(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. ) 

त्या प्रतिष्ठित,मान्यवर, प्रचंड खपाच्या, वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी  फोटो सहित पुढील बातमी छापून आली .

आम्हाला काल पुढीलप्रमाणे पत्र मिळाले .पत्र पाठविणाऱ्याने  त्याचे नाव दिलेले नाही .

"अभिनेत्री रचना अत्यन्त उद्धट होती.प्रसिद्धीची हवा तिच्या डोक्यात गेली होती.स्वतःच्या सौंदर्याचा तिला गर्व झाला होता .तिच्या गर्विष्ठपणाची मला चीड आली. तिला शिक्षा होणे आवश्यक होते .मी तिला मृत्यूदंड दिला .तिच्या शरीराची विटंबना झालेली मला पाहायची होती .तुम्ही मला मनोरुग्ण म्हणा, वेडा म्हणा, किंवा क्रूर म्हणा, मला त्याचे देणे घेणे नाही.मी केले ते योग्य केले असे मला वाटते .मी तिचे शिर कापले.

त्याचा फोटो सोबत जोडत आहे .ती पोलिसांत जाणार होती .त्यामुळे मला तिला ठार मारणे आवश्यक होते .मला तिला नुसते ठार मारायचे नव्हते .मला सूडाचे समाधान हवे होते .म्हणून मी तिचे निरनिराळे अवयव वेगळे केले आहेत .रोज त्याचा एक फोटो आपल्याला पाठविला जाईल .आपण तो वर्तमानपत्रात प्रसिद्ध करालच."

~सोबत रचनाच्या डोक्याचा फोटो जोडला होता.~       

त्या फोटोमुळे व बातमीमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली.

बातमीत पुढे लिहिले होते .आम्हाला मिळालेल्या पत्राचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते .

मासिकातील अक्षरे कापून ती एका कोऱ्या कागदावर चिकटवण्यात आली होती.तसे करण्याचा हेतू कुणी पत्र पाठविले त्याचा मागमूस लागू नये हा होता .फोन केला असता तर तो कुठून केला याचा पत्ता लागू शकला असता .हस्ताक्षरातील पत्राचे हस्ताक्षर अर्थातच ओळखता येऊ शकते .पत्र टाइप केले तर ते कुठे टाइप केले ते तज्ज्ञ ओळखू शकतात .पत्र पोस्टानेही पाठविले नव्हते कारण एकच, कुठून पत्र आले त्याचा काहीही मागमूस लागू नये.पत्र त्या वर्तमानपत्राच्या बाहेर ठेवलेल्या लेटर बॉक्समध्ये टाकले होते.  

थोडक्यात पत्र पाठविणाऱ्याने त्याच्यापर्यंत पोलीस पोचू नयेत यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. 

ते पत्र व तो फोटो पाहून संपादक मंडळ हादरले होते.कोणीतरी आपली गंमत केली असावी असाही त्याना संशय आला .

त्या पत्रासह तो फोटो  पेपरमध्ये छापण्यात आला होता . तो फोटो व ती बातमी वाचून सिनेजगत हादरले .सिनेजगतच काय तर सर्व समाजमाध्यमामध्ये खळबळ उडाली.

.हा फोटो खोटा आहे .संगणकावर तो तयार करण्यात आला आहे .असे फोटो व अश्या बातम्या प्रसिद्ध करून निष्कारण समाजामध्ये भीती निर्माण करण्यात येत आहे अश्याही प्रतिक्रिया उमटल्या .

सर्वजण रचना कुठे आहे त्याचा तपास करू लागले.तिचा तपास लागत नव्हता .ती जणू काही हवेत अदृश्य झाली होती .

त्याच दिवशी एका पोलिस स्टेशनसमोर खोक्यात तिचे कापलेले शिर सापडले .लेखकाने सनसनाटी निर्माण करण्यासाठी पत्र लिहिले नव्हते .त्याने खरेच तिचा खून केला होता. परंतु  ही बातमी सार्वत्रिक व्हायला उशीर झाला .ही बातमी प्रसृत झाली आणि खोटा फोटो , संगणकावर तयार केलेला फोटो,वृथा निर्माण करण्यात आलेली भीती , इत्यादी वल्गना हवेत विरल्या .

सर्वत्र हाहा:कार उडाला. सरकार काय करीत आहे? पोलिस काय करीत आहेत? आजकाल कुणालाही आपल्या जिवाची शाश्वती राहिली नाही.राज्य सरकारचे नाही, तर गुंडांचे आहे .अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सर्व समाज माध्यमांमध्ये उमटल्या 

तो फोटो खोटा नव्हता .ते पत्र खरेच कुणीतरी नराधमाने पाठविले होते .त्याला रचनावर कोणता सूड उगवावयाचा होता ते तो नराधमच जाणे .

तोच फोटो रचनाच्या अकाऊंटवर फेसबुक व  इन्स्टाग्रामवर त्याच दिवशी टाकण्यात आला .

दुसऱ्या दिवसापासून अशी एक मालिकाच सुरू झाली .कधी केवळ तळवा, कधी केवळ हात, कधी केवळ पाऊल, कधी केवळ पाय,कधी केवळ धड ,अश्या  निरनिराळ्या अवयवांचा फोटो त्या वर्तमानपत्राला पाठण्यात येत असे .

त्याच वेळी  कोणत्यातरी पोलिस स्टेशनसमोर  तो अवयव ठेवलेला खोका ठेवण्यात येई.प्रत्येक वेळी निराळे पोलिस स्टेशन निवडण्यात येई.

प्रत्येक पोलिस स्टेशन बाहेर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले होतेच .त्या वर्तमानपत्राच्या लेटरबॉक्सवरही सीसीटीव्ही होताच.सीसीटीव्ही फुटेज काळजीपूर्वक तपासण्यात आले .अनेक जण वर्तमानपत्राच्या कचेरीत येत जात असत .अनेक लोक लेटर बॉक्समध्ये पत्र टाकीत असत .त्यातील कुणी पत्र टाकले हे ओळखणे एक मोठे किचकट काम होते.

ज्या ज्या पोलिस स्टेशनसमोर ही खोकी ठेवण्यात आली तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. 

संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली असूनही त्यांना त्या माणसाचा शोध घेता आला नाही.

पत्र टाकणारा वेषांतरात पटाईत असावा. तो स्वतःला पोलिसांपासून लपवण्यात यशस्वी होत होता.

वर्तमानपत्राच्या  लेटर बॉक्समध्ये फोटो , नंतर कोणत्या तरी पोलिस स्टेशनसमोर अवयव असलेले खोके आणि त्याच दिवशी फेसबुक व इन्स्टाग्रामवर तोच फोटो .अशी ही मालिका आठ दहा दिवस चालली होती .

सेक्रेटरी वसंत व त्याचप्रमाणे रचनाच्या मित्रमंडळींवर कडक लक्ष ठेवण्यात येत होते.कुठेही काहीही धागादोरा मिळत नव्हता .रचनाचा ज्या ज्या व्यक्तींशी संबंध आला होता त्या सर्वांची तपासणी काटेकोरपणे करण्यात आली .त्या सर्वांचा त्या आठ दहा दिवसांतील प्रत्येक मिनिटाचा हिशोब पाहण्यात आला .

तो नराधम शोधण्यात पोलिस अयशस्वी ठरले .

दहा दिवसांनी अर्थातच फोटो येण्याचे पूर्णपणे थांबले . 

फोटो येणे थांबले तरी पोलिस तपास चालूच होता .

असाच एक महिना गेला.रचना केसमध्ये काहीच प्रगती झाली नव्हती .

आणि एक नवीनच मालिका पुनः सुरू झाली .

ज्याप्रमाणे रचनाचे निरनिराळ्या अवयवांचे फोटो व अवयव पाठविले जात होते त्याच स्टाइलमध्ये एका अज्ञात इसमाच्या अवयवाचे फोटो त्याच प्रथितयश वर्तमानपत्राला पाठविण्यात येऊ लागले व त्याच दिवशी तोच अवयव  निरनिराळया पोलिस स्टेशन समोर ठेवण्यात येत होता. त्याच दिवशी  तोच फोटो फेसबुक व इन्स्टाग्रामवरही टाकला जात होता .

हा उपद्व्याप कोण करीत आहे त्याचाही छडा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला .

पोलिस स्टेशन्स व वर्तमानपत्र या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासता एक आश्चर्यकारक गोष्ट आढळून आली .

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पत्र हवेतून तरंगत येताना दिसे .आणि ते कुणीतरी लेटर बॉक्समध्ये टाकीत असे . त्या व्यक्तीचा फोटो सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत नसे .त्याचप्रमाणे अज्ञात इसमाचा अवयव असलेला खोका हवेतून तरंगत येताना दिसे आणि तो पोलिस स्टेशनसमोर ठेवला जाई .

कुणी तरी अदृश्य व्यक्ती हा सर्व उपद्व्याप करीत आहे एवढेच लक्षात येत असे .

ज्याचे अवयव निरनिराळया  पोलीस  स्टेशनसमोर ठेवण्यात आले त्याची ओळख पटली .तो रचनाचा, ती प्रसिद्धीच्या झोतात येण्यापूर्वीचा तिचा मित्र होता .पोलीस तपासात तो मित्र लक्षात आला नव्हता .नाहीतर पोलिस त्याला त्याच वेळी पकडण्यात यशस्वी झाले असते .

त्याच्या अवयवाचा शेवटचा फोटो जेव्हा पाठविण्यात आला तेव्हा  त्यासोबत एक पत्रही होते . 

ते पत्र पुढीलप्रमाणे होते .

~हा माझा कित्येक वर्षे घनिष्ठ मित्र होता .पुढे पुढे मला त्याचा त्रास होऊ लागला .माझ्या ओळखीचा मैत्रीचा तो गैरफायदा घेऊ लागला .मी त्याच्याशी लग्न करावे असा त्याचा आग्रह होता.मी त्याच्याशी लग्न करण्याला तयार नव्हते.हल्ली त्याची अरेरावी मला आवडत नाहीशी झाली होती. तोच माझ्या मनातून उतरला होता .मला माझे करिअर महत्त्वाचे वाटत होते .एक दिवस त्याने मला अंतिम भेटीसाठी एका बागेत बोलावले .हे प्रकरण मिटवावे म्हणून मी तिथे गेले.मी तिथे जाऊन घोडचूक केली . तिथे त्याने क्लोरोफॉर्म वापरून मला बेशुद्ध केले.त्याच्या मोटारीतून मला अज्ञात स्थळी नेले .तेथे गेल्यावर त्याने मला तू माझ्याशी लग्न करशील का म्हणून शेवटचे विचारले .मी नाही म्हणताच तो माझ्यावर चार दिवस अत्याचार करीत होता .शेवटी त्याने  माझा गळा दाबून खून केला .

पुढील सर्व हकीकत तुम्हाला माहित आहेच .

मलाही त्याचा सूड घेतल्याशिवाय मरणोत्तर स्वस्थ बसणे शक्य नव्हते .किंबहुना  सूडाच्या भावनेने झपाटलेली मी, त्याच्यापासून लांब जाऊ शकत नव्हते.

मला सूड घेण्याची इच्छा होती. सूड घेण्याची शक्ती प्राप्त होण्यासाठी मला एक महिना लागला .

जशास तसे या न्यायाने त्याने मला जसे मारले तसेच मी त्याला मारले .त्याप्रमाणेच अवयव कापून त्याचे फोटो व प्रत्यक्ष अवयव पाठविले . 

माझा सूड पूर्ण झाला आहे .

रचना

(समाप्त)

६/३/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel