मोहिनी

माझा प्रथमदर्शनी प्रेमावर विश्वास कधीच नव्हता .सिनेमात, काही वेळा नाटकात, लघुकथांमध्ये, कादंबरीत, नेहमीच असे प्रेम दाखविले जाते .अशा कथा वाचताना मला नेहमी हसू येत असे.सिनेमाही पाहात असताना मला हसू येत असे.नेहमी मला आश्चर्य वाटे की असे कसे काय होईल?कोणता तरी एक मुलगा आणि कोणती तरी एक मुलगी .त्यांचे शिक्षण त्यांची पार्श्वभूमी त्यांची जात त्यांचा धर्म काहीही माहित नाही आणि बघितले एकमेकांना आणि लागले प्रेम करायला हे कसे काय शक्य आहे ?नुसता मूर्खपणा आहे झाले .दुसऱे याला काय नाव देणार ? सिनेमांमध्ये तर नेहमीच आणि लघुकथा वगैरेमध्ये बर्‍याच वेळा असे दाखविले जाते.

दोघं जण एकमेकांना बरेच दिवसांपासून ओळखत आहेत .भेटत आहेत .त्यामुळे एकमेकांचे स्वभाव  विचार कल्पना एकमेकांना माहीत आहेत .ते एकमेकांशी जुळले आहेत .आणि अशावेळी  त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मी निश्चित समजू शकते .मला जातही महत्त्वाची वाटते .मी जात पाळते म्हणून नव्हे  तर प्रत्येक कुटुंबाचे जातीचे धर्माचे प्रदेशांचे देशाचे काही संस्कार असतात .या संस्कारांना पुढील आयुष्यात फार महत्त्व असते .जर संस्कार भिन्न असतील तर पुढे एकमेकांचे परस्परांशी जुळणे कठीण होते .आर्थिक परिस्थितीही महत्त्वाची आहे .आर्थिक परिस्थितीमुळे एका विशिष्ट स्टाइलने राहायची सवय होते .जर गरिबीमुळे ती स्टाईल राखता आली नाही .तर झगडे होणारच.मी बुद्धिवादी आहे .मी तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारी आहे.त्यामुळेच मला प्रथमदर्शनी प्रेम ही कल्पनाच चुकीची मूर्खपणाचे वाटते . 

नेहमी असे सांगितले जाते की लग्ने स्वर्गात निश्चित केली जातात .व इथे फक्त शोधली जातात किंवा अस्तित्वात येतात .या सांगण्यावर माझा विशेष विश्वास नव्हता .बऱ्याच दिवसांच्या ओळखीनंतर एकमेकांचे प्रेम जुळले तर मी समजू शकते.असो.

मी स्वभावाने मोकळी आहे .माझे मित्र मैत्रीणींचे वर्तुळ फार मोठे  आहे.माझ्या मित्रांमध्ये कुणी बुद्धिमान आहे. कुणी वक्तृत्वकुशल आहे. कुणी स्वभावाने चांगला आहे .कुणी देखणा आहे .मला सगळेच मित्र आवडतात .यातील कुणाशीही लग्न करावे असे मला अजून तरी वाटले नाही .मी आर्थिक स्तराला विशेष महत्व देत नाही .जातीलाही विशेष महत्त्व देत नाही .असे असले तरी या गोष्टींना महत्त्व आहे असेही मला वाटते .माझी आई नेहमी म्हणते हिचे कसे होणार आहे कुणास ठाऊक ?ही हा पसंत नाही तो पसंत नाही असे करीत शेवटी कुवारी राहील .मुलीच्या जातीने फार खोलात जाऊ नये .मुलींच्या जातीने  फार चिकित्सक असू नये.मी तर म्हणते की चिकित्सक असण्याचा मक्ता काय मुलांना दिला आहे ?

अशाप्रकारे सर्वच मला आवडतात आणि कुणीच मला आवडत नाही अशी परिस्थिती आहे.

असे असताना परवाच अशी एक घटना घडली की माझ्या सर्व मतांवर  पाणी पडले बोळा फिरला.ते असे झाले.अांतर विश्वविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा होती.स्पर्धा आमच्या कॉलेजात होती .मी सहसा अशा स्पर्धांना वगैरे जात नाही .मैत्रिणींनी फार आग्रह केला म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले .आणि काय सांगू प्रथम दर्शनी प्रेम खरे आहे खोटे नाही यावर माझा एकदम विश्वास बसला .कोकणातील कुठल्या तरी एका कॉलेजातील मुलगा स्पर्धेसाठी आला होता .आणि त्याला बघितल्याबरोबर अमर अकबर अँथनी मध्ये अमिताभ म्हणतो त्याप्रमाणे माझ्या डोक्यात घंटा किणकिणली.त्यांचे वक्तृत्व तर मला आवडलेच.पण हा मला सुखी ठेवील हा आणि मी यांच्या गाठी स्वर्गात मारलेल्या आहेत असे मला कुठेतरी खोलवर जाणवले .ना ओळखीचा ना पाळखीचा .पुन्हा भेटेल न भेटेल. जात धर्म आर्थिक परिस्थिती कौटुंबिक पार्श्वभूमी काही माहिती नाही .भाग घेणाऱ्यांच्या यादीमध्ये मी त्याचे नाव पाहिले.प्रमोद काळे या वरून विशेष काही बोध होण्यासारखा नव्हता.काळे हे आडनाव इतके सार्वजनिक आहे की ते कोणत्याही जातीला फिट बसते.

दिसायलाही तो फार देखणा होता असे नाही.लक्षात राहिले ते त्याचे पाणीदार डोळे तरतरीत नाक मृदू मुलायम केस .बाकी तो सावळा कदाचित काही जणांच्या मते काळ्यांमध्येच मोडणारा होता.काळे हे आडनाव त्याला फिट बसत होते . मी जरी बुद्धिवादी असले तरी कुठे तरी दैववादीही आहे.  मी नंतर त्या मुलावर विचार करण्याचे सोडून दिले .जर परिजन म्हणतात त्याप्रमाणे स्वर्गात गाठी मारलेल्या असतील तर तो मला कुठे ना कुठे भेटेलच.असा विचार करून मी तो विषय डोक्यातून काढून टाकला .परंतु टाक म्हणून एखादा विषय डोक्यातून काढून थोडाच टाकता येतो .काही ना काही कारणाने तो मुलगा माझ्या डोक्यात मधून मधून घोळत राहिला .

एखाद्याचे बोलणे एखाद्याचे चालणे एखाद्याचा रंग एखाद्याची उंची एखाद्याचे नाक एखाद्याचे डोळे एखाद्याचे केस अश्या कशावरूनही तो मला आपला आठवे.उगीचच तो आता काय करत असेल असा विचार मनात येई.माझे कॉलेज पूर्ण झाले .मला एक चांगली नोकरीही लागली .माझ्या लग्नाची बोलणी घरात सुरू झाली .मला आईने तुझे कुठे काही ठरले नाही ना म्हणून विचारले .माझी आई माझी चांगली मैत्रीणही आहे.मी तिला होय आणि नाही अशी दोन्ही उत्तरे दिली .यावर तिने याचा अर्थ काय म्हणून विचारले . त्यावर मी तिला दोन वर्षांपूर्वी घडलेली सर्व हकीकत सांगितली .ते ऐकून आई हसू लागली .

कोण कुठला मुलगा. ना ओळख ना पाळख.काय करतो माहित नाही . कुठे राहतो माहित नाही .जात धर्म माहित नाही .फोटो नाही .आणि मी आपली वेडी डोक्यात घंटा किणकणली म्हणून सांगत होते.आईने हे वेड डोक्यातून काढून टाक म्हणून सांगितले .आम्ही स्थळे आणतो त्यातील एखादा चांगला मुलगा पसंत कर किंवा तुझ्या अनेक मित्रांपैकी तुला कोण आवडतो ते सांग आम्ही आनंदाने तुझे लग्न त्याच्याशी लावून देऊ .मी त्यावर ठीक म्हणून सांगितले .याशिवाय मी दुसरे काय करणार होते ?

मी ज्या वर्षी स्पर्धा झाली होती त्या वर्षाची विश्व विद्यालयाची  स्मरण पुस्तिका शोधून काढली.त्यातून वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणार्‍यांचे फोटो शोधून काढले.त्यातून मुश्किलीने त्याचा फोटो शोधून काढला .तो फोटो आईला दाखविला .हा कुठे राहतो काय करतो काहीही माहित नाही .पण हा मला आवडतो हे निश्चित .वेडाबाई असे म्हणून आईने माझा गालगुच्चा घेतला आणि तो विषय तिथेच संपला असे सांगितले.

रत्नागिरीला कोणत्या तरी नातेवाईकाच्या लग्नाला आम्हाला जावयाचे होते .आम्ही रत्नागिरीला जात असताना  चिपळूणला आमच्या डब्यात तो चढला.दोन तीन वर्षे झाली तरी त्यांच्यात काहीही बदल झाला नव्हता.त्याच्याशी कसे बोलावे ते मला कळत नव्हते .एवढी मी चतुर व धीट परंतु जर मी त्याच्या जवळ बोलायला गेले तर तो मला  आगाऊ तर समजणार नाही ना अशा विचारात मी पडले होते.आणि जाऊन मी बोलणार तरी काय होते?तू मला आवडतोस असे थोडेच सांगता येणार होते .आणि याशिवाय ट्रेनमधील गर्दी मध्ये बोलता तरी काय येणार होते .आम्ही सर्वच बरोबर होतो .आईला मला तो मुलगा दाखवून हाच तो मुलगा असे सांगण्याची संधी मिळाली नाही .काहीहि न घडता आम्ही रत्नागिरीला उतरलो.

आम्ही सरळ लग्न घरी गेलो .दुसऱ्या दिवशी लग्नाची गडबड सुरू होती .आम्ही मुलीकडून होतो .आणि काय आश्चर्य तो मुलाकडून होता .हा केवढा मोठा योगायोग .तो नवर्‍या मुलाचा चांगला मित्र दिसत होता. मी त्याच्याकडे रोखून पाहात होते .आणि मी म्हणून कुणी आहे हे त्यांच्या गावीही नव्हते .मी आईला हाच तो मुलगा असे सांगितले .आईने हसून ठीक असे म्हटले.

पुढे सर्व गोष्टी पटापट होत गेल्या . आईने त्याची सर्व माहिती काढली .त्याचा रंग सोडला तर त्याच्यात नाकारण्यासारखे आईला काही वाटले नाही .मी एवढी गोरी आणि तो काळा हे आईला काही पचत नव्हते.आईने थोडे बहुत मला समजावण्याचा प्रयत्न केला . मी ऐकायला तयार नव्हते .आईने शेवटी बाबांच्या कानावर सर्व हकीगत घातली .अर्थात त्यातील तो मला आवडतो वगैरे हकीकत गाळली.तो मुलगा काय करतो वगैरे विचारा तो मोहिनीसाठी योग्य आहे की नाही ते पाहा .मला म्हणजे  आईला तो मुलगा चांगला वाटतो .तुम्हाला ठीक वाटला तर आपण त्याच्या आई वडिलांना विचारू या असे तिने बाबांना सांगितले .

आणि त्याच वर्षी महिन्याभरात आमच्या लग्नाचा बार उडाला .लग्नाअगोदर गप्पाटप्पा बोलणे चालणे हिंडणे फिरणे सिनेमाला जाणे इत्यादी काहीही न होता आमचा विवाह झाला .

लग्नाला पाच वर्षे झाली आहेत .मला एक लहान मुलगाही आहे .आमच्या दोघांचा संसार छान चालला आहे .अशी ही मी बुद्धिवादी तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारी आधुनिक मुलगी .अशी ही आमच्या प्रेम विवाहाची कथा .अशा या स्वर्गात मारलेल्या गाठी.

तात्पर्य डोक्यात केव्हा कुठे कशी घंटा वाजेल ते सांगता येत नाही !!!

११/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel