निरंजन रंजनाकडून आल्यावर काही कामांमध्ये त्याचा वेळ गेला .नंतर तीन चार तासांनी त्याने फोन करण्यासाठी मोबाइल पाहायला सुरुवात केली.त्याला त्याचा मोबाइल मिळेना. बहुधा आपण मोबाइल रंजनाकडे विसरलो असणार म्हणून त्याने  लॅंडलाईनवरून तिला फोन केला .ती फोन उचलत नव्हती. कदाचित ती झोपली असेल किंवा तिला रिंग ऐकू गेली नसेल असे त्याला वाटले.जरा वेळाने त्याने पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला.एवढ्यात त्याच्या दरवाज्यावरील बेल वाजली .उठून त्याने दरवाजा उघडला तो रंजनाचा नोकर दरवाज्यात उभा होता.त्याने एक लखोटा त्याच्या हातात दिला.लखोटय़ावर रंजनाकडून निरंजन यास एवढीच अक्षरे  होती.

नोकर निघून गेला. निरंजनने दरवाजा बंद केला व उत्सुकतेने लखोटा उघडला.त्यामध्ये त्याचा मोबाइल व एक पत्र होते. पत्रामध्ये  पुढील मजकूर होता .

"आपला संबंध संपलेला आहे .मी तुम्हाला भेटणार नाही.मला भेटण्याचा प्रयत्न करू नका .आपल्या दोघांमध्ये जे काही होते ते विसरून जा ."

पत्र वाचून निरंजनला काहीच कळेना.काही तासांपूर्वी रंजनाचा प्रेमळ निरोप घेऊन तो परत आला होता.त्यावेळी रंजना नेहमीप्रमाणेच हास्यविनोद करीत होती .आणि आता हे असे पत्र त्याला काहीच कळेना. आपल्याकडून काय चुकी झाली ते त्याला समजेना .त्याने पुन्हा एकदा पत्र वाचून पाहिले .पत्रावर चार पाच पाण्याचे डाग पडलेले होते.

निरंजन रंजनाला गेली दोन तीन वर्षे ओळखत होता .केव्हातरी कुठेतरी झालेल्या साध्या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीमध्ये व पुढे प्रेमामध्ये कधी झाले ते त्यांचे त्यांनाच कळले नव्हते. त्याच्या व तिच्या घरची मंडळी ही दोघे लग्न करणार हे गृहित धरून चालली होती. दोघांच्याही घरून त्याला मूक संमती होती.दोघेही केव्हा आपल्याजवळ बोलतात म्हणून त्यांच्या घरचे वाट पाहात होते .निरंजनने रंजनाला प्रपोज करूनही चार महिने झाले होते .रंजनाने लाजून त्याला होकार दिला होता .असे सर्व असताना हे असे पत्र त्याला काहीच कळेना .रंजना असा कधी निर्णय घेईल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.पत्रात असा निर्णय घेण्याचे कारणही तिने लिहिले नव्हते .त्याने पुन्हा एकदा पत्र नीट पाहिले .तिने रडत रडत नाइलाजाने हे पत्र लिहिले आहे असे त्याला कुठेतरी जाणवले .फक्त हे पत्र तिने स्वखुशीने लिहिले की तिला कुणीतरी जबरदस्तीने लिहिण्यास भाग पाडले  ते त्याला समजत नव्हते .

त्याने रंजनाला फोन करून व नंतर प्रत्यक्ष भेटून खुलासा करून घेण्याचे निश्चित केले .याच्या मुळाशी जाऊन असे पत्र लिहिण्याचे कारण काय ते तो जाणून घेणार होता .त्याने मोबाइल फोन करण्यासाठी उचलला .तो पूर्णपणे डिस्चार्ज झाला आहे असे त्यांच्या लक्षात आले .त्याने मोबाइल चार्जिंगला लावून लँडलाइनवरून रंजनाला फोन केला .एक दोनदा रंजनाने फोन उचलला नाही .शेवटी तिसऱ्यांदा तिने फोन उचलला.फोनवरील तिचा आवाज रडका जड व विचित्र वाटत होता.एखादी व्यक्ती जर बराच वेळ रडत असेल आणि त्याच प्रमाणे तिला खूप मोठा धक्का बसला असेल तर जसा तिचा आवाज येईल त्याप्रमाणे रंजनाचा आवाज येत होता .तिला एवढा मोठा धक्का कसला बसला असेल हे त्याच्या लक्षात येईना.ती विशेष काही बोलावयाला तयार नव्हती .तिचे मधून मधून हुंदके ऐकायला येत होते .मी तुला भेटायला येत आहे असे म्हणून त्याने फोन ठेवला .

निरंजन लगेच रंजनाच्या घरी गेला . नोकराने रंजना घरी नाही. बाहेर गेली आहे. कुठे ते माहीत नाही. एवढेच सांगितले.निराश होऊन निरंजन घरी परत आला.दुसऱ्या दिवशी तो तिला पुन्हा भेटायला गेला .तिने त्याला घरातही न घेता दरवाजा त्याच्या तोंडावर बंद केला .गेली दोन तीन वर्षे माहीत असलेली रंजना ही रंजना नव्हती.जेव्हा दोघांची मने जुळलेली असतात त्यावेळी शब्दांची गरज नसते .एकाच्या मनातील भाव दुसऱ्याला शब्दाविना कळतात.निरंजन व रंजना यांच्यामध्ये असे मूक संभाषण होत असे .रंजनाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा तिचे डोळे रडून सुजलेले असावेत असे त्याला वाटले.त्याचप्रमाणे ती पाच दहा वर्षांनी वयस्क झाली की काय असे वाटत होते. काय होत आहे ते निरंजनला कळत नव्हते काय करावे तेही त्याला कळत नव्हते.रंजनाच्या उदासीपणाचा शोध घ्यावा असे त्याला उत्कटतेने वाटत होते.परंतु हे कसे करावे ते त्याला कळत नव्हते .

दैवानेच त्याचा मार्ग मोकळा केला.त्याची इच्छा पूर्ण केली .रंजना भेटत नाही, बोलत नाही, तर निदान तिचा आवाज तरी ऐकावा म्हणून त्याने फोन रेकॉर्डिंग चालू करून तिचा आवाज ऐकण्याला सुरुवात केली. फोनवरील एक संभाषण संपले की पुन्हा पुढचे चालू होत होते.आणि एकदम त्याला एक वेगळाच जाड पुरुषाचा आवाज एेकू येऊ लागला .तो आवाज ऐकून निरंजन एकदम सावरून बसला .तो आवाज तिच्या फॅमिली डॉक्टरांचा होता .त्यांचे बोलणे ऐकून निरंजनलाही मोठा धक्का बसला.एवढ्या सुंदर नाजूक लहान मुलीच्या बाबतीत असे कसे काय होऊ शकते?असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला .परंतू तो जे काही ऐकत होता ते सत्य होते .डॉक्टर रंजनाला समजावून सांगत होते.आणि ऐकताना भावनाप्रधान रंजनाचे हुंदकेही  त्याबरोबर ऐकू येत होते.

झाले ते असे झाले होते .रंजनाकडे गेलेला असताना निरंजनचा फोन रेकॉर्डिंग मोडवर राहिला . तो तिथेच विसरून निरंजन आपल्या घरी आला .निरंजन रंजनाकडून निघाल्यावर थोड्याच वेळात त्यांचे फॅमिली डॉक्टर तिला भेटण्यासाठी आले.ते जे काही रंजना जवळ बोलले त्याचे स्वाभाविक रेकॉर्डिंग झाले.

डॉक्टरांनी सांगितलेली धक्कादायक गोष्ट पुढील प्रमाणे होती .रंजनाच्या उजव्या हाताच्या काही बोटांना संवेदना वाटत नव्हती .असे का म्हणून ती आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे गेली होती .डॉक्टरना संशय आल्यामुळे त्यांनी तिला स्किन स्पेशालिस्टकडे पाठवले होते .स्किन स्पेशालिस्टने रिपोर्ट फॅमिली डॉक्टरांकडे पाठविला .फॅमिली डॉक्टर रंजनाला वडिलांसारखे जवळचे असल्यामुळे ते मुद्दाम तो रिपोर्ट घेऊन तिला भेटण्यासाठी ,सल्ला देण्यासाठी व सांत्वन करण्यासाठी आले होते .

त्यांच्या बोलण्यातून रंजनाला कुष्ठरोग झाल्याचे निरंजनला समजले.यासाठी कडक पथ्य पाळावे लागेल .रोग पूर्ण बरा होईपर्यंत कुणाच्याही संपर्कात येणे धोक्याचे आहे .संपर्कात आलेल्या व्यक्तीला तो रोग जडू शकतो . यावर उत्तम औषधे आहेत .तू निश्चित बरी होशील .तोपर्यंत तू कुणाच्या संपर्कात येऊ नकोस .रोग पूर्ण बरा झाल्यावर लग्न करण्यास हरकत नाही .परंतू नंतरही एक दोन वर्षे मूल न झाले तर बरे .हा रोग आनुवंशिक नाही .वगैरे गोष्टी डॉक्टर तिला समजावून सांगत होते .रंजना सारख्या मुलीला असा रोग? ती कुणाच्या संपर्कात आली. हा तिला कसा काय जडला? त्याला काहीच कळेना.डॉक्टरांचे संभाषण बंद झाल्यावर त्याने ते रेकॉर्डिंग पुन्हा सुरुवातीपासून नीट लक्ष देवून ऐकिले.

त्याला आता सर्वच गोष्टींचा उलगडा झाला .रंजनाने तसे पत्र का लिहिले ?त्यावर पाण्याचे थेंब पडले असे का वाटत होते?तिने त्याचे फोन घेण्याचे सतत का टाळले ?फोन घेतला त्यावेळी तिचा आवाज रडका का होता?निरंजन भेटण्यासाठी गेला असताना तिने दरवाजा त्याच्या तोंडावर बंद का केला?तिचे डोळे रडून रडून सुजलेले का होते?ती पाच दहा वर्षांनी वयस्क का दिसत होती?त्याला टाळण्याचा आटोकाट प्रयत्न तिने का केला?त्याला कठोर होऊन तोडून का टाकले?सर्वच गोष्टी स्पष्ट झाल्या .

अशा वेळी आपण दूर रहाता कामा नये .आपण तिच्या जवळ असले पाहिजे.जे काही होईल ते दोघांचे एकत्रच.अश्या वेळी आपणच तिला आधार दिला पाहिजे . धीर दिला पाहिजे.असा मनोमन निश्चय करून निरंजन तिच्या घरी गेला . बेल वाजविल्यावर रंजनाने दरवाजा उघडल्यानंतर त्याने आपला पाय दरवाज्यामध्ये घातला आणि तिला दरवाजा बंद करू दिला नाही .बळजबरीने दरवाजा उघडून आत गेल्यावर त्याने तिला  मला सर्व काही माहित आहे . मी तुझ्या पाठीशी उभा आहे.तू व्यवस्थित औषध घेत जा .मी आत्ताच तुझ्याशी लग्न करणार आहे .डॉक्टर सांगतील तोपर्यंत आपण संबंध ठेवणार नाही .आपण दोघेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागू. अपघात हे आयुष्यात होतच असतात. दोघांनी जोडीने हातात हात घालून त्यावरती विजय मिळवायचा असतो. संकटांना घाबरून कसे चालेल ?वगैरे गोष्टी तिला समजून सांगितल्या .तिचे सांत्वन केले .तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला .दोघांनीही कोणती काळजी घेतली पाहिजे हे डॉक्टरांकडून समजून घेतले. दोघांच्याही घरच्यांना न कळवता रजिस्टर मॅरेज केले .संकटांमध्ये निरंजन रंजनाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला .

वर्ष दीड वर्षांमध्ये रंजना पूर्ण बरी झाली .रोगाच्या कुठच्याही खुणा अस्तित्वात राहिल्या नाहीत .

*या गोष्टीला  तीन वर्षे झाली आहेत .त्यांना एक छान गोंडस मुलगीही आहे .*

६/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel