रामाला थंडींतहि उठविणार्‍या त्या मातेचा दोष नाहीं. कारण नवरा तुरुंगांत. तिला घर चालवायचे. पोरांच्या तोंडांत सुका घांस घालायचा. मुलाला न उठवील, कामाला जा न म्हणेल, तर तिचें कसें चालणार ? आणि तो रामा ? तो अल्लड पोर बापाचा लाडका. तोहि एखादे दिवशीं रागावला असेल, आईला उलटून बोलला असेल. काय त्याचा दोष ? दोष दारिद्र्याचा, समाज रचनेचा, विषमतेचा. रात्रंदिवस श्रमणार्‍यांना सुखाचा नीट घांसहि मिळूं नये. काय हीं दैना ? कधीं हा घोर अन्याय दूर होईल ? केव्हां येतील समता, न्याय ?

“भाऊ, पत्र लिहितांना ?”
लिहितों हां.”

मीं सुंदर पत्र लिहिलें. ‘आईवर रागवूं नको. तिचे पाय धर पोरा, आईसारखे दैवत नाही. मी येईपर्यंत नीट नांदा. मग तुला शाळेंत घालीन. चांगला हो. पुन्हां पाप नको करूं. तुझी आई एकटी किती काम करील ? तिला मदत करा. आणि गांवांत कलागती नको करूं. लौकरच स्वराज्य येईल. आपली मानहानि थांबेल.

मी किती तरी त्या लहान कार्डांत बारीक अक्षरांत लिहिलें. धर्माला मी तें पत्र वाचून दाखविलें.
“छान लिहिलेंत पत्र तों म्हणाला.
“तुझ्या रामाला भेटायला येईन.”
“या खरेंच या.”

धर्मा गेला. मी मात्र दिवसभर विचारांत होतों. मातृप्रेम, बंधूप्रेम, पतिपत्‍नी प्रेम सारीं ही गोड प्रेमें पिकायलाहि आर्थिक परिस्थिति, बरी हवी. गरिबींत सारीं प्रेमें गारठून जातात. दारिद्र्य दुर्गुणांची जननी, हेच खरें. संस्कृति फुलायला, प्रेममय संबंध वाढायला सांसारिक सुस्थितीही हवी. आणि हें सारें करायचे म्हणजे समाजवाद हवा. अशा विचारांत मी होतो.

“कसला चलला आहे विचार ?” कोणीं विचारलें.
“समाजवादाशिवाय तरणोपाय नाहीं.” मी म्हटलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel