दिवसेंदिवस माझा शेंद्री बद्दलचा द्वेष वाढत गेला. एकेकाळी नुसत्या डोळ्यांनी मला भुरळ पाडणारा आणि नेहमी माझ्या आज्ञेत असणारा तो मुलगा आता उद्धट बनला होता. जर तो एखादा  पाळीव प्राणी असता, तर मी त्याला विचार न करता हाकलून लावले असते. पण ज्योत्स्ना आणि त्याच्यात एक नाते निर्माण झाले होते ते आड येत होते.

असे अनेक प्रसंग आले जेव्हा मला ते एकमेकांमध्ये खूपच रमलेले आणि एकमेकांच्या कानात अनेक गोष्टी कुजबुजताना आढळले, कदाचित तेव्हा त्यांना असे वाटत असेल की मला काही लक्षात येत नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी जरी काही पहिले नसले तरी माझ्या कानांनी ते ऐकले होते. ते दोघे मला काही कळत नाही असे त्यांना वाटत असल्याचे सोंग घेऊन बिनधोकपणे वावरत होते.

त्या मुलाचा शोध घेण्यासाठी कोणीतरी आले असावे या व्यर्थ आशेने मी अनेक वेळा पोलिस स्टेशनला भेटी दिल्या, परंतु तो अद्याप पर्यंत बेवारस होता. त्यांनी त्याला सरकारी अनाथालयात पाठवण्याची ऑफर मला दिली आणि त्या गोष्टीशी मी सहमत झालो पण ज्योत्स्नाला हा विचार पटला नाही.

जवळ जवळ महिनाभर अशाच पोलीस स्टेशनच्या वाऱ्या केल्यानंतर मी माझ्या मागे तेथील कर्माचारी वर्गाने केलेल्या घृणास्पद टिप्पण्या ऐकल्या आणि त्यात बरेच असे शब्द होते जे कोणत्याही सभ्य व्यक्तीने ऐकू सुद्धा नये . त्या सर्वां शब्दांत एक शब्द माझ्या मनात सतत बोचत राहिला तो  शब्द होता नपुसंक!! आणि  तेव्हाच मी ठरवले की मी पुन्हा तिकडे जाणार नाही. पोलीस स्टेशनच्या त्या शेवटच्या भेटीनंतर गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होऊ लागला.

त्या दिवशी संध्याकाळ होती. ज्योत्स्ना घरात नेहमीची कामे करत होती आणि मी ऑफिसातून येऊन सोफ्यावर बसलो होतो आणि माझे डोके पुस्तकात खुपसलेले होते. तो मुलगा खिडकीजवळ त्याच्या आवडत्या जागी बसला आणि वाढत्या अंधाराकडे बघत होता. तो तिथे काय पाहत होता हे मला काही  समजू शकले नाही, आणि मी सुद्धा त्याला कधी काही विचारले नाही कारण त्या वेळेस तरी किमान माझी पत्नी त्या मुलामागे संमोहित झालेली दिसत नव्हती.

तथापि, या विशिष्ट प्रसंगी  मी त्याच्या ओठातून एक आवाज बाहेर पडताना ऐकला. मी त्याचे ओठ हलताना पाहू शकलो नाही, परंतु काही शब्द होते जे हवेत दिशाहीन तरंगत होते, जणू कोणीतरी ते ऐकावे या आशेने!!

विचित्र होते. पण त्यावेळी  मला असे वाटले की ते शब्द ऐकून घेणारे कान तिकडे आहेत. मी ते फक्त पाहू शकलो नाही.

म्हणून मी जरा जवळ गेलो. तो मुलगा काय म्हणत होता ते मला ऐकायचे होते. किमान माझ्या मनातली शंका तरी दूर झाली असती जी माझ्या मनात नको नको त्या विचारांची वादळे निर्माण करत होती. आणि मग  जेव्हा मी त्याच्या हाताजवळ पोहोचलो तेव्हा मला काहीसे अस्पष्ट शब्द ऐकू आले

"मी ठीक आहे आई. हे लोक छान आहेत. ”

मग मी अचानक खिडकीकडे तोंड वळवले आणि कदाचित क्षणभर मला असे वाटले की एक सावली खिडकीबाहेर पडताना दिसली. त्याच क्षणी खिडकीच्या बाहेरच्या हवेत आंदोलने जाणवली, पण वाऱ्यामुळे होणाऱ्या खिडकीच्या चौकटीच्या खडखडाटात तो आवाज पटकन विरून गेला आणि तो मुलगा माझ्याकडे वळला.

मला क्षणभर वाटले की मी त्याच्याकडे पाहून त्याला प्रेमाने सांगावं,

“अच्छा, तर हि गम्मत तू आमच्यापासून लपवत आहेस! कि तुला आई आहे,"

पण मी काही बोलण्याआधी किंवा नीट विचार करण्याआधीच तो मुलगा मोठमोठ्याने रडू लागला.

आणि नाही, हे रडणे नव्हते जे साधारणपणे त्याच्या वयाची मुले करतात. ते खोटे होते  आणि त्यात एक कांगावा जाणवत होता. आणि त्यावेळी त्याचा ऑरा अशुभ वाटत होता हे नक्की. आणि त्या क्षणार्धात मला दिसले. डोळे! ज्या डोळ्यांनी मला पूर्वी भुरळ घातली होती, ते पूर्णपणे काळे झाले होते आणि मी टक लावून पाहत असताना त्याच्या पापण्या आधीपेक्षा लांब होत गेल्या.

आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य होते, ज्यात आनंद काही दिसत नव्हता. ते हास्य म्हणजे प्रचंड दुष्ट अभिभाव होता आणि मला लगेच लक्षात आले कि माझ्या घरात मी सैतान आणून ठेवला आहे.

मी सोफ्याला अडखळलो आणि गालिच्यावर खाली पडलो. आणि मग मला ज्योत्सना येताना दिसली .

" काय झालं इथे?" ती किंचाळली. "तू ठीक आहेस ना... शेंद्री?"

शेंद्री! शेंद्री!

मी इथे जमिनीवर पडलो होतो आणि तिला फक्त त्या लहान सैतानाची काळजी होती?

माझा मी उठून बसलो, माझ्या तोंडात  आले शब्द घशातच अडकले.

समोर साक्षात कृष्ण आणि यशोदा यांच्यातील ममतापूर्ण प्रसंग भासेल असे दृश्य माझ्या समोर होते. शेंद्री पुन्हा त्याच्या निरागस रुपात आला होता. ती त्याच्या ममतेत इतकी आंधळी झाली होती कि माझ्या डोक्यातून रक्त येत होते हे सुद्धा तिच्या लक्षात आले नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel