चारूची आई दुस-याच दिवशी एकदम घरी गोडगावाला जायला निघाली. माहेरी चित्राचा काटा काढायलाच ती गेली होती. ते काम झाले. इकडे चारूला कळवणे जरूर होते. त्याने डोक्यात राख घालू नये म्हणून त्याची समजूत घालणे आवश्यक होते.

एके दिवशी अकस्मात चारूची आई घरी आली; परंतु बरोबर चित्रा नव्हती. ‘आई, तू एकटीशी आलीस? चित्रा कोठे आहे? तिचे दोन दिवसांपुर्वीच पत्र आले की ‘न्यायला या’ आणि आज तू एकटी कशी आलीस? चित्रा, कोठे आहे? बरी आहे ना माझी चित्रा, खुशाल आहे ना? आई, सांग लवकर. मला धीर नाही निघत.’

‘बाळ, चित्रा गेली.’

‘काय? चित्रा गेली? काय झाले तिला? आई, एकदम कशी गेली? अरेरे!’

‘रडू नकोस. चित्रा, गेली म्हणजे जगातून नाही गेली. ती मेली नाही. मरती तरी बरी; परंतु तोडांला काळे फासून गेली. कोणा रंगेलाचा हात धरून गेली. कोणी तरी तिला दिला पट्टी. गेली त्याच्याबरोबर. मला पहिल्यापासूनच असे वाटत होते. मुसलमानांशी हिची मैत्री आणि मुलगीही निर्लज्ज. पहिल्या भेटीतच मळ्यात लागली तुझ्याबरोबर हसायला, बोलायला. तू तेव्हाच पारख केली पाहिजे होतीस. आम्ही बायका शितावरून भाताची परीक्षा करतो. तू ऐकले नाहीस. आता भोगा फळे.’

‘आई, काय तू बोलतेस?’

‘खरे ते बोलते. मला खोटे सांगून काय करायचे आहे? तुझा आनंद तो माझा. आमचा एकुलता एक मुलगा तू. तुझे वाईट व्हावे असे का तुझ्या आईला वाटेल? मी इतकी का नीच असेन? चित्राविषयीचा तिटकारा मी जिंकला. तुला ती आवडते म्हणून शेवटी तिच्यावर मी प्रेम करू लागल्ये. तिला माझ्या माहेरी नेले; परंतु तेथे तिने हा चावटपणा केला. कशी मी तेथे राहू? कसे त्या गावात तोंड बाहेर काढू? चारू, मला देवाचेच काही हेतू दिसतात चित्राजवळ लग्न होऊन इतके दिवस झाले. तुला मुलबाळही झाले नाही. तीही
बाहेर पडली. तिच्याशी तुझ्या नकोच संबंध, तिच्या द्वारा नको आपला वंशतंतू राह्यला, असे देवाच्या मनात असावे. मी सांगू का, ती माझ्या मैत्रिणीची मुलगी अद्याप लग्नाची आहे. जणू तुझ्यासाठीच देवाने तिला अद्याप अविवाहीत ठेवले आहे. काही तरी अडचण येते व तिचे लग्न मोडते. तुझीच ती आहे. लहानपणापासून तुझ्या आईने जे योजले तीच जणू देवाचीही योजना होती. तू माझे ऐक. जाऊ दे ती चित्रा चुलीत. तिच्या बापाला एक पत्र टाक. मोकळा हो. दुसरे लग्न कर. माझ्या मांडीवर नातवंड दे हो चारू.’

‘आई, मला जगावेसे वाटत नाही. चित्रा माझ्या जीवनाचा आधार होती. किती तिचे माझ्यावर प्रेम! काही तरी घोटाळा आहे. आई, मनात येते की, तुझे व त्या तुझ्या मैत्रिणीचे हे कारस्थान आहे. त्या मुलीची घोरपड माझ्या गळ्यात बांधण्यासाठी तुमचे हे उद्योग आहेत. चित्राला तिकडे नेता यावे म्हणून तू एकदम खोटे वरपांगी प्रेम तिच्यावर करू लागलीस. त्या कोणा पुत्रदादेवीची कथा रचलीस. तिला नवस केला म्हणजे मुलगा होतो, असे त्या भोळ्याभाबड्या मुलीच्या मनात  भरवलेस. आई, सारे तुझे कारस्थान. तू माझी जन्मदाती; परंतु माझ्या मनात असे येते खरे. मी जातो, चित्राचा शोध करायला जातो. तिच्या आईबापांस मी काय सांगू? अरेरे, चित्रा, कोठे आहेस तू? आई, तिला मारलीत तर नाही? विहिरीत तर नाही ना लोटलेत? विष नाही ना दिलेत? खड्डयात नाही ना लोटलेत? कड्यारून नाही ना लोटलेत? आई, माझी चित्रा दे. तू माझी चित्रा चोरली आहेस. चित्रा दे, नाही तर तुझा मुलगा मेला असे समज. नको हे घर, ही जहागीर. दे, चित्रा नाही म्हणजे काही नाही. अकपट प्रेमळ मुलगी. म्हणे एकदम कशी तुझ्याजवळ बोलली! आई, आमची जणू शतजन्मांची ओळख होती असे वाटले. माझ्या प्राणांना तीच जणू दुरून पोषीत होती आणि शेवटी मला शोधीत त्या मळ्यात आली. हृदयाची भाषा तुला काय कळे! आई, चित्राविषयी खोट्या कंडया नको उठवू. शपथ आहे तुला. मी चालता होतो. चित्रा सापडली तर घरी परत येईन, नाही तर जीव देईन. प्राण नाही देववला तर कोठे हिमालयात निघून जाईन. हा माझा शेवटचा प्रणाम. बाबांना सांग. तेही बाहेरगावी गेले आहेत. त्यांना सांग की चारू गेला. चित्राला शोधायला गेला. माझी चित्रा मला सापडेल. तरीच बुधवारी मला सारखे रडू येत होते आणि चित्रानेही पत्रात तसेच लिहिले आहे. आमची दोघांची हृदये एक आहेत, याचा हा घे पुरावा. एकाच दिवशी आमच्या हृदयांस हुरहुर लागली होती. अशी माझी चित्रा, ती का कोणाचा हात धरून जाईल? आई, केवढे कुंभाड तू रचीत आहेस? निष्पाप व निर्मल मुलीला तू कलंक लावू पाहात आहेस. आई, हे पाप, घोर पाप आहे. कोठे हे फेडशील? अरेरे! चित्रा, कोठे असशील तू? टाहो फोडीत असशील, रडत असशील. कोठे तुला पाहू, कोणाला विचारू, कोठे शोधू? आई, प्रणाम. चालला हो चारू.’ आणि चारू. खरेच घर सोडून निघून गेला. त्याने चित्राच्या वडिलांना पुढीलप्रमाणे पत्र लिहिले-

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel