रसिका

त्या दिवशी त्याने गाडी सुरू करून दिल्यावर तो मला आता पुन्हा लवकर भेटेल असे वाटले नव्हते.तो भेटावा असे आतून वाटत होते.काल गडबडीत त्याचे नावही विचारायचे राहून गेले होते.एवढ्या मोठ्या शहरात तो पुन्हा केव्हा भेटेल ते सांगता येत नव्हते .आणि काय आश्चर्य दुसऱ्या दिवशी तो मला लगेच मॉलमध्ये भेटला .आता मात्र हा चान्स मी गमावणार नव्हते. तुम्हाला तशी मी थोडी आगाऊ वाटेन परंतू मी तशी मुळीच नाही.माझ्या जवळजवळ सर्व मैत्रिणीच आहेत .फार फार तर दोन तीन मित्र असतील.मुलांमध्ये मी मोकळेपणाने मिसळू शकत नाही असे माझ्या मैत्रिणींचे मत आहे . या मुलाशी मात्र बोलावे त्याची ओळख करून घ्यावी असे मला वाटत होते . काल तुमचे आभार मानायचे राहिले असे म्हणून मी त्याचे आभार मानले .खरेतर मी काल त्याचे आभार मानले होते.मला तो कदाचित आगाऊ समजला असेल .खुबीने त्याने माझे नावही विचारून घेतले . तीच खुबी वापरून मी त्याचे नावही माहीत करून घेतले .तेव्हाच माझ्या लक्षात आले की मी त्याला आवडले आहे .त्याने माझा आगाऊपणा गोड मानून घेतला आहे .

मी माझ्या मैत्रिणीना सोडून त्याच्याकडे गेले होते .परत आल्यावर मला माझ्या मैत्रिणी कोण ग तो? कोण ग तो? म्हणून चिडवू लागल्या.मी त्यांना खरे काय ते न सांगता तुम्हाला काय करायचे आहे? म्हणून उडवा उडवीची उत्तरे दिली.त्यामुळे त्यांच्या व माझ्या संबंधांमध्ये  एक गूढ वातावरण निर्माण झाले . मैत्रिणींच्या चेहर्‍यावरील गोंधळ पाहून मला गंमत वाटत होती .

तो एमबीए होता .एका कॉर्पोरेट  कंपनीत चांगल्या उच्च पदावर काम करीत होता .त्याच्या जवळ स्कूटर,बुलेट, मोटरसायकल , मोटार तीनही प्रकारची वाहने होती .निरनिराळ्या गाड्यांचा त्याला शौक होता. तो चांगला संपन्न होता .त्याचे घराणेही सुसंस्कृत व खानदानी होते.त्याची ओळख झाल्यावर कोणत्याही प्रयत्नांशिवाय हळूहळू ही सर्व माहिती आपोआप मला माहिती झाली .  

आरोह

त्या दिवशी एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे आमची लगेच दुसर्‍या दिवशी भेट झाली .एवढेच नव्हे तर तिने खुबीने मी तिला आवडतो हेही सुचविले.मी युक्तीने तिचे नाव जाणून घेतले.तिनेही माझे नाव त्याच युक्तीने जाणून घेतले. तरीही अजून आम्हाला परस्परांचे फोन नंबर माहिती नव्हते.यानंतर(कायनात बहुधा पंधरा दिवस झोपलेली असावी!! ) जवळजवळ पंधरा दिवस मध्ये गेले .आमची भेट एका सिनेमागृहात झाली .नंतर मात्र आम्ही परस्परांचे फोननंबर तर जाणून घेतले. काहींना काही कारणाने वारंवार भेटत गेलो .हळूहळू आमची मैत्री दृढ होत गेली .माझ्या कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे रोजच भेटणे शक्य होत नसे.एकमेकांना भेटल्याशिवाय दोन चार दिवस मध्ये गेले तरी चैन पडत नाही असे होऊ लागले.फोन वर तर रोजच बोलणे होत असे. आमच्या दोघांचे नाते काय वळण घेणार हे आम्ही दोघांनी व आमच्या मित्र मैत्रिणीनी अगोदरच ओळखले होते.

रसिका

आरोहची भेट झाल्यापासून जीवनामध्ये जास्तच रस वाटू लागला होता.आम्ही वारंवार भेटत होतो .सर्व काही छान चालले होते आणि तो दिवस उजाडला. त्या दिवशी माझा आईवडिलांजवळ काहीतरी कारणावरून वादविवाद झाला होता .मी बरीच डिस्टर्बड् होते .त्यात बोलता बोलता आमचा कशावरूनतरी मतभेद झाला.मी त्याला काही तरी बोलले .मी वड्याचे तेल वांग्यावर काढले. तो मला काहीतरी बोलला .आरोह म्हणाला तू कमालीची हट्टी व आग्रही आहेस.तू आपल्या बोलण्यापासून कधीही एक पाऊलही मागे घेण्यास तयार नसतेस .जशी माँ तशी बेटी.माझ्या आईला हट्टी व दुराग्रही म्हटल्याबद्दल मला प्रचंड राग आला.नंतर मग दोघांचेही मी मी तू तू झाले.रागाने आम्ही आंधळे झालो होतो .बरे झाले,अगोदरच तू कसा आहेस ते कळले नाहीतर मी मागाहून पस्तावले असते .इत्यादी बोलून पुन्हा मी तुझे तोंडही पाहणार नाही इथपर्यंत आमची भांडणाची गाडी गेली .खरे म्हणजे असे अद्वातद्वा बोलणे माझ्या स्वभावात नाही परंतु  त्या दिवशी मला काय झाले  होते कुणास ठाऊक ?

आता सर्व काही आठवले की वाईट वाटते आणि हसूही येते.आपण माणसं किती क्षुल्लक कारणावरून एकदम हमरीतुमरीवर येतो .खरेच इतके टोकाला जाणे योग्य असते का ?मी जर त्याच्याकडे जातें आणि माझे चुकले असे म्हटले असते तर काय बिघडले असते?पण मनात असा विचार येतो की हे तोही करू शकला असता ?हा "मी" हा "अहंकार" किती माणसांना किती दूर करतो. काही सांगता येत नाही .थोडक्यात आम्ही दोघेही प्रथम त्याने माघार घेतली पाहिजे या मुद्द्यावर अडून बसलो .आय लव्ह यू" "मी चुकलो" "मीचुकले" केवळ पाच शब्द परंतु ते आपण अहंकारापायी उच्चारत नाही .कोणी नमते घ्यावे हा काय मुद्दा झाला?त्याला फोन करावा म्हणून मी कितीदा फोन हातात घेतला व नंतर ठेवून दिला. 

या गोष्टीला आज एक महिना होत आहे .अजून सर्व काही जैसे थे आहे जितकी मी मनातल्या मनात तडफडत आहे  तितकाच तोही तडफडत असेल. दोघेही घायाळ झाले आहोत.दिवस जसे जात आहेत तसा पॉइंट ऑफ नो रिटर्न जवळ येत आहे .रोज अहंकाराला आणखी एक पीळ पडत आहे .

आरोह 

विचारमग्न खिन्न उदास अवस्थेत मी समुद्रकिनारी बसलेला असताना ,एकाएकी मला आरडा ओरड ऐकू आली .एक दहा बारा वर्षांची मुलगी वाळूत उताणी पडून किंकाळ्या मारीत होती .मी धावत तिच्या जवळ गेलो .ती पाय झाडीत होती .तिच्या पायात कसला तरी लोखंडाचा तुकडा घुसलेला दिसत होता .पायातून जोरात रक्तस्राव सुरू होता .असाच रक्तस्राव सुरू राहाता तर ती मुलगी बेशुद्ध झाली असती .मी वाळूत बसलो .तिचा पाय हातात घेतला .पावलाकडे जाणार्‍या  मुख्य शुद्ध रक्तवाहिनीवर जोरात दाब दिला.रक्त लगेच थांबले . बघ्यांपैकी एकाला माझ्या खिशातील रुमाल काढून तो पोटरीवर  घट्ट बांधण्यास सांगितला.एवढय़ात तिची आई धावत आली .कुणीतरी काही अपघात झाला तर लगेच उपचार व्हावेत म्हणून समुद्र किनाऱ्यावर कायमच्या असलेल्या एका अॅम्ब्युलन्सला बोलावले .तिची आई ती मुलगी व मी हॉस्पिटलमध्ये गेलो .डॉक्टरनी छोटेसे ऑपरेशन करून तो पायात घुसलेला तुकडा बाहेर काढला.ड्रेसिंग झाल्यानंतर थोड्या वेळाने ती मुलगी  शुद्धीवर आली .

मी तिच्या आईचे सांत्वन करीत होतो .तीन चार दिवसांसाठी नेहमीच्या रुटीनमध्ये विरंगुळा बदल म्हणून त्यांचे कुटुंब या समुद्रकिनाऱ्यावर आले होते .वाळूत धावताना हा लोखंडाचा तुकडा त्या मुलीच्या पायात घुसला होता.एवढ्यात कुणीतरी माझ्या मागून धावत आले आणि काकू काकू काय झाले म्हणून तिच्या आईला विचारू लागले .

आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी तिच्याकडे निरखून पाहिले .जरी ती पाठमोरी असली तरी ती रसिकाच आहे हे मी लगेच ओळखले.हे नसते तर आज बिकट प्रसंग होता . यांनी प्रसंगावधानाने रक्तस्राव  थांबविला व मला सर्व प्रकारची मदत केली . जखमी मुलीच्या आईने माझी रसिकाशी ओळख करून दिली . 

रसिकाने मागे वळून मान वर करून पाहिले.

* तो मीच आहे हे पाहताच प्रथम आश्चर्य ,नंतर हरवलेले गवसल्याच्या आनंद तिच्या डोळ्यात उमटला.  प्रेमळ,अभिमानाचे, भाव उमटले.*

* नंतर तिच्या चेहऱ्यावर मी चुकले मला क्षमा कर असा भाव आला.*

*  माझ्या चेहऱ्यावरही मी चुकलो मला क्षमा कर  असा भाव उमटलेला असावा.ती भेटल्यामुळे, तिने क्षमा कर असे न बोलता सांगितल्यामुळे,तिने क्षमा केल्यामुळे माझा आनंद गगनात मावत नव्हता   *

~~~

*दोघांनी एकमेकांना  क्षमा केली, असे मनातल्या मनात म्हटले. ते न उच्चारलेले शब्द स्पष्टपणे दोघांनाही ऐकू आले* 

*खऱ्या प्रेमात संदेशवहन शब्दाविना होते.*

(समाप्त )

२०/५/२०१९ ©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel