(ही गोष्ट काल्पनिक आहे जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

                     काकासाहेब हॉलमध्ये येरझारा घालत होते.काही वेळापूर्वी त्यांनी जे ऐकले त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता .समीरा, त्यांची मुलगी, एवढी मोठी झाली हे त्यांच्या लक्षातच आले नव्हते .समीराने जे सांगितले त्यामुळे त्यांची झोपच उडाली होती.रात्रीचे बारा वाजले होते. त्यांच्या घरात सर्वत्र सामसूम झाली होती.सर्व आपापल्या खोल्यांमध्ये बहुधा शांत झोपले होते .निदान सर्वत्र शांतता वाटत होती .आपल्या खोलीत  समीरा जागी असावी.

                     काकासाहेब बडी असामी होती .पिढीजात जमीनजुमला होता .त्यामध्ये कारखान्यांची भर काकासाहेबांनी घातली होती .खेडेगावात जिथे त्यांची जमीन होती,फार तर आपण आता त्याला फार्म हाऊस म्हणूया, त्यांचा एक वाडा होता.तर इथे शहरात त्यांचा टुमदार बंगला होता .काकासाहेबांना दोन भाऊ होते .तीनही भाऊ गुण्या गोविंदाने नांदत असत .काकासाहेब सर्वांना वडिलांच्या ठिकाणी होते.काकांच्या अर्ध्या वचनांत सर्वजण होते.काकांचा दराराच तसा होता .काकानी सांगितल्यावर नाही म्हणण्याची  कुणाचीच हिंमत नव्हती.काका बोले व दल हाले अशी स्थिती होती.

                     समीरा झाली तेव्हा काकांना व सर्व कुटुंबियांना किती आनंद झाला होता .तीन पिढ्यांमध्ये कुणाला मुलगी झालीच नव्हती .प्रत्येक वेळी सर्वजण मुलगी होईल म्हणून वाट पाहात असत. परंतु मुलगाच जन्माला येई.यावेळी मात्र मुलगी जन्माला आली होती . लहानपणापासून समीरा सर्वांचीच आवडती होती.वेळोवेळी सर्वजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत असत . काकासाहेबांना तीन मुले दोन मुलगे व एक मुलगी समीरा.अति लाडामुळे समीराला कधीही नाही ऐकायची सवय नव्हती.आत्तापर्यंत समीराने कधी काही मागितले आणि कुणी नाही म्हटले असे झाले नव्हते.समीराला आजही काका थोडे रागावतील परंतु नंतर होय म्हणतील असे वाटले होते.

                     समीराने जे सांगितले ते ऐकून काका भयंकर अस्वस्थ झाले होते .त्यांना त्यांचा राग अनावर झाला होता .त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले. तुझी ही निवड मला मुळीच पसंत नाही .तू त्याच्याशी लग्न करू शकत नाहीस.तू त्याचा नाद सोडून दे .तो गरीब आहे त्याला माझी हरकत नाही .आपण त्याला श्रीमंत करू.तो उच्च शिक्षित आहे .डॉक्टर आहे .त्याला मोठे हॉस्पिटल काढून देऊ .तूही डॉक्टर आहेस.दोघेही दवाखाना चालवाल .तो तुझ्याबरोबर शिकायला होता. तुम्ही चार वर्षे बरोबर काढली, ठीक आहे .तो स्वभावाने चांगला आहे. तो मनमिळावू आहे. वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहेत.

                     परंतु --*तो आपल्या जातीचा असता तर प्रश्नच नव्हता*--तो आपल्यापेक्षा खालच्या जातीचा आहे .नुसताच कमी जातीचा नव्हे,तर ज्या जातीला आपण समाजबाह्य जात समजतो त्या जातीतील तो आहे.असा समाजबाह्य जातीचा मनुष्य कितीही उच्चशिक्षित असला, कितीही श्रीमंत असला,कितीही दिसायला उच्चवर्णीय वाटत असला, तू म्हणतेस त्याप्रमाणे तो कितीही सुसंस्कृत असला,कितीही गोरा देखणा तुला शोभणारा असला, तरीही मी जिवंत आहे तोपर्यंत हे लग्न होऊ देणार नाही.  

                     आपला समाज आपल्या तोंडात शेण घालील.आपला समाज आपल्याला समाजातून बाहेर टाकील. आपल्याला वाळीत टाकतील.आपले नातेवाईक आपल्याकडे येणार नाहीत. आपल्याला ते घरात घेणार नाहीत. आपण आपल्या नातेवाईकांपासून तुटू.आपण सर्वस्वी एकटे पडू.  तुझ्या चुलत भावाना, सख्ख्या भावाना, कुणी मुली देणार नाहीत.आपल्याकडील धार्मिक कृत्यांना कुणीही येणार नाही .सर्वत्र आपली छी:थू: होईल.पेपरमध्ये बातमी छापून येईल. लोक आपल्याकडे विचित्र नजरेने बघतील.इथे शहरात कुणीही कुणाकडे विशेष लक्ष देत नाही. ते एक बरे आहे.

                     परंतु आपल्या गावी गेल्यावर सर्वजण आपल्याकडे विचित्र नजरेने बघतील .तिथे आपण कितीही श्रीमंत जमीनदार असलो तरी कुणीही आपली पत्रास ठेवणार नाहीस.लोक आपल्याकडे अश्या नजरेने बघतील की आपल्याला भोके पडतील.खेडेगावात जाती व्यवस्था अतिशय कठोर असते .जाती जातींमध्ये जलाभेद्य विभाग  (वॉटरटाइट कम्पार्टमेंट) असतात.  

                     तसा मी स्वभावाने कडक आहे .मी आतापर्यंत लोकांची पर्वा केली नाही .परंतु लोकांची पर्वा केली पाहिजे हे माझ्या लक्षात येत आहे.

                     एक वेळ मी असे म्हणेन की समाज गेला खड्ड्यात.मी मला जे योग्य वाटते ते करणारच .परंतु मलाच तुझे हे वागणे करणे तुझा हा निर्णय योग्य वाटत नाही.तू पुनर्विचार कर. तू त्याला विसरून जा. आपण वाटल्यास त्याला भरभक्कम रक्कम देऊ .मला स्वतःलाच तुझा हा निर्णय पटत नाही.

                     समीराने गोड बोलत, लाडीगोडी लावत, तर्कशुद्ध बोलत, काकासाहेबांना तिचे म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न केला .अापण नेहमी बोलताना जात गेली पाहिजे असे म्हणतो मग आपण आपल्यापासूनच सुरुवात का करू नये? मी त्याला विसरू शकणार नाही .मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही .आम्ही एकमेकांना आणाभाका दिल्या आहेत .मी त्याच्याशी लग्न करणारच .तुम्ही मला घरातून बाहेर काढले तरी चालेल .कायद्याने मी प्रौढ आहे.तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही.तुम्ही मला कोंडून ठेवले तर मी आरडाओरडा करीन. मी समर्थ आहे .मी पळून जाईन.

                     काका व मुलीची सुरवातीला शांतपणे  सुरू झालेली बोलणी हळूहळू उच्च स्वराने होऊ लागली .उच्च स्वराला हळूहळू आरडाओरडीचे स्वरूप आले .घरातील मंडळीही आपापल्या खोल्यातून बाहेर येऊन ऐकत होती.काकासाहेबांच्या पुढे येऊन काही बोलण्याची कुणाचीही हिंम्मत नव्हती.नंतर हळूहळू सर्व शांत झाले.समीरा आपल्या खोलीत झोपायला गेली .तिलाही झोप लागली नव्हती.तीही गादीवर तळमळत होती.काकांनी स्पष्टपणे या लग्नाला विरोध दर्शविला होता .काका कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होऊ देणार नाहीत याची तिला खात्री पटली होती .आता काय करावे असा प्रश्न तिच्यापुढे होता .   

                     काकाही हताश झाले होते .जिच्यावर जिवापाड प्रेम केले, जिचे लग्न आपण आपल्या तोलामोलाच्या मुलाबरोबर थाटात लावू म्हणून स्वप्न पाहिले,जी आपल्या काळजाचा तुकडा आहे ,जिच्या जन्माच्या वेळी आपण आनंदाने बेहोष झालो होतो,ती अशी वाह्यात निघेल, ती अशी जातीबाह्य लग्न करील,ती अशी आपली आज्ञा धुडकावून बंड करील, असे त्यांना कधीही वाटले नव्हते.जिला आपण हौशीने वाढविले, जिला आपण हौशीने उच्च शिक्षण दिले, जिचे आपण हौशीने लग्न लावून देणार होतो ,ती आपल्याला विरोध करील ,ती घरातून पळून जायला तयार होईल, असे कधीही वाटले नव्हते.

                     काकासाहेबही तळमळत होते त्यांना फार मोठा धक्का बसला होता.

                     सकाळ झाली.रात्री जागरण झालेले असल्यामुळे सर्वजण जरा उशिराच उठले.आज कुणीही कुणाशीही विशेष बोलत नव्हते .जे बोलणे होत होते ते कुजबुजीच्या स्वरूपाचे होते.काकासाहेबांच्या पुढ्यात जायला सर्व घाबरत होते.समीरावरील रागाचा स्फोट आपल्यावर होईल असे त्यांना वाटत होते.

                     सकाळपासून समीरा कुठे दिसत नव्हती .सगळ्यांच्याच ही गोष्ट लक्षात आली .तिच्या खोलीचा दरवाजा लावलेला होता .अजून कदाचित रात्रीच्या जागरणामुळे झोपलेली असेल असे सर्वांना वाटत होते .सकाळचे नऊ वाजले .अजूनही समीरा बाहेर आली नव्हती.तिची आई  तिच्या खोलीचा दरवाजा उघडून आत शिरली .खोली रिकामी होती .समीराची बॅगही कुठे दिसत नव्हती.कॉटवर एक चिठी  ठेवलेली होती.चिठी उडून जाऊ नये म्हणून त्यावर पेपरवेट ठेवलेले होते.

                     चिठीत पुढील मजकूर होता ."मी राघव बरोबर लग्न करण्यासाठी घरातून निघून जात आहे. माझा शोध घेऊ नये. माझा निर्णय अपरिवर्तनीय आहे .मी माझे प्रेम,माझे भविष्य,माझा राघव विसरू शकत नाही .मला सर्वांनी माफ करावे .माझा नाईलाज आहे .तुम्ही हे लग्न मान्य कराल तेव्हाच मी घरी येईन ."

                    " तुम्हा सर्वांची लाडकी परंतु आता लाडकी नसलेली "

                     " समीरा "

                     तिच्या आईने ती चिठी  वाचली आणि हंबरडा फोडला.समीरा व काकासाहेब दोघेही एवढ्या टोकाला जातील असे वाटले नव्हते.काकांचा निष्ठूर निग्रही स्वभाव त्यांना माहीत होता .समीराही बाबांवर गेली होती.तिने लिहिल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे ती करणारच हे तिची आई ओळखून होती.काकाही मागे सरणार नाहीत. ते काही तरी बोलल्याप्रमाणे भयंकर करणारच याचीही तिच्या आईला खात्री होती.

                    आता पुढे काय घडणार आहे.आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे . ते तिच्या आईला कळेना

                    काकासाहेबांनी समीरा मला मेली व मी समीराला मेलो असे जाहीर करून टाकले.वाट्टेल ते झाले तरी मी हे लग्न  होऊ देणार नाही असा त्यांनी पण केला.

                    समीराचा पत्ता कुठेही लागत नव्हता .काकासाहेबांचे हेर सर्वत्र लक्ष ठेवून होते.समीरा किंवा राघव कुणीही कुठेही सापडत नव्हती.जणूकाही दोघेही भूगर्भात गडप झाली होती. 

                    एक महिन्याने अनेक पेपरमध्ये एक बातमी छापून आली .

                    दोघांनीही रजिस्टर मॅरेज केले होते .जातीबाह्य केलेला विवाह म्हणून त्याचे कौतुक केलेले होते .

                    असे सरमिसळ  विवाह झाल्याशिवाय आपली चिकट जातीव्यवस्था नष्ट होणार नाही असे लिहिले होते . 

                    यांचा आदर्श इतरांनी ठेवावा असेही लिहिले होते .

                    अनेक पुढार्‍यानी समाजसुधारकानी या विवाहाचे अभिनंदन केले होते.

                    काही पेपरमध्ये या विवाहावर अग्रलेखही लिहून आले . 

                    नेहमी प्रमाणे थोड्याच दिवसात सर्व जण ही गोष्ट हे कौतुक विसरून गेले .

                    हे सर्व वाचून काकांच्या अंगाचा तिळपापड झाला होता .ही मुलगी जन्माला आलीच नसती तर किती बरे झाले असते असाही विचार त्यांच्या मनात येत होता .त्यांचे नातेवाईक त्यांच्यावर टोमणे मारीत होते.त्यांच्या जातीच्या संघटनेचे ते अध्यक्ष होते .त्याचाही त्यांनी राजीनामा दिला .जमिनीच्या कामासाठी त्यांना त्यांच्या गावी जाणे भाग होते .तिथेही त्यांना सर्वजण दूषण देत होते .मुलीला लहानपणापासून लाडावून ठेवल्याचा हा परिणाम असे सर्वजण म्हणत होते .

                  गेले चार महिने काकांना नीट झोप लागली नव्हती .या मुलीचे काय करू आणि काय नको असे त्यांना झाले होते .त्यांचा अहंकार प्रचंड दुखावला गेला होता .काहीही करून मुलीला व जावयाला धडा शिकवायचाच असा त्यांचा निश्चय होता .त्यांचा पक्का निर्णय होत नव्हता .त्यांचे मन दोलायमान स्थितीत होते .

                  शेवटी आपली जात वाचविण्यासाठी,आपली इज्जत राखण्यासाठी ,समाजात मानाने मिरविता यावे म्हणून ,जातीसाठी वाटेल तो त्याग करण्याला अापण तयार असतो हे आपल्या समाजाच्या लक्षात यावे म्हणून, समाजाचा रोष टाळण्यासाठी, समाजाचे टोमणे खावे लागू नयेत म्हणून,समाजाचा मान राखण्यासाठी ,त्यांनाही हे लग्न काटय़ासारखे सलत होते म्हणून,त्यांनी कठोर निर्णय घेतला .

                  आठ दिवसांनी पेपरमध्ये पुढील बातमी छापून आली.

                  त्याला खालीलप्रमाणे मथळा दिला होता 

    ~आपण शहाणे कधी होणार ?~

                  राघव व समीर या उच्च शिक्षित सुसंस्कृत जोडप्याने आंतरजातीय विवाह केला होता. याची बातमी आम्ही चार महिन्याभरापूर्वी तुम्हाला दिलेलीच आहे .राघव हा समाजबाह्य जातीतील होता .तिच्या वडिलांचा या लग्नाला कट्टर विरोध होता व आहे तरीही त्यांनी त्यांच्या नाकावर टिच्चून लग्न केले होते .त्यांचे लग्न होऊन चार महिने झाले होते.दोघेही अतिशय आनंदात होती .सिनेमा पाहण्यासाठी दोघेही सिनेमागृहात गेली होती .सिनेमा सुटल्यावर बाहेर येऊन रिक्षात बसत असताना एकाएकी दोन तीन गुंड त्यांच्या अंगावर धावून आले .त्यातील एकाने सुरा काढून राघवच्या मानेवर सपासप वार केले .राघव जागच्या जागीच गतप्राण झाला .रक्ताच्या चिळकांड्यात समीरा न्हावून निघाली.राघवच्या आकस्मिक  मृत्यूमुळे बसलेल्या धक्क्याने समीरा तिथेच गतप्राण  झाली.

                  आपली जातीव्यवस्था आणखी किती बळी घेणार आहे?

                  अजून तरी आपला समाज शहाणा सुसंस्कृत होणार आहे कि नाही?

                  मृतांच्या आत्म्यास शांती मिळो.

                  *समीराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी ऐकल्यापासून काकासाहेबांची वाचा गेली आहे .

              *राघव मेल्यावर समीरा परत आपल्याकडे येईल अशी त्यांची कल्पना असावी.

                  *राघव मेल्याच्या धक्क्याने तिचा मृत्यू होईल याची त्यांना कल्पना नसावी.

                  * ते वेड्यासारखे हातवारे करीत असतात .

                  *त्यांचे हल्ली कपड्यांकडे विशेष लक्ष नसते .

                  *ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत असतात.समीराला मी ओळखू शकलो नाही असे ते बहुधा  पुटपुटत असावेत 

                  *त्यांनी टाकलेले सर्वच फासे उलटे पडले आहेत .

                  *ते जे वाचवायला गेले ते वाचले की नाही ते माहीत नाही.*

                  *ते वाचविण्याच्या लायकीचे होते की नाही तेही माहीत नाही .*

                  *ते वाचविण्याच्या लायकीचे नव्हते असे बऱ्याच जणांचे मत आहे 

                  *सर्वच अशुद्ध व अवघड होऊन बसले आहे.*

                     *त्यांचा धंदा व सर्व व्यवहार  हल्ली दोघे भाऊच सांभाळतात.*   

  ३०/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel