( ही कथा  संपूर्णपणे काल्पनिक आहे.प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

जर तिचा हात अपघातात तुटला आहे,

तो हात आता प्रेतात्म्याने भारित आहे,

तो आपल्याला शोधीत होता,

अाता त्याने आपल्याला शोधून काढले आहे,

तो खिडकीतून आपल्याला न्याहाळत आहे,

तो खोलीत येण्याची खटपट करीत आहे,

या गोष्टी त्याला कळल्या असत्या तर कदाचित तिथेच त्याचा हार्ट फेल झाला असता.

खोलीला शटर्स होते.शटर्स अर्थातच बंद होते.हाताला आंत प्रवेश मिळणे कठीण दिसत होते.रात्रीचे दोन वाजले होते.शेवटी हात पुढच्या दरवाज्याकडे गेला.त्याने बेल वाजवली.सर्व नोकरचाकर गाढ झोपले होते.पुन्हा पुन्हा बेल वाजवली.बंगल्यावर रखवालदाराची नजर होती.तो बंगल्याभोवती फिरत होता.कुणाच्याही दृष्टीस न पडता बंगल्यात प्रवेश मिळणे कठीण दिसत होते.हाताने सकाळपर्यंत थांबायचे ठरवले.

सकाळ झाली.बाहेरील   दरवाजा उघडण्यात आला.नोकरांची वर्दळ सुरू झाली.कुणाच्याही दृष्टीस न पडता बंगल्यात प्रवेश करणे आवश्यक होते.असा प्रवेश हाताला अशक्य दिसत होता.गच्चीचा दरवाजा उघडण्यात आला.थंडीचे दिवस होते.थंडीत उन्हाचा शेक घेण्यासाठी व व्यायामासाठी राकेशचे वडील गच्चीत आले.त्यांचे उन्हात फेऱ्या मारणे सुरू झाले.त्याचवेळी ते फोनवर बोलत होते.त्यांचे आसपास लक्ष नव्हते.हाताने भिंतीवरून घोरपडीसारखे चढण्याचा प्रयत्न केला.त्याला वरपर्यंत चढणे कठीण जात होते.जवळच वाढलेल्या झाडाची एक फांदी गच्चीत आली होती.हात त्या झाडावर चढला आणि फांदीवरून रांगत रांगत अलगद गच्चीत उतरला.हाताचे लक्ष राकेशच्या वडिलांकडे होते.वडिलांची नजर चुकवून त्याला घरात प्रवेश करायचा होता.हात गच्चीच्या दरवाजाने आंत जाऊन जिन्यावरून उडय़ा मारीत उतरू लागला. एवढ्यात कुणीतरी जिन्याने वर येत आहे असे त्याच्या लक्षात आले.जिन्याला एक वाकण होते.तेथे एक आरामखुर्ची उभी केलेली होती.हात पटकन उडी मारून त्या आरामखुर्चीच्या कापडात दिसेनासा झाला.

दिवसा घरात फिरणे धोकादायक होते.तुटका हात इतस्ततः फिरत आहे असे पाहिल्यावर सर्वांचीच बोबडी वळली असती.त्याच्या बंदोबस्तासाठी सर्वच प्रयत्न करू लागले असते.प्रेतात्म्याचा हात असला तरी त्याच्या शक्तीला मर्यादा होत्या.दिवसभर खुर्चीत लपून राहायचे.दुपारी सर्वत्र शांत झाल्यावर   हळूच बाहेर यावे, खाली उतरावे, राकेशची खोली शोधून काढावी आणि त्यात कुठेतरी लपून बसावे, असा त्याचा विचार होता.दुपारी त्याला हवी असलेली संधी मिळाली नाही.तिन्हीसांजेला दिवे लावण्याच्या  वेळी त्याला संधी मिळाली.घरात  बरीच शयनगृहे हाेती.स्वतः कुणालाही दिसल्याशिवाय   राकेशची खोली शोधून काढणे जरा कठीणच काम होते. 

काल रात्री एक वाजता त्याने राकेशची खोली बाहेरून पाहिली होती.फिरता फिरता त्याला राकेशची खोली सापडली.खोलीचा दरवाजा बंद होता.बहुधा हीच खोली असेल असा त्याचा अंदाज होता.दरवाजा उघडल्याशिवाय खात्री होणार नव्हती.हात तिथेच जवळ लपून बसला.कुणातरी नोकराने कांही कामासाठी खोली उघडली.नोकरापाठोपाठ त्याच्या दृष्टीस न पडता हात खोलीत शिरला.सुदैवाने त्याने अंदाज केलेली खोलीच राकेशची होती.त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. एका कपाटामागे त्याने आश्रय घेतला.रात्री राकेश झोपण्यासाठी खोलीत आला असताच.तो आल्यावर त्याला ठार मारणे कांहीच कठीण नव्हते. 

त्याला ठार मारावे की जन्माची अद्दल घडेल अशी शिक्षा करावी असा प्रश्न त्या हातासमोर,म्हणजेच विनिताच्या प्रेतात्म्यासमोर होता.ठार मारले असते तर तिथेच सर्व विषय संपत हाेता.त्याला अपंग करून ठेवला असता तर पदोपदी त्याला त्याने केलेल्या गुन्ह्याची आठवण होत राहिली असती.त्याने कोणता गुन्हा केला तो त्याला सांगून नंतर शिक्षा करणे जास्त योग्य ठरले असते.शेवटी हाताने राकेशला जन्माचा अपंग करून ठेवण्याचे ठरविले.कपाटामागे राकेशची वाट बघत दबा धरून हात तिथे बसला.रात्री राकेश येईपर्यंत त्याला वाट पाहणे भाग होते. 

यमदूत आपल्या शयनगृहात आपली वाट पाहत आहे असे जर राकेशला कळले असते तर तो शयनगृहात कधीही आला नसता.शयनगृहातच काय तो बंगला सोडून पळून गेला असता.त्या दिवशी राकेशचे दैव बहुधा चांगले असावे.त्या दिवशी तो त्याच्या मित्राकडे गेला असताना, खाण्यापिण्यात बराच वेळ गेला. बरीच रात्र झाली.तिथेच रात्री थांबण्याचे त्याने ठरविले.इकडे हात राकेश आता येईल मग येईल म्हणून वाट पाहत बसला होता.दुसर्‍या  दिवशी राकेश आपल्या बंगल्याकडे सकाळी खूप उशिरा आला.हाताला त्याला ठार मारण्यासाठी संधी मिळाली होती.परंतु हाताला त्याला आता ठार मारायचे नव्हते.गुन्हेगाराला शिक्षा कां होत आहे ते न्यायाधीश वाचून दाखवतात आणि नंतर शिक्षा जाहीर केली जाते.नंतर त्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते.तसेच हाताला करायचे होते.प्रथम तो कोण ते त्याला सांगायचे होते.ही विनिता आहे हे त्याच्या लक्षात येणे आवश्यक होते.नंतर शिक्षा कां होत आहे ते सांगणे गरजेचे होते.शिक्षेचे स्वरूप आणि नंतर प्रत्यक्ष शिक्षा,असे सर्व साग्रसंगीत करायचे होते.त्यासाठी एकांतात राकेश भेटणे गरजेचे होते.त्यासाठी अर्थातच रात्रीची वाट पाहणे अपरिहार्य होते.राकेश खोलीत येणे,त्याने दरवाजा लावून घेणे,आवश्यक होते.  

शेवटी एकदा रात्र झाली.हाताच्या(विनिताच्या)  सुदैवाने परंतु राकेशच्या दुर्दैवाने त्या रात्री राकेश घरी आला.जेवण झाल्यावर,आई वडिलांजवळ थोड्याबहुत गप्पा मारल्यावर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी आला.त्याने खोलीचा दरवाजा बंद करून घेतला.नाईट ड्रेस घातला.थोडावेळ टीव्ही पाहण्यासाठी तो सोफ्यात बसला.त्याने टीव्ही चालू केला.टीव्हीवर शोले चालू होता.राकेशचा तो आवडता सिनेमा होता.सिनेमा पाहण्यात गुंग झाला असताना त्याला कुणी तरी त्याच्या टीपॉयवर उडी मारल्याचे जाणवले.

बघतो तो, तो एक हात होता.टीपॉयवर त्या हाताचा पंजा एखाद्या नागासारखा डुलत होता.      

ते दृश्य पाहून राकेशची  बोलती बंद झाली.त्याची बोबडी वळली.त्याला बेंबीच्या देठापासून जोरात ओरडावे असे वाटत होते.त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता.उठून खोली बाहेर पळावे असे त्याला वाटत होते. तो उभा राहू शकत नव्हता.जणू कांही त्याच्या दोन्ही पायात मणामणाच्या बेड्या घातल्या होत्या.विस्फारित नजरेने तो त्या तुटक्या हाताकडे पाहात राहिला.हात नाजूक दिसत होता.एखाद्या मुलीचा असावा असे त्याला वाटले.दुसऱ्याच क्षणी त्याला हा हात विनिताचा आहे हे लक्षात आले.जो हात त्याने रस्त्यात पकडला होता. जो हात स्वतःकडे ओढून त्याने तिला आलिंगन दिले होते. तोच हा हात होता.त्या दिवशीचे सर्व दृश्य त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा स्पष्ट उभे राहिले.त्या दिवशी बघितलेले अस्मानही त्याला पुन्हा आठवले.   

आपण केलेला गुन्हा,तिला ठार मारण्याचा केलेला गुन्हा त्याला आठवला. विनिता रस्ता ओलांडत होती.राकेशला तिने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.गेले आठ पंधरा दिवस तो संधीची वाट पाहत होता.ती संधी परवा आली होती.त्याने मोटार तिच्या अंगावर घातली.तिला जबरदस्त जखमी करावे आणि तिला धडा शिकवावा एवढाच त्याचा हेतू होता.प्रत्यक्षात भलतेच घडले होते.विनिताचा मृत्यू झाला होता.त्या दिवशी घरी आल्यावरही तो धडधडत्या हृदयाने,अपराधी भावनेने, रात्री कितीतरी वेळ जागा होता.दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये त्याने अपघाताची बातमी वाचली होती.तिचा एक हात अपघातात तुटून गायब झाला आणि तो सापडला नाही हेही त्याने वाचले होते.

आणि तो हात आता त्याच्यापुढे उभा होता. नागासारखा डोलत होता.हा आता आपल्याला सोडत नाही याची त्याला खात्री पटली.त्यांचे सर्व अवसान गुर्मी गळून पडली.

हाताच्या डोलण्याकडे    संमोहित होऊन तो बघत असताना एकाएकी हाताच्या जागी त्याला विनीताचे  मस्तक दिसू लागले.तिचे डोळे अंगार ओकत होते.अगोदरच राकेशचा जागच्या जागी बध्द केल्यासारखा पुतळा झाला होता.आता तर त्याला पापणीसुद्धा हलवता येत नव्हती.विस्फारित नेत्रांनी तो तिच्याकडे बघत होता.आपण बघतो ते सत्य आहे की  स्वप्न आहे तेच त्याला कळत नव्हते.

विनिता आता बोलू लागली.मी तुझा असा काय गुन्हा केला होता म्हणून तू मला ठार मारलेस. माझ्यासमोर सर्व जीवन पडले होते.जीवनात काय काय करायचे मी योजले होते.शिकून मोठी होऊन नोकरी करून पैसे मिळवून मी माझ्या आईवडिलांना आनंदी सुखी ठेवणार होते.त्यांनी आतापर्यंत गरिबीमुळे अपरंपार कष्ट सोसले.तू मला मारल्यामुळे केवळ मी या जगातून गेले एवढेच नव्हे तर माझ्या आईवडिलांचे जीवनही उद्ध्वस्त झाले.तू एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले.

गयावया करत राकेश बोलू लागला.तू मला सोड. मी तुझा अपराध केला आहे. मी तुझ्या आईवडिलांना मालामाल करीन.जन्मभर ते सुखात राहतील एवढा पैसा त्यांना देईन.राकेश भीतीने थरथर कापत होता.आपल्याला मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे त्याला जागचे हलता येत नव्हते.घामाचे ओघळ त्याच्या सर्व अंगातून वाहात होते.   

पंजा म्हणजे विनिता पुढे बोलू लागली.पैशाने सर्व गोष्टींची भरपाई होत नाही.तुम्हा श्रीमंतांना पैशाने सर्व विकत घेता येते असे वाटते.आईवडिलांची एकुलती एक मुलगी गेली.याची भरपाई तू कशी करणार?तू मला ठार मारले.मी तुला ठार करणार नाही.तू मेलास म्हणले सुटशील.तुला मी लुळा पांगळा करून ठेवणार आहे.क्षणोक्षणी तुला माझी आठवण येईल.तू केलेल्या अपराधाबद्दल तुला सतत जाणीव होत राहील.

रात्र झाली होती. राकेशच्या खोलीत कुणी येण्याचा  संभव नव्हताच.तरीही उगीचच बोलण्यात वेळ दवडण्यात आता  अर्थ नव्हता.गुन्हा सांगून झाला होता.शिक्षा फर्मावण्यात आली होती.विनीताचे मस्तक दिसेनासे झाले.हाताने उडी मारली व  त्याचा उजवा हात पकडला.एका झटक्यात त्याने राकेशचा हात   खांद्यातून निखळून टाकला.हाताने पुन्हा हवेत उड्डाण केले.एखाद्या  लोखंडी काठीसारखा तो त्याच्या पायावर आपटला.त्याच्या मांडीचे हाड पाच सहा ठिकाणी मोडले होते.

असह्य वेदनांनी राकेश विव्हळत होता.त्याचा मोबाईल दूर होता.मदतीसाठी तो कोणाला बोलवू शकत नव्हता. प्राण एकवटून राकेशने एक किंकाळी मारली.

विनिताचे काम झाले होते.राकेशला शिक्षा करण्यासाठीच ती थांबली होती.ती पुढील गतीला निघून गेली.

राकेशची किंकाळी ऐकून कुणीतरी नोकर धावत आला.दरवाजा आंतून बंद होता.राकेशला हांका मारण्यात आल्या आंतून कांहीहि प्रतिसाद येत नव्हता.दरवाजा फोडण्यात आला. 

दरवाजा उघडल्याबरोबर सडलेल्या मांसाचा भयानक वास सर्वांच्या नाकात शिरला.

त्या वासाने कांहीजण तर भडाभडा ओकले.राकेशला शिक्षा केल्यावर लगेच त्या हातातून विनिता निघून गेली होती.

*हाताचा मृत्यू तीन दिवसांपूर्वीच झाला होता.विनिता त्यात असल्यामुळे तो टवटवीत जसाच्या तसा वाटत होता.ती जाताच त्याचे विघटन झाले.*

*राकेशला हॉस्पिटलमध्ये अनेक महिने रहावे लागले.*

*त्या काळात क्षणोक्षणी त्याला विनिताने केलेल्या शिक्षेची व त्याच्या गुन्ह्याची आठवण होत होती.*

*हल्ली तो काठी घेऊन थोडाबहुत चालू शकतो.*

*अजूनही त्याला त्याच्या गुन्ह्याची आठवण अधूनमधून होत असते.*

* मरेपर्यंत तो विनिताला विसरणे शक्य नाही  

(समाप्त)

५/१२/२०२१©प्रभाकर  पटवर्धन

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel