हुतात्मा जतीनदास

१३ सप्टेंबर १९२९. आठवतो तो तुम्हाला दिवस ? तो कसा विसरुं शकाल ? तो रक्ताचा नि अश्रूंचा दिवस. महान् बलिदानाचा तो दिवस. त्या दिवशीं दुपारीं १ वाजता जतीनदास ६१ दिवसांचा उपवास करुन देवाघरीं गेला. भगतसिंग क्रांति-कामासाठीं तरुण मिळवायला कलकत्त्यास आले होते. त्यांना बटुकेश्वर दत्त आणि जतीनदास मिळाले.

१९२८ मध्ये कलकत्त्यास काँग्रेस भरली होती. जतीनदास स्वयंसेवकांच्या तुकडीवर अधिकारी होता. सुभाषबाबूंचा तो उजवा हात होता. पुढें लाहोरच्या कटाच्या धरपकडींत त्यालाहि अटक झाली. राजकीय कैद्यांना नीट वागवण्यांत यावें म्हणून अन्नसत्याग्रह सुरु झाला. त्यावेळेस भगतसिंग दूरच्या एका तुरुंगांत होते. जतीनदास प्रथम सामुदायिक अन्नसत्याग्रहाच्या विरुध्द होते. कारण बळजबरीने अन्न घालण्यांत येतें. सत्याग्रहाची विटंबना होते. परंतु जतीनदासहि उपवास करु लागले;  ते एनिमाहि घेत ना. शेवटीं भगतसिंगांना लाहोर जेलमध्यें आणण्यांत आले. त्यांनीं जतीनदासांना एनिमा घ्या सांगितलें. कोणाचें न ऐकणा-या जतीनदासांनी ऐकलें.

अधिका-यांनी विचारलें इतरांचें ऐकलेंत नाही. “भगतसिंगांचेंच का ऐकलेंत?”  जतीनदास म्हणाले “भगतसिंगांची योग्यता केवढी आहे ते तुम्हाला माहीत नाही. त्यांचा शब्द कसा मोडूं ?”

पुढे भगतसिंगांनी जतीनदास सुटावेत म्हणून राजकीय कैद्यांच्या चौकशी समितीला सांगितलें. परंतु कोणतीहि अट मान्य करुन तें सुटायला तयार नव्हते. सुभाषबाबूंनीं त्यांच्या तसें करण्यास संमति कळविली होती. भाऊ व वडील अट पत्करुन सुटणें नको म्हणाले.

जतीनदासनें सक्तीचें अन्न नाकारलें. सात आठ जण छातीवर बसले. डॉक्टरने नळी नाकांत घातली. जतीनदास खोकला. दूध फुफुसांत गेलें. फफुसें बिघडलीं. डॉक्टरांना पुन्हां सक्तीनें घशांत दूध वगैरे दवडणें अशक्य झालें. दिवसेदिवस जतीन अशक्त झाला. तिळतिळ तो मरत होता. हात हलवेना. पापणी हलवेना.
सरकारनें बाहेर दवाखान्यांत नेऊन कोणाचा तरी खोटा जामीन घेऊन त्याला सोडण्याचें ठरविलें. ते पहा अधिकारी स्ट्रेचर घेऊन आले.

जतीनदासाच्या खोलींतील क्रांतिकारी म्हणाले, “आमच्या मुडद्यावरुन त्यांना न्यावे लागेल.”
जतीनदासानें खूण करुन अधिका-यांना सांगितलें, “मी विरोध करीन.” 

या झटापटींतच हृदय थांबेल अशी भीति अधिका-यांस वाटली. ते गेले. आणि मित्र जतीनदासाच्या मरणशय्येभोवतीं बसले. त्यानें सर्वांचे हात सर्वशक्ति एकवटून हातांत घेतले.

अधिका-यांनीं सर्व क्रांतिकारकांना कम-यांत नेले. शूर जतीन आतां तेथें एकटा होता.
भारतमातेचा त्यागी सुपुत्र ! दुस-यांना नीट जगता यावे म्हणून मरणारा !  राजकीय कैद्यांचे हाल बंद व्हावेत म्हणून अग्निदिव्य करणारा जतीन !

१३ सप्टेंबर १९२९ !  दुपारची एक वाजायची वेळ आणि हा हुतात्मा देवाघरीं गेला.
त्याची स्मृति अखंड स्फूर्ति देत राहील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel