आजचा चित्रपट एक भारतीय चित्रपट आहे आणि तो सुद्धा मिथुनदाचा. मिथुन म्हणजे गरिबांचा अमिताभ अशीच इमेज आहे. गुंडा, लोहा, आणखीन अनेक बी ग्रेड सिनेमांचा सम्राट मिथुन ह्याला मुख्य चित्रपट क्षेत्रांत सुद्धा चांगले यश लाभले. मिथुन मध्ये अभिनय क्षमता होती ह्यांत शंकाच नाही. गुरु मधील रामनाथ गोयंका ह्यांची भूमिका माझी विशेष प्रिय मिथुन भूमिका आहे.
मिथुन ह्यांचा गुडिया हा चित्रपट जास्त लोकांनी पहिला असेल असे मला वाटत नाही. हा १००% आर्ट सिनेमा होता. ह्याचा प्रीमिअर सुद्धा १९९७ मध्ये टीव्ही वर झाला. तेंव्हा सहारा नावाचा चॅनल होता त्याच्यावर. त्याकाळी माझी बाल्यावस्था असली तरी चित्रपटाने मनावर थोडाफार परिणाम केलाच. त्याकाळी मला तो थोडा गूढ प्रकारचा चित्रपट वाटला. नंतर पुन्हा पहिला तेंव्हा समजला.
हमीद (प्राण) हा एक व्हेंट्रिलॉकिस्ट म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा मुस्लिम कलाकार आहे. त्याच्या कलेची विशेष कदर कुणाला नाही पण जॉनी मेंडिस (मिथुन) ह्या गोमंतकीय कलाकाराला हमीद कडून हि कला शिकायला मिळते. हमीद च्या बाहुलीचे नाव आहे उर्वशी. ती एक विभ्रम फेकणारी, वेड लावणारी ललना आहे. हमीद आपली कला जॉनीला चांगल्या प्रकारे शिकवतो आणि हमीद च्या मृत्यूनंतर उर्वशी जॉनी ला मिळते. जॉनी आणि उर्वशीची जोडी अत्यंत लोकप्रिय होते. उर्वशी बाहुली असली तर जॉनी साठी ते एक माध्यम आहे. उर्वशीचा आवाज जॉनीचाच असला तरी जॉनीच्या मनात उर्वशीची आपली अशी पर्सनॅलिटी असते.
रॉसमेरी ह्या खूप तरुण मुलीला जॉनी आवडतो आणि ती त्याच्या सोबत ती खूप वेळ घालवते. नंदना सेन ह्या भूमिकेत विशेष लोभस दिसली आहे. मिथुन तिच्यापेक्षा खूपच वयस्क वाटतो. रॉसमेरी जॉनीवर प्रेम करत असला तरी त्याला मात्र उर्वशी बद्दल इतके आकर्षण वाटते कि तो तिच्यांत पूर्ण पणे गुंतून जातो. ह्याच थीम वर अनेक चित्रपट बनले आहेत आणि बहुतेक वेळा "संगीत" ह्या विषयासाठी लोक आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना विसरतात असे कथानक असते पण इथे त्या जागी बाहुली आहे. माझ्या मते बाहुली थोडी "creepy" वाटते. माझ्या मते दिग्दर्शकाला सुद्धा हेच अपेक्षित असावे. पण चित्रपटांत मात्र सर्वानाच ती अत्यंत सुंदर वाटते. रोजमेरीला जॉनी चे उर्वशीवरील ऑब्सेशन अजिबात आवडत नाही पण जॉनी तिचे ऐकत नाही.
लहानपणी मला गुडिया एक गूढ चित्रपट का वाटला ह्याचे कोडे मला आता सुटले. चित्रपटांत वारंवार गुडिया बोलते आणि जॉनी अश्या प्रकारे वागतो कि जणी काही गुडिया स्वतःच बोलत आहे. तो त्या उर्वशीशी भांडतो सुद्धा. जॉनी किती उत्कट पणे आपल्या कलेच्या आहारी गेला आहे हे दिग्दर्शक दाखवू इच्छितो पण माझ्या बालमनाला ते गूढ वाटले.
चित्रपटाच्या दुसऱ्या भागांत जॉनी आणि उर्वशीची लोकप्रियता खूप वाढते आणि ते एका डांबिस नेत्याच्या नजरेत भरते. तो भरपूर पैसे देऊन जॉनी ला करारबद्ध करतो. पण ऐनवेळी उर्वशी स्टेजवर बोलण्यास नकार देते आणि शो फ्लॉप होतो. म्हणजे इथे कदाचित जॉनीने अंतर्मन त्याला उर्वशीचा आवाज काढण्यास देत नसावे.
ह्या सर्वांची परिणीती जॉनी आणि नेता ह्यांच्या दुश्मनीत होते. आता इतर कुठल्याही मिथुन चित्रपटांत मिथुन ने आपल्या करंगळीने नेता आणि त्याच्या गुंड मंडळींचे नरडे दाबले असते पण हा तसा चित्रपट नाही.
नेता दंगली घडवून आणतो आणि लोकांचा जीव जातो. जॉनी बाहुलीच्या मार्फत लोकांच्या पुढे सत्य आणू पाहतो आणि त्याचे पर्यवसान मोठया भांडणांत होऊन नेते मंडळींचे गुंड उर्वशीला तोडून फोडून टाकतात. जॉनी त्यामुळे अत्यंत दुःखी होतो आणि त्याची कलाच गायब होते.
पण रोजमेरी त्याला आधार देते आणि ती त्याचा आवाज बनते. चित्रपटाच्या शेवटी रोजमेरी त्याची गुडिया बनते म्हणजे उर्वशीची जागा घेते जी खरे तर तिने आधीच घ्यायला पाहिजे होती. जॉनी आणि रोजमेरी स्टेज परफॉर्मन्स करतात आणि तिथेच चित्रपटाचा अंत होतो.
चित्रपटांत नक्की काय आहे हे पाहिल्याशिवाय समजत नाही. चित्रपट खूप मनोरंजक आहे असे नाही किंवा डेव्हिड लिंच प्रकारे मनावर प्रभाव पाडणारा सुद्धा नाही किंवा स्टॅन्ड बाय मी प्रमाणे अतिशय हृदयद्रावक संवाद आहेत असेही नाही. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे मिथुन आणि नंदना ह्यांचा सुरेख आणि उत्कट अभिनय. प्राण आणि मोहन आगाशे ह्यांनी सुद्धा आपल्या भूमिका स्कोप नसताना सुद्धा प्रभावी केल्या आहेत पण लक्षांत राहतो तो म्हणजे मुखर्जी हे पात्र जे जॉनीला आपल्या दुर्बिणीतून तारे दाखवते.
घोष ह्यांचे चित्रपट असेच असतात. तथाकथित कलात्मक वगैरे. त्यांचा दुसरा चित्रपट मी पहिला होता तो म्हणजे नाना पाटेकर आणि रेखा ह्यांचा यात्रा.
तुम्ही गुडिया विनामूल्य youtube वर पाहू शकता. एक चांगला चित्रपट म्हणून पाहण्यापेक्षा मिथुन ह्यांचे चाहते असाल तर त्याच्या साठी पहा.