किर्र रात्री सुन्न रात्री

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती,

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आली आली भुताबाई;

तीन माणसे रोज खाई

स्मशानामध्ये घालते फेरी

पहाटेपूर्वी करते न्हेरी

न्हेरीसाठी होतात चट्‍ट

दोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ

पण प्रत्येक एकादशीस

रताळ्याचा खाते कीस.

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपोआप खोले !

आला आला महासमंध;

त्याची चाल संथ संथ

त्याची उंची दहा फूट

अंगावरती काळा सूट,

डोक्यावरती हँट बीट,

तुम्ही फसाल ! पहा नीट

वळवळणारे गळ्यात काय ?

नागोबाचा लंबा टाय !

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी ;

शार वाडा गार भिंती,

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपोआप खोले !

आले आले थातूमातू ;

खाते सातू जर सातू

नसले घरात तर बसते

नखे खात. रोज रात्री

मांजरावरुन हे येते

जग फिरुन, हे भूत

आहे मुत्रे, तरी त्याला

भितात कुत्रे.

किर्र रानी सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती,

दार त्यांचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आले आले अरेतुरे ;

हे भूत काळेबेरे

मध्य रात्री रांगत येते;

दारावरती थाप देते.

जर त्याला घेतले घरात

जीभ काढते तेरा हात.

पण ’कारे’ म्हटले तर,

जाईल सोडून तुमचे घर.

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी ;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आला आला आग्या वेताळ;

त्याच्या डोक्यात असतो जाळ.

कोळसे खातो कराकर;

राकेल पितो डबाभर.

डोक्यावरती कढई धरुन

भुते घेतात स्वैपाक करुन

केसामधून उठतात ज्वाळा,

सगळे न्हावी भितात त्याला.

किर्र रात्री सुन्न रानी;

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

कोण आले ? कोण आले ?

दार आपो-आप खोले !

आला आला पिंपळावरुन

एक मुंजा संध्या करुन.

त्याची पोथी चालत येते;

हळूच त्याच्या हातात जाते.

रक्‍तासारखी पाने लाल,

खुणेसाठी असते पाल.

तीच पोथी ऐकण्यासाठी

भुते आली; झाली दाटी

पाल लागली चुकचुक करु,

पोथीवाचन झाले सुरु;

’हेंगाड वेंगाड फेंगाड भेंगाड

फेंगाड भेंगाड हेंगाड वेंगाड’

किर्र रात्री सुन्न रानी

झर्र वारा भुर्र पानी;

शार वाडा गार भिंती

दार त्याचे हस्तिदंती.

सर्व आले सर्व आले

दार हसले बंद झाले !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel