त्याने वयाची पंचविशी नुकतीच उलटली होती .सहज जाता जाता त्याने तिला पाहिले .त्याला ती आपली आहे अशी भावना  निर्माण झाली.तिच्याशी भेट व्हावी. तिच्याशी दोन शब्द आपल्याला बोलायला मिळावेत .यासाठी त्याच्या जिवाची तगमग सुरू झाली.परंतु ओळख होणार कशी असा प्रश्न होता .तुम्ही मला आवडता माझ्याबरोबर चहा कॉफी प्यायला याल का ?फिरायला याल का?असे तर विचारता येत नाही ?काय करावे असा त्यांच्या मनात सारखा विचार चाले.तेवढ्यात त्याला एका मासिकांमधील स्पर्धा आठवली. त्या स्पर्धेमध्ये एक चित्र दिलेले होते.त्या चित्राला योग्य असे कॅप्शन लिहून पाठवायचे होते.तो तसा हरहुन्नरी होता .मराठी व इंग्रजी वाङमय त्याने बरेच वाचले होते .

त्याने कॅप्शन लिहून ते त्या मासिकाकडे पाठवले .आणि काय आश्चर्य ते कॅप्शन पुढच्या अंकात छापून आले . कॅप्शन पाठविताना त्याने ते तिच्या नावाने पाठविले होते .तिचे नाव त्याने माहीत करून घेतले होते .तिचा पत्ता तर त्याला माहित होताच कारण तिच्या बंगल्यावरून तो रोज नेहमी कॉलेजला जात असे .ते मासिक आणि त्याला असलेले बक्षीस तिच्या नावाने मासिकाने पाठविले .आता त्याला तिला भेटण्यासाठी एक कारण मिळाले होते .ती अशीच बागेमध्ये फिरायला गेली असताना तिच्याबरोबर एक मैत्रीण होती .याचाही एक जीवश्चकंठश्च मित्र होता .त्या मित्राला बरोबर घेऊन तो तिला भेटला .त्याच्या हातात ते मासिक होते .त्याने ते कॅप्शन तिच्या नावाने पाठविल्याचे तिला सांगितले.तिने तुम्ही हा उद्योग का केलात म्हणून जरा रागानेच विचारले.त्यावर आपण हॉटेलमध्ये जाऊन चहा कॉफी काही तरी घेऊ या मी तुम्हाला सर्व स्पष्ट करतो असे तो म्हणाला .त्याच्या डोळ्यात व चेहऱ्यावर त्याला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट दिसत होते .ते समजण्याइतकी ती चतुर व हुषार नक्कीच होती .

कुठे तरी तिलाही तो आवडला होता .आपल्याला भेटण्यासाठी त्याने वापरलेली युक्तीही तिला आवडली होती .चौघेही एका हॉटेलमध्ये चहा कॉफी घेण्यासाठी गेले.त्याचा मित्र व त्याची मैत्रीण गप्प होते .तो व ती एकमेकांकडे पाहात होती . दोघांनाही  काय बोलावे ते सुचत नव्हते .एवढ्यात वेटर आला .त्याने काय आणू म्हणून विचारले .त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले .तिने तुम्हाला हवे ते मागवा म्हणून सांगितले .त्याने खायला काय मागू असे विचारले .तिची मैत्रीण म्हणाली तिला पेपर डोसा आवडतो .त्याने तिच्याकडे पाहिले .तिने होकारार्थी मान हलविली .पेपर डोसा खाऊन झाल्यावर आता पुढे काय मागवू असे त्याने तिच्या मैत्रिणीला विचारले .मैत्रीणिने चहा मागवा. तिला कॉफी आवडत नाही असे सांगितले.त्यांनी चहा मागविला .तिची मैत्रीण बोलत होती. ती स्वतः काहीही बोलत नव्हती.ती त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहात होती .त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता .ती जणू काही त्याला अापल्या डोळ्यांनी पिऊन  घेत होती .तिला तो आवडल्याचे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.त्याचा तर प्रश्नच नव्हता त्यानेच तर हा सर्व घाट जुळवून आणला होता .चहा आला अजूनही ती काही बोलत नव्हती .ती मुकी आहे की काय असा त्याला संशय आला .एवढ्यात तिच्या मैत्रिणीने तिला काहीतरी विचारले त्याचे तिने स्पष्ट उत्तर दिले .तिचा आवाज मंजुळ होता .रुपेरी घंटा कानात किणकिणावी तसे वाटत होते .एवढ्यात चहा आला .ती विशेष काही बोलत नसल्यामुळे तोही जरा गडबडलेला होता .चहा जरा अगोड होता .त्याला चहात आणखी साखर हवी होती .त्याने वेटरला हाक मारली. गडबडीत तो साखर मागण्याच्या ऐवजी मीठ म्हणाला .

मीठ म्हटल्याबरोबर सगळे जण त्याच्याकडे पाहू लागले .चहात मीठ घालून पिणारा हा पहिलाच प्राणी सर्व पाहात होते .आता त्याला मला साखर म्हणायचे होते असेही म्हणता येईना .माझे घर समुद्रकिनारी आहे .सारखा खारा वारा तोंडावर येत असतो .त्यामुळे चहा पिताना किंचित खारट चव येते. जेव्हा मी समुद्रकिनारी नसतो त्या वेळी चहात किंचित मीठ टाकून पितो.मला तसाच चहा आवडतो . असे त्यावर तो म्हणाला.त्यावर ती म्हणाली मी पुढे लक्षात ठेवीन .

या वाक्यानेच सर्व काही सांगून टाकले .नंतर ती वारंवार भेटू लागली .एकमेकांच्या घरच्यांचीही ओळख झाली .दोघेही एकमेकांना अनुरूप होती .ती वारंवार भेटत राहिली .दोघांचेही शिक्षण पुरे झाल्यावर त्याला नोकरी लागल्यावर त्यांचे लग्न झाले .तिने तिच्या घरी त्याला चहात किंचित मीठ लागते हे सांगून ठेवले होते.जेव्हा जेव्हा तो तिच्या घरी येई तेव्हा तेव्हा आवर्जून त्याच्या कपात मीठ टाकले जाई .त्याला गोड चहा आवडत असताना तो मीठ टाकलेला चहा गोड मानून घेई.

लग्न झाल्यावर त्यांचा संसार सुरू झाला .तो बिचारा रोज किंचित मीठ टाकलेला चहा मुकाट्याने पीत होता .त्याला मला गोड चहा आवडतो. त्या दिवशी मी गांगरल्यामुळे चुकून मीठ असा शब्द उच्चारला असे त्याला सांगावयाचे असे .परंतु सर्व हसतील म्हणून त्याची जीभ काही रेटत नसे. हळूहळू त्याला किंचित मीठ टाकलेला चहा आवडू लागला .त्याच्याबरोबर तीही तसा मीठ टाकलेला चहा पीत असे.केव्हा केव्हा आलेल्या पाहुण्यालाही मिठाचा चहा प्यावा लागे.अर्थात चहामध्ये साखर असेच .तोही कुठे गेला म्हणजे त्याला आवर्जून मीठ टाकलेला चहा दिला जाई.

भिडे भिडे चहा खारटे असे म्हणायला हरकत नाही .अशीच त्यांच्या लग्नाला तीस वर्षे झाली.आता एवढ्या प्रदीर्घ संसारामुळे एकमेकांचे गुपित असे काही राहिले नव्हते .हे एवढेच गुपित होते .शेवटी एक दिवस त्याने धीर करून खरे काय ते सांगितले . त्यानंतर दोघेही मनापासून मनमुराद हसले .दुसऱ्या  दिवशी तिने नुसत्या साखरेचा गोड चहा बनविला.दोघांनाही तो नीट वाटेना.त्यांनी थोडे थोडे मीठ टाकल्यावर त्याला चव आली.

*तुम्हीही आता जेव्हा चहा प्याल तेव्हा त्यात चवीपुरते मीठ टाकून पाहा.मजा येईल .*

८/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel