काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे .आम्ही काही मित्रमंडळीनी औरंगाबाद दौलताबाद अजंठा वेरूळ घृष्णेश्वर  पाहण्यासाठी ट्रिप काढली होती . मिनी बस घेऊन आम्ही पंधरा वीसजण नाशिकहून निघालो. औरंगाबादला हॉटेलमध्ये उतरलो .एक दिवस औरंगाबादमध्ये फिरून दुसर्‍या दिवशी वेरूळला जाण्यासाठी निघालो.दौलताबाद किल्ला पाहीपर्यंत जवळजवळ अकरा वाजले त्यानंतर औरंगजेबाची  कबर बघून आम्ही वेरूळलेणी पाहण्यासाठी गेलो. अगदी संध्याकाळी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पाहून आम्ही परत फिरलो .औरंगाबादला जाऊन जेवीपर्यंत खूप उशीर होईल म्हणून वाटेतच कुठेतरी धाब्यावर अस्सल मराठवाडी जेवण घेण्याचे ठरले .आमचा धाबा दौलताबाद किल्ल्याच्या अगोदर पाच दहा किलोमीटरवर होता .जेवण झाल्यावर रात्री दहाच्या सुमारास आम्ही धाब्यावरून औरंगाबादला जाण्यासाठी निघालो .

दौलताबाद किल्ल्याच्या समोरच रस्त्यावर एक  म्हातारा उभा होता .तो इतका अकस्मात गाडीच्या पुढे हेडलाइटच्या प्रकाशात दिसला की जणू काही तो हवेतूनच तिथे निर्माण झाला होता .जर सावधपणे करकचून ब्रेक दाबले नसते तर तो गाडीखाली आला असता .तो इतका कृश होता की त्याची सर्व हाडे मोजून घेता येणे शक्य होते .तो रस्त्याच्या मध्ये उभा राहून हातवारे करीत असल्यामुळे आम्हाला आमची गाडी थांबविणे  भाग होते .आमच्या जवळ येऊन त्याने त्याचे खपाटीला गेलेले पोट दाखविले .व काहीतरी खाण्याला देण्याची विनंती केली .तो इतका कृश होता की जणूकाही हाडांचा सापळाच .त्याचे भेसूर स्वरूप पाहून एखाद्याला भीतीच वाटली असती .त्याने कडेला रस्त्यावर झोपलेला एक लहान मुलगा दाखविला .भुकेमुळे ग्लानी येऊन तो आडवा झाला आहे असे त्याने सांगितले .दोघांसाठी काहीतरी खाण्याला द्या अशी विनंती त्याने केली .

आमच्याजवळ त्याला खाण्याला देण्यासाठी बिस्किट्स भेळ वगैरे काहीही  खाद्यपदार्थ शिल्लक नव्हते.त्या दोघांची भुकेकंगाल स्थिती पाहून आम्हाला त्यांची दया आली . जवळपास एखादे हॉटेल उघडे दिसते का ते आम्ही पाहिले.कुठेच काही दिवा दिसत नव्हता.त्याला आम्ही पैसे देऊ केले परंतु त्याला अन्नच हवे होते .आम्ही पुढे जाऊन एखादे हॉटेल उघडे पाहू व तुला अन्न आणून देऊ असे सांगितले. हे ऐकून तो म्हातारा रस्त्यातून दूर झाला .आम्ही पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला एखादे हॉटेल टपरी दुकान उघडे दिसते का म्हणून पाहात हळूहळू जात होतो .एवढ्यात आमच्यापैकी एकजण म्हणाला की अरे काही खायला घेऊन कशाला परत त्याला नेऊन द्यायचे?आपण सरळ औरंगाबादला जाऊ या.त्यावर आमचे सरळसरळ दोन गट पडले .एका गटाचे म्हणणे औरंगाबादला जाऊ या असे होते तर दुसऱ्या गटाचे म्हणणे नाही त्या म्हातार्‍याची व मुलाची स्थिती फार वाईट आहे आपण त्यांना अन्न नेऊन देऊया असे होते.

शेवटी बहुमताचा विजय झाला आणि आम्ही रस्त्याच्या कडेला उघड्या असलेल्या टपरी समोर बस  थांबविली.आम्ही त्या टपरीच्या मालकाला काही खाण्यासाठी अन्न पदार्थ आहेत का म्हणून विचारले .त्याने हो म्हणताच आम्ही त्याला दोघांसाठी भाकरी भाजी किंवा पोळी भाजी बांधून देण्यास सांगितले. त्यावर त्याने आमच्याकडे निरखून बघितले आणि तो म्हणाला तुम्हाला तो म्हातारा भेटला वाटते ?आम्ही होय म्हणून मान हलविताच तो म्हणाला की तो म्हातारा अत्यंत कृश आहे .कडेला एक लहान मुलगा होता? कि संपूर्ण कुटुंब? किंवा आणखी कुणी बसलेले होते? आम्हाला त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येईना.  आम्ही त्याला एक लहान मुलगा झोपला होता असे सांगितले .त्यावर तो टपरीचा मालक म्हणाला की तो म्हातारा एकदम हवेतून आल्यासारखा तुमच्या मोटारी पुढे आला असेल.आम्ही मान हलवून हे तुम्हाला सर्व कसे काय माहिती असे विचारता त्याने पुढील गोष्ट सांगितली .

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .बैलगाडीतून एक कुटुंब औरंगाबादला काही कामासाठी आले होते .म्हातारा म्हातारी मुलगा सून व नातू अशी पाचजण काम आटपून परत आपल्या गावी बैल गाडीतून जात होते. औरंगाबादहून निघे निघेपर्यंत त्यांना संध्याकाळ झाली .किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी उभी करून कडेला तीन दगड मांडून भाकरी भाजी करून खावी आणि नंतर पुढे जावे असे त्यानी ठरविले.त्यांच्याजवळ शिधा होताच .तीन दगड मांडून विस्तव पेटवून सुनेने स्वयंपाकाला सुरुवात केली . एवढ्यात एक ट्रक भरधाव आला .तो ट्रक वेडावाकडा होत त्या कुटुंबाच्या अंगावरून गेला .आणि ते पाच जणांचे कुटुंब चिरडले गेले.त्या ट्रकचे टायर  अकस्मात पंक्चर झाल्यामुळे तो ट्रक तोल जाऊन त्या कुटुंबाच्या अंगावरून पुढे गेला आणि रस्त्याच्या कडेला आडवा झाला.त्यात त्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला .

तेव्हापासून गेली दोन वर्षे हा सर्व देखावा तेथे अमावास्येला रात्री दहाच्या सुमाराला अस्तित्वात येतो .  (भासमान होतो) . रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला रात्री दहाच्या सुमारास एक ट्रक भरधाव येतो व रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कुटुंबाला चिरडून आडवा होतो असे दृश्य दिसते .तर इतर दिवशी केव्हा केव्हा मधूनच म्हातारा खाण्यासाठी याचना करताना किंवा तो लहान मुलगा रस्त्यावर धावताना दिसतो .तर एखादवेळ पेटलेली चूल व भाकरी थापत असलेली एक तरुण मुलगी दिसते.आमच्या जवळ रात्री अकराच्या सुमाराला कुणीतरी भाजी भाकरी दोघातिघांसाठी बांधून मागू लागला.म्हणजे या लोकांना तो म्हातारा दिसला असे आमच्या लक्षात येते .तुम्हाला आता परत तिथे जाण्याचे काहीच कारण नाही .तुम्हाला आता तिथे कुणीही दिसणार नाही . रस्त्यावर मोटार,ट्रक,बस समोर अकस्मात म्हातारा दिसल्यामुळे  किंवा लहान मुलगा धावत रस्ता क्रॉस करताना दिसल्यामुळे आतापर्यंत काही अॅक्सिडेंट झाले आहेत.

सर्व गोष्ट ऐकून आम्ही अचंबित झालो .आमच्याजवळ तो म्हातारा गयावया करून बोलला होता .रस्त्याच्या कडेला झोपलेला मुलगाही आम्ही पाहिला होता .हा सर्व भास होता किंवा ती सर्व भूते होती आणि ते भूत आमच्याशी बोलले हे आम्हाला खरेच वाटेना .तरीही आम्ही त्याच्यापाशी भाकरी भाजी बांधून मागितली .परत जाऊन प्रत्यक्ष तिथे काय आहे ते पाहूया असे आम्ही ठरविले .आम्ही बस वळवून परत निघालो असे पाहिल्यावर तो टपरीवाला म्हणाला एखादवेळी तुम्हाला तिथे कुणीच भेटणार नाही किंवा सर्व कुटुंबही भेटेल किंवा कुटुंबातील काहीजण भेटतील .आम्ही परत त्या ठिकाणी गेलो तेव्हा तिथे आम्हाला म्हातारा त्याचा नातू मुलगा व सूनही भेटले.त्यांनी आनंदाने आम्ही दिलेली भाजी भाकरी घेतली .त्या टपरीवाल्याने आम्हाला एखादी कथा खुलवून सांगितली आणि आमचा मामा केला असे आम्हाला वाटले. मगाशी म्हातारा याचना करीत होता तेव्हा मुलगा सून कुणीही दिसले नाहीत हा विचारही आमच्या मनात आला नाही .

आम्ही परत औरंगाबादला येण्यासाठी निघालो .सहज आम्ही मागे वळून पाहिले तो तिथे कुणीही नव्हते सर्व काही अदृश्य झाले होते. किंवा कदाचित ते सर्व तिथे असतील परंतु आम्हाला काही कारणाने  दिसत नसतील .पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये सर्व परिसर स्वच्छ दिसत होता .समोर दौलताबादचा किल्ला होता रस्त्यावर सामसूम होते.सर्व काही शांत शांत होते .ती भयाण स्तब्धता आपल्याला गिळून टाकील की काय असे वाटत होते.रस्त्यावरून एखादी दुसरी मोटार  जात होती .आम्ही पाहिले ते खोटे ,आम्ही ऐकले ते खोटे, की सर्वच खरे, असा संभ्रम  आम्हाला पडला.

कुणीही एकही अक्षर बोलत नव्हते आणि आमची मिनी बस औरंगाबादच्या दिशेने धावत होती.

९/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel