“तुमच्या ध्यानांत राहिले नांव. पालवणीचाच मी. त्या वेळेस घरांत कांही नव्हते खायला. पोरांची तोंडें सुकून गेलीं. माझा रामा मोठा गोड मुलगा आहे. काकडी खाऊन, भोपळ्यांची भाजी खाऊन कोठवर पोरांची भूक राहणार ? अजून शेतेंभातें पिकली नव्हतीं. भात तयार झाल्यांवर दोन भारे झोडपले असते. परंतु त्यालाहि अवकाश होता. रामजीभाईचें गांवांत कोठार. भातानें भरलेलें. काढावें कुलूप, न्यावें चार पायली भात मनांत आलें. आणि त्या रात्रीं गेलों. कुलूप तोडायची खटपट करीत होतों, अंधार होता आणि पाऊसहि आला. आकाश गरजायला लागलें मला बरें वाटलें. आवाज कोणाला ऐकायला जाणार नाही वाटलें, परंतु एकाएकीं कुत्रा भुंकूं लागला. मालकहि उठला. मी निसटलों. ‘चोरचोर’ रामजीभाई ओरडला. त्यांचा गडी उठला. कुत्रा भुंकत निघाला निघाला. आजूबाजूचे लोक धांवले. मला घेरले त्यांनीं. “कोण धर्मा, आणि तू चोरी करायला आलास?” मला म्हणाले.

“मग काय केलेंस तूं?”

“त्यांनीं त्यावेळेस मला जाऊं दिलें. मागून रीतसर खटला भरला. मला अटक झाली. लॉकपमधेंच चार महिने गेले. बायको कधीं भेटायला येई नि रडे. एकदां पोरगा रामाहि आला. गजांवर त्यांनें डोकें आपटलें.”

“तुला कां एकच मुलगा?”
“चार पोरें आहेत. रामा मोठा. त्याच्यावर माझा लई जीव. कसा दिसतो देवावाणी.”
“शाळेत जातो का तो?”

“म्हारवड्यांत शाळां नाहीं. तिकडे लांब जायला पोरे कंटाळा करतात. परंतु चार अक्षरें पोरानें शिकावीं वाटे. रामा जायला लागला होता. परंतु मला अटक झाली. त्याची शाळा सुटली. तो काम करतो. मजुरीला जातो. रानांतून मोळी आणतो. गवत विकतो. दहा बारा वर्षांचा पोर. पोरगा शिकेल वाटत होतें. आमच्या नाहीं नशिबीं, दादा.”

“स्वराज्यांत शिका सारी.”

“कधीं येणार तुमचें स्वराज्य ? आणि स्वराज्यांत तरी दाद लागेल का नाहीं कोणाला ठावं ? गरीबाला शिक्षण मिळूं नये म्हणून महागहि कराल नाहीं तर ?”

“धर्मा, असें कसें होईल? स्वराज्य म्हणजे का थट्टा ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel