( ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे .प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )    

त्याच्या दिसण्यातही  फरक पडला होता. 

त्याचे डोळे बटबटीत,खोबणीतून बाहेर आलेले, डोळ्याभोवती काळी वर्तुळे व सुजलेले  दिसत असत.गालाची हाडे वर  आल्यासारखी वाटत.तो थोडा खप्पड झाल्यासारखा वाटत होता.त्याचे दातही थोडे विचित्र वाटू लागले होते.सुळे जास्त मोठे व धारदार वाटत होते.त्यामुळे तोंडाचा आकार बदललेला वाटत होता.  

त्याच्या बाबतीत कांहीतरी तातडीने करण्याची गरज होती.नाहीतर मुलगा हाताबाहेर गेला असता. 

विचार करता करता बाबाना एकाएकी सहा महिन्यापूर्वी घडलेली एक घटना आठवली.कांही कामानिमित्त दोघेही बाजारात जात होते.रस्ता ओलांडत असताना एकाएकी एक मोटार वेडीवाकडी होत त्यांच्या अंगावर आली.दोघांनीही अंगावर मोटार येऊ नये म्हणून उड्या मारल्या.दैव बलवत्तर असल्यामुळे बाबा बालंबाल बचावले.मोटारीचा धक्का नीलेशला लागला.तो सुमारे आठ दहा फूट उडून रस्त्यावर आपटला.तो तत्काळ बेशुद्ध झाला.बाबा त्याला लगेच मोटारीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.बाबाना त्याची नाडीही लागत नव्हती.बहुधा तो मेला की काय अशी त्यांना शंका आली होती.गाडी हॉस्पिटलजवळ पोचेपर्यंत तो शुद्धीवर आला होता.त्याला कुठेही बाह्य जखम किंवा मोडतोड दिसत नव्हती.तरीही त्यांनी त्याला डॉक्टरना दाखविले होते.डॉक्टरांनी तपासणी केल्यावर  सर्व काही ठीक आहे असे सांगून तो शॉकमध्ये आहे,धक्क्यातून सावरल्यानंतर दोन तीन दिवसांत तो ठीक होईल म्हणून सांगितले होते

तेव्हापासून तो असा विचित्र वागू लागला होता.

जणू काही पूर्वींचा नीलेश लुप्त होऊन नवीन नीलेश जन्माला आला अशी शंका वाटावी एवढा बदल त्याच्यात झाला होता.त्याच्याकडे पाहून बाबांना हा आपला मुलगा नाहीच असे अनेकदा वाटू लागले होते.  

जरी त्यावेळी डॉक्टर सर्व काही ठीक आहे असे म्हणाले असले तरी प्रत्यक्षात त्याच्या डोक्याला अंतर्गत जखम झाली असली पाहिजे.त्याचा परिणाम म्हणून तो असा वागत असावा.डॉक्टरांना ही सर्व घटना सांगावी आणि नंतर ते काय म्हणतात ते पाहावे असे त्यांनी ठरविले.

प्रथम त्याचे बाबा त्याला फॅमिली डॉक्टरांकडे घेऊन गेले.नंतर त्यांच्या सल्ल्यावरून ते एका स्पेशालिस्टकडे गेले.त्या डॉक्टराना अपघाताची सर्व हकिगत सांगितली.नीलेशच्या अपरोक्ष त्यांनी डॉक्टरांना त्याचा विचित्रपणा सांगितला. त्याच्याबद्दल त्याच्या शाळेतून आलेल्या तक्रारी, त्यांना आलेले अनुभव, शेजाऱ्यांशी त्याची वर्तणूक, इत्यादी सर्व हकिगत  सविस्तर सांगितली. तेव्हापासून त्याच्यात झालेला आमूलाग्र फरकही सांगितला.डॉक्टर विचारमग्न झाले .त्यानी त्याचा एमआरआय काढला.आणखीही काही तपासण्या केल्या.शेवटी सर्व काही ठीक आहे असे सांगितले. तरीही एकदा मनोचिकित्सकाकडे जाऊन त्याला दाखवा असा सल्ला दिला.त्याप्रमाणे ते मनोविकारतज्ज्ञाकडे गेले.तेथेही डॉक्टरांना काही विशेष अॅबनॉर्मल वाटले नाही.हे वयच असे असते.प्रेमाने वागा, समजुतदारपणे  घ्या, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला, रागावू नका,काळजी करू नका,विशेष काही झालेले नाही, असा सल्ला बाबांना देण्यात आला.

फॅमिली डॉक्टरांकडे त्याला नेला. मनोविकार तज्ज्ञांकडे त्याला नेला. प्रत्येक वेळी नीलेश छद्मीपणे हसत आहे असा भास त्याच्या बाबांना होत होता. 

त्याच्या बाबतीत तातडीने काहीतरी करणे आवश्यक होते.मात्र काय करावे ते कळत नव्हते.ज्योतिषावर बाबांचा विशेष विश्वास नव्हता.तरीही कुणाच्या तरी सांगण्यावरून ते एका ज्योतिषाकडे गेले.ज्योतिषाचार्य नावाजलेले होते.त्यांना पत्रिका पाहून हा मुलगा अल्पायुषी आहे असे लक्षात आले.बाबांना तसे सांगणे त्यांना अवघड वाटले.त्यांनी काळजी घ्या, त्याला अपघात संभवतो, एवढेच सांगितले.त्यावर बाबांनी त्याला झालेल्या अपघाताची हकीगत सांगितली.ते ऐकल्यावर ते आता काही भीती नाही असे म्हणाले अपघात होऊन गेला आहे . ज्यांनी बाबांना त्या ज्योतिषांकडे जाण्याचा सल्ला दिला होता ते एकदा ज्योतिषाला भेटले.त्यावेळी ते ज्योतिषी एवढेच म्हणाले.या मुलाचे भविष्य अंध:कारमय आहे.याचा अपघातात मृत्यू होईल असे भविष्य सांगते.प्रत्यक्षात त्याला अपघात होऊन गेला आहे.सुदैवाने तो जिवंत आहे.तरीही मला त्याचे भविष्य विचित्र वाटत आहे.जर हा मुलगा सहा महिन्यानंतर जिवंत असला तर मला भेटा. नंतर पुढचे भविष्य सांगेन.

दिवस असेच चालले होते.एके दिवशी नीलेश व शेजारचा मुलगा यांचे भांडण झाले.भांडणाच्या भरात नीलेशने त्या मुलाचा गळा धरून त्याला दातांनी चावण्याचा प्रयत्न केला.त्याच्या गळ्यावर नीलेशचे दात रोवले गेले होते.जर शेजारी मध्ये पडले नसते, त्यांनी त्याला सोडवला नसता तर त्याने त्याचे रक्त प्याले असते .रक्त पिईन ही धमकी खरी करून दाखविली असती.तसे काही झाले असते तर पोलिस केस झाली असती.प्रकरण हाताबाहेर चालले होते. 

त्याचा क्रूरपणा वाढत चालला होता.एकदा एका कुत्र्याने त्याला चावण्याचा प्रयत्न केला.दुसरा एखादा घाबरला असता.नीलेशने त्या कुत्र्याला पकडून त्याची मुंडी मुरगाळली आणि त्याला ठार मारले.एवढी ताकद एवढे धैर्य सर्वांनाच विचित्र वाटले.मुंडी मुरगळली एवढेच नव्हे तर त्या कुत्र्याचे पाय धरून त्याला दगडावर आपटले.तो त्या कुत्र्याला खाणार असे वाटत होते.परंतु सर्व त्याच्याकडे स्तिमित होऊन भीतीने पाहात आहे असे पाहिल्यावर त्याने  आपली चाल बदलल्याचे लगेच लक्षात आले होते.     

दिवसेंदिवस तो हाताबाहेर चालला होता.  आता तो शाळेत जात नाहीसा झाला होता.त्याला रागवायलाही आईबाबांना भीती वाटत होती. त्याच्याकडे बघून,त्याचे वर्तन बघून, त्यांना हा आपला मुलगा नाहीच असे अनेकदा वाटत असे.

बाबांचा विश्वास नसला तरी ते एका स्वामींकडे त्यांच्या आणखी एका मित्राच्या सांगण्यावरून गेले.बुडत्याला काडीचा आधार असे त्याना वाटत होते.स्वामींचे दत्त मंदिर होते.ते दत्त उपासक होते.बाबानी त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला.त्यांना आपली समस्या सांगितली.स्वामीनी थोडा वेळ समाधी लावली.त्यांचा चेहरा गंभीर झाला .त्याला येथे घेऊन या, सर्व काही ठीक होईल असे ते म्हणाले.

स्वामींच्या  सीमेमध्ये नीलेश यायला तयार नव्हता.शेवटी जबरदस्तीने त्याला उचलून आणावा लागला.स्वामींच्या तो जवळ येत होता तसतसा त्याचा उग्रपणा वाढत होता.मंदिरामध्ये येण्याच्या वेळी,  शेवटी एक प्रचंड किंकाळी मारून नीलेश जमिनीवर कोसळला.त्याचे फक्त कलेवर होते.

स्वामीनी सर्व घटनेचा पुढीलप्रमाणे उलगडा केला.

सहा महिन्यांपूर्वी जेव्हा अपघात झाला तेव्हा नीलेशचा प्रत्यक्षात मृत्यू झाला होता.त्याचवेळी खवीस (एक प्रकारचे भूत)जवळपास होते.त्याला ही संधी नामी वाटली.तो नीलेशच्या शरीरात हळूच शिरला.त्याने नीलेशच्या शरीराच्या पूर्ण कब्जा घेतला. त्यासाठी त्याला कांही दिवस जावे लागले.अपघातानंतर नीलेश विचित्र वागत होता त्यामागे हे कारण होते.प्रत्यक्षात तो नीलेश नव्हता तर त्याच्या शरीरात शिरलेला खवीस होता. आता तो बाहेर पडून पुन्हा त्याच्या जागी गेला होता.नाइलाजाने त्याला हे घर सोडावे लागले होते.  

*नीलेशच्या आईबाबांना हे सर्व ऐकून अतिशय दु:ख झाले.त्यांच्या शोकाला सीमा राहिल्या नाहीत.*

*त्याची आई तर तत्क्षणी बेशुद्ध झाली.तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.तिला बरे व्हायला कित्येक दिवस लागले.*   

*त्यांचा मुलगा प्रत्यक्षात सहा महिन्यांपूर्वीच मेला होता आणि ते सहा महिने एका खवीसाच्या सहवासात राहत होते,याचा त्यांना प्रचंड धक्का बसला होता.*

*सुदैवाने ती दोघे जिवंत होती.* 

*सहा महिन्यांपूर्वीच मुलगा मेल्याचे ऐकून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.*  

* आपल्याला स्वामींकडे यायची बुद्धी झाली हे चांगले झाले. अन्यथा काय झाले असते कुणाला माहीत?*

*कदाचित त्या दोघांवर दुर्धर प्रसंग ओढवला असता.*  

*नीलेशच्या कलेवरावर त्यांनी विधीवत संस्कार केले.*

*सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातापासून त्यांना जो विलक्षण ताण होता तो आता नाहीसा झाला होता.*   

*त्या खवीसाने त्यांना नंतर काही त्रास दिला नाही.*

*घटना घडून जातात नंतर लोक त्याचा अन्वयार्थ लावीत बसतात.*

(वरील हकीगत कांहीजणांना पटणार नाही.घटनेचे अन्य स्पष्टीकरण असू शकेल.आपल्याला आकलन न होणार्‍या अनेक गोष्टी जगात असतात एवढे मात्र खरे.)

(समाप्त)

२२/११/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

pvpdada@gmail.com   

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel