(सत्य हे कल्पनेहून आश्चर्यजनक असते असे कुणीतरी म्हटलेले आहे आणि कुणी नसेलच म्हटलेले तर मी म्हणतो !)

(जे अध्यात्मामध्ये आपली प्रगती करीत आहेत त्यांना प्रगतीच्या कोणत्या तरी एका टप्प्यावर आजारपणाला तोंड द्यावे लागते असे कुठेतरी वाचलेले स्मरते)

गोष्ट सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वीची आहे त्यावेळी वैद्यकीय सुविधा विशेष उपलब्ध नव्हत्या .खेडेगावात तर वैद्यकीय सुविधांच्या नावाने आनंदच होता. गावातील वैद्य डॉक्टर जे कुणी असत त्यांच्यावर सर्व भरवसा असे . रात्रीचे बारा वाजले होते .अण्णा अंथरुणावर आडवे पडलेले होते .ते शेवटच्या घटका मोजीत होते .घरातील मंडळीही स्तब्धपणे पाहात होती. उशाजवळ डॉक्टर बसलेले होते .

त्याकाळी खेडेगावात वीज आलेली नव्हती .फक्त शहरात वीज तीही काही ठिकाणी उपलब्ध असे.खेडेगावात घरात सर्रास कंदील वापरले जात .रॉकेल तेलांमध्ये भेसळ असली, कंदिलाची वात नीट कापलेली नसली, कंदिलाच्या वरच्या भागात खूप काजळी धरल्यामुळे वायुविजन व्यवस्थित होत नसले, तर कंदील भडकत असे .शहरातील लोकांना हल्ली कंदील ही फक्त चित्रांमध्ये बघण्याची वस्तू राहिली आहे .त्यामुळे कंदील भडकणे म्हणजे काय हे माहित असण्याची शक्यता नाही.कंदिलाची ज्योत थरथरते,मध्येच खूप मोठी होते, मध्येच ती काळी दिसते, मध्येच ती विझल्या सारखी नाहीशी झाल्यासारखी वाटते, एवढ्यात पुन्हा ज्योत दिसू लागते .यावेळी भडक कडक असा आवाज येत असतो .अशी आवर्तने चाललेली असतात. त्याला कंदील भडकणे असे म्हणतात.काही जण कंदील फडफडणे असेही म्हणतात .असे होता होता एखाद वेळ कंदील पूर्ण विझतो ज्योत पुन्हा येत नाही .तर केव्हा केव्हा भडकणे पूर्ण थांबते  आणि ज्योत व्यवस्थित पूर्ण प्रकाशाने तेवू लागते.

एवढे सर्व सांगण्याचे कारण की पुढ्यात स्टुलावर कॉटजवळ ठेवलेला कंदील भडकला होता .डॉक्टरांच्या हातात अण्णांची नाडी होती.डॉक्टर घरचेच नातेवाईक होते .किंबहुना अण्णा अप्पांच्या डॉक्टरांच्या घरातच राहायला आले होते कारण ते त्यांचे आजोळ होते .अण्णा तसे शुद्धीवर होते त्यांचा जीव घाबरत होता .क्षणात आपली प्राणज्योत मालवली जाईल अशी भीती त्यांना वाटत होती .डॉक्टरांना नाडी अगदी क्षीण  लागत होती .मध्येच नाडीला धुगधुगी वाटे तर मध्येच नाडी लागत नाहीशी होई.डॉक्टर अण्णांच्या चेहर्‍याकडे एक टक पाहात होते .अण्णांची दृष्टी भडकलेल्या कंदिलांकडे लागलेली होती .क्षणात खोलीत अंधार होई आणि थोड्या वेळाने पुन्हा ज्योत दिसू लागे.अण्णांच्या मनात विचार होता जर कंदील विझला तर मी त्याक्षणी मरेन.जर कंदील व्यवस्थित तेवू लागला त्याचे भडकणे थांबले तर मी या आजारातून नक्की उठेन.डॉक्टरांच्या मनातही तसाच विचार चालला असावा .डॉक्टर आपल्या परीने गोळ्या चूर्णे इत्यादी अण्णांना देत होते . डॉक्टर व अण्णा दोघांचेही लक्ष भडकलेल्या कंदिलाकडे होते .जणू काय अण्णा जगणार की मरणार, आजारातून उठणार की उठणार नाही ,हे तो भडकणारा कंदील ठरवणार होता,म्हणजेच दैव ठरवणार होते.  अप्पांच्या मनात दुसरा चांगला पेटता कंदील आणून ठेवावा असे आले पण त्यांनी ते मुद्दाम कटाक्षाने टाळले असावे कारण देवाचा कौल काय आहे ते पाहूया असा धाडसी विचार त्यांच्या मनात असावा .  

अण्णांची छाती भरून आली होती .जवळजवळ गेले वर्षभर अण्णा आजारी होते .त्यांच्या छातीत सतत कमी जास्त प्रमाणात दुखत असे .पहिल्याने सुरुवात अगदी छोटीशी झाली .अण्णा खेडेगावातील शाळेवर मास्तर होते. शाळेतून घरी येताना एक लहानसा चढ चढून मग पुन्हा एक घाटी उतरावी लागे.एक दिवस चढ चढत असताना त्यांना धाप लागल्यासारखे वाटले.म्हणून ते शेजारील एका दगडावर विश्रांतीसाठी बसले .थोड्या वेळाने ते पुन्हा चढ चढू लागले.चढावर आल्यावर त्यांना छातीत एक बारीकशी कळ आली.अण्णा घाबरट स्वभावाचे असल्यामुळे त्यांना आपल्याला बहुधा हार्ट अटॅक येत आहे असे वाटले. त्यांनी कुठेतरी वाचले होते की छातीत कळ येते आणि मनुष्य मरतो .एखादवेळी  लगेच मरतो किंवा काही दिवसांनी महिन्यांनी तो मरतो.परंतु एकदा छातीत कळ आली म्हणजे काही दिवस महिन्यांचाच तो सोबती असतो.पोटात वात धरल्यामुळे किंवा काही अन्य कारणांमुळे असे होवू शकते हे त्यांच्या गावीही नव्हते. तेव्हापासून त्यांच्या मनाने आपल्याला हार्टचा विकार जडला आहे असे घेतले .

त्यांना शाळेत येता जाताना त्रास होऊ लागला .येता जाताना एक तरी चढ चढावा लागे.त्यावेळी त्यांची छाती भरून येई.त्यांना मधून मधून आपल्या छातीत दुखत आहे असे वाटे .मुलांना शाळेत शिकवताना त्यांचा आवाज भरून येई छाती जड पडे.नोकरी करायची तर ती प्रामाणिकपणे मन लावून सर्वस्व ओतून करायची असा त्यांचा स्वभाव होता .त्यांच्या प्रवृत्ती प्रमाणे त्यांना शाळेत शिकवता येईना.आपण काही दिवस विश्रांती घ्यावी मग आपल्याला बरे वाटल्यावर पुन्हा शाळेत जाण्याला सुरुवात करावी असे त्यांच्या मनाने घेतले .अण्णा रजेवर गेले .सुरुवातीला काही दिवस पूर्ण पगार मिळत होता .नंतर त्यांनी अर्धपगारी रजा घेतली .

त्यांचे मामेभाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांना बोलविण्यात आले .ते दुसऱ्या गावात राहात असल्यामुळे त्यांना गड्याबरोबर चिठ्ठी पाठवावी लागे व नंतर ते येत असत .संदेशवहनाचे दुसरे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते .त्यांनी तपासले त्यांना हार्ट प्रॉब्लेम वाटेना काही औषधे दिली तात्पुरते बरे वाटले.परंतु अण्णांच्या मनाने मला हार्ट प्रॉब्लेम आहे,मी यातून काही वाचत नाही, असे पक्के घेतले.त्यांना अशक्तपणा खूप वाटू लागला .चार पावले चालणेही मुश्किल झाले .सतत छातीत धडधड होत असे .त्यांची बायको जरी खूप धीराची असली तरी तीही घाबरून गेली.अण्णांची तब्येत जास्त झाली की गडी पाठविण्यात येई.डॉक्टर लगेच येत असत .त्यांचे आपल्या आतेभावावर खूप प्रेम होते.गडी पाठवला कि लगेच ते येत. 

ते आले की अण्णांना जरा बरे वाटे.खोल गेलेला आवाज हळूहळू पुन्हा पूर्वीच्या पातळीवर एक दोन तासांमध्ये येऊ लागे.डॉक्टर निघाले की त्यांची पुन्हा घबराट सुरू होई .छाती खूप दुखू लागे.आवाज खोल जाई. जेव्हा त्यांचा आवाज खोल जाई त्यावेळी त्यांच्या तोंडाजवळ कान नेला तरीही ते काय बोलत आहेत ते नीट ऐकू येत नसे.बायकोला मुलांना बाजूला बसवून मी आता चाललो. तुम्ही स्वतःला सांभाळा. पुढे किती फॅमिली पेन्शन मिळेल, त्यात तुमचे कसे भागणार , तुम्ही नंतर काय करणार, मुलांचे शिक्षण कसे होईल,मी हा असा अर्ध्यावर तुम्हाला सोडून चाललो .एक ना दोन त्यांची अखंड बडबड चाले .बोलता बोलता ते आपण आजारी आहोत हे काही वेळा विसरून जात .त्यांचा खोल गेलेला आवाज हळूहळू वाढू लागे.अण्णा तुम्हाला त्रास होईल. बोलू नका.स्वस्थ झोपा. वगैरे त्यांना सांगावे लागे.मुले लहान. घरात आणखी कुणी मोठे नाही. गावात कुणीही  धीर द्यायला संभाळून घ्यायला नातेवाईक नाहीत.जवळचे नातेवाईक अंतराने जवळ परंतु दळणवळणाच्या दृष्टीने खूप लांब .चिठी घेऊन गडी पाठविला तरी त्याला जाऊन येण्यासाठी एक दिवस लागे.चालत जाण्याशिवाय दुसरी कुठलीही सोय  त्या काळात नव्हती.अशी एकूण बिकट परिस्थिती होती .

डॉक्टरांना प्रॉब्लेम शारीरिक थोडासा व मानसिक जास्त वाटत होता .डॉक्टर आठवड्यातून दोन तीन चकरा मारून मारून कंटाळून गेले.त्याना त्यांची डॉक्टरी व इतर व्यवसाय सांभाळणे कठीण जात असे.त्यात आणखी इकडे चकरा मारणे त्यांना जड जात असे .शेवटी त्यांनी अण्णांना सांगितले की अण्णा नाहीतरी तू आपल्या आजोळी बऱ्याच वर्षांत राहण्यासाठी आलेला नाही .तू आमच्याकडे येऊन काही महिने रहा.मी तुला टुणटुणीत करून आपल्या पायानी तू चालत जाशील याची खात्री देतो .

अप्पा(डॉक्टर) त्यांचे मामेभाऊ त्यांना होणारा त्रास अण्णांना दिसत होता .त्यांनी अप्पाकडे जावून राहायचे असे ठरविले .डोली करून अण्णा त्यांच्या आजोळी म्हणजे अप्पांकडे आले .तिथे आल्यावरही त्यांना बरे वाटत नव्हते .एक दिवस त्यांची तब्येत जास्त व्हायची तर दुसऱ्या दिवशी जरा उतार वाटायचा. अण्णांचा प्रॉब्लेम सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे जास्त मानसिक होता.अर्थात शारीरिकही काहीतरी आजार निश्चित होता .(मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कदाचित अध्यात्मिक उन्नतीचा एखादा टप्पा असावा. आपल्याला माहित नाही अशा अनेक गोष्टी जगात असतात.ज्या गोष्टी आपल्या तर्काला पटत नाहीत त्या नसतातच असे नाही )  आपल्याला हार्ट प्रॉब्लेम आहे आणि आपण या आजारपणात  जाणारच असे त्यांच्या मनाने घेतले होते .प्रथम ही भीती त्यांच्या मनातून घालवणे जरूर होते .अप्पांनी नाना प्रकारे उपाय करून त्यांची भीती घालविण्याचा आटोकाट प्रयत्न केला .त्यांना एखाद्या मानसोपचार तज्ञांकडून उपाययोजना पाहिजे होती .त्याकाळी तसे तज्ज्ञ विशेष नसत.असले तर मोठ्या शहरातून असत.त्याकाळी म्हणजे सुमारे पंचाहत्तर वर्षांपूर्वी तसा विचारही कुणाच्या डोक्यात आला नाही .खिशाला परवडला नसता तो भाग वेगळाच .

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कंदील भडकला होता .अप्पा व अण्णा शिवाय खोलीतील माणसेही त्या कंदिलाकडे पाहात होती.सर्वांच्याच मनात एकच विचार होता .जर कंदील भडकण्याचा थांबला ज्योत स्थिर झाली तर अण्णा नक्की बरे होणार .जर कंदील विझला तर अण्णांचीही प्राणज्योत विझणार .

आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जवळजवळ एक तास फडकत असलेला तो कंदील शेवटी स्थिर झाला .ज्योत पूर्ण तेजाने झळकू लागली .अण्णांच्या अप्पांच्या व खोलीतील इतर मंडळींच्याही चेहऱ्यावर आनंद हास्य पसरले .तेव्हापासून अण्णांच्या मनाने उभारी घेतली .पुढील चार सहा महिन्यांमध्ये ते पूर्णपणे बरे झाले.त्यांनी निवृत्ती घेतली .त्यानंतर ते पुढे तीस चाळीस वर्षे व्यवस्थित जगले .सात आठ किलोमीटर सकाळी व पुन्हा संध्याकाळी तेवढेच अंतर ते चालू शकत असत.नंतर त्यांना आणखी काही आजार पुढील आयुष्यात झाले परंतु छातीत कधीही दुखले नाही !

*त्या कंदिलाने मानसोपचारतज्ञाचे काम फारच भक्कमपणे केले.त्याचप्रमाणे दैवाचा कल व भविष्यवेत्यांचेही काम केले.*

२३/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel