१८४७
श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले, उदात्त, व
भगवंताच्या प्रेमाने न्हाऊन निघालेले वाटते.
श्री जसजसे मोठे होऊ लागले तसतसे त्यांचे खाणे-पिणे, निजणे, उठणे, स्नान करणे कपडे घालणे इ. सर्व गोष्टी आजी-आजोबाच करू लागले. रावजी एकनिष्ठपणे आपल्या उपासनेत व देवपूजेत मग्न असायचे. संतती व संपत्ती यांनी युक्त असतानाही रावजी कोणत्याही स्थितीत मनाने निश्र्चल रहात. अशा पित्याच्या पोटी जन्मलेले पुत्ररत्न किती योग्यतेचे असेल ? लिंगोपंतांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वापुढे रावजींचे संपूर्ण जीवन शांत व अप्रकाशित राहिले. ते निरंतर उदासीन असत. आपल्या पत्नीचे कर्तृत्व, उदारपणा व लोकांना सदैव मद्त करण्याची तिची प्रवृत्ती इ. गोष्टींचा त्यांना फार अभिमान वाटे. आपल्या चिरंजीवाच्या अंगचे लहानपणापासून दिसणारे दैवीगुण व परमेश्र्वराविषयी मुलाचे वाढते प्रेम व विलक्षण ओढ याचे त्यांना मनापासून कौतुक वाटे. पण त्यांचा स्वभाव भिडस्त व अंतःर्मुख असल्याने त्यांनी लोकांपुढे फारसे तसे प्रदर्शित केले नाही. आपल्या कर्तृत्ववान पुत्राल साजेल असेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. ’शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी ’ या उक्तीप्रमाणे रावजीचे निर्मळ जीवन अतिशय शुद्ध व सोज्वळ होते. श्रीमहाराजांच्या पुढील कर्तृत्वाचे ते एक आधारभूत अंग ठरले असे म्हणावेसे वाटते. लिंगोपंतांसारखे आजोबा व रावजींसारखे वडील यांच्या गुणवैशिष्टयांचा सुरेख संगम श्रींच्या आयुष्यात झालेला दिसून येतो. त्यामुळे श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले, अतिशय उदात्त व भगवंताच्या प्रेमाने न्हाऊन निघालेले असे वाटते. एखादे वेळेस बाळ आक्रोश करी, पंत घाबरून जात आणि अंगारा धुपारा लावण्याविषयी इतरांची धावपळ सारखी सुरू होई. परंतु रावजींचे मन किंचितही गोंधळत नसे. त्यांचे एकनिष्ठपणे व शांत चित्ताने देवतार्चन सुरूच असायचे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel