सौ.ची शाळा सकाळी सात वाजता असे .शक्यतो मी तिला रोज सकाळी शाळेत सोडण्यासाठी जात असे .आमच्या सोसायटीमधून फाटकातून बाहेर पडल्यावर रस्त्याला लागेपर्यंत एकदम उंचवटा आहे  .स्कूटर सकाळी सुरुवातीला जर रेझ केली नाही तर ती बंद पडण्याचा संभव  असतो.मी नेहमी रेझ करूनच स्कूटर सुरू करीत असे.कुठल्याही रस्त्यावर येताना अापण जर चढअसेल तर तो काटकोनात चढला पाहिजे.जर आपण तिरके चढलो तर गाडी घसरण्याचा संभव असतो .हे सर्व माहीत असूनही  व मी नेहमी कुठेही त्याचे आचरण करीत असूनही त्या दिवशी गोंधळ झाला . मी दोन चुका केल्या . एक गाडी रेझ करून घेतली नाही.दोन गाडी काटकोनात न चढवता तिरकी रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला .गाडी चढावर बंद पडली .उजव्या बाजूला कलली . मी पाय टेकला परंतु  सौ. डाव्या बाजूने बसलेली असल्यामुळे उजव्या पायावर  पडलेला भार सहन करता आला नाही.  गाडी कलल्यावर  ती गाडीवरून उजव्या बाजुला पाठीवर कोसळली .स्पीड काहीच नसल्या मुळे लागण्याचा संभव नव्हता . तरीही पडल्यामुळे जे लागले ते लागणरच.तिचे डोके आमच्या सोसायटीच्या कम्पाउंडच्या   धक्क्यावर जाऊन आपटले.कंपाऊंडला बारीक रेतीचे प्लास्टर केलेले होते .त्यातील  टोकदार  खड्यावर तिचे डोके आपटले व जखम झाली .ती झटकन उठून उभी राहिली .तिच्या हालचालीवरून तिला विशेष लागले असे वाटले नाही .आज शाळेत जायचे नाही असे आम्ही ठरविले .ती घाबरली  व थोडी थरथरतही होती .हाता पायाला खरचटले होते परंतु याशिवाय फ्रॅक्चर वगैरे काही नव्हते .एवढ्यात समोरून एक रिक्षा जात होती ती थांबली व त्यातून एक  बाई  उतरल्या .त्या तिच्या शाळेतील होत्या.आम्ही पडलेले पाहून त्या थांबल्या होत्या .त्यांना तिने ती आज शाळेत येणार नाही असा निरोप मुख्याध्यापिकेला द्यावयास सांगितला .तिच्या बॉडी लँग्वेज वरून तिला विशेष लागलेले नाही फक्त मुका मार थोडासा बसला आहे असे वाटत होते.तीआमच्या बिल्डिंगमध्ये बरोबर शिरली.दोन जिने चढून आमच्या फ्लॅटमध्येही बरोबर शिरली. डोक्याला लागल्यामुळे रक्त येत होते म्हणून तिला गादीवर न झोपवता सतरंजी टाकून जमीनीवर झोपण्यास सांगितले .जखम किती आहे ते केसांमध्ये पाहून रक्त पुसून त्याला ड्रेसिंगही केले .मुलाला कॉफी करण्यास सांगितली .तीही तिने घेतली .नंतर तिला विश्रांती घे असे म्हटले  आणि ती आडवी झाली . थोडीशी झोपलीही.तिचे बोलणे चालणे नेहमीप्रमाणे होते .जिने चढून फ्लॅटमध्ये शिरणे बेडरुममध्ये जाणे सर्व नैसर्गिक होते .यामध्ये साधारण एक तास गेला आठ वाजता ती एकदम उठली आणि म्हणाली की मी इथे कशी आले?त्या बरोबर आम्ही चमकलो काहीतरी विचित्र होत आहे असे लक्षात आले. ती स्कूटरवरून पडताना अहोअहो म्हणून ओरडली ते तिच्या लक्षात होते.त्यानंतर शाळेतील मैत्रिणीजवळ दिलेला निरोप , माझ्या जवळ झालेले बोलणे ,.मी हात धरून हळू हळू  चालवणे, काय झाले काय झाले असे विचारत आलेल्याना मी परत पाठवणे ,घरामध्ये येऊन कॉफी पिणे व झोपणे ,यातील एकही गोष्ट तिला आठवत नव्हती .स्कूटरवरून पडले हीच शेवटची आठवण होती. आणि म्हणून तिने येथे मी कशी आले असे विचारले .तो एक तास जसा काही तिच्या आयुष्यातून लुप्त झाला होता आणि अजूनही लुप्तच आहे  .मी डॉक्टरना घरी घेऊन आलो .हल्लीसारखी त्या वेळी परिस्थिती नव्हती .डॉक्टर घरी येत असत . हल्ली हॉस्पिटलमध्ये आणा किंवा दवाखान्यात घेवून या असे  सांगितले जाते.डॉक्टरनाही त्याची काही कारणे असतील .बदललेली उपचारपद्धती त्याला कारणीभूत असेल.काही असो परंतु फॅमिली डॉक्टर आणि होम व्हिजिट या गोष्टी हल्ली अस्तंगत  झाल्या आहेत .एवढे खरे .डॉक्टर घरी आले.त्यांनी पूर्णपणे तपासले . त्यांना सर्व काही नॉर्मल वाटले .त्यांनी त्या दिवशी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले . लिक्विड फूड द्या असेही सांगितले . जर  उलट्या   झाल्या तर हॉस्पिटलमध्ये घेऊन या असे सांगितले .दोन दिवस ती रजेवर होती बाकी सर्व काही व्यवस्थित  होते .तिसर्‍या दिवशी  ती शाळेतही गेली काळजीचे कारण मिटले.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेंदूमध्ये काहीतरी धक्का बसला व एक तासाची स्मृती नष्ट झाली नेहमी मेंदूंमध्ये घटनांचे रेकॉर्डिंग होत असते ते काही  कारणाने थांबले व नंतर ते पुन्हा सुरू झाले .त्या वेळीही तिची स्मृती व्यवस्थित होती. शाळेतील मैत्रीण ओळखणे, बरोबर आपल्याच ब्लॉकमध्ये येणे, आम्हा सर्वांना ओळखणे,ही तिची स्मृती शाबूत असल्याची लक्षणे होती . तिच्या  स्मृतीवर काहीही परिणाम झाला नव्हता . तिला सर्व काही पूर्वीचे व्यवस्थित आठवते व त्यानंतरचेही सर्वकाही खडखडीत आठवते . फक्त त्या एक तासात काही रेकॉर्डिंग झाले नाही . मीच बरेच काही विसरून जात असतो  .या घटनेला सुमारे तीस वर्षे झाली.अजूनही तिला त्या एका तासातील काहीही आठवत नाही .मेंदूला जरा मागे पुढे लागले असते तर एवढ्याशा अपघाताने काहीही होऊ शकले असते .जिवावरचे शेपटीवर निभावले असे म्हणता येईल .

मेंदू ही एक गूढ चमत्कारिक गोष्ट आहे .तिथे काम कसे चालते हे अजूनही शास्त्रज्ञांना पूर्णपणे कळलेले नाही .केमिकल लोच्याम्हणतात तो हाच!!

४/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel