https://www.youtube.com/watch?v=eChcpHv5_eU
विशेष धन्यवाद.: विविध लोकांनी मला शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे असे सांगितले आहे. त्यांचे आभार. शुद्धलेखन किंबहुना त्याचा अभाव ही समस्या माझ्या लेखनात नेहमीपासूनच आहे आणि ती दूर करण्याचा खूप प्रयत्न मी करीन. माझी लेखन प्रतिभा दुर्दैवाने माझ्या इच्छाशक्तीची गुलाम नाही. हनुमानाच्या सुप्तशक्ती प्रमाणे त्याला ट्रिगर लागतो. हा ट्रिगर मिळाला कि अचानक झटका आल्याप्रमाणे डोक्यांत विचार येतात आणि मी लिहायला बसते. लिहिण्याची दुसरी समस्या म्हणजे माझे विचार माझ्या लेखनाच्या वेगापेक्षा कैक वेगाने येतात आणि मी जर ते योग्य वेळी पकडले नाहीत तर मग संपूर्ण विचारमालिका अचानक खंडित होते आणि विखुरलेले विचारांचे मणी मग एकत्र करण्यात वेळ जातो. जुन्या काळी टेट्रिस नावाची गेम होती. त्यांत विटा अत्यंत वेगाने वरून खाली येतात आणि तुम्हाला त्या बटन्स दाबून व्यवस्थित अरेंज कराव्या लागतात. तुमच्या बोटांचा वेग चांगला नाही तर मग गेम बिघडते. मग तुम्ही लिहून झाल्यांनतर आणखीन २-३ वेळा का नाही वाचत आणि सुधारत ? असा योग्य प्रश्न लोक विचारतात. पण इथे आणखीन एक स्वभावदोष आडवा येतो. काहीही लिहिले तरी वाचताना मला ते पसंद पडत नाही. फेकून द्यावेसे वाटते. अनेकदा मी एकाच draft पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने लिहिते.
तरी सुद्धा आपले लेखन किमान व्यवस्थित वाचनीय तरी असावे हि वाचकांची मागणी अत्यंत रास्त आहे. लेखिकेने अजिबात मेहनत घेतली नाही तर वाचकांना अपमान झाल्या सारखे वाटू शकते ह्याची मला जाणीव आहे आणि मी ह्यापुढे जास्त काळजी घेईन.
--
क्लासिक सिनेमा अनेक आहेत पण बहुतेक रसिक मंडळींनी ते पहिले सुद्धा असतील त्यामुळे त्यावर मला लिहायचे नाही. मला असे चित्रपट इथे मांडायचे आहेत जे चांगले आहेत पण भारतीय प्रेक्षकांनी पाहण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे अत्याधिक जुने किंवा हटके असे चित्रपट इथे मी मांडेन. त्याशिवाय मी काही समीक्षक वगैरे नाही. त्यामुळे हे लेख समीक्षण नाहीत उलट आपल्या मित्रांना आम्ही गाडी चालवता चालवता काही सांगू त्या पद्धतीने मी हे लेख लिहीत आहे. त्यामुळे चित्रपट सोडून अवांतर गोष्टी (चित्रपटाच्या पार्श्वभूमी शी संबंधित) सुद्धा लिहिल्या जातील.
पालोमा हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेलच. पालोमा म्हणजे स्पॅनिश भाषेतून कबुतर. स्पॅनिश भाषा आणि भारतीय भाषा ह्यांचात एक गुणसाधर्म्य आहे. ते म्हणजे
अलंकारिक भाषेचा प्रयोग भरपूर होतो. विशेषतः काव्यांत. आणि हे अलंकार सुद्धा अत्यंत जुने शब्दप्रयोग असू शकतात. आता चकोर, चातक पक्षी आम्ही किती लोकांनी पाहिला आहे ? तरी सुद्धा "मन हे चकोर अमुचे, तू चंद्र भाविकाचा " हा तुकडोजी महाराजांचा अभंग आम्हाला समजू शकतो. इंग्रजी भाषेंत अलंकार नाहीत असे अजिबात नाही पण विविध ऐतिहासिक कारणामुळे इंग्रजी काव्य हे बहुतेक वेळा अलंकार मुक्त तरी असते किंवा बहुतेक अलंकार हे खूपच आधुनिक आणि कवीने स्वतःच निर्माण केलेले असतात. (अलंकार = मेटफोर असा अर्थ घ्यावा)
सध्या अमेरिकेतील नंबर एक गाणे आहे "लास्ट नाईट". त्याचे पहिले कडवे पहा. ह्यांत जवळ जवळ शून्य अलंकार आहेत. संपूर्ण काव्य अत्यंत साधे सरळ आहे.
Last night we let the liquor talk
I can't remember everything we said but we said it all
You told me that you wish I was somebody you never met
But baby, baby somethin's tellin' me this ain't over yet
No way it was our last night
पण स्पॅनिश भाषेंतील गाणी मात्र एकदम भारतीय धाटाची असतात. अनेक आवडत्या गाण्यांपैकी एक आहे : "कुकुरूकुरू पालोमा"
भाषांतर करायचे झाले तर "गुटर्गु गुटर्गु कबुतर". पण हे प्रणयगीत नसून विरहगीत आहे. १९५४ मध्ये निर्माण झालेले हे गाणे विविध लोकांनी आपल्या पद्धतीने गायले आहे. लीला डाऊन्स, सिल्विया पेरेझ, कायतांनो वेरोसो, हुआन फॉलेझ अश्या अनेक विख्यात मेक्सिकन/स्पॅनिश गायक गायिकांनी ह्या गाण्याला अजरामर केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=_iYLbGtPOto
सर्वप्रथम हे गीत मी ज्या चित्रपटांत ऐकले त्या स्पॅनिश चित्रपटावर मी आज लिहिणारं आहे. हेब्लॉ कॉन एला म्हणजे इंग्रजीत talk to her (तिच्याशी बोल) ह्या चित्रपटांत मी हे गाणे सर्वप्रथम ऐकले, त्यांत ते लाईव्ह रिकॉर्ड केले आहे, कायतानो अत्यंत कमी संगीत वापरून निव्वळ आपल्या आवाजाच्या जोरावर ह्या गीतांतील आर्त साद घालतो. ते ऐकून दोन पुरुष आपल्या प्रेमाची आठवण येऊन ओक्सबोक्शी रडतात.
त्या गीताचे बोल काही असे आहेत
ते म्हणतात कि प्रत्येक रात्री तो (पालोमा पक्षी), फक्त वाहणाऱ्या अश्रूंची नदी होता
ते म्हणतात कि तो खात नव्हता ,फक्त पीत होता आपला असह्य वेदना विसरण्यासाठी
ते शपथेवर सांगतात कि रात्रीचे काळेकुट्ट आभाळ सुद्धा त्याच्या विरहाच्या आर्त किंकाळीने शहारून उठत होते
आणि त्याच्या वेदना इतक्या तीव्र होत्या कि. ...
त्याचे प्राण जरी गेले तरी त्याच्या मृत शरीरातून कृश असे उसासे ऐकू येत होते..
मूळ चित्रपटांतील गाणे एका
https://www.youtube.com/watch?v=-CsA1CcA4Z8
२००२ सालचा विख्यात स्पॅनिश दिग्दर्शक आलमदोवर ह्याचा हा चित्रपट समीक्षकांना खूपच आवडला होता. आत्मघातकी प्रेम हि चित्रपटाची प्रमुख थीम आहे. ह्या चित्रपटांत दोन प्रेमकथा आहेत ज्या एकमेकांत गुंततात. पुढे स्पॉईलर्स आहेत.
चित्रपट सुरु होतो एका नृत्याच्या प्रोग्रामांत जिथे मार्को नृत्य पाहत आहे आणि चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो.
लिडिया हे एक स्त्री मॅटडोर आहे. म्हणजे स्पॅनिश बैलांना खेळवण्याचा जो जीवघेणा खेळ आहे त्यातील ती एक प्रमुख खेळाडू आहे. दररोज ती आपला जीव धोक्यांत घालते. तिची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार मार्को येतो. मार्कोला खरे तर ह्या खेळाची शून्य माहिती असते पण दोघेही जण गाडीतून जाताना त्याबद्दल बोलतात आणि मार्कोला काहीही ठाऊक नाही म्हणून लिडिया रागाने गाडीतून उठून जाते. पण तिच्या घरांत एक साप असतो, त्याच्या भयाने ती पुन्हा पळत बाहेर येते आणि मार्कोच्या गाडीत बसते. मार्को सापाला मारतो पण तो रडतो सुद्धा. लिडिया आणि मार्को मध्ये एक प्रकारची मैत्री निर्माण होते.
लिडिया आणि दुसरा एक विख्यात मेटॅडोर ह्यांच्या प्रेम असते पण त्यांचे काही तरी बिनसले आहे अशी खबर सर्व पेज थ्री मध्ये पसरलेली असते. लिडिया आणि मार्कोची भेट पुन्हा होते मार्कोच्या जुन्या प्रेयसीच्या लग्नात. तेंव्हा लिडिया त्याला पुढील बुलफाईट नंतर भेटू असे सांगते. ह्या फाईट मध्ये लिडिआ चा मेटॅडोर प्रेमी अल निन्यो प्रेक्षक म्हणून आलेला असतो. इथे लिडियाला बैल पूर्णपणे शिंगावर घेऊन आपटतो आणि लिडिया भयंकर जखमी होऊन कोमात जाते. मार्को आणि लिडियाचा संवाद होऊ शकत नाही. मार्को दिवस रात्र तिच्या बेड शेजारी बसून राहतो. तिथे डॉक्टर त्याला सांगतात कि कोमातून बाहेर येणे शक्य असले तरी आशा कमीच ठेवणे चांगले.
हॉस्पिटल मध्ये मार्कोची भेट पुरुष नर्स बेनिनयोशी होते. दोघांची मैत्री होते. बेनिनयो हा अलिशिया ह्या नर्तकीच्या पराकोटीच्या प्रेमात पडला आहे. जिथे अलिशिया प्रॅक्टिस करते त्या स्टुडिओच्या बाहेर त्याने घर घेऊन तो तिच्यावर बारीक नजर ठेवतो. तिचा पाठलाग करतो. त्याच्यासोबत त्याची अंथरुणाला खिळलेली माता सुद्धा राहते. तिला हॉस्पिटल मध्ये ठेवणे शक्य नसल्याने तो स्वतः नर्स बनला आहे. आणि तिच्यामुळे त्याला स्वतःसाठी जास्त वेळ सुद्धा मिळत नाही.
शेवटी त्याची माता वारते आणि तो मुक्त होतो. त्याला वाटते आता अलिशियाशी बोलण्याची संधी मिळेल. अलिशिया आपली पर्स विसरते आणि त्याचे निमित्त करून तो तिला भेटतो आणि तिच्याशी संवाद साधतो. ती आपल्याला जुने चित्रपट पाहायला आवडते वगैरे त्याला सांगते आणि दोघेही चालत तिच्या घरा पर्यंत जातात. आणि ती त्याचा विदा घेते.
त्या घराच्या इमारतीत एक मानसोपचार तज्ञ सुद्धा प्रॅक्टिस करतो. त्याच्याशी बोलण्याचे निमित्त करून बेनिनयो त्या इमारतीत घुसतो आणि हळूच तिच्या घरांत सुद्धा घुसतो. तिथे थेट तिच्या बेडरूम मध्ये घुसून तो तिचे एक केसांचे क्लिप सुद्धा चोरतो. अलिशिया त्याला पकडते आणि घाबरून जाते. त्याच दिवशी अलिशियाचा मोठा अपघात होतो आणि ती सुद्धा कोमात जाते.
अलिशियाचे वडील मोठे डॉक्टर असतात आणि जिथे अलिशिया आणि लिडिया दोन्ही आहेत ते हॉस्पिटल त्यांच्याच मालकीचे असते. तिथेच बेनिनयो नोकरी करतो आणि अलिशियाचा दिवस रात्र सोबत राहतो. अलिशियाच्या वडिलांना त्याचा संशय येतो पण तो गे आहे असे त्याने सांगितल्यानंतर मात्र ते त्याच्यावर जास्त संशय घेत नाहीत.
लिडियाची काळजी मार्को घेतो आणि अलिशियाची बेनिनयो. बेनिनयो अलिशियाचे कपडे काढून तिला स्पॉंज बाथ वगैरे घालतो. तिला कथा सांगतो. तिच्यासाठी जुने चित्रपट आणतो.
एक दिवशी लिडियाचा जुना बॉयफ्रेंड म्हणजे अल निन्यो हॉस्पिटल मध्ये येतो आणि मार्कोला सांगतो की लिडिया आणि त्याने त्या अपघाताच्या दिवशी संभाषण केले होते आणि दोघांत समेट झाला होता. लिडिया मार्कोला तेच संध्याकाळी सांगणार होती. मार्कोचे प्रेम लिडिया ला मान्य नव्हते.
बेनिनयो आणि मार्कोचे संभाषण होते तेंव्हा बेनिनयो मार्को ला सांगतो की कोमात असलेल्या अलिशिआ वर बेनिनयोचे प्रचंड प्रेम असून त्याला तिच्याशी त्याच अवस्थेत लग्न करायचे आहे. मार्कोला ते अजिबात पटत नाही आणि तो त्याला परावृत्त करतो.
काही दिवस जातात आणि एका नर्सच्या लक्षांत येते की अलिशियाला मासिक पाळी आल्यास दोन महिने गेले आहेत. ह्यावर चौकशी होते आणि लक्षांत येते की अलिशियावर बलात्कार होऊन ती गर्भवती राहिली आहे. शंकेची सुई बेनिनयो वर येऊन थांबते पण तो असे काही आपण केले आहे हे मान्य करत नाहीत.
दुसऱ्या बाजूला मार्को आपली वेदना विसरण्यासाठी फिरायला जातो. तिथे त्याला बातमी वाचायला मिळते कि लिडिया मृत पावली आहे आणि ती कोमातून बाहेर आलीच नाही. तो परत येतो तेंव्हा त्याला बातमी मिळते कि अलिशियाच्या बलात्कराच्या गुन्ह्यात बेनिनयो जेल मध्ये आहे. तो त्याला जेल मध्ये भेटतो. बेनिनयो त्याला विचारतो कि अलिशिया कशी आहे. मार्को अलिशिया चा शोध घेतो आणि त्याला कळते कि ती कोमातून बाहेर आली आहे आणि पुन्हा नृत्य शिकते आहे. तिचा वकील त्याला सांगतो कि तिचे अर्भक मृत जन्माला आले आहे आणि ह्यापैकी कुठलीही माहिती बेनिनयोला जेल मध्ये मिळू नये अशी विनंती करतो.
बेनिनयो जेल मध्ये आत्महत्या करतो. आपल्या मार्को ला लिहिलेल्या पत्रांत तो लिहितो की फक्त कोमात राहून अलिशियाची भेट होईल म्हणून कमीच गोळ्या खाल्ल्या आहेत पण प्रत्यक्षांत बेनिनयो मरतो.
अलिशियाच्या नृत्याच्या प्रोग्रॅम मध्ये मार्को जातो आणि अत्यंत भावुक होऊन तो तिचे नृत्य पाहतो. आणि जिथे चित्रपट सुरु झाला तिथेच संपतो.
हॉस्पिटल मध्ये होणारी लोकांची दुर्दशा आणि बलात्कार ह्या दोन गोष्टी पाहण्याचा मला विलक्षण तिटकारा आहे आणि इथे तर ह्या दोन्ही गोष्टीचा संगम असल्याने मला हा चित्रपट पाहणे खूपच जड गेले. पण "विरह" ह्या भावनेला इतक्या उत्कट पणे दाखवणारा चित्रपट माझ्या तरी पाहण्यात नाही. चित्रपट दुखान्त असल्याने हा पाहून मूड खराब होण्याचीच शक्यता जास्त असली तरी आलमडोवर ह्यांना चित्रपट जगत इतके का मानते हे चित्रपट पाहून समजते. स्पॅनिश संगीत तर अत्यंत जबरदस्त आहे. अभिनय अगदी A+. कथानक साधे सोपे असले तरी स्क्रीनप्ले खूप छान आणि एडिटिंग सुद्धा. काही जुन्या चित्रपटातील सीन्स आणि शृंगारिक सीन्स खूप छान पणे मिक्स केले आहेत. अलिशियाचा बलात्कार अत्यंत प्रतीकात्मक पद्धतीने दाखवला आहे.
ह्या चित्रपटाला बॅफ्टा आणि गोल्डन ग्लोब दोन्ही पुरस्कार (उत्कृष्ट विदेशी चित्रपट) मिळाले होते.