ती रात्रदेखील आजच्याच पावसाळी रात्रीसारखी होती. राम हे सर्व कथन करत होता मात्र तो खरोखरच समाधी अवस्थेत होता. त्या अवस्थेतून तो जेव्हा पुन्हा सचेतन अवस्थेत परत आला तेव्हा त्याला दिसले कि शचीदेवी समोर उभी आहे. ती किंचित घाबरलेली होती आणि आश्चर्यपूर्ण नजरेने त्याच्याकडे एकटक पहात होती. मग तिने अधिक खोदून खोदून विचारल्यामुळे रामने समाधी अवस्थेमध्ये जे काही अनुभवले ते तिला कथन केले. ते ऐकून तिचे डोळे विस्फारल्यासारखे झाले आणि तिने अडखळत अडखळत विचारले,
“वैजयंती जमीनदारीण यांना मी......सदेह रुपात माझ्या या डोळ्यांनी पाहू शकेन का?”
“हो... का नाही?” राम
“मग तर तुम्ही इकडे अमावस्येपर्यंत थांबायला हवं... अमावास्येला आणखी दोन दिवस आहेत.”
“ नाही त्या रात्री मी इकडे नाही थांबू शकत. तेव्हा मला उल्लाल मध्ये असणे आवश्यक आहे. मी वैजयंती देवीना तसं वचन दिलंय. त्या दिवशी त्या माझ्या तिकडे येण्याची प्रतीक्षा करीत असतील. ”
“असं असेल तर मग मी सुध्दा तुमच्या सोबत येते उल्लालला....”
“माझ्याबरोबर?”
“होय, तुमची काही हरकत तर नाही ना?”
“ नाही नाही. माझी काही हरकत नाही. पण तुम्ही एकदा तुमच्या पती महोदयांना विचारलेत तर बर होईल.”
“ ठीक आहे आताच विचारते”
असे म्हणून ती तडक आतल्या खोलीत गेली.
“ मी रामचंद्र भावजींबरोबर उल्लालला गेले तर तुमची काही हरकत आहे का?”
सिद्धरामय्या नुकतेच ड्युटी संपवून घरी आले होते जरा आडवे झाले होते. त्यांनी त्यांचे डोळे उघडले. नेहमीप्रमाणे त्यांचे डोळे लाललाल दिसत होते. त्यांच्या डोळ्यात नुकत्याच तोंडात टाकलेल्या अफूच्या गोळीची झिंग स्पष्ट जाणवत होती.
“काय विचारत्येsस?” जरा वैतागलेल्या स्वरात त्यांनी विचारले. तेव्हा तिने तोच प्रश्न पुन्हा विचारला.
तेव्हा त्यांना जराशी उचकी लागली. बाजूला भरून ठेवलेल्या पितळी तांब्यातून त्यांनी फुलपात्रात घोटभर पाणी ओतून घेतले. तोंड न लावता ते आपल्या घशात ओतत असताना ते हातानेच नाही म्हणाले,
“ नाही माझी काहीच हरकत नाही...गेलीस तरी चालेल.” त्यांनी फुलपात्र पुन्हा तांब्यावर उपडे ठेवत सांगितले.
क्रमश: