गुरुजींनी शुभमंगल सावधान म्हटले आणि वर वधूने एकमेकांना हार  घातले.पंख्यावर ठेवलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा पंखा फिरू लागताच  वधूवरांवर वर्षाव झाला .दोघेही सोफ्यावर जाऊन बसले .त्यांचे शुभचिंतन व अभिनंदन करण्यासाठी नातेवाईक व मित्रमंडळी स्टेजवर आली .प्रज्ञा व प्रकाश सर्वांच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत होते .कुणाशी हस्तांदोलन,तर कुणाशी दोन कर जोडून नमस्ते,तर कुणाच्या पाया पडत होते.कुणा कुणाबरोबर फोटोसाठी उभे राहात होते .काही जणांबरोबर सेल्फी काढला जात होता .तीव्र प्रकाशाचे झोत व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सोडले होते.

प्रज्ञा व प्रकाश यांचा जोडा शोभून दिसतो असे मंडपातील सर्व मंडळी मनात किंवा केव्हा उघड म्हणत होती. हे सर्व यांत्रिकपणे चालू असताना प्रज्ञाला प्रकाशची भेट कशी झाली तेच आठवत होते .एखाद्या चित्रपटासारखा तो सर्व प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात होता .तिचे एक मन समारंभात गुंतले होते तरी दुसरे मन त्या प्रथम भेटीच्या प्रसंगात रमले होते.एखाद्या सिनेमात शोभून दिसेल असा तो थरारक प्रसंग होता .

त्यांच्या शहराजवळ एक मोठी नदी होती. पात्र रुंद व खोलही होते.त्यामध्ये एक छोटेसे बेट होते.त्यावर एक थ्री स्टार हॉटेल होते .एक ऑब्जर्व्हेशन  टॉवर होता .किनार्‍यावर  चार पाच किलोमीटरच्या अंतरात दोन स्विमिंग क्लब्स होते .क्लबमध्ये पार्किंग, मौल्यवान वस्तू कपडे वगैरे  ठेवण्यासाठी लॉकर्स ,आराम करण्यासाठी हॉल अशा सोयी होत्या .बैठे खेळ खेळण्यासाठी व टेबल टेनिस बॅडमिंटन अशा खेळांसाठी सुविधा होत्या .प्रत्येक क्लबमध्ये छोटेसे कॅन्टीनही होते.ज्यांना हवे असेल त्यांना सॉफ्ट किंवा हार्ड  ड्रिंकस् घेण्याची व्यवस्था होती .क्लबला जोडून जेटी होता .तिथे पायडल बोट मोटर बोट रोइंग बोट भाड्याने मिळत असे.किनाऱ्याला मजबूत कठडा केलेला होता . कठड्यांच्या बाजूला हिरवळ व फिरण्यासाठी पायवाटही तयार केलेली होती .शहरातून लोक दुचाकी स्वयंचलित दुचाकी चारचाकी यावरून संध्याकाळी किंवा सकाळी फिरण्यासाठी येत असत .काही हौशी मोटर बोट घेऊन किंवा पायडल बोट घेऊन नदीत सैर करीत असत.काही नदीत केवळ पोहण्यासाठी येत असत.क्लब मेंबर्स क्लबच्या खासगी जेटीवरून बोट घेऊन जात.

एक सार्वजनिक बोट क्लबही होता .तिथे कुणालाही बोट भाडय़ाने मिळत असे.मोटार बोटीवर तुम्हाला हवा असल्यास चालकही मिळत असे .नदी संथ असल्यामुळे पोहणे बोटींग हे सुरक्षित होते .त्याचप्रमाणे किनार्‍यांवरून बेटापर्यंत फेरी सर्व्हिसही होती.

या नदीवर वरच्या बाजूला एक मोठे धरण बांधलेले होते .जर धरणातून पाणी सोडले तरच त्या प्रमाणात पूर येत असे.पाणी सोडण्याअगोदर लोकांना कळविण्यात येत असे.अशा वेळी स्विमिंग बोटिंग हे बंद ठेवले जाई.दूरदूरच्या अंतरावरूनही शाळांच्या किंवा इतर ट्रिप्स येत असत .थोडक्यात हे एक प्रेक्षणीय स्थळ झाले होते.

धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाचे दरवाजे उघडत आणि  नदीला पूर येत असे.

प्रज्ञा पट्टीची स्वीमर होती.तिला मोटर बोटही चांगली चालविता येत असे .गेल्या वर्षी ती अशीच नदीकिनारी तिच्या दोन मैत्रिणींबरोबर बोटिंगसाठी आली होती .मोटर बोटीमध्ये बसणाऱ्यांच्या संख्येनुसार लाइफ जॅकेट्सही पुरवली जात .किंबहुना लाइफ जॅकेट्स पुरवणे सक्तीचे होते . ती क्लब  मेंबरही ही होती.दिवस पावसाळी होते .पावसाचे  चिन्ह कुठेही दिसत नव्हते.प्रज्ञा व तिच्या मैत्रिणी हसत खिदळत बोट घेऊन धरणाच्या दिशेने निघाल्या .धरण जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर होते .इथे जरी सर्व शांत वाटत असले तरी  धरणक्षेत्रात पाऊस जोरात  पडत होता .नदी किनार्‍यांवरच्या लोकांना सावधानतेचा संदेश देण्यात आला होता.परंतु संदेश यंत्रणेमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे संदेश वेळेवर  पोचू शकले नाहीत .संदेश यंत्रणेमधील दोष दूर होऊन जेव्हा संदेश सर्वांना पोचले त्यावेळी प्रज्ञा व तिच्या  मैत्रिणी बोट घेऊन गेल्या होत्या .त्यांना सावधानता इशारा करण्यासाठी परत फिरा काळजी घ्या असे   कळविण्यासाठी  मोबाइलवरून फोन करण्यात आले.परंतु ती व तिच्या मैत्रिणींना संदेश मिळू शकला नाही .त्या बिनधास्तपणे बोटिंग एन्जॉय करत होत्या .

एवढ्यात प्रज्ञाला समोरून मोठा पाण्याचा लोंढा येत असताना दिसला.तिने बोट उलटी फिरवली व शक्य तितक्या लवकर नदीतील बेटावर किंवा क्लबवर पोचण्यासाठी गती वाढविली.दुर्दैवाने बोटीचे इंजिन बंद पडले. आता किनाऱ्यावरही जाणे शक्य नव्हते .तिने मैत्रिणींना लाइफ जॅकेट्स चढवण्यास सांगितले .तिघीनीही लाइफ जॅकेट्स चढवले. प्रसंगाला तोंड देण्यास त्या तयार झाल्या.बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाट्टेल तशी हेलकावत सुसाट वेगाने निघाली.सुकाणू धरून बोट शक्य तेवढी नियंत्रणात ठेवणे एवढेच प्राप्त परिथिती शक्य होते.

नदीच्या प्रवाहात एक मोठा खडक होता .त्याची प्रज्ञाला कल्पना होती .प्रवाहाबरोबर बोट भेलकांडत त्या खडकाच्या दिशेने चालली होती .दुर्दैवाने प्रज्ञा खडक चुकवू शकली नाही .वेगाने बोट खडकावर आपटली . बोटीचे दोन तुकडे झाले .तिघीही आकाशात उडून पाण्यात पडल्या .आता प्रत्येकाने जमेल त्या मार्गाने आपला बचाव करायचा होता .पाण्याच्या वेगाबरोबर तिघीही  वाहात चालल्या होत्या.

प्रज्ञाने पोहत बेट गाठायचे असे ठरविले .परंतु पाण्याच्या वेगामुळे तिला ते शक्य झाले नाही .बेटाच्या किनाऱ्यावरील रेलिंगला ती पकडणार तेवढ्यात ती पाण्याबरोबर दूर  खेचली गेली . तिच्या मैत्रिणी त्याबाबतीत सुदैवी निघाल्या .रेलिंग पकडून त्या बेटावर जाऊ शकल्या .वेगवान राक्षसी ताकदीच्या प्रवाहाला आडवे पोहत जाऊन किनारा गाठणे मुष्कील होते.लाइफ जॅकेट असल्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊ न देणे व एखाद्या कठीण वस्तूंवर आपला कपाळमोक्ष होणार नाही हे पाहणे एवढेच तिच्या हातात होते .ती हेल्मेट घालीत असताना दुर्दैवाने ते तिच्या हातातून निसटून पाण्यात पडले होते.

एखादी पाण्याची लाट आपल्याला किनाऱ्यावर नेऊन सोडील अशी ती आशा करीत होती .प्रवाहाबरोबर वेगाने जाताना तिला तीनहि क्लब सार्वजनिक व खाजगी डाव्या बाजूला दिसले. तिने अगोदरच तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यात मी अयशस्वी झाली .आता केवळ दैवावर हवाला ठेवणे भाग होते .पोहतांना आणि पाण्यावर डोके ठेवताना तिची दमछाक झाली होती.तीनही क्लब संपल्यावर जॉगींग ट्रॅक रेलिंग आणि नंतर पुढे काहीही नव्हते.

या सर्वानंतर पुढे दोन किलोमीटरवर एक मोठा खड्डा होता .त्यात पाणी वेगाने फिरत असे.एकदा एखादा त्या भोवऱ्यात सापडला की तो तळात जात असे .भोवर्‍याच्या जवळपास आल्यावर भोवरा चुकविणे अशक्य असे .भोवरा तोडून पार करणेही शक्य नसे.या सगळ्याची प्रज्ञाला कल्पना होती .वाटेल ते करून किनारा गाठला पाहिजे हे तिला समजत होते .तिने दमछाक झालेली असतानाही शेवटचा प्रयत्न म्हणून जोरात किनार्‍याच्या दिशेने हात  मारायला सुरुवात केली .

स्विमिंग जॅकेट शक्यतो लाल रंगाचे असते .त्याचा हेतू दुरूनही कुणी तरी धोक्यात आहे व जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे हे  कुणालाही कळावे हा असतो. तिचे जॅकेटही लाल रंगाचे होते. 

जॉगिंग ट्रॅकच्या कडेला रेलिंगजवळ उभे राहून दोघेजण नदीला आलेला पूर पाहात होते .एवढ्यात त्यातील एकाला नदीतून कुणीतरी वहात आहे,  पोहत किनार्‍याकडे येण्याचा प्रयत्न करीत आहे ,असे लक्षात आले .तोही पट्टीचा पोहणारा होता .प्रक्षिप्त क्रिया म्हणून त्याने आपले कपडे काढण्याला सुरुवात केली.नदीत उडी मारून त्याला पोहणाऱ्या व्यक्तीला वाचवायचे होते.तो प्रकाश होता .त्याच्या मित्राने त्याला या वेडेपणा पासून वाचविण्याचा प्रयत्न केला . पाण्याच्या सुसाट  वेगवान प्रवाहात त्या व्यक्तीपर्यंत पोचणे जवळजवळ अशक्य आहे.संकटात असलेली व्यक्ती चांगली पोहणारी असावी .आपण किनार्‍यावरूनच त्या संकटात असलेल्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करूया . तेच जास्त शहाणपणाचे होईल .अशा पाण्यात उडी मारणे हे वेडेपणाचे आहे .ती आत्महत्या ठरेल .प्रकाशला चटकन परिस्थितीचे भान आले .त्याने इकडे तिकडे पाहण्याला सुरुवात केली .सुदैवाने त्याला कोणत्यातरी कामासाठी बागेत आणलेला एक भक्कम नायलॉनचा दोर मिळाला.तो त्याने रेलिंगला मजबूत बांधला . दुसरे टोक त्याने पक्क्या गाठीने कमरेला बांधले.पोहणारी व्यक्ती जवळपास येताच उडी मारण्याच्या पवित्र्यात तो उभा राहिला. 

जिवाच्या आकांताने प्रज्ञा  जोरजोरात हात मारीत होती .नाऊ अॉर नेव्हर ती आपल्या मनाला बजावीत होती.थोड्याच वेळात रेलिंग संपणार होते .नंतर आपल्याला कोणी वाचवायला येणे बिकट होते .येथून एखाद्या किलोमीटरवर तो जीवघेणा भोवरा होता .एवढ्यात तिला समोर रेलिंगजवळ कुणीतरी जोरात ओरडत आहे असा भास झाला .ती व्यक्ती बकअप बकअप, आणखी जोराने आणखी जोराने, प्रयत्न कर प्रयत्न कर ,थोडेच अंतर राहिले तू ते नक्की पोहून येशील म्हणून जोरजोराने ओरडत होती.

ते ओरडणे ऐकून प्रज्ञाला  उत्साह आला .जिवाच्या आकांताने ती हात मारू लागली.किनाऱ्यावरची व्यक्तीही जोरजोरात ओरडत होती .ती व्यक्ती तिला प्रोत्साहन देत होती.यू कॅन डू इट यू कॅन डू इट असे ओरडत होती. त्या ओरडण्यामुळे तिला ऊर्जा मिळत होती .ती पोहून किनार्‍याकडे येण्याचा प्रयत्न करीत होती.तर पाणी तिला किनाऱ्यापासून दूर खेचत होते.या रस्सीखेचीमध्ये तिला जिंकायचे होते. 

ती किनाऱ्याजवळ आल्याबरोबर त्या प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीने आपले अंग झोकून दिले.त्याने आपला हात तिला दिला . तिने तो हात पकडण्याचा प्रयत्न केला.पाच सहा इंचाच्या अंतराने ती हात पकडू शकली नाही.पुन्हा त्याने जोरात तिच्या दिशेने पोहण्याला सुरुवात केली.तीही त्याच्या दिशेने पोहू लागली. दोन तीनदा अशी चुकामूक झाल्यावर त्याच्या हातात तिचा हात आला .त्याने तिचे मनगट घट्ट पकडले .ओरडून किनार्‍यावरच्या त्याच्या मित्राला ओढण्याला सांगितले.शेवटी ती दोघेही किनार्‍यापर्यंत आली .प्रथम त्याने तिचा हात किनाऱ्यावरच्या मित्राकडे दिला .त्याने तिला वरती ओढून घेतले .पाठोपाठ तोही रेलिंग चढून पलीकडे आला.

पलीकडे आल्यावर तो पहातो तो काय ?अतिरिक्त श्रमाने व आनंदातिशयाने ती बेशुद्ध झाली होती .तिला त्याने त्याच्या मोटारीतून हॉस्पिटलमध्ये नेले .हॉस्पिटलमध्ये दहा पंधरा मिनिटात प्रज्ञा शुद्धीवर आली .समोरच तिला वाचविणारा तरुण चिंतायुक्त चेहऱ्याने उभा होता .प्रकाशने प्रज्ञाला तिच्या घरचा फोन नंबर विचारला.थोड्याच वेळात तिचे आई वडील आले.

तिचे आईवडील पाहताच तो चिंतामुक्त रिलॅक्स झाला .त्याने त्यांना ही तुमची ठेव स्वीकारा म्हणून सांगितले.

*तिचे वडील मनात तुम्हीच ही तुमची अमानत स्वीकारा असे बहुधा  म्हणाले असावेत.*

* पुढील गोष्टी पटापट होत गेल्या .तिला वाचविण्यासाठी पकडलेला हात त्याने आता पुन्हा कायमचा पकडला.*

२/५/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel