(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

ती खोली भुतांची आहे असे म्हटल्याबरोबर सर्वजण दचकले .एवढ्या मोठ्या वाड्यात जिथे अनेक पिढ्या व्यवस्थित नांदल्या ,जो वाडा जागता आहे, जिथे अनेक जणांची एवढी वर्दळ आहे ,जिथे काही दिवसांनी एक चांगले हॉटेल सुरू होणार आहे ,तिथे एकच खोली अशी असावी की जी भुतांची म्हणून कुलूप लावून बंद केलेली आहे!इथे भुताचा निवास कसा शक्य आहे ?पडक्या वाड्यात ओसाड जागेत स्मशानात कब्रस्तानात वडा पिंपळावर भुते असतात .हे आपण समजू शकतो. परंतु इथे एका  जागत्या नांदत्या वाड्यात भूत आणि तेही फक्त एका खोलीत. काहीतरी आश्चर्यजनक अद्भुत आपण ऐकत आहोत  असा भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता .संभाजी बहुधा आपल्या सर्वांची फिरकी घेत असावा असा सर्वांना संशय आला.संभाजीला इतरांच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह दिसले .त्यांच्या डोळ्यातील भावही जाणवले.मी जे सत्य आहे तेच प्रामाणिकपणे तुम्हाला सांगत आहे असे तो म्हणाला .

जवळजवळ सर्वानी एकदमच संभाजीला विचारले की ही खोली भुतांची कशावरून?त्यावर तो म्हणाला असा आमच्या पूर्वजांचा अनुभव आहे .परंपरेने आमच्या खानदानात या खोलीला कुलूप लावलेले असे .  फक्त दसऱ्याच्या दिवशी खोली झाडून पुसून स्वच्छ केली जाई .नंतर पुन्हा बंद करण्यात येई.पूर्वजांना निरनिराळ्या वेळी या खोलीचा वाईट अनुभव आला .वेळोवेळी पुढील कथा या खोलीबद्दल आम्हाला सांगितल्या गेल्या आहेत .

या खोलीत जो झोपायला जातो तो दुसऱ्या दिवशी दिसत नाही .नाहीसा झालेला असतो .अदृश्य होतो .तो कुठे जातो काही कळत नाही .पुन्हा कधीही भेटत नाही.केव्हातरी एकदा एका पाहुण्याला ही खोली झोपण्यासाठी दिली होती. दुसऱ्या दिवशी तो पाहुणा या खोलीत नव्हता .काही कारणाने घाबरून तो पळून गेला असेल अशा कल्पनेने त्याच्या घरीं तपास करण्यात आला .त्याच्या घरच्यानी तो तुमच्याकडे गेला आहे असे सांगितले . तेव्हापासून त्याचा कुणालाही तपास लागला नाही . आम्ही त्याला नाहीसा केला म्हणून आमचे आणि त्या कुटुंबाचे वैर निर्माण झाले .त्या काळच्या सरकार दरबारी तक्रारही करण्यात आली परंतु कशाचाही उपयोग झाला नाही.जणू काही तो हवेत विरून गेला आमच्या कुटुंबावर मात्र ठपका ठेवण्यात आला .सुदैवाने आमच्या पूर्वजांवर काही कारवाई करण्यात आली नाही . 

पुन्हा केव्हा तरी ही खोली  एकाला दिली गेली त्यावेळी रात्री एकाएकी मोठा आरडाओरडा ऐकू आला.तो पाहुणा खोलीतून धावत बाहेर येऊन भूत भूत म्हणून ओरडत होता .त्याने लगेच आपले चंबूगबाळे आवरून ताबडतोब रात्रीच वाड्यातून प्रयाण केले . तुम्ही असे लगेच का निघून जाता असे विचारता तो काहीही बोलायला तयार नव्हता .जणूकाही कुणीतरी त्याला तू बोललास तर खबरदार अशी धमकी दिली होती .

तिसऱ्या वेळी या खोलीत रात्री कुणी तरी शूर शिपाईगडी झोपला होता . झोपणाऱ्याला वेड लागले .दुसऱ्या दिवशी तो कपडे फाडीत फिरू लागला.त्यानंतर तो मरेपर्यंत तसाच वेडा होता .कितीही उपचार केले तरी तो बरा झाला नाही .त्याचे वेडेचार तसेच सुरू राहिले.त्याचे मनोसंतुलन एकदा बिघडले ते बिघडलेच .

थोडक्यात वेड लागण्याच्या , अकस्मात कायमचे अदृश्य होण्याच्या,भुताचा प्रत्यय येऊन अक्षरही न बोलता त्याने वाड्यातून निघून जाण्याच्या,अश्या निरनिराळया  कथा या खोलीबद्दल सांगितल्या जात असत.

एक दोन पिढ्या या खोलीत अघटित घडल्याबद्दलची स्मृती राहात असे.तोपर्यंत ती खोली वापरली जात नसे .नंतर पुन्हा ती खोली वापरात येई. आणि पुन्हा काहीतरी विचित्र घडत असे.

वाडवडिलांकडून आम्ही असेही ऐकले आहे की या खोलीतील भुताचा बंदोबस्त करण्यासाठी मांत्रिक अाणण्यात आला.त्याने बरेच तंत्रमंत्र केले बरेच पैसे घेतले परंतु शेवटी काही उपयोग झाला नाही.तिथे रात्री राहणाऱ्याला विचित्र अनुभव येण्याचे थांबले नाही.खोलीत झोपणाऱ्याला एकाच प्रकारचाच अनुभव येतो, एकाच प्रकारचा परिणाम होतो,असे नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात.   

शेवटी या खोलीला भक्कम कुलूप लावण्यात आले .फक्त दसऱ्याला खोली स्वच्छ करून पुन्हा कुलूप लावण्यात येई .

पुढे संभाजी म्हणाला या सागरप्रमाणेच(म्हणजे माझ्याप्रमाणे) माझाही भुताखेतांवर विशेष विश्वास नव्हता . त्यामुळे मी ही खोली पुन्हा वापरात आणण्याचा निश्चय केला .एकदा तर मीच या खोलीला आमची बेडरूम करणार होतो .परंतु पत्नीच्या तीव्र विरोधामुळे ते शक्य झाले नाही .मी येथे एकटाच झोपणार होतो परंतु मला तसे कुणी करू दिले नाही .

मी एवढेच केले की ही खोली उघडली. तिचे वेगळे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला .वाड्यातील अनेक खोल्यांप्रमाणे ही खोलीही उघडी राहू लागली .तिचा व्यवस्थित वापर सुरू झाला . पाहुण्यांनाही ती देण्यास सुरुवात झाली .तुम्हाला माहितच आहे की आमचा गोतावळा खूप मोठा आहे .एक दोन दिवसाआड कुणी ना कुणी पाहुणा येत असतो . कित्येक महिने तसेच गेले.खोलीचा वापर सुरू होता . कोणत्याही पाहुण्याने केव्हाही तक्रार केली नाही .आम्हाला वाटले की आता येथील तथाकथित भूत पुढील मार्गाला गेले.किंवा कदाचित या खोलीबद्दल आपण जे परंपरेने ऐकिले ती केवळ अफवा असावी .

परंतु तसे नव्हते पूर्वजांकडून ऐकलेल्या गोष्टी अफवा नव्हत्या . एक दिवस तिथे झोपलेल्या पाहुण्याला सणसणून ताप भरला .शेवटी तो नवज्वर ठरला त्यांतून पाहुणा बरा झाला .तापामध्ये तो त्या खोलीबद्दल काही विचित्र बडबडत असे,त्या खोलीत विचित्र काय दिसले ते सांगत असे .असे त्याच्या  घरच्या माणसांनी आम्हाला नंतर सांगितले .

तापाशी भुताचा संबंध आहे असे आम्हाला तेव्हाही वाटले नाही .अजूनही वाटत नाही. जंतू संसर्गामुळे ताप आला असावा. आणि तापात अर्थातच ज्याचा तो नसतो आणि काहीही बडबड काहीजण करीत असतात .ती बडबड अर्थातच कुणीही मनावर घ्यायची नसते .त्याचे काहीही अर्थ लावायचे नसतात.

जसे काही झालेच नाही असे समजून ती खोली पुन्हा वापरायला सुरुवात झाली .

दुसऱ्या वेळी ज्या कुणी ही खोली वापरली त्यावेळी तो अंथरुणातच बेशुद्ध झालेला आढळून आला .सकाळी बराच वेळ पाहुणा उठला नाही म्हणून आम्ही बघायला गेलो तर तो  बेशुद्ध झालेला होता .डॉक्टर आणून मोठ्या प्रयासाने तो शुद्धीवर आला. त्यानंतर जवळजवळ आठ दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता .

तो  बेशुद्ध का झाला ते  डॉक्टरांकडून  कळले .डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला तीव्र मधुमेह होता आणि  रक्तातील साखरेचे प्रमाणवाढल्यामुळे तो बेशुद्ध झाला .

या दोन्ही केसेसमध्ये काही ना काही शास्त्रीय कारण अस्तित्वात होते .

हा सर्व भुतांचा प्रताप असेल असे आमच्या स्वप्नातही आले नाही .

त्या खोलीचा वापर व्यवस्थित सुरू होता अशीच एक दोन वर्षे गेली.

आऊट हाऊसला रंग देण्याचे काम सुरू होते .आमचा माळी दाजिबा याला ऑइल पेंटच्या वासाचा त्रास होतो .ऑइल पेंटच्या वासामुळे त्याला दम्याचा अॅटॅक येतो .तेव्हां तो आऊट हाऊसमध्ये न झोपता या खोलीत झोपला होता. दुसऱ्या दिवशी रात्री तो त्या खोलीत न झोपता आऊट हाऊसमध्ये झोपला.आम्हाला दुसऱ्या दिवशी ही गोष्ट कळल्यावर आम्ही त्याला तुला ऑईल पेंटचा त्रास होतो तरी तिकडे आऊट हाऊसमध्ये का झोपला असे विचारले .त्यावर तो अंग शहारून म्हणाला रात्री कुणीतरी भयानक राक्षस माझ्या छातीवर बसून मला बुक्क्या मारत आहे असे स्वप्न मला पडले .भीतीमुळे माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता .मी जागा झालो तेव्हा घामाने निथळत होतो .माझी बोबडी वळली होती .प्रत्यक्षात तिथे कुणीच नव्हते .पुन्हा तिथे झोपण्याचा मला धीर होत नाही .म्हणून मी ऑइल पेंटचा त्रास होत असला तरीही आऊट हाऊसमध्ये झोपलो.

दाजिबाला त्या खोलीबद्दल  बरेच काही माहिती असल्यामुळे  त्याला स्वप्न पडले असेल . प्रत्यक्षात तिथे काहीही नसेल अशीही शक्यता आहे .अशी काहीतरी विचित्र स्वप्ने एरवी पडतच असतात .स्वप्न पडले भीती वाटली म्हणून आपण दुसऱ्या रात्री त्या गादीवर त्या खोलीत झोपण्याचे काही सोडत नाही . 

काहीही असो. शास्त्रीय कारण असो किंवा नसो.भूत असो किंवा नसो .उगीच विषाची परीक्षा कशाला घ्यायची म्हणून आम्ही तेव्हापासून या खोलीला  कायमचे भक्कम कुलूप लावून ठेवले आहे .

अशी सुरस व चमत्कारिक कथा सांगून संभाजी बोलण्याचे थांबला .

तो थांबल्याबरोबर सर्वांनी एकदम माझ्याकडे पाहिले .सर्वांना माझा त्या गडावरचा किस्सा आठवला.गडावरील रक्षक नको नको म्हणत असताना, आलेले वाईट अनुभव सांगत असताना, मी जसे काही झालेच नाही अशा थाटात त्या पडक्या वाड्यात गेलो होतो.व काहीही न होता सुरक्षित बाहेर आलो होतो.

कमकुवत मन असलेल्या व्यक्तींवर भूत आपला पगडा बसविते .आपला काही संबंध असेल तरच भूत आपल्याला त्रास देईल. वाटेल त्याला त्रास देऊ शकणार नाही.

खेडेगावात अनेकदा स्मशानातून वाट गेलेली असते,तशीच वड पिंपळ या खालूनही पायवाट गेलेली असते, तिथून अनेक जण येजा करीत असतात परंतु  एखाद्यालाच भूतबाधा होते .

या संदर्भातील माझे तत्वज्ञान आणि माझे या बाबतीतील धारिष्ट्य  सर्वांनाच माहीत होते.

*मी त्या खोलीत झोपून खरे काय आहे त्याचा उलगडा करावा असे सर्वांचे म्हणणे पडले.*

*प्रथम  झोपू त्या रात्रीच लगेच आपल्याला भुताचा पडताळा मिळेलच असे नाही .

*मी चार सहा दिवस तिथे आहे तोपर्यंत रोज त्या खोलीत झोपावे .ती खोली इंटरनेट एसी फर्निचर इत्यादी सर्व गोष्टींनी सुसज्ज होतीच.

*आणि त्या चार सहा  दिवसात म्हणजे  रात्रीत भुताचा अनुभव आल्यास मी या गोष्टीचा छडा लावावा असा विचार सर्वांनी मांडला .

*माझ्या धाडसी स्वभावानुसार  मी त्याला संमती दर्शविली*  

( क्रमशः)

२९/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel