सदाभाऊंचा बारदाना फार मोठा होता .म्हशी बैल गायी वासरे मिळून एकूण तीस चाळीस जनावरे गोठ्यात होती .तीन चार गायी म्हशी नेहमी दुभत्या  असत.  घरात वीस पंचवीस माणसे आहेत असे म्हटल्यावर एवढे दूध आवश्यकच असे .सदाभाऊंचे तीन भाऊ काका आजोबा आजी मुले आला गेला पाहुणा रावळा मिळून पंचवीस तीस माणसे एकावेळी जेवणाला असत.सदाभाऊंचा जमीनजुमला पुष्कळ  होता .सर्व भाऊ एकोप्याने राहात असत .विविध पिके घेत असल्यामुळे एकामध्ये जरी तोटा झाला तरी एकूण शेती फायद्यात राही.सदाभाऊ मोठे असल्यामुळे सर्वजण त्यांचे ऐकत असत .सदाभाऊंचे सर्वांवर जसे प्रेम होते त्याचप्रमाणे सर्वांवर धाकही होता. सदाभाऊंचे वय पंचेचाळीसच्या आसपास असावे .

मध्यंतरी सदाभाऊ आजारी पडले होते .आजारातून उठल्यावर त्यांना गाईचे सुध्धा  दूध पचत नसे. वैद्याने त्यांना शेळीचे दूध घेऊन पहा ते तुम्हाला मानवेल असे सांगितले.तेव्हापासून त्यांनी एक शेळी बाळगली होती .शेळीच्या दुधाने त्यांची प्रकृती लवकर सुधारली. तेव्हापासून ती शेळी व तिचे किरडू त्यांचे फार लाडके झाले .ती शेळी त्यांच्या वावरामध्ये कुठेही हिंडून चरत असे.त्या शेळीला कुणी मारलेले त्यांना आवडत नसे .

शेळीचेही ते फार लाडके होते.बर्‍याच वेळा एखाद्या कुत्र्याप्रमाणे ती शेळी सदाभाऊंच्या मागेमागे असे.शेळीला ते लाडिकपणे नेहमी रंगू म्हणून हाक मारीत असत. ते गावाला निघाले कि ती शेळी त्याच्या मागे मागे येत असे.तिला चुकवून किंवा तिला बांधून ठेवून मगच सदाभाऊ गावाला जाण्यासाठी निघत.

जिल्ह्याच्या गावी जायचे म्हणजे सदाभाऊंना साधारण अडीच ते तीन तास लागत .त्यांच्या गावाला रस्ता नसल्यामुळे बस येत नसे. परिस्थिती असूनही मोटारसायकल किंवा मोटार बाळगता येत नसे .सुमारे एक तास त्यांना चालत जावे लागे .वाटेमध्ये त्यांना एक ओढा लागत असे .तासभर चालल्यानंतर ते मुख्य रस्त्यावर पोचत.नंतर बस पकडून त्यांना जिल्ह्याच्या गावी जावे लागे.यामध्ये साधारण अडीच ते तीन तास जात.

सदाभाऊना जिल्ह्याच्या गावी वकिलाकडे,डॉक्टरकडे किंवा आणखी काही कामे निघत.सदाभाऊ सकाळी सहाला निघाले की नऊपर्यंत जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचत.त्यांची आठवड्याला एखादी खेप जिल्ह्याच्या ठिकाणी होत असे .तेथील कामे संपवून ते साधारण पाच सहा वाजता संध्याकाळी परत निघत.रात्री नऊ ते दहापर्यंत ते आपल्या घरी परत येत असत .

असेच एकदा जिल्ह्याच्या ठिकाणी कोर्टात काम असल्यामुळे ते निघाले होते.त्यांची लाडकी रंगू कुठे दिसत नव्हती .असेल कुठे तरी असे म्हणून ते झपाट्याने कोर्टाच्या कामासाठी निघाले .त्या दिवशी कोर्टात अकराला त्यांची केस होती .काही कारणाने ती दुपारी सुरू झाली .ती संपल्यानंतर त्यांना वकिलांबरोबर चर्चा करावयाची होती .वकीला बरोबरची बैठक संपून व  इतर कामे उरकून त्यांना निघे निघेपर्यंत रात्रीचे दहा वाजले.बस पकडून ते रात्री  बाराच्या सुमारास मोकळ्या माळरानावर  त्यांच्या गावाला जाण्याच्या रस्त्यावर उतरले. अगोदर कल्पना असती तर त्यांनी गडी तिठ्याजवळ  सोबतीसाठी बोलवून ठेवला असता.

सदाभाऊंना तशी भीती वाटत नसे.ते केव्हाही कुठेही एकटे दिवसा व रात्री कोणत्याही प्रहरात बिनधास्त फिरत असत.लोक थट्टेने,सदाभाऊ एक महाभूत आहेत ,त्यांना पाहून भुते पळतील असे म्हणत असत. सदाभाऊ आपली पडशी खांद्यावर टाकून गावाच्या दिशेने  बारा वाजता निघाले.पौर्णिमा होती .चंद्राचे स्वच्छ चांदणे पडले होते.मधूनच अभ्रे येत आणि चांदण्याचा प्रकाश मंद धूसर होत असे. गावाला जाणारा रस्ता अर्धा माळरानावरून  होता व पुढे झाडीतून गेला होता .या झाडीमध्ये वाटेवर ओढा होता .उन्हाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर त्या ओढ्याला बर्‍यापैकी पाणी असे.ढोपरभर किंवा त्याहून जास्त पाण्यातून ओढा ओलांडावा लागे.

सदाभाऊ झाडीच्या रस्त्याला लागले आणि त्यांना बेंss बेंss असा शेळीचा आवाज ऐकू आला.त्यांना तो आवाज रंगू सारखा वाटला .एवढ्यात त्यांची रंगू काळोखातून पुढे आली.त्यांच्या अंगाला प्रेमाने अंग घासू लागली.एवढ्या रात्री रंगूला पाहून सदाभाऊ दचकले. त्यांच्या मनात विचार आला बरे झाले आपल्याला उशीर झाला.आपण आता हिला सुरक्षित घरी घेऊन जाऊ .रंगूला एखाद्या श्वापदाने खाऊन टाकले असते. रंगूला घरच्या लोकांनी बांधून का ठेवली नाही ?मी निघताना हिचा निरोप घेतला नाही म्हणून ही बहुधा मला शोधत येथे आली .रंगूला काही भलते सलते झाले असते म्हणजे?घरी गेल्यावर चांगलीच तासंपट्टी काढली पाहिजे .रंगूचा बच्चूही बरोबर दिसत नव्हता.तो सुरक्षित असला म्हणजे झाले .

सदाभाऊ घरी लवकर जाण्याच्या ओढीने भरभर चालत होते.रंगू त्यांच्या मागोमाग येत होती .तिला भराभर चालता येत नव्हते .तिच्या पायाला बहुधा  काहीतरी लागले असावे त्यामुळे ती किंचित लंगडत होती .सदाभाऊनी रंगूला उचलले आणि पाठीवर घेतले .डाव्या व उजव्या हातात तिचे पुढचे आणि मागचे पाय घट्ट धरले तिला मानेवर घेवून ते भरभर चालू लागले .ही आपली रंगू नसेल आणखी कुणीतरी असेल असा विचारही त्यांच्या मनात आला नाही . चालता चालता रंगू जड होत चालली आहे असा भास त्यांना झाला .जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पहाटे उठल्यामुळे,सबंध दिवस कामात गेल्यामुळे, अापण दमलो आहोत म्हणून असे वाटत असावे असा विचार त्यांच्या मनात आला.

भरभर घराच्या दिशेने चालताना ओढा केव्हा आला ते त्यांना कळले नाही . ओढ्यातून पलीकडे जाण्यासाठी धोतर भिजू नये म्हणून त्यांना आपले धोतर जरा वर खोचणे आवश्यक होते.शेळीला खाली ठेवून धोतर नीट खोचून घ्यावे व मग शेळीला पुन्हा खांद्यावर  घ्यावे अशा विचाराने ते शेळी खाली ठेवू लागले .शेळी खाली उतरायला तयार होईना .त्यांना शेळीला खाली ठेवता येईना.सदाभाऊंना थोडे विचित्र वाटू लागले .पडलेला वारा, श्रमाने सुटलेला घाम,झाडांच्या चित्रविचित्र पडलेल्या सावल्या,त्यात मधूनच येणार्‍या अभ्रामुळे कमी जास्त होणाऱ्या व धूसर होणार्‍या सावल्या,त्यातच आकाशातून उडणार्‍या टिटवीचा आवाज,मधूनच येणारा घुबडाचा घुघुत्कार,टळून गेलेली मध्यरात्र आणि त्यातच मानेवरून न उतरणारी रंगू एखाद्याची घाबरगुंडी उडवायला एवढे पुरेसे होते .

रंगू खांद्यावरून उतरत नाही असे पाहिल्यावर त्यांनी तिला एका हाताने धरून ठेवून दुसऱ्या हाताने आपले धोतर खोचले.ओढा ओलांडण्यासाठी पाण्यात पाऊल ठेवले .एवढ्यात लांब कोल्ह्यांचा कोल्हेकुईचा आवाज ऐकू आला.न घाबरणारे न डरणारे स्वतःच एक भूत आहे असे ज्यांना विनोदाने गावकरी म्हणत ते सुद्धा आता जरा कंपायमान झाले होते .पटकन ओढा ओलांडावा आणि उरलेला दहा मिनिटांचा रस्ता पटकन पार करावा आणि घरी पोचावे असे त्यांना उत्कटतेने वाटू लागले .मनातल्या मनात त्यांनी रामनामाचा जप सुरू केला .शेळीला खांद्यावरून उचलून फेकून द्यावे असे त्यांना वाटत होते.शेळी जड होत होती.तिची खांद्यावरची पकड जास्त घट्ट होत आहे असे त्यांना भासत होते .

सदाभाऊ ओढ्याच्या मध्यभागी आले आणि त्यांना शेळीचे पाय लांब होत आहेत असे वाटू लागले.चांदणे, अभ्रे, झाडे, सावल्या मनात होणारी घबराट, नक्की कश्यामुळे असे सदाभाऊना वाटत होते, की खरेच रंगूचे पाय लांब होत होते सांगता येणे कठीण आहे .सदुभाऊ खूप घाबरले .ते कसेबसे ओढा ओलांडून पलीकडे आले .व तिथेच बेशुद्ध होऊन  वाळवंटात कोसळले .

सदाभाऊ जेव्हा शुद्धीवर आले त्यावेळी ते आपल्या घरी आपल्या माणसात आपल्या बिछान्यावर होते .त्यांना सडकून ताप भरला होता .त्यांची पत्नी त्यांच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवीत होती.चार दिवसांनी त्यांचा ताप निघाला . त्यांची तापातील असंबद्ध बडबडही संपली. त्यांना चार दिवसात त्यांच्या आवडत्या रंगूची आठवणही झाली नाही.किंवा कदाचित होऊनही त्यांनी बाहेर तसे दाखवले नाही . आठ पंधरा दिवसांत त्यांची शक्ती भरून निघाली .ते पूर्वीसारखे हसू बोलू लागले .

झाले ते असे झाले .नऊ दहा वाजेपर्यंत येणार्‍या  सदाभाऊंची घरच्या लोकांनी बारा वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यांचे बंधू दोन गडी बरोबर घेऊन रस्त्यापर्यंत सदाभाऊंच्या शोधासाठी निघाले .वाटेत वाळवंटात ओढ्याच्या काठी सदाभाऊ बेशुद्ध पडलेले आढळले .शेजारीच त्यांची लाडकी रंगू उभी होती.रंगू सकट बेशुद्ध सदाभाऊना घरी आणण्यात आले .रंगूला तर घरी बांधण्यात आले होते .तिने आपली सुटका केव्हा करून घेतली आणि ती सदाभाऊंजवळ कशी गेली कुणालाच काही कळेना .

ही सर्व हकिगत सदाभाऊंना पूर्ण बरे झाल्यावर कळली .रंगू खरेच होती, की खऱ्या रंगूच्या अंगात कुणी भूत आले होते,की एखाद्या भुताने रंगूचे रूप घेतले होते, आणि नंतर ते चावट भूत निघून गेले.व तेवढ्यात खऱ्या रंगूने आपली सुटका करून घेऊन ती तिथे बेशुद्ध सदाभाऊंजवळ येऊन उभी राहिली .सदाभाऊंना भास झाले की कि जे झाले वाटले ते सत्य होते, नक्की काय झाले असावे हे एक कोडे आहे .

रंगू अजूनही सदाभाऊंची आवडती आहे .जेव्हा ती दुभती असते तेव्हा तिचे दूध सदाभाऊ आवडीने पितात .

तेव्हापासून जेव्हा जेव्हा सदाभाऊ जिल्ह्याच्या ठिकाणी जातात तेव्हा तेव्हा ते आपल्याबरोबर एक गडी नेतात.हल्ली सदाभाऊंचे दिवसाच्या व रात्रीच्या कोणत्याही प्रहरी  बिनधास्त फिरणे कमी झाले आहे .

१९/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel