ओंकार दिलीप बागल
गेहलोत इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,कोपरखैरणे.
bagalomkar2@gmail.com

एका घनदाट अरण्यात खूप सारे प्राणी-पक्षी राहत होते. सर्व जण गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत आयुष्याचा मनमुराद आनंद घेत असत.जंगलातील एका झाडावर पोपटाचे एक जोडपे घरटे करून राहत होते. त्या घरट्यात एका नाजूक पिलाचा जन्म झाला.जंगलातील पक्षी एकत्र आली आनंदोत्सव करू लागली. त्याच्या बारशाच्या दिवशी चिऊताईने कानात चिव-चिव करून त्याचे नाव ठेवले, "मिठू".

हा मिठू लहानपणापासूनच फार हुशार. सर्वांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून दाखवी. शेजारीच घरट्यात राहत असलेले कावळेकाका तर रोज मिठूचा जणू रियाजच घेत असत, " मिठू , कावळेकाका म्हणं बरं, कावळेकाका." जे जे कोणी जे काही म्हणायला सांगेल तो हा मिठू बोलून दाखवायचा. म्हणूनच तर त्याचे नाव मिठू ठेवले असावे. कधी कधी तर चिमणी ताई येई आणि त्याला "चिऊताई चिऊताई " कविता म्हणून दाखवी आणि मग आई त्याच्याकडून ते तोंडपाठच करून घेई. मिठूच्या बाबांनी त्याला पक्षी-शाळेत घालायचे ठरवले. लहानपणापासूनच पोपटपंची करण्यात त्याचा हातखंडाच होता ना, चांगला शिकला तर मोठ्या शहरात जाऊन तिथे उडेल ,हे त्या मागचे प्रमुख कारण असावे. कोवळ्या वयातच मिठू पक्षी-शाळेत दाखल होतो. इथूनच तर त्याच्या पंखांत बळ येणार होतं, आकाशात उंच अशी गगनभरारी घेण्यासाठी.

मिठू बोलण्यात खूप पटाईत आणि हजरजबाबी होता. त्याची सवांदकौशल्ये पक्षीमात्रांत अतिशय सुरेख होती. भाषेत नम्रता, उच्चारांत स्पष्टता याचीही कमी नव्हती. मात्र राघू गुरुजींनी काही नवे पाठ शिकवायला सुरुवात केली. "मी काही बोलून दाखवतो, ते सर्वांनी नीट ऐकून घ्यायचे. मग नंतर मुळाक्षरे आली ती पाठ करायची आणि उद्या म्हणून दाखवायची -राघू गुरुजी". अर्धवट आणि अढखळत का होईना, तो बोलू लागला. जे बोलायला लावायचे ते तो बोलायचा. स्वतः काही बोलायला शिकण्याची त्याची सवय कमी व्हायला लागली. गुरुजींनी जे बोलायला सांगितलं आहे तेच बोलणे त्याला जमेनासे होत होते. त्याच वेळी, तेच शब्द बोलणे त्यास खूप अवघड होत होते. मात्र तरीही बुद्धी तल्लख असल्याने तो हे सुद्धा अवगत करत गेला आणि शिकत राहिला. ते सर्व शब्द तो खडानखडा बोलायचा. कारण त्याची आई म्हणायची, "तो तोता बघ किती लवकर शब्द बोलतो, एकदा शब्द ऐकवला कि लगेच मागेमागे बोलायला लागतो आणि एक तू आहेस किती वेळा एकच शब्द सांगितलं तरी तुला आठवत नाही." अक्षरे, शब्द, वाक्ये असे करत करत एक एक इयत्ता तो पास होत गेला ते ही उत्तम गुणांनी. जो सर्वांत जास्त पोपटपंची करणार त्याला जास्त गुण मिळत असतं. परंपरागत पक्षी ज्ञान असेच असते आणि सर्व पक्ष्यांनी असेच शिकायचे असते .शिवाय मिठू हा पोपट या पक्षी जातीचा असल्याने मिठूला हेच करावं लागणार होतं. जसे जसे मास्तर बोलत गेले तसे तसे मिठू बोलायला शिकला. अशा प्रकारे मिठू हळूहळू त्याची कौशल्ये विसरत गेला. त्याच्याकडे स्वतःचे असणारे कला-गुण तो साफ विसरूनच गेला जणू. असे होत राहिले आणि छोटा मिठू आता पोपट बनला होता.

मिठू आता या पोपटपंची करुन मिळवलेल्या गुणांच्या जोरावर  पुढील शिक्षण (करियर बनवण्यास) घेण्यास सज्ज झाला होता. मात्र कोणत्या क्षेत्रात करायचं हा मोठा प्रश्न होता. मिठूचा वडील म्हणजे श्री. पोपट यांना बरेच जण मिठूच्या पुढील शिक्षणाबाबत सुचवू लागले . दोघेही जंगलात सैर करण्यास निघालेले असतात ,तेव्हा त्यांना सुतार पक्षी एका झाडावर बसलेले दिसतात. त्यांनी मिठू आणि श्री. पोपट याना सांगितले, " मिठूला उत्तम गुण आहेत शिवाय त्याच्याकडे वक्र लालसर चोच आहे, तर तो सुतारकाम यात त्याचे पुढील शिक्षण घेऊ शकतो.हे खूप नावाजलेले क्षेत्र देखील आहे ." मिठूला सुतारकाम विलक्षण आहे असे भासते . मग दोघेही तिथून निघतात आणि उडत उडत एका झाडावर विसावा घेण्यासाठी थांबतात . आणि पाहतात ते काय सुगरण (विणकर पक्षी) घरटे बांधत असतो. इतके सुंदर घरटे पाहून काही कालावधीतच ते मोहित होऊन गेले. सुगरण त्यांना सांगते " मिठूला जसे गुण आहेत तर तो हे काम निष्णातपणे करू शकतो , या क्षेत्रात फार संधी उपलब्ध आहेत." पुन्हा काही  कालावधीने दोघेही तिथून निघतात आणि उडत उडत जातात. त्यांना कुठून तरी मंजुळ आवाज कानी पडतो आणि ते त्या दिशेने उडत उडत एका झाडावर येऊन बसतात. कोकिळा खूप सुंदर असे गाणे म्हणत होती. तिच्या कंठातून निघणारे स्वर दोघांच्याही

कानाला मंत्रमुग्ध करीत होते. कोकिळेने सांगितले, "याला त्याच्या बोलण्याच्या विषयात उत्तम गुण आहेत तर तुम्ही त्याला आमच्या क्षेत्रात (संगीत) का नाही प्रवेश घेत. या क्षेत्राला पक्षी जगात फार मागणी (scope) आहे." हे ऐकून दोघेही पुन्हा उडत उडत जातात . काही वेळाने दोघेही त्यांच्या घरी येतात. अशा तऱ्हेने घरट्यात मिठूच्या शिक्षणक्षेत्राच्या निवडीबाबत चर्चा चालू असते. त्याला सर्वच क्षेत्र आवडलेली असतात आणि काय करावे हा मनात संभ्रम चालू असतो. सर्व मिळून एक निर्णय घेतात आणि वरीलप्रमाणे (अबक) शिक्षणक्षेत्रात मिठूला प्रवेश मिळवून देतात. मिठूचे शिक्षण पूर्ण होते. बरेच महिने उलटून जातात, वर्षे निघून जातात आणि कालांतराने पाहतो तर काय, मिठू पक्षी-दुकानात एका घरट्यात बंदिस्त असतो. कोणी ग्राहक त्यास विकत घेण्यास तयार नव्हता. ग्राहकांच्या मते, मिठूच्या बोलण्यात अस्पष्टता आहे, तो फार काळ कमी वेळ माणसांसोबत सवांद साधू शकतो.किती तरी काळ तो तिथेच बंद पिंजऱ्यात कोंडून होता आणि किती वेळ तो तिथेच राहणार आहे ? काय होईल त्याचं? काही माहित नाही.

याबद्दल सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा. घोकंपट्टीला किती महत्त्व द्यायचे हे आपणच ठरवायचे आहे. आपल्या अभ्यासातील चुका स्वत: सुधारत राहावे आणि निरंतर पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावा. आपल्यात काय आहे याचा सखोलपणे अभ्यास करावा. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel