्रीमंत व्हायचे आहे .मला चित्र रंगवायचे आहे .ही इच्छा म्हणजेच कर्ता. कर्म कर्ता व हेतू या तिन्ही गोष्टींशी आपण परिचित आहोत .हा आपला रोजचा अनुभव आहे .मी फक्त वस्तुस्थिती स्पष्ट करीत आहे .जे आहे त्यामध्ये क्रांती घडवून आणायची असेल ,तर प्रथम वस्तुस्थितीचे ,जे आहे त्याचे ,नीट निरीक्षण केले पाहिजे .अभ्यास केला पाहिजे .कोणत्याही पूर्वग्रहांना किंवा आभासाना थारा देऊन चालणार नाही .आता या तीन पायऱ्या ,म्हणजेच कर्ता कर्म व हेतू,म्हणजेचअनुभव .काहीतरी बनण्याची प्रक्रिया .


                जे जीवन आपल्याला ज्ञात आहे ,त्यात काहीतरी बनण्याच्या प्रक्रियेशिवाय,दुसरे काय असते ? मी गरीब आहे ,माझ्या कर्माचा हेतू, श्रीमंत बनणे हा असतो .मी कुरूप आहे,माझ्या बनण्याचा हेतू सुंदर व्हावे असा असतो .अशी अनेक उदाहरणे देता येतील .माझे जीवन ही काहीतरी बनण्याची अखंड धडपड आहे .असण्याची इच्छा म्हणजेच काहीतरी बनण्याची इच्छा .ही इच्छा जाणिवेच्या निरनिराळ्या पातळ्यांवरील असेल , निरनिराळ्या परिस्थितीतील असेल ,परंतु प्रत्येक ठिकाणी क्रिया, प्रतिक्रिया, नामकरण, तुलना, व संग्रह ,हा असतोच .आता यातून असंतोष व झगडा निर्माण होतो .कांकणाची हीतरी बनण्याची इच्छा ,हीच दुःखप्रद नाही काय ?मी असा आहे व मला असे व्हायचे आहे,असा हा झगडा आहे . 


                   माझा असा प्रश्न आहे कि काहीतरी बनण्याविरहित ,असे कर्म असेल काय ?म्हणजे दुःख विरहित, झगड्याशिवाय ,कर्म असेल काय ?जर हेतू नसेल तर कर्ता नसेल ,कारण हेतुयुक्त कर्मच ,कर्ता निर्माण करते. वासनाविरहित ,हेतुविरहित, कर्ताविरहित ,कर्म असू शकेल काय ?अश्या तर्‍हेचे कर्म हे काहीतरी बनण्याची धडपड नसते .म्हणूनच ते असंतोषकारक  नसते .अनुभव वा अनुभवणारा याशिवाय केवळ अनुभवणे असते, तेव्हा असे कर्म असते . 
                    हे सर्व फार गूढ व तात्त्विक वाटण्याचा संभव आहे परंतु वस्तुतः हे फारच सोपे आहे .जेव्हा अनुभवणे असते, तेव्हा "मी" हरवलेलेला असतो  .अनुभव व अनुभवणारा एकरूप असतात, त्याच वेळेला तुम्ही अनुभवणे ,या स्थितीमध्ये असता .एक साधे उदाहरण घेऊ. समजा तुम्ही क्रोधायमान झालेले आहात ,त्या उत्कट क्षणी ,अनुभव व अनुभवणारा ,दोघेही हरवलेले असतात, केवळ अनुभवणे असते. दुसऱ्या क्षणी, तुम्ही त्यातून बाहेर येता त्या वेळी,मग अनुभवणारा व अनुभव असतो, परंतु अनुभवणे नसते. कर्ता व हेतुयुक्त कर्म अस्तित्वात येते.हेतू, राग आटोक्यात आणण्याचा ,नष्ट करण्याचा, किंवा धारणेनुसार त्याला वळण देण्याचा, असतो .या अनुभवण्याच्या स्थितीत, आपण नेहमी पुन: पुन: असतो. परंतु आपण दुसऱ्या क्षणी ,त्यातून बाहेर पडतो .आणि क्रिया, प्रतिक्रिया, नामकरण संग्रह ,वगैरे क्रिया सुरू होतात .अश्या तर्‍हेने काहीतरी बनण्याच्या प्रक्रियेतील दुवा जोडला जातो . जर अापण कर्म ,योग्य रित्या व संपूर्णपणे जाणू ,तर आपल्या सर्व हालचालींवर त्या समुजतीचा परिणाम होईल .
               यासाठी कर्माची, मुलभूत संपूर्ण ओळख झाली पाहिजे .कर्माची उत्पत्ती कल्पनेतून होते काय ?कल्पना प्रथम व कर्म नंतर असेच असते काय?का कर्म प्रथम होते? कर्मामुळे विरोध निर्माण होतो व मग त्याच्या भोवती कल्पना तयार होते ?कर्म कर्ता निर्माण करतो का कर्ता प्रथम निर्माण होतो? प्रथम कोण, याचा शोध घेणे फार महत्त्वाचे आहे .  जर कल्पना प्रथम निर्माण होत असेल ,तर कृती केवळ कल्पनेची दासी असते ,आणि त्यामुळे ते योग्य कर्म नसते .ती केवळ नक्कल असते .हे समजणे फार महत्त्वाचे आहे . आपला समाज केवळ बौद्धिक किंवा शाब्दिक पातळीवरचा आहे. प्रथम कर्ता निर्माण होतो व नंतर कर्म होते .कर्म हे कल्पनेचे नोकर  असते.आणि म्हणून कल्पना निर्मिती ,खऱ्या कर्माला  बाधक ठरते .कल्पना निर्मितीतून आणखी कल्पना निर्मिती होते .यामुळे विरोध निर्माण होतो .योग्य कर्माचा अभाव व कल्पनाधिक्य यामुळे समाजाचा तोल ढळतो .आपली सामाजिक रचना बौद्धिक आहे .आपल्या अस्तित्वाचा बळी देऊन, आपण केवळ बौद्धिक वाढ करीत असतो .कल्पनाधिक्याने गुदमरून मरण्याची वेळ येते . 
                 कल्पना केव्हा तरी कर्म निर्माण करील काय ?का फक्त कल्पना कर्माला वळण लावतात व त्याचे नियमन करतात ?कर्म कल्पनेने बांधलेले आहे ,तोपर्यंत मनुष्य कधीहि स्वतंत्र होणार नाही .हे समजणे अत्यंत जरुरीचे आहे .कल्पना जोपर्यंत कर्म ठरवीत आहेत ,तोपर्यंत  सर्व दु:खाना व प्रश्नांना उत्तर सापडणार नाही .योग्य कर्माचा विचार करण्याअगोदर, आपल्याला ,कल्पना कश्या निर्माण होतात ,त्याचा विचार केला पाहिजे . कल्पना निर्मिती, मग ती समाजवादी,भांडवलवादी, डाव्या गटाची ,वा उजव्या गटाची, धार्मिक ,किंवा आणखी कसली असो,  कल्पना निर्मिती म्हणजे काय ,ती कशी होते ,हे समजून घेणे अगत्याचे नाही काय?
               कल्पना म्हणजे  तुमची काय समजूत आहे ?कल्पना व कर्म एकाच वेळी होऊ शकेल काय?समजा एखादी कल्पना माझ्या जवळ आहे.ती कार्यवाहीत आणण्याची मी एखादी पद्धत शोधून काढतो.दुसरा एखादा दुसरी पद्धत शोधून काढतो .मग योग्य पद्धत कुठली हे ठरविण्यासाठी अापण वादविवाद करतो .व निष्कारण पुष्कळ शक्ती खर्च करतो.तेव्हा कल्पना निर्मिती कशी होते त्याचा शोध घेणे फार महत्त्वाचे नाही काय?या बद्दलची वस्तुस्थिती समजून घेतल्यावरच आपण कर्म विचार करू शकू .कल्पनेची चर्चा केल्याशिवाय केवळ कर्म विचार अर्थशून्य आहे . 
               कल्पना कशी निर्माण होते ?उदाहरणासाठी अगदी साधी कल्पना घेऊ .ती मोठी तात्त्विक धार्मिक किंवा शास्त्रीय असण्याचे कारण नाही.कल्पना, विचार प्रक्रियेतून निर्माण होते .विचार- प्रक्रियेचे अपत्य ,म्हणजे कल्पना .विचारं प्रक्रियेशिवाय कल्पना निर्माण होऊ शकत नाही .तेव्हा प्रथम ,कल्पना निर्मिती समजून घेण्यापूर्वी, विचार प्रक्रिया समजून घेतली पाहिजे .त्याशिवाय विचार प्रक्रियेचे फल जी कल्पना ,ती मला कशी समजणार ?विचार म्हणजे काय ?तुम्ही विचार केव्हा करता?विचार ही एक जड अथवा सूक्ष्म प्रतिक्रिया आहे . जर आघात जड असेल ,तर प्रथम प्रत्याघात म्हणून इंद्रियांचा जबाब असतो.मग लगेच संस्कार संग्रहातून प्रत्याघात येतो .जर क्रिया सूक्ष्म मानसिक असेल तर संस्कार संग्रहातून प्रत्याघात येतो .आता संस्कार संग्रह म्हणजे  जात,उपजात, धर्म ,वर्ण ,गुरू, कुटुंब ,गाव ,तालुका, जिल्हा, राज्य ,राष्ट्र ,जग ,परंपरा ,शिक्षण,  भोवतालची परिस्थिती, या सगळ्यांचा सूक्ष्मपणे ग्रथित केलेला एकत्रित  परिणाम .आणि याने दिलेल्या जबाबाला आपण विचार म्हणतो .
                तेव्हा विचार प्रक्रिया ही स्मरण प्रक्रिया आहे .हा कुठल्याही आव्हानाला, स्मरणाने दिलेला जबाब आहे .स्मरण नाही, संस्कार संग्रह नाही,तर विचारही नाही .संस्कार संग्रहाची एखाद्या विशिष्ट क्रियेबद्दलची प्रतिक्रिया, विचार प्रक्रिया सुरू करते .उदाहरणार्थ मी हिंदू आहे ,असा संस्कार संग्रह माझ्याजवळ आहे . शिक्षण, परंपरा, कौटुंबिक ,सामाजिक, व शैक्षणिक परिस्थिती, यातून हा संस्कार संग्रह निर्माण झाला आहे.जेव्हा मी इतर धर्मांबद्दल ,(मग तो बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान, शीख, कोणताही असो,)काही ऐकतो ,पाहतो, वाचतो, तेव्हा एक अनिवार्य प्रतिक्रिया सुरू होते .विशिष्ट विचार प्रक्रिया, या धारणेमधून सुरू होते .व नंतर मी बोलतो किंवा लिहितो .तुम्ही विचार प्रक्रियेचे अवलोकन करा ,व मग नंतर, तुम्हाला मी सांगतो यातील तथ्य उमजेल.
            समजा तुमचा कोणी अपमान केलेला आहे .त्याचा संस्कार तुमच्या जवळ रहातो.तो तुमच्या पार्श्वभूमीचा एक भाग बनतो .जेव्हा तुम्ही पुन: त्या व्यक्तीला भेटता तेव्हा या आव्हानाला (व्यक्तीची भेट हे आव्हान )पार्श्वभूमीने दिलेला जबाब ,म्हणजे विचार प्रक्रिया, व त्यातून एक कल्पना निर्माण होते.उदाहरणार्थ याच्याजवळ, त्याने केलेल्या अपमानाची जाणीव होईल, अशा तऱ्हेने आपण वागले पाहिजे .ही प्रतिक्रिया प्रत्येकाच्या धारणे प्रमाणे निरनिराळी असेल. कदाचित दोघांची प्रतिक्रिया एकमेकांच्या  विरुद्धही असेल.त्याच्याशी बोलू नये, तिरकस बोलावे ,मागील अपमानाबद्दल काहीही दर्शवू नये, शांत राहावे, किंवा एखादा खरोखरच सर्व विसरून गेल्यामुळे शांत असेल .
               कल्पना हे आव्हान बनते ,मग त्या आव्हानाला अनुसरून, धारणेतून, आपला हेतू साध्य होईल ,अश्या प्रकारच्या विचार चक्राला ,व नंतर कर्माला सुरुवात होते.म्हणजे  हेतुयुक्त कर्माला सुरुवात होते .  ही कल्पना जड दृष्टीने प्रत्यक्षात अाणली जाते. कर्माला आरंभ म्हणजेच कर्त्याचा जन्म होय.कल्पना ही नेहमीच बद्ध असते .ही गोष्ट समजणे फार महत्त्वाचे आहे . कल्पना हे विचारप्रक्रिया फल आहे .विचार प्रक्रिया म्हणजे धारणा प्रतिक्रिया .धारणा ही नेहमीच पूर्व संस्कारबद्ध असते .स्मरण हे नेहमीच भूतकाळातील असते .त्या स्मरणाला जीवन आव्हानामुळे दिले जाते .स्मरणाला स्वतःचे म्हणून स्वतंत्र अस्तित्त्व नाही.त्याला जीवन एखाद्या आव्हानामुळे दिले जाते .
                सर्व संस्कार संग्रह, सुप्त किंवा प्रगट, हा बद्ध असतो. आता आपण अश्या परिस्थिती पर्यंत येऊन पोचलो आहोत, कि या सगळ्याचा आपण फार वेगळ्या पद्धतीने ,विचार केला पाहिजे .तुम्ही आत तपास केला पाहिजे, कि आपण कल्पने प्रमाणे वागत नाही काय़ ?कल्पना निर्मिती विना, कर्म असेल काय ?कल्पना निर्मिती विरहित कर्म म्हणजे काय ते आता पाहू . कल्पना निर्मितीशिवाय तुम्ही केव्हा वागता?कर्म असते, परंतु ते पूर्व अनुभवाचा परिणाम नसते, असे केव्हा असते ?पूर्व अनुभवाधारित कर्म हे नियंत्रित(धारणा-कल्पना-कर्म) असते, म्हणूनच ते घोटाळा निर्माण करते .कल्पना निर्मिती विना कर्म, हे स्वयंभू असते .ते पूर्व अनुभवाधारित नसते .पूर्वानुभव, कल्पनेचे, व त्या द्वारा कर्माचे ,नियमन करीत नसतात .म्हणजेच कर्म हे कल्पनेपासून मुक्त असते .मन कर्माचे नियमन करीत नाही.
                        जेव्हा मन ,पूर्व अनुभवानुरूप,कर्माचे नियमन करीत नसते;जेव्हा विचार, पूर्व अनुभव अनुरूप , कर्माला वळण देत नसतो ; तेव्हाच खरी समज असते .विचार प्रक्रियेविना असे कर्म कुठचे?असे कर्म खरोखरच असू शकेल काय ?मला पूल अथवा घर बांधायचे आहे .मी तंत्र जाणतो .ते तंत्र मला पूल किंवा घर कसे बांधावे ते सांगते.या सांगण्याला आपण कर्म म्हणतो . कविता लिहिणे, चित्र काढणे; सरकारी ,सामाजिक, धार्मिक,  आर्थिक, जबाबदाऱ्या पार पाडणे;अशी अनंत प्रकारची कर्मे असतात .परंतू कल्पना निर्मितीविना कर्म असेल काय ? 
               नक्की असे एक कर्म आहे कि जिथे कल्पना थांबते .जेव्हा प्रेम प्रगट होते ,तेव्हाच कल्पना थांबते. प्रेम म्हणजे  स्मरण नव्हे. प्रेम म्हणजे  अनुभव नव्हे.प्रेम म्हणजे  तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता   तिच्या बद्दलचा विचार नव्हे .तुंम्ही प्रेमाचा विचारच करु शकणार नाही . तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तिच्याबद्दलचा ,मग ती कोणीही असो,प्रियकर प्रेयसी आई वडील मुलगा मुलगी नातू नात मित्र गुरू बंधू इत्यादी कोणीहि, त्यांच्याबद्दलचा विचार करू शकाल .परंतु विचार हे धारणेचे फल असते .आणि म्हणूनच ते सत्य नसते .प्रेम म्हणजे अनुभव नव्हे. जेव्हा प्रेम असते ,तेव्हा कर्म असते काय ?ते कर्म स्वतंत्र करणारे नसते काय?असे कर्म धारणेचा परिणाम नसते .ज्या प्रमाणे कल्पना व कर्म यांच्या मध्ये वेळ जातो, तसा येथे जात नाही .एकाच वेळी कर्म व प्रेम या दोन्ही गोष्टी होतात.कल्पना हे विचारप्रक्रिया फल.विचार प्रक्रिया हे धारणा फल होय  .धारणा म्हणजेच स्मरण हे भूतकाळातील असते . त्यामुळे कल्पना ही नेहमी जुनाट असते.भूतकाळाची सावली नेहमी वर्तमानावर पडलेली असते .आपण कल्पना व कर्म यांना जोडण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो .


                प्रेम हे संस्कार संग्रहाचा, धारणेचा, पार्श्वभूमीचा, अनुभवाचा, कल्पना निर्मितीचा, एखाद्या शिस्तीचा, परिणाम नसते . प्रेम हेच एक कर्म असते . फक्त प्रेमामुळेच स्वतंत्रता मिळते .जोपर्यंत कर्म कल्पनेने ,कल्पना विचारप्रक्रियेने, विचार प्रक्रिया धारणेने, धारणा पूर्व संस्कारांनी ,पूर्वसंस्कार त्यापूर्वीच्या धारणेने ,बद्ध आहेत; तोपर्यंत मुक्ती मिळणार नाही.


           जोपर्यंत ही साखळी अव्याहत सुरू आहे, तो पर्यंत सर्व कर्म बद्ध असते .जेव्हा तुम्ही याबद्दलचे सत्य जाणाल ,तेव्हा प्रेम, जे धारणेचा परिणाम नाही, ते प्रगट होईल . कल्पना निर्मिती कशी होते ?कर्म कल्पना बद्ध कसे असते.कल्पना कर्म नियमन  कश्या करीत असतात,त्यामुळे सर्व कर्म कसे बद्ध असते ,याबद्दल प्रत्येकाने जागृत असले पाहिजे .कल्पना कोणत्या आहेत किंवा कोणाच्या आहेत त्यांचा प्रश्न नाहीं .त्याला महत्व नाही .जोपर्यंत आपण कल्पनांना चिकटून आहोत तोपर्यंत "अनुभवणे"अस्तित्वातच येणार नाही . तो पर्यंत आपण भूत किंवा भविष्य ,ज्यामुळे आणखी आणखी कल्पना निर्माण होतात, त्यामध्ये राहणार आहोत .कल्पनेपासून मन जेव्हा मुक्त होईल ,तेव्हाच आपण वर्तमानात राहू.व अनुभवणे अस्तित्वात येईल . कल्पना हे सत्य नव्हे .सत्य हे क्षणाक्षणाला सरळ सरळ अनुभवण्याचे असते. तुम्हाला जो अनुभव हवा ते सत्य नव्हे.जेव्हा एखादा, कल्पनेच्या गाठोड्या पलीकडे जातो, तेव्हाच सत्य प्रगट होते .कल्पनेचे गाठोडे, म्हणजेच मी व माझे . तेच मन.या मनाला पूर्ण किंवा विभागश: सूत्रबद्धता आहे .या मना पलीकडे जेव्हा एखादा जाईल, जेव्हा विचार पूर्णपणे स्तब्ध होईल, तेव्हा एक अनुभवणेच शिल्लक राहील. आणि त्याच वेळेला सत्य काय त्याचा बोध होईल . 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel