काल म्हणजे काय याविषयी चर्चा करणे मला आवडेल .कारण अंतिम सत्याचे कालातीत वस्तूचे महत्त्व, सौंदर्य व संपन्नता,काल प्रक्रिया संपूर्ण समजल्याशिवाय आपल्या अनुभवाला येणारा नाही.शेवटी आपल्यापैकी प्रत्येकजण, प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे, आनंद व संपन्नता शोधीत असतो .महत्त्वपूर्ण,आनंदमय व संपन्न जीवन ,कालाशी संलग्न असूच शकणार नाही.प्रेमाप्रमाणे असे जीवन कालरहित असते.कालरहित वस्तू समजण्यासाठी आपण कालाचा उपयोग करता कामा नये.फक्त काल म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे.आपण काल हा मिळवण्यासाठी,अनुभवण्यासाठी,शोध घेण्यासाठी साधन म्हणून,वापरता कामा नये.कालाचा उपयोग आपण कालातीत तत्त्व मिळवण्यासाठी करता कामा नये.आपण सर्वजण कालाचा उपयोग  "ते"(सत्य आनंद परमेश्वर अनंत ) मिळविण्यासाठीच करीत असतो.कालातीत वस्तू समजण्यासाठी आपण कालाचा वापर करीत असतो . काल फुकट दवडीत असतो.
                 
काल म्हणजे काय हे समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटत नाही काय ?मला असे वाटते की कालातीत होणे शक्य आहे .काल म्हणजे काय हे विभागाश:नव्हे अर्धवट नव्हे तर संपूर्ण एकसमयावच्छेदेकरून समजणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे आहे.                  

जेव्हा मी काल म्हणतो तेव्हा सेकंद मिनिट तास दिवस महिना वर्ष अशा तर्‍हेच्या अखंड अविरत चालणाऱ्या भौतिक कालाबद्दल बोलत नाही.मानसिक कालाबद्दल मानसिक स्मरण, संस्कार, क्रिया व प्रतिक्रिया, याबद्दल बोलत आहे.हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे .आपल्या आयुष्यातील जागेपणाचा बहुतेक भौतिक काल आपण या मानसिक कालात व्यतीत करीत नसतो काय ?आपण कालामुळे जगतो आपण कालाचे अपत्य आहोत.मन गेली कित्येक दिवस महिने वर्षे यावर उभे आहे.वर्तमान हा फक्त भूताकडून भविष्याकडे जाण्याचा दरवाजा आहे. आपल्या हालचाली,आपले मन,आपले अस्तित्व,हे कालावर उभे आहे. कालाशिवाय अापण विचारच करू शकत नाही.कारण विचार हे कालाचे अपत्य आहे.गेलेल्या कितीतरी दिवसातून महिन्यातून वर्षांतून विचार हा निर्माण होतो. स्मरणाशिवाय विचार हा अशक्य आहे .स्मरण म्हणजे काल.(मानसिक)वरती उल्लेख केल्याप्रमाणे काल हे दोन प्रकारचे आहेत.भौतिक व मानसिक.गेला दिवस हा घड्याळाप्रमाणे एक काल आहे.गेल्या दिवसांतील स्मरण, संस्कार या दृष्टीने कार्यवाहीत असणारा, व वर्तमानाचा  परिणाम होऊन कल्पना रचणारा,असा दुसरा मानसिक काल आहे.तुम्ही भौतिक काल नाकारू शकत नाही. कारण तो मूर्खपणा होईल.आपली गाडी चुकेल.नोकरी जाईल.भौतिक कालाशिवाय मानसिक काल म्हणून एखादी चीज खरोखरच अस्तित्वात आहे काय?गेला दिवस म्हणून काल जरूर आहे परंतु मन ज्या प्रकारे गेल्या दिवसांचा विचार करते,गेला दिवस समजते,तसा एखादा काल खरोखरच अस्तित्वात आहे काय?
                   
मानसिक काल हा मनाचा खेळ आहे.तो मनाचा पसारा आहे.ते मनाचे अपत्य आहे.प्रत्येक व्यक्तीचा मानसिक काल भिन्न आहे. विचाराविना काल नाही.काल म्हणजे भूतकाळाचा वर्तमानाशी संयोग व त्यातून भविष्याची घडण होय. भूतकालातील संस्कार संग्रह, अनुभव, हा वर्तमानकालावर आदळून, भविष्यकाल निर्माण करीत असतो .ही सर्व विचार प्रक्रिया आहे. हा मनोमार्ग आहे. विचार प्रक्रिया मानसिक उत्क्रांती घडविते.परंतु भौतिक कालाप्रमाणे हा मानसिक काल सत्य आहे काय?                      
मनोबालक असा हा काल आपण कालरहित समजण्यासाठी कधी तरी वापरू शकू काय ?आनंद गेल्या दिवसांवर उभा असू शकत नाही.आनंद हा कालफल,कालअपत्य नाही.आनंद हा नेहमी वर्तमानात असतो.तो कालरहित स्थितीमध्ये असतो.अशी स्थिती तुम्ही कधी अनुभवली आहे कि नाही ते मला माहीत नाही.जेव्हां तुम्ही एखादी निर्मिती करीत असता त्यावेळचा आनंद या स्वरूपाचा असतो .काळ्या ढगांच्या कडा रुपेरी असतात,त्या क्षणी काल नसतो.फक्त वर्तमान, चालू वर्तमान, 'आत्ताच', असते.
                     
तत्कालिक वर्तमान अनुभवताना मन नसते.अनुभवल्यावर मन प्रवेश करते.नंतर ते आठवण्याचा, साठवण्याचा,चालू ठेवण्याचा,आणखी मिळवण्याचा,प्रयत्न करते.अशाप्रकारे काल अस्तित्वात येतो .काल 'आणखी' 'आणखी' ने निर्माण केला जातो. काल म्हणजे मिळविणे,राखणे, साठविणे, वाढविणे, काल म्हणजे दाबून टाकणे,त्याग हेही एक प्रकारचे मानसिक मिळवणे बनणे आहे .म्हणूनच मनाला शिस्त लावून,ताब्यात ठेवून, त्याला आकार देऊन,त्याची दिशा बदलून,त्याच्या धारणेत बदल करून,विचार, स्मरणानुरूप आकारयुक्त करून, काल रहित वस्तू कधीही प्राप्त होणार नाही.                      

बदल कधीतरी कालावर अवलंबून आहे काय ?आपल्यापैकी बहुतेक जणांची अशी धारणा आहे की बदलासाठी काल आवश्यक आहे. आपली वाढ तश्याच  तर्‍हेने झालेली आहे.त्यामुळे आपल्याला बदलासाठी काल आवश्यक वाटतो.मी कांहीतरी आहे,आणि मी जे कांही असावे असे मला वाटते,त्यात मी जे कांही आहे त्याचे परिवर्तन होण्यासाठी,काल आवश्यक आहे अशी माझी धारणा आहे.मी अधाशी आहे आणि त्या अधाशीपणामुळे दुःख गोंधळ क्लेश विरोध निर्माण होतो.मला अधाशीपणा सोडायचा आहे.हा बदल होण्यासाठी आपल्याला असे वाटते की काल आवश्यक आहे.म्हणजेच कांहीतरी उच्च प्राप्त करून घेण्यासाठी कांहीतरी उच्च बनण्यासाठी काल हा मला आवश्यक वाटतो.बदलण्यासाठी बनण्यासाठी काल हे साधन म्हणून वापरला जातो .एखादा खुनशी,दंगेखोर ,मत्सरी, रागीट, दुष्ट, भावना प्रधान व अधाशी आहे.आता हे जे कांही आहे त्यात बदल घडवून आणण्यासाठी काल आवश्यक आहे काय?आता जे कांही आहे त्यात बदल घडून यावा असे आपल्याला कां वाटते ?बदल कां? कारण जे काही आहे त्यात आपण असमाधानी आहोत. त्यामुळे विरोध निर्माण होतो.आता ती स्थिती आपल्याला आवडत नसल्यामुळे आपल्याला दुसरी काहीतरी जास्त चांगली उच्च भव्य दिव्य स्थिती पाहिजे आहे.क्लेश विरोध व असमाधान यातूनच बदलाची वासना निर्माण होत नाही काय़ ? विरोध कधीतरी कालातून नष्ट होतो काय ?तुम्ही जर अजूनही म्हणत असाल कि तो कालातून नष्ट होईल तर तुम्ही अजूनही विरोधातच आहात.विरोधमुक्त होण्यासाठी तुम्ही जे कांही आहा त्यात बदल होण्यासाठी तुम्ही म्हणाल वीस दिवस किंवा वीस वर्षे लागतील तर या सर्व कालात तुम्ही विरोधातच आहात. विरोधात नसता काय ?आणि म्हणूनच काल,बदल घडवून आणू शकत नाही.
                  
जेव्हां आपण "काल", एखादी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी वापरतो तेव्हां आपण फक्त मुद्दा टाळीत असतो.जे कांही आहे त्याला तोंड देण्याचे टाळत असतो.त्याला तोंड देण्याचे पुढे ढकलीत असतो .हा मुद्दा समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे.अधाशी व दंगेखोरपणा आपल्याला क्लेश देतो. त्यामुळे आपले संबंध ढवळले जातात. या संबंधरूपतेच्या ढवळण्याची आपल्याला जाणीव आहे.त्याला आपण अधाशीपणा किंवा दंगेखोरपणा असे नाव दिलेले आहे.मग आपण स्वतःशी असे म्हणतो कि काही कालानंतर मी यापासून मुक्त होईन.मी अधाशीपणा सोडण्याचा प्रयत्न करीन.मी कोणाचा मत्सर करणार नाही.मी शांत राहण्याचा प्रयत्न करीन.आता तुम्हाला दंगेखोरपणा सोडून द्यायचा आहे.त्यामुळे विरोध झगडे क्लेश व गोंधळ निर्माण होतो असे तुम्हाला आढळून आले आहे आणि हळूहळू कांही काळ गेल्यावर त्यापासून तुम्ही मुक्त व्हाल अशी तुमची विचारसरणी आहे.परंतु वस्तुतः काय घडत आहे ?विरोधमय स्थितीमध्ये असल्यामुळे तुम्हाला जिथे विरोध नाही अशी स्थिती प्राप्त करून घ्यावयाची इच्छा आहे.अविरोधमय स्थिती ही कालोत्पन्न आहे क़ाय?ती हळुहळू प्राप्त करून घेण्यासारखी आहे काय?कारण जोपर्ययत अविरोधमयस्थिती प्राप्त करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात तोपर्यंत तुम्ही विरोधमय स्थितीमध्ये आहात.तुम्ही दंगेखोर आहात. आणि जेव्हा तुम्ही बदलाल (अर्थात जर तुम्ही बदललात तर )तेव्हा तुम्ही तत्क्षणी तत्काळ बदलाल.             

आपली समस्या अशी आहे कि विरोध गोंधळ हा दिवस वर्षे अनेक जन्म यातून नष्ट  होण्यासारखा आहे काय? मी या काळात ढवळलेली संबंधरूपता ठीक करण्याचा प्रयत्न करणार आहे,असे जेव्हां तुम्ही म्हणता तेव्हां काय होते ?हा प्रयत्नच तुमची विरोधमय स्थिस्ती दर्शवित नाही काय?जर तुम्ही विरोधाला विरोध करीत नसाल तर विरोध टाळण्याचा प्रयत्न करण्याची काही गरज नाही !!विरोधमुक्त होण्यासाठी विरोधाला विरोध आवश्यक आहे व त्यासाठी काही काळ आवश्यक आहे असे तुमचे म्हणणे आहे. परंतु विरोधाला विरोध हाही एक विरोधच आहे.तुम्ही तुमची शक्ती विरोधाला ज्याला तुम्ही मत्सर दंगेखोरपणा अधाशीपणा वगैरे नावे देत आहात त्याला विरोध करण्यात फुकट दवडीत आहात.तुमचे मन अजूनही विरोधमय स्थितीत आहे.या  हळूहळू विरोधमुक्त होण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून राहणे चुकीचे आहे.या कालावर दंगामुक्त होण्यासाठी(संबंधमयता योग्य करण्यासाठी ) ,या प्रक्रियेवर दंगामुक्त होण्यासाठी, अवलंबून राहणे चुकीचे आहे, हे लक्षात आले पाहिजे . नंतरच तुम्ही जे काही आहे ते असण्याला समर्थ व्हाल. मानसिक ढवळणे म्हणजेच दंगा .           
                   
कांहीही समजण्यासाठी, मानवी किंवा शास्त्रीय समस्या समजण्यासाठी,काय आवश्यक आहे ?शांत मन आवश्यक नाही काय?समजण्याला उत्सुक असे मन आवश्यक आहे.जे मन एकाग्र होण्याचा प्रयत्न करीत आहे असे मन नव्हे.असे मनच विरोधमय स्थितीत आहे.जर मला एखादी गोष्ट समजावी असे खरोखरच वाटत असेल तर मन तात्काळ शांत होते. जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीचे स्वर ऐकायचे असतात किंवा जेव्हा तुम्हाला एखादे आवडते चित्र पहायचे असते तेव्हा तुमच्या मनाची स्थिती काय असते?तिथे ताबडतोब शांती निर्माण होत नाही काय ?जेव्हां तुम्ही आवडीचे स्वर ऐकत असता किंवा आवडीचे चित्र पाहत असता किवा एखादी आवडीची गोष्ट करीत असता तेव्हा तुमचे मन एकाग्र होत नाही काय ?तुमचे मन इकडे तिकडे भरकटत नसते .तुम्ही फक्त ऐकत असता.जेव्हां तुम्हाला विरोध समजून घ्यायचा असेल तेव्हां तुम्हाला कालावर अवलंबून राहण्याचे मुळीच कारण नाही.तुम्ही जे कांही आहे त्यापासून म्हणजे विरोधापासून दूर न पळता त्याच्यासमोर उभे ठाकले पाहिजे.गंमत पाहा मन ताबडतोब शांत स्तब्ध होते. तुम्ही जे कांही आहे त्यात बदल घडवून आणण्यासाठी कालावर अवलंबून राहण्याचे सोडून देता.त्या प्रक्रियेतील मूर्खपणा फसवेपणा तुमच्या लक्षात येतो.जे कांही आहे त्याच्या समोरच तुम्ही उभे ठाकलेले आहात.जे कांही आहे ते समजून घेण्यासाठी तुमचे मन उत्सुक असल्यामुळे स्वाभाविकच ते शांत स्थिर स्तब्ध झालेले आहे.जोपर्यंत तुमचे मन विरोध करीत आहे,धि:कार करीत आहे,दोष देत आहे,तोपर्यंत समज अशक्य आहे.जर मला तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला सारखा धि:कार दोष देत राहता कामा नये.समज अशक्य होईल.शांत स्तब्ध निस्तरंग मन बदल घडवून आणते.जेव्हा मन जे कांही आहे त्याला धि:कार करण्याचे, दोष देण्याचे, टाळण्याचे ,थांबवील ; फक्त निवड शून्य जागृत असेल, त्या गतिशून्य निवड शून्य जागृत स्थितीत जेव्हा तुम्ही खोलवर जाल तेव्हा तुम्हाला आपोआप बदल घडूनआलेला आढळून येईल .              

क्रांती फक्त आताच शक्य आहे भविष्य काळात नाही.पुनर्जन्म आत्ता उद्या नाही. जर तुम्ही मी जे कांही आतापर्यंत सांगितले त्याचा प्रयोग करून पाहाल ,तर तुम्हाला तात्काळ पुनर्जन्म नाविन्य ताजेपणा प्राप्त झालेला आढळून येईल.जेव्हां मन उत्सुक असते तेव्हां त्याला समजून घेण्याची वासना असते.अशा वेळी नेहमीच ते स्थिर शांत स्तब्ध असते.आपल्यापैकी बऱ्याच जणांची अडचण अशी आहे कि आपल्याला समजून घेण्याची खरोखरच खोलवर इच्छा नसते.आपल्याला समजले तर त्यामुळे क्रांती घडून येईल अशी तुम्हाला भीती वाटत असते .म्हणून आपण विरोध करीत असतो.जेव्हां आपण काल हा हळूहळू बदलासाठी वापरतो त्यावेळी "मी"ची संरक्षण यंत्रणा कार्यवाहीत असते!               

अशा प्रकारे मला असे वाटते कि पुनर्जन्म आत्ताच शक्य आहे.तो भविष्यात नव्हे. उद्या नव्हे.जो मनुष्य आनंद मिळविण्यासाठी, ईश्वरप्राप्तीसाठी, सत्य समजण्यासाठी, कालावर अवलंबून राहतो तो स्वतःला फसवीत असतो.तो अज्ञानात राहात असतो आणि म्हणूनच विरोधमय स्थितीत असतो.जेव्हा मन शांत स्तब्ध निस्तरंग असते,ज्यावेळी ते उत्तर शोधीत नसते, विरोध करीत नसते, टाळाटाळ करीत नसते ,कांहीही दाबून टाकीत नसते, कांहीही बनत नसते, त्याच वेळेला पुनर्जन्म होण्याची शक्यता आहे.त्याच वेळेला मन सत्य घेण्याला समर्थ असते .तुमचे स्वतंत्र होण्याचे प्रयत्न नव्हेत तर सत्य तुम्हाला स्वतंत्र करते.(जे आहे त्याचा जसा आहे तसा स्वीकार तुम्हाला स्वतंत्र करतो )

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel