मी रंजना इथे नागपूरला एकटीच येऊन पडले आहे .मुंबईला माझे घरदार मित्रमैत्रिणी आईवडील सर्वकाही आहे. पण मुंबईला राहणे असह्य झाल्यामुळे मी माझी बदली इथे करून घेतली आहे.आमच्याच सोसायटीमध्ये शिरीष राहतो .तो व त्याची बायको येता जाताना अनेकदा भेटतात.मला तो बहिण समजत असल्यामुळे किंबहुना त्याच्या दृष्टीने मी त्याची बहिणच असल्यामुळे तो अनेकदा फोनवर किंवा एरवीही बोलतो .सण समारंभ सुख दुःख इत्यादि वेळी तो व त्याची बायको आमच्या घरी येतात .त्याचा संसार सुखी चालला आहे .तो तसाच चालू दे. तो सुखी व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे .मला तिथे मुंबईला राहताना खूप दुःख होत होते .येथेही सुखी आहे असे नाही .परंतु  माझ्या नशिबी जे आले आहे ते मला भोगले पाहिजे .कशालाच कुणाचा इलाज नाही .मी लग्न करावे म्हणून माझे आईवडील माझ्या मागे लागले आहेत .मी त्यांना दरवेळी नाही म्हणून सांगते .त्यांना त्याचे कारण जाणून घ्यायचे आहे .मी त्यांना कारण सांगू शकत नाही .कशालाच कोणाचा इलाज नाही .मी हे जे लिहित आहे त्याचा तुम्हालाही अर्थ कळत नसणार .

मी सर्व काही पहिल्यापासून सुरू करते .मी रंजना व माझी बहिण संजना.आम्ही दोघी व आई वडील मुंबईला एका चांगल्या फ्लॅटमध्ये रहात होतो अजूनही राहातो .वडील खासगी कंपनीत उच्च पदावर आहेत. आईही एका बँकेत नोकरी करते .आमची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे .आईला मुलगा नसल्याचे व आम्हाला भाऊ नसल्याचे  दुःख होते .विशेषतः भाऊबीज रक्षाबंधन अशावेळी आम्हाला भाऊ हवा असे फार वाटत असे.बाबांना ही आमची इच्छा पूर्णपणे माहिती होती .एकदा आम्ही सर्व कोकणात आमच्या गावी गेलो होतो .तिथे आमच्या दूरच्या नात्याचे एक कुटुंब होते .त्या काका काकूंचा मुलगा शिरीष .तो अतिशय हुशार व चुणचुणीत होता .आम्ही कोकणात गेलो त्या वर्षी तो चौथीला होता .चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेमध्ये तो जिल्ह्यात पहिला आला .त्यांच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती .फार फार तर तो एसएससीपर्यंत शिकला असता .त्यापुढे गरिबीमुळे त्याचे शिक्षण अशक्य होते .स्कॉलरशीपमुळे काही खर्च भागतो परंतु इतरही अनेक खर्च असतात. आमच्या कोकणातील गावी महाविद्यालय नव्हते.दुसरीकडे राहुन त्याला महाविद्यालयीन शिक्षण घेणे गरिबीमुळे शक्य नव्हते .माझ्या वडिलांच्या ती गोष्ट लक्षात आली .त्यांनी त्याच्या आई वडिलांना विचारून त्याला आमच्याबरोबर मुंबईला आणला .तो आमच्याकडे मुलासारखा राहिल,मी त्याचे सर्व शिक्षण करीन असे  त्यानी त्याच्या आई वडिलांना सांगितले .त्याला दत्तक घ्यावा अशी आई बाबांची इच्छा होती .परंतु ते शक्य झाले नाही .

आम्हा दोघींना बाबांनी हा तुमचा भाऊ म्हणून सांगितले . आम्हाला खूप आनंद झाला .मी त्यावेळी पहिलीत होते .संजना बालवाडीत होती .शिरिष प्रथम आमच्या घरी खूप बुजत असे. हळूहळू तो मोकळा होऊ लागला .बहीण भावाप्रमाणे आमच्यामध्ये मारामाऱ्या भांडणे दंगाधोपा खेळ  हास्य विनोद चालत असे .आम्हाला हवा असलेला भाऊ मिळाला म्हणून आम्ही दोघे आनंदित झालो होतो.दिवाळी भाऊबीज रक्षाबंधन हे सण शिरीषमुळे आमच्या  इथे आता दणक्यात साजरे होत असत . शिरीषमुळे त्या सणाना आणखीच गोडी आली होती .शिरीष  हुषार होता .हा हा म्हणता तो शिकत गेला .शिक्षणाची नवीन नवीन शिखरे तो काबीज करीत गेला. एमबीबीएस होऊन पुढे पोस्ट ग्रॅज्युएट करून त्याने दवाखाना सुरू केला.बाबांनी त्याला सर्व प्रकारची मदत केली .त्याची प्रॅक्टिस दणक्यात चालली होती .

तो आमच्या इथे आल्यानंतर पहिली सात आठ वर्षे अतिशय आनंदात गेली .नंतर मात्र मी त्याच्याकडे का कोण जाणे  वेगळ्याच दृष्टीने पाहू लागले .असे कसे झाले का झाले ते माझे मलाच कळले नाही .त्याची दृष्टी मात्र नितळ स्वच्छ भावाप्रमाणे होती.सुरुवातीला आनंदाने हौशीने त्याला भाऊबिजेला ओवाळणारी मी आता मात्र ओवाळताना कसनुशी होत असे. भाऊबीज रक्षाबंधन हे सण मला आता टोचू लागले . नकोसे वाटू लागले .त्या दिवशी घरी नसावे असे मला वाटे .काही ना काही सबबी पुढे करून मी त्याला भाऊबिजेला ओवाळण्याचे किंवा  राखी बांधण्याचे टाळीत असे .त्यात मी केव्हा यशस्वी होत असे तर केव्हा यशस्वी होत नसे. माझी बदललेली दृष्टी शिरीषला मुळीच लक्षात येत नसे.त्याची दृष्टी पूर्वी प्रमाणेच स्वच्छ व पारदर्शक असे .त्याला माझ्या मनातील भाव केव्हा ना केव्हा कळतील म्हणून मी आशेने वाट पहात असे.पण त्याला वेड्याला कधी काही कळलेच नाही .त्याची दृष्टी स्पर्श नेहमीप्रमाणे  असे.अशा परिस्थितीत त्याला माझ्या मनात काय आहे हे सांगण्याचे धाडस मला कधीच झाले नाही .आई बाबांजवळ मी काही बोलू शकत नव्हते .ज्याला भाऊ मानला नव्हे ज्याला भाऊच समजलो त्याच्या बद्दल अशी काही भावना ठेवणे सर्वांनाच गैर वाटले असते .मी आतल्या आत कुढत होते .दृष्टीने स्पर्शाने एकदा जरी शिरीषचा अनुकूल  कल दिसला असता तरी मी बंड करून उठले असते . परंतु तो वेडा मला सख्खी बहिण समजत होता. कुणाच्याच काही लक्षात येत नव्हते .अशा परिस्थितीत मीच वेडी ठरत होते .ठरली असते .

माझे शिक्षण पुरे झाले .मी बँकेची परीक्षा दिली .बँकेत मला नोकरीही लागली .माझ्या लग्नाची बोलणी घरात सुरू झाली .मी प्रत्येक वेळी तूर्त नाही तूर्त नाही म्हणून सांगत होते .शिरीषला आम्ही सर्व दादा म्हणून हाक मारीत असू .पूर्वी दादा दादा म्हणून त्यांच्या मागे असणारी मी आता मात्र शिरीष म्हणून हाक मारीत असे .कुणाच्या तरी केव्हा तरी लक्षात येईल अशी मला आशा होती .शिरीषला तरी काही तरी जाणवेल असे मला वाटत होते.त्या आशेवर एक दिवस पाणी पडले .शिरीष एका देखण्या सावळ्या मुलीला घेऊन आमच्या घरी आला. बाबांना त्याने तिची प्रतिभा म्हणून ओळख करून दिली .त्याच्या मनातील गोष्ट सर्वांनाच कळली.तीही उच्च शिक्षित होती .तिच्यात नापसंत करण्यासारखे काहीही नव्हते .शिरीषच्या आईबाबांना विचारता त्यांनी बाबांना आता तुम्हीच त्याचे आई वडील तुम्हाला योग्य वाटेल तेच आम्हालाही योग्य म्हणून सांगितले .दोघांचे लग्न धूमधडाक्यात झाले .आमचा फ्लॅट मोठा होता .त्या दोघांनी आमच्या इथे राहावे असा आईचा आग्रह होता .तिला सून असल्याचा आनंद घ्यायचा होता.शिरीषलाही आपल्या घरी म्हणजे आमच्या इथेच राहायचे होते .तो हेच घर आपले घर असे समजत होता .

परंतु बाबांनी योग्य तो निर्णय घेतला . त्यांना त्यांचा संसार स्वतंत्रपणे करू दे असे आईला समजाविले .कितीही झाले तरी तो आपला मुलगा नाही .त्याला आपण दत्तकही घेतलेला नाही,आत्तापर्यंत ठीक होते,परंतु आता त्यांनी इथे राहणे योग्य दिसणार नाही .प्रतिभाच्या आईवडिलांना व कदाचित प्रतिभालाही ते रुचणार नाही.प्रतिभाच्या घरी म्हणजे आपल्या घरी  तिच्या आई वडिलांना मोकळेपणाने येता जाता येणार नाही.वगैरे गोष्टी सांगून त्यांनी दोघांनाही समजावले .जरी तो वेगळा राहिला तरी तो आपला आहे आणि आपलाच राहील म्हणून आईला समजावले .आमच्याच सोसायटीमध्ये एक फ्लॅट रिकामा झाला होता .तो विकत घेतला .तिथे शिरीषचा संसार सुरू झाला .शिरीषच्या लग्नात मी मन मारून वरवर हसरा चेहरा ठेवून भाग घेतला .

दिवसामागून दिवस जात होते .महिन्या मागून महिने जात होते .मी कामावर जात होते येत होते .वरवर हसून खेळून राहात होते .परिस्थितीचा मी स्वीकार केला होता .परंतु एक मन मात्र स्वीकार करायला तयार नव्हते .या आतल्या आत कुढत असण्याचा माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत होता.आईबाबानाही मला काय होत आहे ते कळत नव्हते .डॉक्टरही सर्व काही ठीक आहे असे सांगत होते .शेवटी एक दिवस मला उपाय सुचला .मुंबईची सर्द हवा मला सोसत नाही .कुठे तरी कोरड्या हवेत गेले पाहिजे असे मी आमच्या डॉक्टरांकडून वदवून घेतले .त्याप्रमाणे बदलीचा अर्ज दिला .

मी लग्न करीन ही आशा आता आई वडिलांनी जवळजवळ सोडून दिली आहे .संजनाने तिचे लग्न जुळविले .आई बाबांनी त्याला  संमती दिली .तिचे लग्न धूमधडाक्यात झाले. तिच्या लग्नात मी हौशीने सामील झाले .मी मोठी बहिण मी लग्न का करीत नाही अश्या सर्वांच्या अदृश्य बोचऱ्या नजरा मला जाणवत होत्या .लग्नामध्ये शिरीष व प्रतिभा दोघेही आनंदाने सामील झाले होते .बाबांचा मोठा मुलगा व सून म्हणून दोघांनीही त्यांची जबाबदारी पूर्णपणे उचलली होती .प्रतिभा ही फार चांगली मुलगी आहे .ती आई बाबांना सासू सासरे मानते .सणवाराला ती नेहमी आमच्याकडे असते .सर्व चांगले आहेत .सर्वांचेच छान चालले आहे .या सर्वात मीच एक वेडी आहे असे मला वाटत आहे .

आणि आता मी ही अशी एकटी येथे नागपुरात येऊन राहिले आहे .माझी आई केव्हा नागपूर तर केव्हा मुंबई अशी ये जा करीत असते .मला लग्न का करायचे नाही ते खोदून खोदून आई  विचारीत असते .मी तिच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही .तुझे एखाद्या परजातीतील परधर्मातील मुलावर प्रेम आहे का म्हणूनही मला आई बाबांनी विचारले. कदाचित  आमच्या मनाविरुद्ध  असले तरीही आनंदाने तुझे लग्न लावून देऊ म्हणून सांगितले .आम्ही आज आहो उद्या नाही .आयुष्य एकटीने काढणे कठीण आहे .तू लग्न कर असा त्यांचा आग्रह व प्रेमाचा  सल्ला आहे .मलाही त्यांचे म्हणणे पूर्णपणे पटते .

मला एखादा मुलगा  भेटेलही.तो माझ्यावर नितांत प्रेम करीलही .मलाही प्रेम म्हणून किंवा तडजोड म्हणून किंवा दोन्हीही दृष्टीने त्याच्याशी लग्न करावे असे वाटेलही .मी परिस्थितीचा स्वीकार केला आहे .मी कधीही लग्न करणार नाही अशी शपथ घेतलेली नाही .जरी मी भावनाप्रधान असले तरीही मी आत कुठे तरी प्रॅक्टिकल आहे .

आता अशी मी येथे एकटी अंतराळात दृष्टी लावून बसले अाहे.लग्न न करण्याचा माझा निर्णय योग्य की अयोग्य ते मला समजत नाही .मी बावरले आहे.मी गांगरले आहे .काय करावे तेच मला कळत नाही .भविष्याच्या पोटात काय दडले आहे समजत नाही .

१४/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel