दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर जाताना पोलीस स्टेशनला भेट दिली. सायन पोलिस स्टेशनचे वातावरण विचित्र अशा गोंगाटाने भरलेले होते, मला आत जाताना कोणीही पाहिले नाही आणि मी स्वतः एका अधिकाऱ्याकडे जाण्याचा मार्ग शोधला. खाकी वर्दीतले एक हवालदार श्री. डोळस समोरच्या डेस्कवर एक मोठं रजिस्टर घेऊन बसले होते
“सर,” मी माझा घसा खाकरत म्हणालो, “मला काल रस्त्यावर एक मुलगा सापडला. मला त्याला त्याच्या आई वडिलां सोबत एकत्र बघायला आवडेल."
"तो आता कुठे आहे?" सौहार्दाचा आव न आणता डोळस म्हणाले.
"तो आता माझ्या घरी आहे, माझी पत्नी त्याची काळजी घेत आहे."
मला वाटते की पोलीस अधिकारी एका दिवसात इतक्या गुन्हेगारांना सामोरे जातात की ते गुन्हेगार श्रेणीत न येणाऱ्या लोकांना ते चटकन ओळखू शकत नाहीत.नंतर माझ्या किरकोळ बुद्धीला सहज समजणार नाहीत अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी सुरु केली.
“तुम्ही त्याला आणयला हवे होते. हरवलेल्या मुलाला आम्ही पाहू शकलो नाही तर पुढे कारवाई काय करणार? आणि एक मिनिट आधीच बजावून ठेवतोय आमच्यापासून काही लपवू नका. मिस्टर...."
"सुदेश .....सुदेश चाकणकर आणि नाही सर, मी नक्कीच काही लपवत नाही! मी एलआयसीमध्ये नोकरीला आहे चर्चगेटला. आणि हो तो मुलगा पोलिसांना थोडा घाबरतो त्यामुळे तो यायला तयार नव्हता. ”
“तसं काही असेल असं वाटत नाही... पण तरी तुम्ही एक सभ्य गृहस्थ दिसता. आत्ता आम्ही कामाच्या राम रगाड्यात पुरते गुंतलो आहोत. आणि आज सकाळी सायन सर्कलवर उभ्या असलेल्या लक्झरी बसला एका टेम्पोने धडक दिली. मृतदेह शोधायचे त्यांच्या कुटुंबीयांशी ओळख पटवून द्यायची आमची तशी तारांबळ उडाली आहे आणि गणपतीपण जवळ आलेत त्यामुळे सिक्युरिटी टाईट केल्ये. स्टाफ शॉरटेज आहे तेव्हा मिस्टर...???”
“सुदेश .....सुदेश चाकणकर....सर मी नंतर येऊ का?”
मग त्यांनी क्षणभर विचार केला आणि मग ते उभे राहिले आणि त्यांच्या केबिनच्या वरच्या शेल्फमधून त्यांनी एक जाडजूड फाईल काढली. "चाकणकर, आमच्याकडे आलेल्या या सर्व मुलं हरवल्याच्या तक्रारी आहेत. पहा आणि मला सांगा की तुम्हाला तो मुलगा या फायलीत दिसतोय का."
असं म्हणत त्यांनी दरवाज्याजवळच्या एका लाकडी बाकाकडे इशारा केला. मी ती जाडजूड फाईल कडेवर घेऊन त्या बाकाकडे गेलो आणि त्यावर बसलो, ,माझ्याआधी त्या बाकावर एक इसम आधीच बसला होता जो नखशिखांत एक अस्सल बलात्कारी किंवा खुनी दिसत होता.
सर्व फोटो नीट पाहण्यासाठी मला पंधरा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला. ते सगळे मुले मुली असे निरनिराळे फोटो होते आणि गंमत म्हणजे ते या चित्रांमध्ये खूप गोड हसत होते, त्यांच्या डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची आशा दिसत होती. पण.... आता... बहुधा, भीक मागून उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे डोळे काढून टाकले असतील , हात, पाय तोडून टाकलेल्या शरीराने कोणत्याशा फुटपाथवर खितपत पडले असतील.
“तो ह्या फायलीत नाहीये," मी बघून पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्याला सांगितले.
फाईल परत घेताना अधिकाऱ्याने सांगितले, “अरेच्या..सापडायला हवा होता पण तुम्ही व्यवस्थित पाहिलत ना? या महिन्यात बरीच मुले हरवली आहेत. ”
हा प्रकार आणखी पंधरा वीस मिनिटे चालला आणि तक्रार नोंदवून घ्यायला त्यांची इच्छा नव्हती हि गोष्ट माझ्या लक्षात आली.
“आमच्या सगळ्या फायली भरल्या आहेत!” ते म्हणाले. “शहरात कितीतरी भटकी मुले आहेत! प्रत्येकाचा रेकॉर्ड ठेवायचा तर पोलीस स्टेशन बंद करून स्टेशनरीचं दुकान काढावं लागेल आम्हाला...”
पण, शेवटी त्यांनी मला आश्वासन दिलं. " तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे हरवलेल्या मुलाची तक्रार करण्यासाठी कोणी आले, तर आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ. तुमचा नाव,पत्ता आणि फोन नंबर इकडे लिहून ठेवा" असं म्हणून त्यांनी एक रजिस्टर पुढे सरकवलं.
"ते केव्हा होऊ शकते?" मी रजिस्टर हाती घेता घेता विचारले.
"ते मी कसं सांगू ?" असं म्हणून त्यांनी हात वर केले.
"आणि मग, तोपर्यंत?"
" तोपर्यंत ते जनावर आपल्या घरात ठेवा किंवा त्याला शाळेत घाला किंवा त्याला रस्त्यावर सोडून द्या आणि आशा करा कि तो पळून जाणार नाही. ठीक आहे?" आता हवालदार डोळस वैतागले आहेत हे मो लगेच ओळखले आणि तिकडून काढता पाय घेतला.