सुभाषची बदली नुकतीच या गावाला झाली होती .तो तलाठी म्हणून काम करीत असे .दर दोनतीन वर्षांनी त्याची बदली होत असे .त्याचे आई वडील निवृत्त झाल्यामुळे तेही त्याच्या बरोबर बदलीच्या गावी येत असत .पत्नी दोन मुले एक भाऊ एक बहीण अशी सर्वच त्याच्याबरोबर असत .त्याचा कबिला मोठा असल्यामुळे त्याला नेहमीच मोठ्या जागेची गरज पडे.बदली झाली की प्रथम बदलीच्या गावी जाऊन तो जागा निश्चित करून येत असे .नंतर मग तो सर्व फॅमिलीसकट तिथे जाई.तलाठी असल्यामुळे आणि नेहमी खेडय़ावर बदली होत असल्यामुळे त्याला कधी जागेची टंचाई भासत नसे .तलाठय़ाकडे लहान मोठी कामे खेडेगावातील लोकांची नेहमीच असतात .खेडेगावातील लोक काही ना काही कारणाने शहरात गेले असल्यामुळे घरे रिकामी असतात.त्यातील एखादे घर सहज मिळून जात असे. त्यासाठी बहुधा भाडेही द्यावे लागत नसे. घराची देखभाल झाडझूड साफसफाई होत आहे यावरच मालक खूष असे. शिवाय तलाठी आपल्या घरात राहत आहे यामुळे जमिनीसंबंधी कामेही चटकन होतात हा आणखी एक फायदा असे.

यावेळी सुभाषची बदली अशा गावात झाली होती की जिथे अजून वीज आली नव्हती .या गावात त्याला मनासारखे घर पटकन मिळत नव्हते. त्याचे कुटुंब मोठे असल्यामुळे त्याला स्वाभाविक मोठे घर लागत असे. आतापर्यंत नेहमीच मोठ्या जागेत राहिला असल्यामुळे तो नेहमी मोठी जागा शोधित असे.शेवटी एक मनासारखी जागा त्याला मिळाली .ही जागा गावापासून थोडी दूर होती. याशिवाय या जागेत नाव ठेवण्यासारखे काही नव्हते.ज्याच्याकडे या घराची देखभाल करण्याचे काम मालकाने सोपविले होते त्याने सुभाषला मुंबईला जावून मालकांना भेट .तसा त्यांच्याशी मी बोललो आहे असे सांगितले .सुभाष मुंबईला जावून मालकांना भेटून आला .आणि पुढच्याच आठवड्यात सुभाष सर्व कुटुंबासह त्या घरात येऊन राहिला .त्याने त्याचे ऑफिस त्याच्या घरातच ठेवले होते .नेहमी साधारण तो तसेच करीत असे.

शाळा गावातच असल्यामुळे मुलांना फारसे दूर जावे लागत नसे खेडेगावच्या वातावरणाला नेहमी खेडेगावात राहिल्यामुळे सर्वजण सरावलेले होते.काही दिवस तसेच गेले .आणि एक दिवस त्यांना अंगणातच एक साप जाताना दिसला .साप दिसला की सगळे त्याला घाबरतात .सापाचे व माणसाचे काय वाकडे आहे काय माहित?साप दिसला की मनुष्य घाबरतो दचकतो आणि त्याला मारण्याचाही प्रयत्न करतो. या सापाला बघितल्यावरही तशीच सर्वांची प्रतिक्रिया झाली.अर्थात खेडेगावात नेहमीच राहिल्यामुळे साप दिसणे आणि त्याला मारणे ही काही नवलाईची गोष्ट नव्हती . काठी शोधेपर्यंत साप गडग्यात (धक्क्यात) दिसत नाहिसा झाला होता.  

आता सर्वच सावध झाले होते .काठी शोधून चटकन सापडेल अशा ठिकाणी ठेवण्यात आली .अडचणीची जागा असली तर काठीचा फटका बरोबर बसणार नाही म्हणून वेताची छडी चटकन सापडेल अशी ठेवण्यात आली  .ती लवचिक असल्यामुळे फटका बरोबर वर्मी बसतो .एक दोन दिवस असेच गेले  नंतर पुन्हा एकदा तो किंवा दुसरा साप दिसला.सर्व जण तयारच होते .त्याला ठार मारण्यात आले.सर्वांनी सुस्कारा सोडला .आता आपण सुटलो अशी सर्वांची कल्पना होती .

जेव्हा आपण साप असे म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त सरपटणारा प्राणी दिसत असतो.प्रत्यक्षात अनेक प्रकारचे साप असतात .काही विषारी असतात तर काही बिनविषारी असतात .फुरसे मण्यार सर्पटोळ कांडर नाग असे विषारी सापांचे अनेक प्रकार असतात .आधेली दुतोंडे असे काही बिनविषारी असतात. सुभाष व घरची मंडळी आता बिनधास्त झाली होती . पण हा विश्वास काही काळापुरताच होता .आता जवळजवळ रोज एखादा साप दिसू लागला .त्यातले काही मारता येत होते तर काही मारता येत नव्हते .जणू काही आदल्या दिवशी मारून फेकून दिलेला साप पुन्हा जिवंत होऊन येत आहे असे वाटत होते . दिवसा उघड्यावर साप दिसला तर त्याला मारता येत असे.घरात साप निघाल्यास तो मारता येणे मोठे कठीण असे .घरातील सामानामागे तो कुठेही लपून बसत असे .जरी तो दिसला तरी त्यावर काठी मारता येत नसे.घरातून साप बाहेर गेला की नाही हेही नक्की कळत नसे .अशा वेळी घरात राहणे फिरणे कठीण होत असे .सर्वजण दहशतीखाली रहात असत .

सुभाषने दुसरीकडे जागा बघण्याचा प्रयत्न केला .मनासारखी जागा मिळत नव्हती .मिळाली तरी तिथे साप निघणार नाही याची खात्री नव्हती .गावात चौकशी करता केव्हा तरी साप दिसतात निघतात असे सांगण्यात आले .त्यामुळे जागा बदलण्यात विशेष तथ्य नाही असे  ठरविण्यात आले.जागा मिळत नव्हती हे तर झालेच .शेवटी आहे त्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यावे असे ठरविण्यात आले .

प्रथम दोन तीन मोठे टॉर्च आणण्यात आले .रात्री किंवा दिवसा अडचणीच्या जागी लपलेला साप दिसावा हा त्यामागे हेतू होता .वेताच्या लवचिक चार पाच काठ्या आणण्यात आल्या.सहज हाताला येतील अशा ठिकाणी त्या प्रत्येक खोलीत ठेवण्यात आला.लोहाराकडून एक पंजा तयार करण्यात आला .त्रिशुळाला तीन दात असतात तर पंजाला पाच.कुठेही साप दिसला की प्रथम त्यावर पंजा मारण्यात येई.पंजाचा एखादा दात जरी सापांमध्ये घुसला तरी त्याला नंतर पळता येत नसे .मग काठीने त्याला सहज मारता येई .चालताना पायाखाली नीट बघून चालावे लागे.साप सहसा उघड्यावर थांबत नाही .कडेला अडचणीच्या जागी त्याला सुरक्षित वाटते.पाट,कपाट,पेटी, कणगी, स्वयंपाकघरात उभी केलेली भांडी, अशाच्या मागे जाऊन साप लपतो .तिथून त्याला हुसकून बाहेर काढणे आणि मारणे फार कठीण असते .अशा परिस्थितीत पंजा त्रिशूळ याचा फार उपयोग होतो . पंजा किंवा त्रिशूळ मारल्यावर त्याचा दात सापांमध्ये अडकल्यानंतर त्याला अडचणीच्या जागेतून ओढून बाहेर काढणे सहज शक्य होते.

प्रथम बिचकत घाबरत असलेली मंडळी आता चांगली धीट झाली. पूर्वी साप मारण्यासाठी दोन तीन जण लागत.आता एक जण डाव्या हाताने पंजा मारून उजव्या हातातील काठीने सापाला मारू शकत असे .दिवस असो रात्र असो घरात लहान मुले असो किंवा म्हातारी माणसे असोत सर्वजण साप मारण्यात कुशल झाले.सर्वांना भीती एकच होती की जर एखादे विषारी जनावर कुणाला चावले तर काय करावे .स्थानिक डॉक्टर किंवा सरकारी आरोग्य योजना यांच्याकडे विषावर प्रभावी औषध शिल्लक  असेलच असे नाही .शहर लांब होते .

एकदा सुभाषकडे त्याच्या मावशी काही दिवस राहण्यासाठी आल्या होत्या.त्या म्हणाल्या ज्याअर्थी इतके साप सतत निघत आहेत त्याअर्थी  हा काहीतरी भुताटकीचा प्रकार असला पाहिजे. एखाद्या जाणकाराला विचारून पहा. त्याप्रमाणेही प्रयत्न करून पाहण्यात आले परंतु काहीही उपयोग झाला नाही. एकाने सल्ला दिला की अमावस्येला तुम्ही दहीभात  आणि नारळ जवळच्या वडाच्या झाडाखाली ठेवून पाहा.त्याचाही काही उपयोग झाला नाही.सर्व प्रकारचे साप निघतच राहिले .जवळच्या शेजाऱ्यांना  विचारून पाहिले .तुमच्याकडे साप निघतात का ?त्यांच्या बोलण्यात आले की हो हे कोकणच आहे इथे साप निघतात परंतु क्वचित केव्हातरी एखादा साप निघतो .तुमच्या इथे फारच साप निघतात. जवळचा शेजार अर्धा किलोमीटरवर होता.शेजारी व एकूणच गावात तुरळक साप निघतात आणि इथे मात्र पुष्कळ साप निघतात याचे कारण कुणाच्या लक्षात येत नव्हते .कदाचित  या जागेची रचनाच अशी असली पाहिजे की इथे सापाना निवास करणे सोईस्कर पडावे.जमीन भुसभूशीत असेल .बिळे करणे सोपे जात असेल .सापांना त्यांचे खाद्य बेडूक उंदीर सहज उपलब्ध होत असेल .कारण काहीही असो रोज इथे एखादा साप निघत होता एवढे मात्र खरे .

घरातील सर्वांना आता सापाची सवय झाली होती .साप म्हटल्यावर कुणीही आता दचकत नसे.पंजा काठी वगैरे घेऊन त्याला ठार मारण्यात येई.

अशी दोन वर्षे गेली .सुभाषने जागा बदलण्याचा आटोकाट प्रयत्न केला .परंतु प्रयत्न करूनही त्याला जागा मिळू शकली नाही .निरनिराळ्या प्रकारचे इतके साप निघत असत की आश्चर्य  वाटे .जनमेजयाने सर्पयज्ञ केल्याचे वाचलेले सुभाषलाआठवत होते.असाच यज्ञ आपल्या हातून होत आहे की काय असे सुभाषला वाटू लागले.

अशीच दोन वर्षे गेली .तोपर्यंत सापासंबंधीची सगळ्यांची भीती गेली होती .वर म्हटल्याप्रमाणे शेजारच्या घरातून साप दिसण्याचे  प्रमाण अल्प असे.याच घरावर साप एवढे मेहरबान का होते ते कळले नाही .सुभाषची बदली झाली .नवीन गावी जाऊन सुभाषने घराची तजवीज केली .आणि एक दिवस सर्वजण सामानाची बांधाबांध करून घर सोडून निघून गेले .

दोन वर्षांमध्ये जवळजवळ पाचशे सहाशे साप मारून सुद्धा घरातील कुणालाही साप चावला नाही हे एक आश्चर्यच.

बहुधा या घरात राहणाऱ्यांवर परमेश्वराचे छत्र असावे.किंवा सुभाषच्या कुटुंबियांवर परमेश्वराचा वरदहस्त असावा.

(सत्यकथेवर आधारित )

२६/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel