राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री

श्रीनिवासपंत दाजी, स्वामींचे सेवेशी.

सेवक नारो मेघश्याम कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावे. विशेष. आपण पत्र पाठविलें त्यांत मजकूर लिहिला की, श्रीमंत पेशवे यांस पेशवाई कशी प्राप्त झाली; व कोणत्या पुरुषाने शाहू महाराज यांचे येथे पराक्रम करून महाराजांची कृपा -संपादन करून, कामगिरी मोठी कोणती बजाविली; म्हणून महाराज कृपावंत -होऊन यांसच पेशवाई देण्याचे कारण कोणते झाले; व कोणत्या पुरुषार्न किती दिवस राज्य केलें; तें तपशीलवार लिहून पाठविणे. येविशी पत्री आज्ञा झाली, त्यावरून सविस्तर मजकूर लिहून आपणांस पाठविला आहे त्याजवरून कळेल.

बाळाजी विश्वनाथ भट व जानोजी विश्वनाथ भट हे राहणारे  श्रीवर्धनचे. यांचे वतन देशमुखीचें. देशमुखीचा कारभार हे उभयतां बंधू करीत असतां, ते राज्य हबशी यांचे पडलें, जानोजी विश्वनाथ भट यांस हबशी याणे -जंजिऱ्यास धरून नेले आणि कैद करून गोणत्यांत घालून समुद्रात बुडविलें. - त्या दहशतीने बाळाजी विश्वनाथ श्रीवर्धनाहून पळून मौजे वेळास येथे बाळाजी महादेव भान यांचे येथे आले. भानू व भट यांचा स्नेह पूर्वीचा होता. बाळाजी विश्वनाथ तेथे येऊन भानुस भेटले. ते समयीं भानू यांणी बाळाजी - विश्वनाथ यांस विचारिलें, " असे तुम्ही का आला ?" मग भट याणी मागील मजकूर झाला तो भानूंस सांगितला, आणि बोलिले:- “आतां या प्रांतांत राहावयाचें नाहीं; बाहेर कोठे तरी रोजगारास जावे." तेव्हां बाळाजी महादेव बोलले, " आम्ही तुमचे समागमें त्रिवर्ग बंधू येतो." हे ऐकून भट यांणी उत्तर केलें, “बरें आहे, आम्हांस भाकर मिळेल तीत तुम्हांसही चतकोर मिळेल".

असें बोलणे झाल्यानंतर त्रिवर्ग बंधू भानू व भट, असे चारी असामी निघाले ते साताऱ्यास आले. तेथें धनाजी जाधवराव होते. त्यांजकडे बाळाजी विश्वनाथ व भानू तिये बंधू गेले. महादाजी कृष्ण जोशी साता-यास होतेच; त्यांची व रामाजी महादेव यांची ओळख पूर्वीची होती; त्याजवरून जोशी यांजकडे जाऊन ते भेटले. महादाजी कृष्ण जोशी व रामाजी महादेव भानू हे उभयतां शंकराजी नारायण सचिब यांजकडे चाकरीस राहिले. ते समयीं साताऱ्यास ताराबाई राज्य करीत होती, तिजपाशी धनाजी जाधवराव हे सरदार होते, व शंकराजी नारायण कारभार करीत होते. शाहू महाराज दिल्लीस गेले होते. ते दिल्लीहून साताऱ्यास यावयास निघाले, ते खानदेशांत आले. तेथून धनाजी जाधवराव, व खंडेराव दाभाडे, शंकराजी नारायण सचिव, व रामचंदँ, व चिमणाजी दामोदर यांस पत्रे महाराज यांणी पाठविली की, तुम्हीं भेटीस येणे. त्यावरून धनाजी जाधवराव व खंडेराव दाभाडे व चिमणाजी दामोदर, असे खानदेशांत जाऊन त्यांणी श्रीमंत शाहूमहाराज यांची भेट घेतली. शंकराजी नारायण सचिव भेटीस गेले नाहीत, साताऱ्यास ताराबाईजवळ होते. धनाजी जाधवराव खानदेशांत महाराजांचे भेटीस गेले, त्यासमयी बाळाजी विश्वनाथ देशमूख व हरी महादेव भानू व बाळाजी महादेव भानू , असे त्रिवर्ग धनाजी जाधवराद यांजवळ होते. ते तसेच त्यांच्यासमागमें खानदेशांत गेले. तेथें महाराजांच्या भेटी झाल्या. नंतर जाधवराव यांणी बाळाजी विश्वनाथ यांची महा- राजांची भेट करविली. नंतर शाहूमहाराज साता-यात आले ते समयी शंकरौजी नारायण सचिव यांणी हिरकणी खाऊन प्राण दिला.

शाहू महाराज साताऱ्यास राज्य करूं लागले, त्यासमयीं बहिरोपंत पिंगळे पेशवे होते. महाराज राज्य करूं लागल्यानंतर एका वर्षाने बहिरोपंत पिंगळे पेशवे यांजकडे लोहगड किल्ला होता तो पिंगळे लोहगडास असतां कान्होजी आंगरे यांणी घेतला. हे वर्तमान साताऱ्यास समजले. ते समयीं पिंगळे यांजवर इतराजी करून पेशवाई त्यांजकडील दूर करून दुसऱ्यास सांगावी हा विचार करीत असतां बाळाजी विश्वनाथ हे खानदेशापासून महाराज साताऱ्यास येत तो पावेतों महाराजांचे स्वारीयराबरच होते, ते कांही मसलतीच्या उपयोगी पडले होते, हे महाराजांच्या मनांत येऊन व बाळाजी विश्वनाथ शाहाणे, कर्ते, असें पाहून, त्यांस महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. शके १६३५ विजयनाम संवत्सरे, सन अर्बी अश्शर मय्यां व अल्लफ, या साली पिंगळे यांची पेशवाई काढून बाळाजी विश्वनाथ यांस सांगितली.

त्यासमयीं बाळाजी विश्वनाथ पेशवे यांणी महाराजांस विनंती करून राज्याची फडणिशी आपल्याकडे मागून घेतली, आणि हरी महादेव भानू यांस फडणिशीची वस्त्रे पेशवे यांणी दिली. पुरंदर किल्ला, व लोहगड किल्ला, असे दोन किल्ले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांणी मागून घेऊन, ते व हरी महादेव भानू फडणीस असे निघून पुरंदरास आले. त्यासमयीं किल्ल्यावरती सचिवां- कडून कारभारी बापूजीपंत होते. त्या बापूजीपंताचा व भानू यांचा स्नेह पूर्वीचा, म्हणजे ज्या समयीं भानू सचिवांजवळ चाकर होते त्या वेळचा होता. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांणी किल्ल्याखाली येतांच किल्ला खाली करून यावा सबब हरी महादेव भानू यांस किल्ल्यावरती पाठविलें. ते किल्ल्या- वरती जातांच बापूजीपंत यांस घेऊन, किल्ल्याखाली येऊन बाळाजी विश्व- नाथ पेशवे यांची व बापूजीपंतांची भेट केली. त्या वेळेस बापूजीपंत यांजपासून आण शपथक्रिया घेऊन मागती किल्ल्याचे काम त्यांजकडेसच सांगितले.

असा पुरंदर किल्ल्याचा बंदोबस्त करून पेशवे तेथून कूच करून लोह- गडास आले. मौजे ओलवण येथे मुक्काम केला आणि किल्ल्यावरती कान्होजी आंगरे होते त्यांजकडे मध्यस्तीकरितां शाहाणे मनुष्य पाठविले. त्यांच्या जवळ मजकूर सांगितला की, " तुमचा आमचा स्नेह पूर्वीपासून; जंजिऱ्यास बहिरराव दळवी यांणी दास्तान मांडिले तेव्हां त्यांजवळ तुम्ही होतां व आम्ही श्रीवर्धनास देशमुखीचा कारभार करीत होतो. तेथील तुमचा आमचा स्नेइ. हल्ली शाहू महाराज यांणी पेशवाई आम्हांस सांगितली व लोहगड किल्ला आम्हांस दिला, या साठी लोहगड आमचे हवाली करावा. "

असें कान्होजी आंगरे यांणी ऐकून, संतोष पावून लागलेच बाळाजी विश्वनाथ यांचे भेटीस मौजे ओलवणास आले. येथे येऊन, उभयतांच्या भेटी होऊन बोलणी चालणी दोघांची झाली. त्यांत उभयतांची आण शपथ परस्परे झाली की, उभयतांनी एकमेकांचा भाऊपणा चालवावा. ह्याप्रमाणे होतांच लागलाच किल्ला पेशवे यांचे हवाली करून आंगरे कुलाब्यास गेले. बाळाजी विश्वनाथ पेशवे किल्ल्यावर जाऊन किल्ल्याचा बंदोबस्त करून, किल्ल्याची सबनिशी रामाजी महादेव भानू यांजकडे सांगितली व नाणे मावळची मुज, हरी महादेव भानू यांस सांगितली.

असे होऊन बाळाजी विश्वनाथ पेशवे चिंचवडास आले. तेथून रामाजी महादेव भानू लोहगडास गेले. त्या दिवसापासून हरी महादेव भानू व बाळाजी महादेव भानू हे बाळाजी विश्वनाथ यांजबरोबर होते. तेथून बाळाजी विश्वनाथ पेशवे निघून जेजुरीस आले. तेथे मुक्काम होता. त्या मुक्कामास हरी महादेव भानू फडणीस चार पांच महिने फडणिशीचे काम करून होते ते मृत्यू पावले. त्यांचा काल झाल्यानंतर बाळाजी महादेव भानू हे स्वारी- बरोबर होते, त्यांसच फडणिशीची वखें बाळाजी विश्वनाथ पेशवे यांणी दिली.

पुढे बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा व सय्यद यांचा तह होऊन उभयतां दिल्लीस स्वारीस गेले. त्यांबरोबर बाळाजी महादेव भानू फडणिशीचे काम करून होतेच. नंतर फौजेंत बाळाजी महादेव भानू व शंकाजी भोसले असे मुख्यत्वे ठेवून पेशवे व सय्यद असे उभयतां शहरांत पातशाहाचे भेटीस गेले. पाठीमागें पादशाही फौज शहरांतून निघाली. चाहेर येऊन त्या फौजेने पेशवे यांचे फौजेवर मोठी गर्दी करून फौजेमध्ये मारहाण केली. त्या गर्दीत बाळाजी महादेव भानू व शंकाजी भोसले, असे लढाईत सरकार कामासे आले. इतक्यांत पातशाहाच्या भेटी होऊन बाळाजी विश्वनाथ पेशवे आपले फौजेंत शहराबाहेर आले. पाहतात तो बाळाजी महादेव फडणीस व शंकाजी भोसले पडले. हे पाहून पेशवे यांणी आपले फौजेचा मुक्काम दिल्लीपासून चार कोसांवर केला. सय्यद बरोबर होता, त्यास दक्षिणेचा सुभा सांगितला. उपरांत पातशहाचे बोलणे होऊन तह 'झाला. त्यांत सरदेशमुखी, बावती व मोकाशे शाहू महाराज यांस दिले. याप्रमाणे पातशहाशी तह होऊन सय्यदसुद्धा बाळाजी विश्वनाथ पेशवे दिल्लीहून निघाले. शहर औरंगाबाद येथे आले. तेथपावेतों फडणेशाचें काम बाळाजी महादेव फडणीस यांच्याबरोबर नारो बाबाजी परचुरे दप्तरदार होते, त्यांणी चालदिले. पेशवे औरंगाबादेस आल्यानंतर रामाजी महादेव भानू लोहगडास सबनिशीचे काम करीत होते, त्यांस बलावू पाठविले. ते -समयीं रामाजी महादेव भानू यांणी भिकाजी नारायण भानू मौजे पोसरी कोकणांत आहे त्यांस बोलावून आणून सबनिशीवर लोहगडात ठेविलें व फडणिशीनें काम करावयास आपले पायेचा फडावर कोणी तरी पाहिजे, म्हणून ' अंताजी नारायण भानू नाणेमावळचे मुजमूवर होते, त्यांस बोलावून आणून त्या  कामावर हरी महादेव भानू यांचे कन्येचे पुढे कृष्णाजी महादेव बापये यांस मुजम दिली. नंतर रामाजी महादेव भान, अंताजी नारायण भानू यांस समागमें घेऊन लोहगडाहून निघून औरंगाबादेस आले. तेथे आल्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची भेट झाली. ते समयी पेशवे यांणी भानूस आज्ञा केली जे, “ तुम्ही आपले फडणिशीचे कामकाज करावे." ते समयी रामाजी महादेव भानू यांणी विनंती केली की, 'मी कानाने बहिरा आहे, ऐकू येत नाही. तेव्हां फडाकरील काम मला कसे आटपेल !” हे ऐकून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांणी आज्ञा केली की, “तुम्ही दप्तर आटोपावें. तुमचे मायेचा कोणी असेल त्यास फडाचे काम सांगावे; त्याची असामी वेगळी करून देऊ."

त्याजवरून अंताजी नारायण भानू यांस पेशवे यांति भेटविलें. तेव्हां त्यांची असामी वेगळी करार करून दिली. नंतर रामाजी महादेव भानू फडणिशीचे काम करूं लागले. उपरांत बाळाजी विश्वनाथ पेशवे औरंगाबादेहून देशी आले. रामाजी महादेव भानू यांणी फडणिशीचा कारभार पांच वर्षे केला. नंतर त्यांचा काळ झाला. ते समयीं बाबूराव राम व जनार्दन बल्लाळ भानू हे पांच सात वर्षांचे होते, ते मोठे होत तोपर्यंत अंताजी नारायण भानू यांणी फडणिशीचे काम चालविले. पुढे बाबूराव राम व जनार्दन बल्लाळ मोठे झाल्यावर फडणिशी कर लीगले.

असा पेशवाईचा कारभार बाळाजी विश्वनाथ करीत असतां दोन वेळा हिंदुस्थान पावेतों मोहीम करून आले. महाराजांची आज्ञा घेऊन सासवड मुक्कामी राहू लागले. तेव्हां पुरंदरे पेशवे यांजपाशीं चाकरीस राहिले. अंबाजी- पंत हे शाहाणे पाहून त्यांस आपल्या दिवाणगिरीची वखें बाळाजी विश्वनाथ यांणी दिली. मल्हारजी होळकर हे सातारे मुक्कामी बांडे' म्हणून सरदार होते त्यांचे पतकांत चाकरीस होते, त्यांस बाळाजी विश्वनाथ यांणी आपले जवळ चाकरीस ठेविलें. तसेच आपले शिंदेही केले.

अशी फौज जमवून सासवड मुक्कामी राहू लागले. त्यांणी आठ वर्षेपर्यंत पेशवाईचा कारभार केला. पुढे सासवड मुक्कामी पेशवे यांचे शरिरास व्यथा होऊन तेथेच मृत्यू पावले.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel