( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

रावसाहेब कुठेतरी आसपास असतील.त्यांच्या शक्ती अमर्याद असतील.ते ऐकतील, ते आणखी कठोर शिक्षा करतील, या भीतीखाली दोघेही राहत होती.

रावसाहेबांच्या मनात काय होते.त्यांच्या शक्ती कशा वाढत होत्या.ते कोणती शिक्षा करणार होते.ते भविष्यकाळातच कळणार होते.

दोघांच्याही जन्मभर लक्षात राहील अशी शिक्षा करण्याचे  रावसाहेबांच्या मनात होते .कोणती शिक्षा करावी अशा विचारात ते होते.मृत्यूपत्रामध्ये त्यांनी सर्व मालमत्ता कमलच्या नावे ठेवली होती.मृत्युपत्र तिजोरीतून व वकिलाकडील तिजोरीतून नाहीसे करावे.नंतर कमल इस्टेटीवर पूर्ण हक्क सांगू शकणार नाही.आपले दूरचे अनेक वारस आहेत.ते मालमत्तेच्या लोभाने  आपला वाटा मागतील.कोर्टात खटले कित्येक वर्षे पडून राहतील.कुणालाच कांही उपभोग घेता येणार नाही. अशी व्यवस्था करावी असा त्यांचा एक विचार होता.तिजोरीतील मृत्यूपत्र काढून घेणे व नष्ट करणे कठीण होते.हेही त्यांनी काहीतरी करून साध्य केले असते. 

इस्टेट मिळत नाही असे पाहिल्यावर परेशही कमलला सोडून जाईल.त्याच्या स्वभावानुसार कमलमधील त्याचा रस (इंट्रेस्ट)   कमी होईल.परंतु  ही शिक्षा पुरेशी आहे असे त्यांना स्वतःलाच वाटत नव्हते.दोघांच्याही जन्मभर लक्षात राहील अशी काहीतरी कडक शिक्षा करण्याचा त्यांचा मानस होता.त्यांच्या म्हणजे रावसाहेबांच्या भुताच्या डोक्यात अनेक पर्याय घोळत होते.  

भाऊसाहेबांच्या स्वप्नात जावे.त्यांना सर्व सत्य परिस्थिती सांगावी.नवीन मृत्युपत्र तयार करावे.कमलला इस्टेटीतून बेदखल करावे.भाऊसाहेबांच्या देहात शिरून त्यावर आपण सही करावी.असाही एक विचार होता.अशा मृत्युपत्रामुळे कमल व परेश यांचा सर्व डाव उधळला जाईल.कमलने कितीही प्रेम दाखविले,तरी तिने आपल्याशी पैशासाठी लग्न केले हे त्यांना कळून चुकले होते.कमल त्यांच्याशी अप्रामाणिक राहिली याबद्दलही तिला कांहीतरी शिक्षा होणे आवश्यक होते.  

दोघांना कांहीतरी शारीरिक शिक्षा झाली पाहिजे.त्याचबरोबर मालमत्तेतील हिस्सा त्यांना विशेष मिळता कामा नये.मुळीच मिळाला नाही तर फार उत्तम,हे दोन्ही हेतू साध्य होतील,  अशी कांहीतरी योजना पाहिजे असे त्याना प्रामाणिकपणे वाटत होते.

शेवटी विचारांती त्यांनी पुढील शिक्षा करण्याचे ठरविले.त्यांनी परेशच्या शरीरात प्रवेश केला.आता त्यांचा परेशवर संपूर्ण ताबा होता.त्या रात्री परेश बिनधास्तपणे कमलकडे गेला.तो आपल्याकडे आलेला पाहून कमल अत्यानंदित झाली.परेशला पाहिल्यावर कमलला जाणवणारी मनाची टोचणी, केव्हांच मागे पडली होती.आज कितीतरी दिवस ती शरीरसुखाला वंचित झाली होती.तिला परेशच्या पहिल्या भेटीपासूनचे सर्व दिवस आठवत होते.थोडय़ाच वेळात दोघेही तिच्या शयनगृहात पोचले.आज परेशचा मूड कांही वेगळाच होता.त्याने कमलला शारीरिक पीडा होईल अशा बऱ्याच गोष्टी केल्या.तिला सुखाऐवजी दु:खच झाले.परेश असा नव्हता.तो अकस्मात असा कसा झाला याचे तिला नवल वाटत होते.कित्येकवेळा तिला परेशमध्ये रावसाहेब दिसत होते.ते नेहमीसारखे प्रेमळ नसून सूडाने पेटलेले वाटत होते.पूर्वीं ते स्वप्नात येत होते. आता त्यांच्या शक्ती वाढल्या की काय असा संशय तिला येऊ लागला होता.     शरीर केवळ परेशचे होते परंतु त्यांत रावसाहेब होते याची तिला अर्थातच तिळमात्र  कल्पना नव्हती.

रात्री परेशने तिला दारूही पाजली.कधी कधी ती परेशबरोबर संबंध ठेवताना त्याच्याबरोबर दारू घेत असे.परेशने तिला ड्रग्जबरोबर दारुचीही सवय लावली होती.

परेश रोज तिच्याकडे येऊ लागला. ही गोष्ट नंतर रोजचीच झाली.कमल परेशचे येणे बंद करू शकत नव्हती.तो आल्यावर ती त्याला पूर्वीच्या आठवणींना उजळा देण्याचा प्रयत्न करीत होती.परेशचे शारीरिक पीडा देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते.एक दिवस त्याने(म्हणजे रावसाहेबांनी) दारू चांगली नाही असे म्हणत ग्लासातील दारूला पेटती काडी लावली.दारूने लगेच पेट घेतला.ती पेटती दारू तशीच त्याने कमलच्या चेहऱ्यावर फेकली.कमलच्या चेहऱ्याची उजवी बाजू भाजल्यामुळे, भाजलेल्या वांग्यासारखी झाली.त्यातच परेशने तिला जिन्यावरून ढकलून दिले. त्यात तिचा एक हात व एक पाय मोडला.जवळ जवळ दोन महिने तिला हॉस्पीटलमध्ये काढावे लागले.नंतरही ती कधीही व्यवस्थित चालू शकणार नव्हती.तिच्या उजव्या हाताचा व्यवस्थित वापर करू शकणार नव्हती.ती जेव्हां जेव्हां आरशात पाहील तेव्हां तेव्हां तिला तिचा विद्रूप भयानक चेहरा दिसणार होता.रावसाहेबांनी तिला जन्माची अद्दल घडवली होती.मधून मधून रात्री रावसाहेब तिच्या स्वप्नात येत असत.तुझ्या अपराधाची, तुझ्या बेईमानीची, शिक्षा मी तुला केली आहे असे बजावून सांगत असत.आता तुझ्याकडे जन्मभर कुणीही ढुंकूनही पाहणार नाही.असे तिला बजावीत असत.तुला एकदा मी ठारच मारणार होतो.परंतु मृत्यूने तुझी सुटका केली असती.जिवंतपणी भोगावी लागणारी ही शिक्षा तुला सतत तुझ्या                                                             

कुकर्माची आठवण करून देत जाईल.असे तिला बजावून सांगत असत.

कमलला शारीरिक इजा केल्याबद्दल,कमलला विद्रूप केल्याबद्दल,परेशला पकडण्यात आले.त्याच्यावर खटला चालविण्यात आला.सरकारी वकिलाला मदत करण्यासाठी भाऊसाहेबांनी नामांकित वकील दिला.परेशचा हेतू व कृती सिध्द करण्यासाठी अनेक पुरावे उपलब्ध करून दिले.त्याला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.तो कारागृहात कैदेत असताना त्याच्या शरीरात रावसाहेब शिरले.त्यांनी पोलिस इन्स्पेक्टरवर हल्ला केला.परिणामी पोलिसांनी त्याला चांगले तिंबून काढले.त्याने स्वत:ला इजा करून घेण्याचा प्रयत्न केला.आत्महत्येचा प्रयत्न केला. असे प्रत्यक्षात दाखवून त्याच्या शिक्षेत आणखी वाढ होईल असे पाहिले.या मारहाणीमध्ये परेश थोडाबहुत अपंग झाला.त्याशिवाय रावसाहेबांनी त्याच्या शरीरात प्रवेश करून तुरुंगात असलेल्या एका अट्टल गुंडाला शिव्या दिल्या .त्या गुंडाने व त्याच्या साथीदारांनी परेशची कणिक तिंबून काढली.या दोन्ही घटनांमध्ये परेशला कांही महिने हॉस्पिटलमागे काढावे लागले.

आपण पाेलिसांशी असे कसे वागलो?त्या नामचीन गुंडाला आव्हान कसे काय दिले? शिव्या कशा काय दिल्या? याचाच परेश विचार करीत बसे.शारीरिकदृष्टय़ा तो चांगलाच दुर्बल झाला होता.

त्याच्याही स्वप्नात एक दिवस रावसाहेब आले.त्यांनी त्यांच्या कुकर्माचा पुन्हा एकदा पाढा वाचला.तुला मी शिक्षा केली आहे.मी तुझ्या शरीरात प्रवेश करून या सर्व गोष्टी केल्या असे सांगितले. तुरुंगातून जरी तू जिवंत बाहेर आलास,तरी तुझा देखणेपणा आता नष्ट झालेला आहे.इतकेच काय तू अपंग झाला आहेस.तू आता स्त्रियांना तुझ्या मोहजालात फसवू शकणार नाहीस.पाेलिसांच्या व त्या गुंडाच्या वेडय़ावाकडय़ा मारामुळे तुझे पुरुषत्व नष्ट झाले आहे.तू चालता बोलता एक जिवंत प्रेत झाला आहेस.तुला हीच शिक्षा योग्य होती असे बजावून सांगितले.आणि ती मी दिली हेही त्याच्या लक्षात रावसाहेबांनी आणून दिले.

रावसाहेब भाऊसाहेबांच्या स्वप्नात गेले.रावसाहेबांनी त्याना सर्व हकिगत सविस्तर सांगितली. भाऊसाहेबांना थोडीबहुत कल्पना,थोडाबहुत अंदाज, अगोदरच आला होता.रावसाहेबांच्या दर्शनामुळे व त्यांनी सविस्तर सांगितलेल्या सर्व हकिगतीमुळे त्यांना परिस्थितीची पूर्ण खात्री पटली.त्यांनी भाऊसाहेबांना एक नवीन मृत्यूपत्र तयार करायला सांगितले.त्यामध्ये रावसाहेबांच्या सर्व मालमत्तेचा एक विश्वस्त निधी स्थापन करावा.त्या विश्वस्त निधीच्या मार्फत गरजू वृद्ध,अनाथ मुले व स्त्रिया याना मदत द्यावी.भाऊसाहेब आणि रावसाहेबांचे कांही जीवश्चकंठश्च मित्र त्या विश्वस्त निधीचे  विश्वस्त असावेत.अशी आज्ञा दिली.तुम्ही हे मृत्यूपत्र पूर्व तारखेचे मी जिवंत होतो त्या वेळचे करावे.या मृत्युपत्राने पूर्वींची सर्व मृत्युपत्रे रद्द ठरत आहेत असेही कलम (क्लॉज) त्यात टाकावे. विश्वस्त निधीचे ऑफिस माझ्या बंगल्यात असावे. असेही सांगितले. कमलचा गुन्हा कितीही गंभीर असला तरी तिला अगदी रस्त्यावर आणावे असे  रावसाहेबांना वाटत नव्हते. त्यांना लहानपणची कमल आठवत होती.एकेकाळी तिने व त्यांनी एकमेकांवर प्रेम केले होते.ते सोनेरी दिवस त्यांच्या स्मरणात होते. तिला बंगल्यात राहता येणार नव्हते.तिला  मरेपर्यंत दरमहा एक लाख रुपये विश्वस्त निधीमधून देण्यात यावे असेही एक कलम ठेवण्यास सांगितले.मृत्युपत्र तयार झाल्यावर मी तुमच्या शरीरात प्रवेश करीन व मृत्युपत्रावर सही करीन असेही सांगितले.

भाऊसाहेबांना कमल व परेश यांचे संबंध ऐकून,त्यांनी केलेला विश्वासघात ऐकून धक्का बसला होता. परिणामी त्यांनी सरकारी वकिलाला साहाय्य करण्यासाठी तगडय़ा वकिलाची नेमणूक केली होती.त्यामुळेच परेशला जबरदस्त शिक्षा झाली होती.त्यांनी रावसाहेबांच्या सांगण्यानुसार मृत्यूपत्र तयार केले.त्यानंतर रावसाहेबांनी भाऊसाहेबांच्या शरीरात प्रवेश करून सही केली.

आता रावसाहेबांच्या बंगल्यात विश्वस्त निधीचे ऑफिस आहे.त्यातून गरजू वृध्द,मुले व महिला यांना मदत करण्यात येते.रावसाहेबांच्या सर्व मालमत्तेचा   कारभार विश्वस्त निधीमार्फत केला जातो.

चेहरा विद्रूप झालेला,एक  एक पाय मोडलेला व उजवा हात  वक्र झालेला अशा स्थितीत कमल आपले आयुष्य कंठीत आहे.आरशात पाहताना, पाय किंवा हाताचा वापर करताना, दरवेळी तिला आपल्या कुकर्माची, रावसाहेबांशी केलेल्या विश्वासघाताची आठवण येते.ती पश्चात्तापाने जन्मभर जळत राहील अशी व्यवस्था रावसाहेबांनी केली आहे.निदान तिला महिन्याला एक लाख रु जगण्यासाठी मिळत आहेत.ही रक्कम कांही लहान सहान नाही.    

परेशची अवस्था त्याहून वाईट आहे .तो शारीरिक दृष्ट्या अपंग तर आहेच परंतु पुरुष म्हणूनही अपंग आहे.कारागृहात आहे तोपर्यंत त्याला अन्न तरी मिळत आहे.नंतर त्याला गुजराण करण्यासाठी भीक मागण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

*हल्ली रावसाहेब कुणाच्याही स्वप्नात येत नाहीत.*

*कुणाच्याही शरीरात प्रवेश करीत नाहीत.*

*कुणालाही दर्शन देत नाहीत.*

*त्यावरून ते पुढील गतीला गेले असावेत.*

(समाप्त)

२७/६/२०२१©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel