बळवंतराव व चित्रा, महंमदसाहेब व फातमा ही बोलत बसली होती. गावचे काही प्रतिष्ठित लोक तेथे बसलेले होते. बोलता बोलता धर्माच्या गोष्टी निघाल्या. ‘महंमदसाहेब, तुमचे बाकी धाडस आहे. फातमाला  तुम्ही मोकळेपणे मुलांच्या शाळेत शिकवता, याचे कौतुक वाटते.’ बळवंतराव म्हणाले.  ‘रावसाहेब, तुम्ही तुर्कस्तानात जाल तर चकित व्हाल. जगात कोठेही नाही इतके स्त्रीस्वातंत्र्य तेथे आहे. तुर्की असेंब्लीत जितक्या स्त्रिया आहेत, तितक्या स्वातंत्र्याचे माहेरघर समजले जाणा-या अमेरिकेच्या सेनेटमध्येही  नाहीत. केमाल पाशाने ही क्रांती केली.’

‘परंतु तुम्हा मुसलमानांस हे आवडते का? हिंदी मुसलमान केमालचे कौतुक करतील, परंतु आपल्या स्त्रियांना जनानखान्यात, पडद्यात ठेवतील.’ बळवंतराव म्हणाले.

‘मला माझ्या धर्मबंधूची कीव येते. पैगंबरांचा थोर संदेश अद्याप आम्हाला समजला नाही. ज्ञानाला पैगंबर फार मान देत. पैगंबरांची मुलगी फातमा कुराणावर प्रवचन करी. हुतात्म्यांच्या रक्तापेक्षाही नवीन ज्ञान  देणारी शाईची एक ओळ अधिक महत्वाची आहे असे पैगंबर म्हणत. रात्रंदिवस नमाज पढणा-यांपेक्षा सृष्टीचे गूढ उकलणारा, सृष्टीचे नीट परीक्षण करणारा, निसर्गाचा अभ्यास करणारा अधिक धार्मिक होय असे पैगंबर म्हणत. पैगंबरांचा संदेश पहिली तीनचारशे वर्षे आम्ही ऐकला व इ. सनाच्या ७ व्या ते १० व्या शतकापर्यंत ज्ञानात आम्ही अग्रेसर होतो. प्रचंड विद्यापीठे आम्ही स्थापिली, सर्व शास्त्रांत शोध लावले. रावसाहेब, इस्लामी धर्मातील ती तेजस्वी ज्ञानोपासना आमच्यात केव्हा सुरू होईल ते खुदा जाणे.’

‘स्त्रियांच्या बाबतीत पैगंबरांची दृष्टी कशी होती?’ ‘अत्यंत उदार होती. स्वर्ग जर कोठे असेल तर तो मातेच्या चरणी आहे असे ते म्हणत. स्त्रियांना त्यांनी वारसा हक्क दिला. त्यांना काडीमोडाची परवानगी दिली. पैगंबरांनी त्यांच्या काळात अरबस्तानातील परिस्थिती लक्षात घेऊन खरोखरच किती तरी केले.’

‘परंतु त्यांनी बहुपत्नीकत्वाची चाल ठेवली.’ ‘त्याचे कारण आहे अरबस्तानात स्त्रियांची संख्या जास्त होती. शिवाय युद्धकैद्यांच्या स्त्रियांचे काय करायचे हाही प्रश्न असे. त्यांना गुलाम करण्यापेक्षा पत्नी म्हणून करून घेणे अधिक भूतदयेचे असे. असे अनेक प्रश्न त्या काळातील अरबस्तानात होते; परंतु तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की, पैगंबरांनी कुराणात स्वच्छ सांगितले आहे की, ‘चार बायकांची मर्यादा ठेवा.’ एवढेत नव्हे, तर ते पुढे म्हणतात, ‘एकच करणे अधिक श्रेयस्कर.’  ‘परंतु काय हो महंमदसाहेब, पैगंबरांनी तर खूप लग्ने केली.’

‘त्या लग्नांकडे निराळ्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. लक्षात ठेवा की, पैगंबरांची पहिली पत्नी खदिजा जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत त्यांनी दुसरी बायको केली नाही. ते तर केवळ भोगासक्त असते तर ते इतकी वर्षे असे एकपत्नी राहाते ना. खदिजेच्या मरणानंतरची पैगंबरांची लग्ने ही अरबी भांडणे बंद करण्यासाठी होती. निरनिराळ्या जाती, वंश, कुळे यांत भांडणे असत; परंतु पैगंबरांनी त्या त्या कुळांतील एखाद्या स्त्रीशी लग्न केले, म्हणजे आपोआप भांडणे थांबत. कधी धर्मांच्या कामी मरण पावलेल्यांच्या पत्नीचा तिच्याशी लग्न करूनच ते अधिक सांभाळ करू शकत. रावसाहेब, महापुरूषांची लग्ने कधीकधी त्या स्त्रीच्या रक्षणार्थ केवळ असतात. त्यात कामुकता नसते. पैगंबर जर असे विषयासक्त असते तर त्यांचा त्यात प्रभाव पडता का? आज तेराशे वर्षे पैगंबर कोट्यवधी लोकांच्या हृदयाचे सम्राट आहेत, तसे राहाते का? कोणा भोगी किड्याने कोट्यवधी जनतेला शेकडो वर्षे मार्गदर्शन केल्याचे आहे का उदाहरण?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel